Wednesday, December 23, 2009

बहर

नुकताच इथे वळवाचा पाऊस पडून गेला
पाहून बहर परवाचा पाऊस पडून गेला

झाडांच्या हिरव्या फांद्या
शेवाळ मखमली शाली
झाडांची पाने हिरवी
पानांवर निथळे पाणी
देठांशी ओल्या, उरल्या
झाडे ती हिरवी झाली

सर ती सरता सरता
झरली, फुले बरसली
झाडे हरता हरता
माती अशी बहरली

पाऊस येतो आणि माती अत्तर अत्तर
पाऊस जातो आणि माती पत्थर पत्थर

झाडांचे बहर मनस्वी
पाऊस येतो. जातो.

Tuesday, November 10, 2009

आमचाही अग्रलेख

राजपूर्व ४६ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्रराज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील कालचा दिवस सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवला पाहिजे. (आम्ही इ.स. २००६, मार्च ही राजकालगणनेची सुरुवात विकीपिडियाच्या आधारे मानली आहे. हे कुठेतरी कोणीतरी कृपया नोंदवून ठेवा. उगाच ४०० वर्षांनंतर तारखा-तिथींचे अनौरस गोंधळ नकोत.) उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी राज्यांच्या विधिमंडळांत होणारे देदीप्यमान सोहळे मुंबईतही होताना पाहून आम्ही धन्य जाहलो. तेथील आमदारांनाही लाजवेल असा मराठीजनांचा आविष्कार पाहून आमची छाती अभिमानाने भरून आली आहे. ‘अब दिल्ली दूर नहीं’ हा राष्ट्रभाषेत वाटणारा विश्वास लपवून आम्ही ‘घोडा मैदान जवळ आहे’ असा राज्यभाषेतील विश्वास याप्रसंगी जाहीर व्यक्त करत आहोत. ह्या विश्वासाचे पानिपत होऊ नये अशी श्रींनी इच्छा ठेवल्यास बरे होईल. "श्शी! एक जण हिंदीत बोलायला कबूल नाही. नुसतं तमिळ. त्याचं आम्हांला कळेना नि आमचं त्याला. नुसता सावळा गोंधळ. नि सगळ्यांना येत नाही, असं नाही हं. पण डामरटपणा बघा, मुद्दामून बोलत नाहीत." अशी वाक्यं मराठी व महाराष्ट्राबद्दल दिल्लीत बोलली जातील, तो सुदिन उजाडण्याची आम्ही चातकासारखी वाट पाहत आहोत. कालनंतर मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता इत्यादींच्या उज्ज्वल भवितव्याची आम्हांला खात्रीच पटली आहे. ह्याहून अधिक स्पष्ट शब्दांत आम्हांला आमचा आनंद व्यक्त करता येणार नाही. महाराष्ट्रातील तमाम संपादकांना तो इतक्या स्पष्ट शब्दांत का व्यक्त करता येऊ नये, ह्याचं आम्हांला आश्चर्य वाटतं. म्हणजे ते कुणासाठी मनसेला मारल्यासारखं करतात, हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे. आधी उगाच ताकाला जाऊन भांडं लपवायचं नि मग मनसेच्या आमदारांनी मराठी असून अडचणीचे प्रश्न विचारल्याबद्दल जाब विचारला की भोकाड पसरायचं, ह्याला काय अर्थ आहे?

बिच्चार्‍या शिवसेनेचं कसं होणार, असे लांब चेहरे आम्हांलाही करता येतील. दहशत, राडे अशा प्रकारांना आमची ना नाही, पण ते आम्ही करू, तुम्ही काय म्हणून? असा सूर आम्हांलाही लावता आला असता. पण आम्हांला काही शिवसेनेने राज्यसभेवर पाठविलेलं नाही. म्हणून सर्व प्रकारच्या दहशतीचं आम्ही खुल्या दिलाने स्वागत करतो. एक दहशतवादी द्विपक्षीय व्यवस्था येथे निर्माण व्हावी ह्या व्यापक दृष्टिकोणातून पाहता भारतीय राजकारण योग्य दिशेने जात असल्याचेच ते द्योतक आहे. अबू आझमी हेसुद्धा कसे दोषी आहेत, हे सगळं त्यांनीही कसं मुद्दामूनच केलं, असा उफराटा प्रचार आम्हांलाही करता आला असता. पण राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक फाडू पाहणार्‍या ह्या व्यक्तीचे नि आमचे संघर्षाचे मार्ग एकच आहेत. त्या साधनांशी आम्हांला अशी प्रतारणा करता येणार नाही. त्यांनी केलं तेही योग्यच होतं. मनसेला दिलेल्या संधीबद्दल त्यांचं नि त्याचं सोनं केल्याबद्दल मनसेचं पुन्हा एकदा जाहीर अभिनंदन. आम्ही एका तटस्थ भूमिकेतून नरो वा कुंजरो वा अशीही भूमिका घेऊ शकलो असतो. पण पुन्हा तेच. हत्तीलाही एकाधिकारशाहीचं वावडं नसल्यामुळे उगा त्यांना कशाला मध्ये आणा? रीतसर लोकशाहीच्या र्‍हासाबद्दल आम्हांलाही गळे काढता आले असते. पण आम्हांला हे ‘मनसि एकद्‍ वचसि अन्यद्‍’ असलं जमत नाही. आम्हांला मन से मनसेचं प्रेम आहे व ते आम्ही सरळ मान्य करतो. मनसेचं सभासदत्व घेण्याचाही आमचा मानस आहे. "तुमच्या मानसला मनसे जॉइन करायचंय का?" असं जर त्यांनी आम्हांला विचारलं नसतं, तर आम्ही एवाना ते घेतलंही असतं. पण तरीही आमचा अजूनही मानस आहे. लोकांचा विश्वास बसत नाही. कित्तीही समजावलं तरी. "अरे, वाट्टेल ते करायचं. नाही पटलं, तर धरा नि हाणा. पुढे तर सगळ्या मावळ्यांना बंदूक बाळगायचीही परवानगी मिळते की नाही बघ. काहीच विचार करायचा नाही. नो टेन्शन, मज्जानी लाइफ़. अमेरिकन ड्रीम साकारतंय भौ, आहात कुठे?" असं सांगितल्यावर काहींना ते कूल वाटू लागलंय नि आम्हांला लय गार.

ह्या दिलखुश प्रसंगानंतर आजचा लेख लिहिताना आम्ही भावनेच्या भरात जरा भरकटण्याची शक्यता आहे. अग्रलेख आहे हा, साधंसुधं लिखाण नव्हे, हे भान राखलं पाहिजे आम्हांला. त्यामुळे लोकशाही, स्वातंत्र्य इ. रोजच्या गोष्टी राहू देत; राजकीय भूतभविष्याचा विविधायामी वेध घेतला पाहिजे. अबू आझमी ह्यांना वाचविणार्‍या मीनाक्षीताईंना पाहून राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक सादर करणारे तत्कालीन विधी व न्याय मंत्री आणि त्यांच्याभोवती कडं करून त्यांच्या हातातल्या विधेयकाला अबू आझमींपासून वाचविणार्‍या कॉंग्रेसच्या महिला खासदार आम्हांला आठवल्या. भविष्यात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक येईल तेव्हा ते फाडायला अबू आझमी तेथे कदाचित नसतील, पण जे असतील त्यांना देवाने एवाना सद्‍बुद्धी दिली असेल, असे आम्ही गृहीत धरतो. महिला आरक्षण विधेयक आता तरी विनासायास लोकसभेत मांडता येईल. एकट्या मीनक्षीताईंना पाहून अजून काही महिला आमदार असत्या, तर झाला प्रकार टाळता आला असता काय? असा एक विचार सत्ताधारी बाकांच्या मनात शिरेल व निदान असा विचार करून तरी महिला आरक्षण विधेयक संमत होईल, असे आम्हांस तेव्हा वाटले. (आम्ही तसे पुरोगामी आहोत. प्रश्नच नाही.) पण त्यांनाही धक्काबुक्की करून मनसेने तो युक्तिवाद खोटा ठरविल्यामुळे आम्ही खजील झालो आहोत. पण धुडगूस घालण्यामध्येही मनसेने जपलेली लिंगभाव समानता पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. अशीच जाणीव समाजात रुजण्याची नितांत गरज आहे. मग महिला आरक्षण विधेयकाची जरूरच भासणार नाही. शिवाय विरोधी बाकांवरच जर एवढी जाणीव असेल, तर महिलांवरील अत्याचार हा सरकारला कोंडीत पकडणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होणारच नाही. आबांचं केवढं काम कमी होईल अशाने. आता त्यांना मनसेच्या वाढीमध्ये रीतसर लक्ष घालण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. ह्या प्रसंगानंतर शिवसेनेने हाय खाल्ली नि एकनाथ खडसे हे अनभिषिक्त विरोधी पक्षनेते झाले असे म्हणतात. ह्याची परतफेड म्हणून भाजपा मनसेचे कसे आभार मानतो, हे पाहणे रंजक ठरेल. (मराठी वृत्तवाहिन्या पाहत चला. अशी वाक्यं सहज फेकता येऊ लागतात.) इ.स. २०६० अर्थात राजे ५४ मध्ये महाराष्ट्र राज्याची शताब्दी साजरी होईल, तेव्हा आजच्या दिवसाला तेव्हाचा महाराष्ट्र नवनिर्मित महाराष्ट्राची गुढी उभारली गेली, तो दिवस, ह्या शब्दांत गौरवेल, ह्याची आम्हांस खात्री वाटते.

आमचा एक चिंतनशील मित्र तमाम मराठी वृत्तपत्रांनी ह्या घृणास्पद कृत्याबद्दल एवढे मवाळ अग्रलेख का लिहिले, म्हणून सचिंत दिसला. आम्हांला तर काहीच निंदनीय दिसत नव्हतं. आम्ही आता मराठीच्या फूटपट्टीवर त्याची उंची मोजून पाहणार आहोत. दादरहून पट्टी मागविली आहे. उद्याच्या राड्यांतून लोकल बचावल्या तर उद्याच ती आम्हांस मिळेल म्हणतात. "तुमची मुले इंग्रजी माध्यमांत शिकतात, हे कसे?" असे आचरट प्रश्न पत्रकार का विचारत होते, हेही त्याला उमगेना. ह्या बाबतीत आम्ही त्याच्याशी सहमत होतो, पण का ते आम्हांलाच कळत नव्हतं. म्हणून आम्ही खुलासा मागितला. तेव्हा त्याने पुढील अवतरण दिले. त्यातील विरामचिह्णांचा गुंता तुम्हींच निस्तरा. तो म्हणाला, "ज्याप्रमाणे धर्मनिरपेक्षता व धार्मिक/आस्तिक असणे/नसणे ह्या स्वतंत्र गोष्टी आहेत; स्वत: अधार्मिक असणारे बॅरिस्टर जिना किंवा स्वत:ला नास्तिक म्हणवून घेणारे सावरकर जसं धर्माचं भांडवल करू शकतात; स्वत: अत्यंत धार्मिक असणारे गांधी ज्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष असू शकतात; लोकशाहीची गळचेपी करणारे मुशर्रफ जसे पुरोगामी विचारांचे असू शकतात; त्याचप्रमाणे मराठीतून शिकणे/न शिकणे व मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून सहिष्णू असणे/नसणे ह्याही दोन भिन्न गोष्टी आहेत - मराठी अस्मितेचे भाकड मुद्दे उठवून मराठी शिक्षणाबद्दल ब्र न काढणारी मनसे ढोंगी आहेच; एकूणात मनसेचे वागणे विसंवादी असले, तरी मुद्दा त्यांच्या असहिष्णुतेचा असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या माध्यमाचा नाही; त्यांच्या मुलांनी कुठल्या माध्यमात शिकायचं हे विचारणारे तुम्ही कोण?" आम्हांला शेवटचा खडा सवाल तेवढा लक्षात राहिला. "म्हंजे आमची मुलं इंग्लिश मिडिअममध्ये गेली, तरी चालतील ना?" एवढंच आम्ही क्लिअर करून घेतलं. "मनसेच्या आमदारांच्या मुख्यमंत्र्यांसह सर्वांना एकेरीतून संबोधण्याचा उगम तिथे आहे तर", असं काहीसं तो जाताना पुटपुटत होता.

Monday, October 26, 2009

अन्वय

तळ्यावरी हिरव्या तेव्हा
लाटांचे सावट आले
मन हिरवे हिरवे सारे
अन सैरावैरा झाले

कमळावर थेंब निसटला
विस्कटली पिंपळनक्षी
माशाचा श्वास अडकला
ग्रहणाशी चकला पक्षी

वास्तव संयोग सगळे
नियती होऊन हसले
सैरावैरा होण्याचा
मन अन्वय शोधत बसले

धाग्याची टोके जुळली
मध्याशी तुटला धागा
'जैसे थे' सगळ्या गोष्टी
माझा विस्कटला त्रागा

होती ती टोके दूर
की मीच ठेवली दूर?
माझा का हुकला ताल
जुळताना त्यांचा सूर?

अन्वयाचे बाप चकवे
मी सुयोधनाचा अंश
मी सलज्ज साहत असतो
मोकळ्या जटांचे दंश

आंधळ्यास कुठले चकवे?
दृष्टीला डोळस शाप
नि कोमेजण्याचा आहे
उमजल्या फुलांना श्राप

काठांची उत्कट उर्मी
लाटांचे संचित मस्ती
साचल्या तळ्यावर तेव्हा
श्वासांची जिवंत वस्ती

लाटांचे उगम तळाशी
तळेच उन्मळून पडते
नि खोल गढूळ होताना
वाहण्याचे स्वप्न बघते

Friday, October 16, 2009

रेषेवरची अक्षरे २००९

नमस्कार,

‘रेषेवरची अक्षरे’ हे ब्लॉगवरील निवडक लेखांचं संकलन आम्ही मागच्या दिवाळीत प्रथम प्रकाशित केलं होतं. यंदा आम्ही ‘रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक प्रकाशित करत आहोत. हे संकलन येथे उपलब्ध आहे.

http://reshakshare.blogspot.com/

कसं वाटलं ते जरूर कळवा!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

:)

Tuesday, September 1, 2009

पैलतीरावरून

न्यारीच मनाची मापे
पायांना अंतर लांब
तो सागरसेतूचाही
केव्हाच कलथला खांब

वार्‍याचे अल्लद कण्हणे
भुणभुणतो किणकिण ओढा
ती चंद्रकोर गुणगुणते
का सत्ताविसचा पाढा?

मेघांचे देश निराळे
दूतांच्या परक्या वार्ता
नि पैलतीरावर जाता
मी व्याकुळ मंदाक्रांता

वाटसरू मुकाट जातो
टाळूनच रडकी झाडे
कैफियत रुतल्या बिजाची
जगतात मुक्याने झाडे

Friday, August 14, 2009

जाता जाता...(३)

जाता जाता...(१)

जाता जाता...(२)

included वगैरे. आपल्या आसपासच्या आपणच म्हणवून घेतलेल्या समाजात आपल्या असण्याची केवळ एक जाणीव? असेल ब्वा! एरवी पृथ्वी बिथ्वीला पण आपण राहतोय म्हणून ग्रेट म्हणायचं, एरवी असले कुठल्याशा कोपर्‍यातल्या टुकार तार्‍याभोवतीचे ग्रह पासरीला पन्नास! समजा असतील कुठे एकाच सूर्यमालेत दोन तीन ग्रह जीवसृष्टीवाले, करत असतील मज्जा मज्जा त्यांच्यात. निघाले असतील तिथले लोक कधीतरी कुठेतरी कामाला नि वाटेत दिसलो आपण, तर म्हणतील की नाही, "कसं काय बुवा जमतं असं सुटं सुटं राहायला? कसं कुणी राहू शकतं असं कुठल्याशा कोपर्‍यात नि अगदी एकदुसर्‍यांच्या उरावर बसण्याइतपत नेमकं काय म्हणून जगत असतील हे लोक असे?" तसंच असेल हे. असो. इंटरस्टेट संपला की हे प्रश्नही मागे सरतात. एक सिंगल लेन वळणावळणाचा रस्ता सुरू होतो नि गाडी क्रूज कंट्रोल वरून काढावी लागते. काही लोक इथेही चालवतात म्हणे क्रूज कंट्रोलवर. मला नाही जमत ब्वा! वळणावळाणाचा डांबरी रस्ता. दोन्ही बाजूला प्रामुख्याने झाडं, अधूनमधून टुमदार घरं असणारी छोटी खेडी नि त्या प्रत्येक खेड्यात ह्या रस्त्याची होत जाणारी मेन स्ट्रीट. सगळं कसं टिपिकल गावरान. नि यंदा काय वाढून ठेवलंय ह्याची अंधुकशी धाकधूक मनात.

तसं ही धाकधूक हा रस्ता सापडायच्या आधीपासून सुरू झालीय. म्हणजे हे असले गहन, गंभीर, वैचारिक, एकांतातले, एकलकोंडे नि थोडक्यात टुकार प्रश्न पडण्याआधीचा प्रवास. किंबहुना पहिलीच खेप. य वेळा पुढे ढकललेला बेत अखेर ह्यावेळेस तडीस न्यायचा असा चंग आम्ही बांधायला नि डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात वादळासह धोधो स्नोफॉल व्हायला एकच गाठ पडली. इथून सुरुवात. मग बेत एका दिवसाने पुढे. वेदर डॉट कॉम य वेळा चाळून, गूगलला सगळे रस्ते विचारून, त्याच्याकडून सगळे नकाशे घेऊन, "अगदीच वेळ पडली तर मध्ये कुठेतरी थांबू एक रात्र नि पुढे जाऊ" असं ठरवून दिवसाच्या पहिल्या कॉफीचा पहिला घोट स्टारबक्सच्या नावाचा घेऊन आमच्या गुरुजींनी गाडी हाणली. सर्वांत उजवीकडची लेन. स्पीड लिमिटच्या वर काटा सरकायला कबूल नाही. सगळीकडे नुकत्याच थांबलेल्या स्नोफॉलच्या स्पष्ट खूणा. रस्त्याच्या दुतर्फा साचलेला बर्फ व मिठाच्या मिश्रणाचा काळा पांढरा चिखल. हे पाहून मी माझ्या मनातले वेळेचे अंदाज चांगले दीड एक तासांनी वाढवून शांत बसलो. बराच काळ सिमेंट कॉंक्रिटचे इंटरस्टेट असणारेत असं गूगलचा नकाशा दाखवत होता, त्यामुळे तोवर फार काळजी करायचं कारण नव्हतं. पोटोम॓कवरचा पूल हा त्याच्या "पूल अधिक निसरडे असू शकतात" छाप धोक्याच्या सूचनेसह ओलांडला तोवर मी बर्‍यापैकी स्थिरावलो होतो ("ब्रिज नीचेसे भी खुला होता है तो ज्यादा ठंड़ा रहता है इसलिए" असं म्हणणारा स्ट्रक्चरल इंजिनिअर अधिक ब्रिजेसमध्ये स्पेशलायझेशन असा माझा माजी रूममेटम आठवला. रूममेट हे किती मोलाचं नि मुख्य म्हणजे दैनंदिन आयुष्यात कामी येईल असं ज्ञान देतात ह्याची पुन्हा एकदा खूणगाठ.) इंटरस्टेटवरचा बहुतांश भाग हा एक गोष्ट आपल्या प॓केजमध्ये कशी इंप्लिमेंट करावी ह्या वादात गेला. arrayच कसे वापरले पाहिजेत नि hash maps नि काय गोंधळ होईल असा काहीतरी वाद चालला होता. थोडक्यात मी गेले महिना, दीड महिने खपून केलेलं इंप्लीमेंटेशन बेसिकली कसं बदलावं लागणार आहे हे सांगणारा आमचा मास्तर नि नेमकं का ते सांगा तोवर मी अजाबात बदलणार नाही अशी भूमिका घेतलेला मी असे दोघं अत्यंत आग्रहीपणे वितंडवाद घालत होतो. शेवटी व्हायचं तेच झालं, पंधरा वीस वर्षांच्या अनुभवाने तीन महिन्याच्या अनुभावाला गिळून टाकलं. कार्नगी व रिचीने आपल्या मास्तराला लेखनिक म्हणून सी लिहायला बोलावलं असावा असा माझा संशय आहे. रोज पर्वचा म्हणावेत तसा तो कोड पाठ करत असावा असाही मला संशय आहे. त्या प्रवासातल्या त्याच्या दुसर्‍या कॉफीपर्यंत तो फक्त बळावला.

पुढचा काही वेळ शांततेत गाणी ऐकण्यात गेला. इंटरस्टेटवरून गाडीने यूएस २५० चा एक्ज़िट घेतला नि रस्ता एकदम डांबरी झाला. रस्त्याच्या दुतर्फा असलेला बर्फ किंचित वाढला. रस्त्यावरची वळणं वाढली नि आता घाटात कितपत रस्ता क्लिअर केलाय ह्या लोकांनी कोण जाणे अशी एक शंका मनात आली. शंका अगदीच खोटी नाही हे लगेचंच कळलं. घाट सुरू झाला, चढ वाढला, वळणं अधिक वळणदार झाली नि रस्त्यावरचा घट्ट झालेला बर्फसुद्धा. बराच वेळ फक्त रस्त्याच्या आपल्याच बाजूला बर्फ आहे अशा धारणेने आम्ही ग्रासलो होतो. वेग मंदावत होता. जोखीम वाढत होती नि नेमकं अजून किती अंतर असं असणार आहे ह्याचा अंदाज येत नव्हता. जसजसे जात राहिलो तसतशी मगासची धारणा कमी होत गेली नि तिची जागा "हा रस्ता क्लिअर का केला नाहीये?", "आपण बरोबर रस्त्यावर आहोत ना?", "अजून किती मैल ह्या रस्त्यावर असणार आहोत आपण?" अशा भीतीयुक्त शंकांनी घेतली. आता वेग भलताच मंदावला. ताशी दहा, पाच मैल ह्यावर काही गाडी चालवता येईना. स्थळकाळाच्या एका विवक्षित छेदनबिंदूवर आम्ही गाडीत होतो; गाडी ताशी पाच मैल वेगाने चालली होती; नि तिच्याखालचा रस्ता एरवी डांबराचा असावा असं गृहीत धरता येऊ शकत होतं, पण तेव्हा मात्र तो पांढराशुभ्र बर्फाचा होता; तो मुळात रस्ता आहे असं समजण्याचं एक कारण म्हणजे की आम्ही अगदीच भलती वाट घेतली नव्हती नि दुसरं म्हणजे सर्वदूर पसरलेल्या निष्पर्ण तरूंच्या घनरानी रस्त्याशिवाय कुणी असे मधलेच भाग तरूविहीन करत नसतात; एरवी रस्त्याचा तेवढा भाग सपाट नसता नि वरती एखादी ट्रॉली असती तर तो भाग सहज स्किंग ट्रेल म्हणूनसुद्धा खपला असता. ह्या सगळ्यात फोन एवाना बंद झाला होता हे काय वेगळं सांगायला नकोच. नैशनल रेडिओ क्वाएट झोन! बोंबला! आम्ही हे असे दिग्मूढ होऊन ऐन शिशिरात अर्ध्या दिवशी भर रानात भर घाटात भर बर्फात गाडीमध्ये नि मागून एखादी एसयुवी फ्रीवेवर चालावं तशी गुमान सुसाट येऊन पुढे जात होती. अमेरिकेतला तोवरचा सर्वांत भीषण प्रसंग.
"आपण गाडी थांबवून विचारूयात का मागून येणार्‍या गाडीतल्या लोकांना की आपण बरोबर रस्त्यावर आहोत का?"
"आय अ॓म नॉट कम्फर्टेबल स्टॉपिंग लाइक दिस आ॓न द रोड".
अरेच्चा. इथे रस्ता गृहीत धरावा लागतोय. कुठे आहोत पत्ता नाही, असं कुठवर जाणार पत्ता नाही, कुठे अडकून पडू माहित नाही, नि त्यात अजून अनकम्फर्टेबल काय असायचंय?
हे प्रकट नि स्वगत ह्याच क्रमाने अनेकवार झालं. पण गाडी थांबेना. बरं आपल्या हातात काय आहे. तेच कर्ते आणि करवते! पुढे एका वळणावर आम्ही असेच दबकत दबकत जात असताना मागून एक एसयुवीवाला चक्क कर्कश्श हॉंक करून गेला. केवढा तो अपमान. भीती नि अपमान ह्यांची क्रमवारी ठरवता येत नव्हती खरं तर नेमकी. पण अपमान झाला की बस्स...भीती गेली उडत. पुढल्या एका वळणावर अशाच दबक्या चाकांनी जात असताना, बर्फानेही नको तेव्हा जरा लाइटली घेतलं नि आमच्याशी सर्व संघर्ष टाळला. डावीकडे पहाडाचा नव्वद अंशातला पश्चिमउतार, उजवीकडे दरीनामक गर्तेस मिळणारा त्याच पहाडाचा तोच पश्चिमउतार, मागे उतरतं वळण, समोर अधिक उतरतं वळण, सर्वदूर पसरलेली ढवळाई, कडाक्याची थंडी नि अद्याप पूर्वेकडेच असल्यामुळे फक्त "उगवलोय हं मी!" एवढंच सांगणारा कनकगोल हा मरीचिमाली, साक्षी ऐसे अमर करूनी हे सर्व आमच्या गाडीच्या चाकांनी रस्त्यावरचा आपला ताबा सोडला नि हे सगळं अमर असल्याचं काय ते कौतुक मला तेव्हा उमगलं!

आधी काळ आला नि गुमान परत गेला. मग आम्ही गपगुमान बसण्याचा काळ आला नि गेला. मग to break the ice काहीतरी बोलण्याची वेळ आली. मग आपल्या तद्दन अभियांत्रिकी सरड्याच्या धावेला स्मरून मी "आपण पश्चिम उतारावर आहोत, म्हणून इथला स्नो अजून न वितळता त्याचा आइस झालाय," असा एक तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. मास्तरांना पटलं ते. मग त्यांनी त्यांच्या एबीसीडी बाण्यातला अनुवांशिक देसीबाणा टाकला नि अमेरिकन बाणा भात्यातून काढून फोर व्हील ड्राइववाली मोठ्ठी गाडीच कशी हवी ह्या परिस्थितीत, ह्या बाकीच्या गाड्यांची चाकं स्पेशल असली पाहिजेत असे मुद्दे मांडायला प्रारंभ केला. आमच्या हृदयाची लय अशी पूर्वपदावर आल्यावर मग मी तमाम तंत्रज्ञानाला योग्य ती जागा दाखवून हातातला साधा नकाशा उचलला नि त्याच्या सूचीसकट तो सगळा झरझर तोंडपाठ करून गन्तव्यस्थान गाठलं.

तिकडे गेल्यावर कळलं, की आम्ही घेतलेला रस्ता हा तिथवर पोहोचायचा सर्वांत भीषण रस्ता आहे. मग संधी मिळताच मी गूगल नकाश्यांना मनसोक्त लाखोली वाहिली. त्या पश्चात आम्हांला ह्या पर्यायी रस्त्याचे आकलन करून देण्यात आले. तर तेव्हापासून मी ह्या रस्त्याने जातोय नि तरीही पुढे काय वाढून ठेवलं असेल ह्याचे भय काही संपत नाही.

त्याला कारणही तसंच आहे. ही पहिली खेप सुफळ झाल्यानंतर दुसर्‍या खेपेला परत येताना वेस्ट वर्जिनियात ज्याला महानगर म्हणता येईल अशा एका मधल्या गावठाणात एका मुलीने माझ्या गाडीस मागून धडक दिली. आधी माझ्या पुढची गाडी अचानक थांबली. मग मी कसाबसा थांबलो. मग मी आरशात पाहिलं. तेव्हा मागची गाडी व्यवस्थित मागे होती, पण दुर्दैवाने मागच्या गाडीतली ही ड्रायवर ताई तिच्या गाडीत खालती पडलेलं काहीतरी उचलण्यात दंग होती. ती आता नेमक्या कुठल्या क्षणी आपल्या गाडीवर येऊन आदळणार हे मी जीव मुठीत घेऊन बघत होतो. तिने समोर पाहिलं ते थेट तिच्या हत्तीने माझ्या चिमुकल्या गाडीस बोचकारलं तेव्हाच. मग गाडी बाजूला घेऊन मी काही बोलायच्या आतच तिने पापण्यांची कायच्याकाही पीटपीट करत "काही फार झालं नाहीये" असा सूर काढला. मी मनात म्हटलं, "हो तुझ्या हत्तीला काय धाड भरलीय? माझ्या गाडीला काय झालंय हे मी ठरवायचं का तू?" बरं, माझा हा पहिलाच अपघात. मग मी रीतसर तिच्याकडे इन्शुरन्सची माहिती मागितली. तर मी सोशल सिक्युरिटी नंबरइतकी गोपनीय माहिती मागतोय अशा आविर्भावात तिने "यू एलिअन" अशी नजरेतूनच कचकचीत शिवी दिली नि बाजूच्या सोशल सिक्युरिटीच्या कार्यालयात धाव घेतली. अरेच्चा! मग मीही तिथे धावलो. तर तिथल्या बाईने पुन्हा "आजि म्या एलिअन पाहिला" लूक देऊन "पोलिसांना बोलव बाई!" असा एक सल्ला दिला. मग म्हटलं, बोलवा! मग कॉप आला. त्याने येताक्षणी जाहीर केलं की, "ह॓, खरचटलंय तर साधं, आपण नाही पंचनामा करणार. ताई त्याला माहिती द्या इन्शुरन्सची. विषय संपला." तर तिच्याकडे म्हणे नवीन कार्डच नव्हतं. मग तिने जुनीच माहिती उपलब्ध केली, कॉपने शहानिशा करून ती स्वहस्ते मला लिहून दिली. मग मी पुढची दहा मिनिटे त्याचं अक्षर लावण्यात घालवली. १ नि ७ चे गोंधळ निस्तरले. आता माझी विजयोन्मादाची वेळ होती. मग मीही "मी नव्हतो सांगत हेच? उगाच भर दुपारी रणरणत्या उन्हात एक तास खाल्लास. समोर बघून चालवायला काय होतंय? नि मी काय खाणार होतो काय तुला? हातात हत्ती दिलाय तर चालवायची अक्कल नको?" असं सर्व एका नजरेत माववलं नि दिला एक लूक ठेवून.

त्याच्या पुढच्या खेपेला मी संध्याकाळी निघायचा घाट घातला. मग सगळ्या तनहाईबरोबरच्या गप्पा आटपत हा आडरस्ता गाठला तोवर कभिन्न काळोख पडला होता. मग मला निबिड अरण्यातून जाणारे सगळ्या गोष्टींतले सगळे वाटसरू आठवले. धृमण सोडून. तो धर्वणाश्रमात जायच्या आधीची ही गोष्ट आहे. त्यात भरीस भर अमावस्या असावी, चंद्रप्रकाश वगैरेचा पत्ता नाही. मी आपला निमूट चाललो होतो. गोष्टीतले घनदाट रानातले रात्रीचे वाटसरूंचे एकेकट्याने केलेले चित्तथरारक प्रवास हे मी परिकथेतील एकमेव वास्तवदर्शी कथानक म्हणून तेव्हापासून निमूट स्वीकारलंय. एका वळणावर तर चक्क एक हिरव्या डोळ्यांचा रानमांजरसदृश प्राणी पण गाडीसमोर आला. थोडक्याकरता वाचलो, तो नि मी दोघेही! आता हातासरशी आलाच आहे माणूस जंगलात तर सगळेच अनुभव देऊन टाकू, असा रानाचा चंग होता. एका आंधळ्या वळणावर माझी गाडी वळली नि रस्त्याच्या कडेला निपचित उभी असलेली एक गाडी नि तिच्या बाजूला त्याहून निपचित उभ्या असलेल्या काही मनुष्याकृती मला दिसल्या. थरकाप! क्लिशे तर क्लिशे, पण दुसरा शब्दच नाही. मग मी वेग सावध केला. आता मी काय करायचं? गाडी थांबवायची रिस्क घ्यायची की माणुसकी चुलीत घालून गाडी निमूट पुढे दामटायची? ह्याच विचारात पुढे गेलो, तर त्यात एक बाई आहे असा बोध झाला. मग माणुसकी डोकं वर काढू लागली. एवढ्या रात्री ह्यांची गाडी बंद पडली असेल तर काय करतील बिचारे? कोणाला नि कसे कळवणार? नैशनल रेडिओ क्वाएट झोन, बसा बोंबलत. पण नको. त्यांच्याकडे बंदूक असेल. शस्त्रधार्‍यांच्या देशात काय नेम कधी आपल्यावरच नेम धरतील ह्याचा? नि मला संधीही न देता, ह्यांनीच वाटेत येऊन माझी गाडी अडविली तर? कोण असतील हे लोक? साधे एपेलेशिअनच्या गरीबवस्तीतले गरीब लोक की एकटेपणाने गिळलेला वेडापिशासा कुणी सायकोप॓थ? मग मी अत्यंत संदिग्धपणे गाडीचा वेग कमी केला. खिडकीतून त्यांच्या प्रतिक्रियेसाठी काचा बंद असल्याची खात्री करून आतूनच डोकावलो. तर ही डोकी निपचितच. काही मदतीसाठी एक पाऊल पुढे नाही की हल्ल्यासाठी नाही. अरेच्चा! मला त्यांना सांगावसं वाटत होतं की, "तुमचं हे असणं भर रस्त्यात भर रानात भर रात्री उभं असणं फार क्रीपी आहे, हे लक्षात येतंय का तुमच्या? तुम्हाला काहीतरी करणं भाग आहे, अहो!" आता मी काय करावं? तितक्यात समोर अजून एक गाडी उभी दिसली नि तिथून एक जण ह्यांच्या दिशेने येत होता. मग मी एक माझ्या समजूतीसाठी पटकथा रचलीः ह्यांची गाडी बिघडली. त्यांनी ते दुसर्‍या कोणा विरुद्ध दिशेने येणार्‍या पंचक्रोशीतल्या गाववाल्याला सांगितलं. मग त्याने त्याच्या मित्राला गाडी घेऊन ह्यांच्या मदतीसाठी पाठवलं. मला ती स्वरचित पटकथा पटली. मग मला प्रसंगावधानाचं रीतसर अवसान आलं नि त्या क्षणी मी तिथून गाडीतून धूम पळ काढला. पुढच्या वेळेस आता मी पण सांगणार, "आय अ॓म नॉट कम्फर्टेबल स्टॉपिंग लाइक दिस आ॓न द रोड." मग मला मैलौनमैल परिसरात एकेकटे राहणार्‍या लोकांच्या, त्या सायकोप॓थ किलर्सच्या, त्या रात्र-अरण्य-भीतीच्या, त्या मूर्खासारख्या एकेकटे फिरून नसत्या फंदात सापडाणार्‍या नायक, नायिकांच्या अशा सगळ्या सगळ्या गोष्टी पोहोचायच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आठवल्या. मेंदू मेजर गंडला. मग मी त्याला निमूट म्हटलं, "प्रोजेक्ट गेला तरी चालेल, पण आपण नाही ब्वा परत येणार रात्रीचा इथे, कानाला खडा!" मग मला झोप येइपर्यंत तो मला नि मी त्याला भ्याड म्हणत राहिलो. मागे पार्श्वभूमीवर "मी भिऊन अंधाराला..." चालू होतं. ग्रेसना आवरा कुणीतरी! प्लीज!

(क्रमशः)

Thursday, August 13, 2009

सोचते और जागते

सोचते और जागते साँसों का एक दरिया हूँ मैं
अपने ग़ुमगश्ता किनारों के लिए बहता हूँ मैं

जल गया सारा बदन इन मौसमों की आग में
एक मौसम रूह का है जिसमें अब ज़िंदा हूँ मैं

मेरे होटों का तबस्सुम दे गया धोका तुझे
तूने मुझको बाग़ जाना देख ले सेहरा हूँ मैं

देखिए मेरी पज़िराई को अब आता है कौन
लम्हा भर को वक़्त की दहलीज़ पर आया हूँ मैं

-- अथर नफ़ीस

भाषांतराचा प्रयत्न :

चिंतनी जागेपणी श्वाससरिता होय मी
लुप्त काठांसाठीच माझ्या वाहतोय मी

पोळली सारी तनू ह्या ऋतूवणव्यांमधे
एक आत्म्याचा ऋतू ज्यामधे जगतोय मी

भुलविले तुज माझिया सुस्मिताने ओठच्या
मी नव्हे राई, पहा कोरडा निष्तोय मी

माझियाता स्वागता कोण ये पाहा जरा
उंबर्‍यात काळाच्या निमिषभर आलोय मी

Tuesday, August 11, 2009

सोचते और जागते...

उत्कट नाती शोधायची सवय त्याला कधीपासून लागली, हे नेमकं सांगणं कठीण आहे. त्याच्या जडणघडणीच्या बेरजेचं ते उत्तर असावं, अशी एक शक्यता आहे. पूर्वी कधी त्याला उत्कटता शोधत बसावं लागलं नव्हतं. ती एक तर होती किंवा नव्हती. दोन्हींचा नकळत सहज स्वीकार होता. मुळात ही उत्कटतेची भानगडच त्याच्या गावी नव्हती.

हा सगळा झोल केव्हा सुरू झाला, हे आठवून पाहण्यासाठी जेव्हा तो नात्यांचे उगम एक्स्ट्रापोलेट करतो, तेव्हा त्याला "तू कोणाला जवळ येऊच देत नाहीस, तर जीवश्च मैत्र लाभणार कसे?" असं म्हणणारी ती आठवते. त्याला असा परखड प्रश्न विचारणारी ती पहिलीच. त्या वेळचं त्याचं असह्य चपापलेपणही त्याला लख्खं आठवतं. त्याला असं आरस्पानी चव्हाट्यावर उभं करणारी तीच पहिली, नि म्हणून ती त्याची पहिली सख्खी मैत्रीण. तीच त्याच्या कळत्या जाणीवेतली पहिली उत्कट मैत्री.

एकदा अस्तर टराटरा फाटल्यावर त्यानेही मग स्वतःला उधळून दिलं हरेक मैत्रीत. नि कुठलातरी खजिना सापडावा असे जीवाभावाचे मैत्र मिळत गेले. बोलण्यातलं मोजमाप सुटलं. वागण्यातला आखीवपणा संपला. परीघ रुंदावले नि मग त्या विस्तारलेल्या वर्तुळात अनेक परीघ गुंतले. फक्त आपल्यात गुंतलेल्या दुसर्‍या वर्तुळाच्या भागावरच हक्क सांगण्याचं भान ठेवलं त्याने. दोन परस्परभिन्न वर्तुळं गुंतवणंही कटाक्षानं टाळलं. त्यामुळे परीघांचा गुंता टाळता आला त्याला नि उत्कटतेला विश्वासाचा भक्कम पाया लाभला. वास्तविक तेव्हाही हे उत्कटतेचं प्रकरण काही फारसं कुठे वाटेत आलं नव्हतं. त्यासाठी अजून पुढे जावं लागेल.

कुठल्यातरी जिवाभावाच्या एका मित्राला त्यानं नकळत भावासारखं म्हटलं, तिथं आपल्याला थांबावं लागेल. त्यानं हे म्हटलं खरं, अगदी मनापासून. पण त्याच सुमारास त्याला लक्षात येऊ लागलं की काहीतरी बिनसतंय. त्याच्याच चांगुलपणाचं जरतारी कुंपण त्याच्याचभोवती घातलं जातंय हे त्याला कळेपर्यंत फार उशीर झाला होता. ह्या आपण न मागताच घातलेल्या कुंपणात श्वास कोंडू लागला. कुंपणाच्या जरीच्या तारा असहायपणे तोडताना तो वरचेवर रक्तबंबाळ होऊ लागला. त्याच्या ह्या आतल्याआत धुमसण्याने गूढाचं वलय वाढवायला मदतच झाली नि त्यात तो पार अडकला. त्यातून बाहेर पडण्याचे निकराचे प्रयत्न तो करीत राहिला, पण त्याने त्याच्याकडून गुंतवणं टाळलेले परीघ कट केल्यासारखे आपणहून गुंतले नि त्याची तडफड पाहून हास्याचे विखार फेकीत राहिले. जेव्हा काही वर्तुळं आतवर येऊन थेट गाभ्यावर हल्ला करू लागली, तेव्हा तो सावध झाला. आपल्याभोवतीचा जुना कोष तो भराभर पुन्हा निर्माण करू लागला. पण झालं असं की, सगळं तोडता येईना नि पुन्हा जोडण्याची आशा त्याला हार मानू देईना. जिथे खात्री झाली तिथे तो दुहेरी वीण घालत गेला नि जिथे आशा होती तिथे तो टीप घालायला धजेना. मग ह्यातल्या काही उसवलेल्या जागा अशा काही भळाळू लागत की त्या शिवता शिवल्या जात नसत. हे सगळे संभ्रम जेव्हा आ वासून ठाकले, तेव्हा मग कोषाची जाणीवपूर्वक जोडणी नि तोडणी सुरू झाली नि तिथे हा उत्कटतेचा चोखंदळपणा सुरू झाला. चांगल्या सुटसुटीत मैत्रीला भावासारखं वगैरे म्हटलं की मग ते नातं फार आत येऊ न देता अंतर ठेवून मैत्रीशिवायही निभावत रहावं लागतं अशी पक्की खूणगाठ त्याने बांधली नि तेव्हापासून हे असे मित्रांचे भाऊ करणं तो कटाक्षाने टाळत गेला, नि बहुदा तेवढ्या जवळ पोहोचणं नि पोहोचू देणंसुद्धा.

परवा कुठल्याशा ओल्या पार्टीला त्याला आपण एक तर तर्र लोकांच्या नवीन तर्री मारलेल्या त्याच जुन्या विनोदांवर केविलवाणे हसत राहू किंवा अत्यंत रँडम लोकांशी तोंडदेखलं हसत बोलू, एवढ्या दोनच शक्यता दिसत होत्या, म्हणून त्याने चक्क त्याला पकेल हे न येण्याचं कारण सरळ सांगितलं नि विषय संपवला. तर हा त्याच्या दृष्टीने अगदीच क्षुल्लक असणारा विषय वाढवून जेव्हा एक मित्र त्याला "एवढं स्पष्ट बोलणं लोकांना आवडत नाही, तू काहीतरी दुसरं कारण द्यायला हवं होतंस," असं म्हणाला, तेव्हा तो पारच हादरला. "मित्रांशी बोलतानाही?" ह्या त्याच्या जेन्युइन प्रश्नावर पलिकडून "आयुष्य असंच आहे" असं जेव्हा तद्दन भिकार उत्तर आलं, तेव्हा तो पुरता कोसळला. "शोर बड़पा है ख़ाना ए दिल में, कोई दीवार सी गिरी है अभी" हा नासीरचा शेर त्याला तेव्हा कुठे खरा भिडला.

आधी जवळ येऊ द्यायचं की आधी उतू जाऊ द्यायचं, हा गुंता तो नव्याने सोडवताना दिसतो हल्ली कधीकधी. रोज उठून अभिनिवेशशून्य उत्कटता शोधत वणवण करताना तिला ते एका दमात कसं जमलं, ह्याचं कुतूहल त्याला नेहमीच वाटतं. त्यामुळेच कदाचित तो ही रोजची वणवण रोज नव्या आशेने करतो. पायाखालची अंतरं वाढली, तसे हल्ली वरचेवर फोन होत नाहीत त्यांचे. पण जेव्हा होतात अधूनमधून तेव्हा बोलणं न खुंटता मागल्या फोनवरून पुढे अस्खलित सुरू राहतं त्यांचं. नेहमीच. ती, तिचा तो नि त्यांचं प्रेम ह्यांबद्दल ती उत्कटतेने सांगत राहते, नि आपला तो त्याची वणवण फक्त तिलाच त्याच उत्कटतेने सांगत राहतो.

पाऊस पडता पडत नाही, आषाढ सरता सरत नाही
गच्च ढग झरण्यासाठी वणवण फिरत राहतो
पौर्णिमा सरली तरी चातकढग दुष्काळीच
थांबणार कधी? भिजणार कोण?
उत्कटतेने झरवेल कोण?
रात्र रात्र आत आत नेमाने झरत असतो
भार भरता भरत नाही नि ढग झरता झरत नाही.

Wednesday, July 22, 2009

हंस अकेला

रस्त्यावर वळणे येती? वळणाशी रस्ता येतो?
एकटे एकटेपण ये, की मीच एकटा येतो?

पाऊस उन्हाचा वैरी, छायेचा आश्रित मीही
दारावर म्हणून माझ्या पाऊस सारखा येतो?

ही भिंत हवी की खिडकी - आतून पाहण्यासाठी?
भिंतीत चिरावी खिडकी; खिडकीतुन वारा येतो!

आरशात दुकटा दिसतो, डोळ्यांत एकटा असतो
प्रतिमेच्या डोळ्यांमध्ये हा कुठून ऐना येतो?

प्रश्नाला उत्तर मिळता ती जोडी दो हंसांची
एकटाच उडून जाण्या हा हंस एकला येतो

Monday, July 13, 2009

स्तंभावरती चार सिंह

हल्ली तो कविता करतो
चार कडवी रोज लिहितो

एक कडवं शब्दांचं
कमळावरल्या थेंबांचं


दुसरं कडवं सुचलेलं
लोणच्यासारखं मुरलेलं

तिसरं सहज उमटतं
ध्रुवासारखं तळपतं

Tuesday, June 16, 2009

मागे वळून पाहताना...

धगधगत असशील लालबुंद निखारा होऊन,
नाही असशीलच,
कारण ह्या सकाळीसकाळीच्या मुक्तगार हवेतही
धुमसतोय धुराचा कोंदटपणा
पण तेवढंच.
त्याहून अधिक पेटून उठण्याचा प्रश्नच नाही,
कारण स्वतःला स्वतःचीच राख लावून
विझण्याचा स्वभाव आहे तुझा.
म्हणून तुला असं अधूनमधून चुचकारावं लागतं
गोंजारून एक फुंकर घालावी लागते.
फुंकरच तुझ्या वर्मी लागते हा काय माझा दोष आहे?

तुझा हा स्वभाव ते चांगलाच ओळखतात.
भडक्याची भीती नाही म्हणून.
आपली पोळी शेकायला तेवढी धग पुरेशी असते.
पण ती लागतेच.
त्या त्यांत तूही आहेस नि मीही.
त्यामुळे तुला धगधगत ठेवण्यात आपला स्वार्थ आहे.

भडकू नकोस असा तेल ओतल्यासारखा
कारण मला भडका नको आहे.
म्हणून तर मी फक्त फुंकर घालतोय.
भडका उडला तर फक्त राख उरेल
त्या बुळबुळीत राखेचा कुणालाच काहीच उपयोग नाही.
मला तू धगधगताच हवा आहेस.
फक्त मला तुझ्या धगीवर शेकून मस्तवाल झालेल्यांना
"हाय हाय" म्हणत हाय खावी लागेल
असा तू जिवंत जळता हवा आहेस.
तुझी राख झटकण्यासाठी
नि तुझ्यावर फुंकर घालण्यासाठी
तुला मी लागू नये असं मला हवंय.
कारण, मलाही तुझ्याबरोबर तुझ्यासारखंच
तू होऊन पेटतं रहायचं आहे,
पण...

शोले ते डार्क नाईट मार्गे डोंबिवली फास्ट जतन केलेला
तुझ्यातला सलवा जुडूम परजत
थंड राहून "पेटा पेटा" म्हणत
कुणी लावलेल्या आगीत पतंगाप्रमाणे झेपावत
मरत मरत जगण्यापेक्षा जाळून टाका म्हणत
"जळा जळा" करीत
चराचर जाळत फिरशील
तर मला तुमच्यात धरू नकोस.
आधी शेकू देत होतास, आता जाळू पाहतो आहेस.
ह्यांच्या मधलं पेटणं तुला कळेनासं झालंय बहुदा.

उडलेला भडकासुद्धा केव्हातरी शमेल
नि तो शमल्यावर भस्म होऊन राहिलास
तरीही त्या राखेतूनही उभं राहण्याची ऊर्मी गोळा करू पाहशीलच तू
मग तेव्हा कदाचित कळेल तुला
की उभं रहायलाही एक आकार लागतो
जो तुला कधी होता हे तुला कळणारही नाही
कारण ते कळायला तू तूच राहिला नसशील.
तुला दिसणारं सुबक शिल्प घाव घातल्यावरही दिसेल का
ह्याचा विचार
त्या कभिन्न पत्थरावर घाव घालण्यापूर्वीच तुला करावा लागेल.
किमान मागे वळून पाहता यावं म्हणून तरी
तुला तुझं स्वरूप व स्व-रूप सांभाळावंच लागेल
ऊब आणि जाळ
ह्यांच्यामधलंही काही त्यात ज्वलंत असण्याची शक्यता आहे,
एवढंच माझं तुला सांगणं आहे,
मागे वळून पाहताना.

Sunday, June 14, 2009

सहज

अशी सांज संध्याकाळीच यावी
अशी गाज भरतीवेळीच यावी
जशी हाक हाकारल्याविण ये

निळ्याशार गगनी शुभ्राभ्र यावा
असा नील गगनी आषाढ यावा
जशी आत ती घेतल्याविण ये

असा गंध हलका तो दरवळावा
असा थेंब हळवा तो भुरभुरावा
जसा नाद ती बोलल्याविण ये

असा सोनचाफा बहरून यावा
असा आमराई मोहोर यावा
जसा होय हुंकारल्याविण ये

अशी रात रात्री हलके मिटावी
अशी मंद्र झोपेत पहाट व्हावी
जसा शब्द मी सुचविल्याविण ये

Tuesday, June 9, 2009

a Sane man is typing...

हे काही लिहायलाच हवं असं नाही, पण असं वाटलं ह्याची आठवण म्हणून.

आमुचा ब्लॉगु दोन वर्षांचा झाला म्हणून. इतके दिवस माझाच उत्साह टिकला ह्याचंच विशेष अप्रूप म्हणून. आपण अगदीच काही बकवास लिहित नाही, असल्या फाजील आत्मविश्वासापेक्षा आपण काही चांगलंही लिहू शकतो हा विश्वास निर्माण झाला ह्याची नोंद म्हणून नि ते सातत्याने जमायला हवं अशी स्वतःकडून अपेक्षा करायला सुरुवात केल्याची खूणगाठ म्हणून.

का लिहितो ह्याची कारणं सांगून झाली पूर्वीच. त्यांत अद्याप काहीही बदल नाही, ह्या पुनर्विचाराची दखल म्हणून.

आपण लिहिलेलं जगाने वाचावं अशा अर्थात असणार्‍या अपेक्षेने चालवलेला खटाटोप इतरही वाचतात ह्याचा अर्थात आनंद होतो, हे सांगावं म्हणून. त्या सगळ्या वाचकांना तह-ए-दिल से थँक यू म्हणण्यासाठी म्हणून.

जे वाचून निंदाप्रशंसाटीकात्मक प्रतिक्रिया देतात, त्यांचे विशेष आभार मानावेत म्हणून. प्रतिक्रियांची संख्या हे कसलंच द्योतक नसलं, तरीही त्यांच्यामुळे किती हुरूप येतो नि चारचौघांना वाटतं तसंच कसं मस्त वाटतं हे सांगावं म्हणून. इथे प्रतिक्रिया न देता इमेलद्वारे हमखास नि बर्‍याचदा खरमरीत प्रतिक्रिया पाठवून मला जमिनीवरच ठेवणार्‍या नि पुन्हा विचार करायला लावणार्‍या एका जवळच्या मित्राचेही जाहीर आभार मानावेत म्हणून. प्रतिक्रिया न देताही वाचणारे कोण व किती हे कळवून घेण्यासाठी ब्लॉगवर हेर नेमून वाचकांवर पाळत ठेवण्याचा अनाठायी आटापीटा न केल्यामुळे "वाचक किती?" ह्याचं उत्तर मी जरी "गावात कावळे किती?" ह्या प्रश्नाच्या बिरबलाच्या उत्तरासारखं "दिवसाला एकोणतीस" असं दिलं, तरीही ते आहेत ह्याचे पुरावे अनपेक्षित स्थळी, काळी अनपेक्षित व्यक्तींकडून मिळतात, ह्याची दखल घ्यावी व त्यांचेही आभार मानावेत म्हणून.

ब्लॉग हे माध्यम इहलोकात आहे, ही संपूर्णतः विस्मृतीत गेलेली गोष्ट पुन्हा एकदा नजरेस आणून दिल्याबद्दल स्नेहल व मेघनाचे जाहीर आभार मानावेत म्हणून. ती विस्मृतीत जाण्यापूर्वी केवळ इंग्रजीत माहित असणारी गोष्ट पुन्हा भेटली तेव्हा मराठीत सापडल्यामुळे मराठीला अगदीच तहानलेल्या मला केवढा दिलासा मिळाला होता, हे सांगावं म्हणून. नि ज्यांचे ब्लॉग बराच काळ निमूट वाचून आपण लिहिलेलं ब्लॉगावसं वाटलं व वाटत राहिलं, त्या बाठे, ट्युलिप, संवेद, मेघना मंडळींना एकलव्य होऊन याद करावं म्हणून. (की बोर्डची की वगैरे मागू नये, मिळणार नाही!)

दैनंदिन आयुष्यात भेटण्याची पुसटशीही शंका नसलेले व त्याचमुळे आपल्या जजमेंटलपणाच्या शापातून वाचलेले जे अनेक जण ब्लॉगमुळे भेटले व गोतावळ्यातलेच एक झाले त्या तुम्हां सर्व ब्लॉगरांना दोस्तीत थँक्स म्हणावं म्हणून!

नि एकूणात माझ्याच दृष्टीत बहुदा असणारं डिटेलिंग अधिक प्रगल्भ होत चाललंय की काय, असा एक दिलासा देणारा अनाहत नाद कुठल्याशा क्षणी ऐकू आल्याची नोंद ठेवणारा एक दस्तऐवज म्हणून!

:)

- a Sane man

ता.क. चांगला बाजारात मिळणारा नवा अंगा ब्लॉगुला घालावा हा विचार मी अतिउत्साहात हाणून पाडला नि कापड आणून तो घरी शिवायचा घाट घातला. शेवटी तो बड्डेच्या दिवसापर्यंत शिवून झालाच नाही. पण तो जुना रुक्ष अंगा उन्हाळ्यात चिवचिव व्हावी तसा अगदीच साहवेना. म्हणून हे चेरी ब्लॉसमचं ठिगळ लावून थोडा वसंत आणला आहे. रंग आणि लैंगिकता ह्यांचं नातं रंग व प्रकाशाची तरंगलांबी ह्यांच्याइतकं नैसर्गिक व सूत्रबद्ध आहे असं मानणारे इंद्रधनुषी चष्मे आपण डोळ्यांवर चढवले असतील, तर तुम्हांस ते लखलाभ असोत. ते काढून जगाकडे सताड डोळ्यांनी पहावं अशी विनंतीवजा सूचना. ते असो. पूर्ण अंगा कधी शिवून होईल कोण जाणे!

Tuesday, May 12, 2009

दीडकीची अक्कल

सोळा आणे

वास्तविक आम्ही सरळ प्रश्न केला होता, की "भाऊ, तुम्हांला काय वाटतं, कोण होणार पी. एम.?" त्यावर सरळ उत्तर द्यावं किंवा फार फार तर "आम्हांस विचारू नका. आम्ही चारचौघांसारखे अराजकीय आहोत" असं सांगावं की नाही. तर ते नाही. ह्या आमच्या साध्या प्रश्नावर ते इतकं काही बरळले, की ते हल्ली लोकसत्ताचे अग्रलेख लिहितात काय, असे आम्हांस त्यांना विचारावेसे वाटत होते. आता ह्या प्रश्नावर भल्याभल्यांची विकेट गेली आहे, हे काय आम्हांस लोकसत्तेचे अग्रलेख वाचून ज्ञात नाही? त्यात ह्यांची भर कशासाठी? मध्यंतरी तर आम्ही एनडीटिवी सारख्या अद्यापही आक्रस्ताळेपणा न करता बातम्या देण्याची आपली सभ्यता जपून ठेवलेल्या वाहिनीवरदेखील लोकसत्ताकारांना ऐकले. महाराष्ट्रातील राजकारण फार जटिल झाले आहे, त्यावर तुम्ही प्रकाश टाकाल काय, अशा प्रश्नावर ते एवढे काही बोलले, की गाठ सुटायचं तर सोडाच, पक्की निरगाठ बसली. कोल्हापूर ते नागपूर मार्गे पुणे, बारामती ते जेवढं काही बोलले त्यातून एखाद्याने तोंडपाठ असलेले महाराष्ट्र एक्सप्रेसचे वेळापत्रक घडाघडा म्हणून दाखविल्यावर जेवढा काही बोध होईल, तेवढाच तो आम्हांस झाला. तर सांगायचा मुद्दा हा की ते गृहस्थही तद्वतच बोलत होते. आता ते व्यवस्थापन विषयातील तज्ज्ञ असल्याने तीळभर माहितीही मणभर गुळात मिसळून सांगण्याची त्यांची हातोटी आम्हांस माहित होती. शिवाय गेले काही दिवस आम्हांला वाटते आहे की, लोकसत्तेने आपल्या पत्रकारांसाठी कोणा व्यवस्थापन बाबांचे प्रशिक्षण सुरू केले असावे. त्यातला एक खेळ म्हणून प्रत्येक जण एकेक वाक्य लिहितो नि ती सगळी एकत्र जोडून त्यांचा एक अग्रलेख तयार करण्यात येतो. त्याशिवाय इतकं सैरभैर एकटा माणूस कसे लिहिल? ह्यामुळेच त्या वृत्तपत्रातील कर्मचार्‍यांमध्ये 'संघभावना' वाढीस लागली असावी, असाही आमचा संशय आहे. त्यामुळे न राहवून शेवटी आम्ही त्यांना विचारलेच, की आमचे हे संशय खरे का, नि असल्यास ते बाबा आपणच काय? तर त्यांची अशी बाबा म्हणून संभावना केल्यामुळे ते उद्विग्न झाले. पण शेवटी ते व्यवस्थापन तज्ज्ञ. कमाल मधुर भाषेत किमान मधुर गोष्ट सांगण्यात त्यांचा हात कोण धरणार? त्यामुळे ते फक्त "तो मी नव्हेच" एवढंच एकदम नाट्यपूर्ण आवेशात म्हणाले. म्हटलं, "मग तुम्ही हल्ली काय करता?" तर म्हणाले, "हल्ली मी निवडणुका म॓नेज करतो." म्हटलं, "हो? कुणासाठी?" तर म्हणे की, "ते सांगता येणार नाही. आचारसंहिता आहे." हे फारच झालं. ज्यांनी पाळायली हवी ते ती मोकाट पायदळी तुडवताहेत, नि ह्यांना म्हणे आचारसंहिता! म्हटलं, "राहिलं, नका सांगू!" मनात म्हटलं, जणू काही आम्हांला कळणारच नाही.

कमळाच्या ताटव्यात दुर्दैवाने म॓नेजरची जागा रिक्त आहे, हे आम्हांस माहित होते. म्हणून आम्ही प्रथम तिथे मोर्चा वळवून खासगीत एका दक्ष मित्रांकडे फोटो सरकवला, "आपण ह्यांना पाहिलंत का?" तर ते नुसतं नव्हे, शत प्रतिशत नाही म्हणाले. पेस्तनकाकांनंतर हेच. काहीही विचारलं की ते फक्त शत प्रतिशत उत्तर देतात. आमचा पहिल्याच चेंडूवर त्रिफळा! पण पडूनसुद्धा नाक वर ठेवणे आम्ही त्यांच्याचकडून शिकलो असल्याने आम्हीही सावरून उलट प्रश्न केला, "यंदा कसं feel होतंय?" तर म्हणाले, "लाल लाल वाटतंय!" आम्ही उडालोच. ह्यांना लाल लाल वाटायला हे काय विश्वासदर्शक ठरावावरचं मतदान आहे? बरं कुठे रंग तर लालबिल दिसेनात. तर अचानक भाषण संपून टाळ्या वगैरे चालू झाल्या सभेत, नि मागे गाणं सुरू झालं. तसं हे एकदम नमस्ते सदा सुरू झाल्यासारखे ताडकन उठले नि ताल धरून नाचू लागले, "लाल मेरी ओ लाल मेरी, लाल मेरी पत रखियो भला झूलेलालण..." त्यांची ही शिस्त आम्हांस नवीनच होती. त्या धिंगाण्यात आपण नको, म्हणून आम्ही आमची पत सांभाळण्यासाठी तेथून सटकलो नि थेट टिळक भवन गाठलं. तिथे कुणी ज्योतिषी सगळ्यांचे हात बघत होते. आम्हीही पुढे केला. नि पुढची दहा मिनिटे तो का केला, असे आम्हांस झाले. आम्ही कोणी संभाव्य इच्छुक उमेदवार आहोत असा त्यांनी समज करून घेतला होता. त्यामुळे ते दिल्लीतल्या लोकांसमोर काय बोललात तर तिकीट मिळेल, बंडखोरी केल्यास निवडून येण्याची शक्यता किती, विधानसभा निवडणुकीत आपण कुठल्या गोटात असू, आघाडीतले मित्र प्रचारात मदत करतील का, अशी काहीबाही भाकीते विशद करू लागले. आम्ही पुरे म्हणून पुढचा त्रास वाचविणयासाठी हात खिशात घातला. तर ते चातकासारखे आमच्याकडे पाहू लागले. त्यांचे सारे लक्ष आमच्या खिशाकडे होते. आपण इच्छुक उमेदवार नाही नि आपल्या पाकिटात फक्त ठाणे ते सीएसटी-चर्चगेट असा पास व काही चिल्लर एवढेच असल्याचे कळल्यावर त्यांचा अगदीच भ्रमनिरास झाला. तिकडे एकुणात गल्लीपासून दिल्लीपर्यंत फार म्यानेजर असल्यामुळे अजून कोणी नवीन ह्यांनी घेतला नसणार अशी आमची खात्री पटली. मग आम्ही थेट मनसे नाशिक गाठलं. तिथे वेगळाच गुंता होता. आम्ही नाशकात उतरलो तर सगळ्यांनी मनसे "इस बार..." असा एकच घोषा लावला होता. मन से, गर्व से असल्या आत्यंतिक निष्ठावाल्यांना आम्ही जराही भाव देत नाही, त्यामुळे आम्ही थेट आबांना गाठलं, म्हटलं, "आबा, हिंदी आहे हे, मीटर थोडक्यासाठी चुकलं जरा. इस बार च्या ऐवजी अब की बार केलं असतं तर मात्रा मोजून बघा, कसं मीटरमध्ये फिट्ट बसलं असतं." तर ते आमच्यावर उखडलेच, "आम्हांला शिकवू नका. आम्हांलाही हिंदी येतं. शिकलोय आम्हीही हिंदी, इंग्रजीवाल्यांना म॓नेज करायला." आत्ता कसं! ते असे थेट मुद्द्यावर आल्यावर आम्ही लगेच प्रश्न केला, "कोणाकडून?" तर त्यांच्याशी लगट करू पाहणार‍्या त्या पत्रकार ताईंना काय झिडकारलं नसेल, तसं झटकून म्हणाले, "ते आम्ही तुम्हांस कशास सांगू?" म्हटलं, "बरं! नका सांगू. १७ मे ला तरी हातात हात घेणार, विळा घेणार की धनुष्यबाण घेणार तेवढं सांगा, म्हंजे झालं." तर ते एकदम इंग्रजीत गाऊ लागले, "If you come today, it's too early; If you come tommorrow, it's too late, ...tick tick tick..." ती टिकटिक काही थांबेचना. ह्यांचं म्यानेज करणं प्रकरण फारच आंतरराष्ट्रीय आहे, त्यामुळे आमचे ते गृहस्थ ह्यांच्या काही कामाचे नाहीत. नाशकातून परत आलो तसे आम्ही खरं तर बांद्र्याला जाणार होतो, पण दादर ते बांद्रा एक्स्टेंशनचे पैसे उगा का दवडा? असा आम्हांला प्रश्न पडला. मुळात कारण ज्यांच्यासाठी जायचं त्यांचा पक्ष त्यांचे साहेब चालवितात का हे साहेब चालवितात, हेच आम्हांला आताशा कळेनासं झालंय. मग आम्ही म्हटलं, "मरो." मग आम्ही जरा न्याशनल लेवलला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कुणाचाच फोन लागेना. सगळ्यांच्या लायनी व्यस्त. चांगल्या निवडणुका आल्यात, खोर्‍यानं म्यानेजर मिळतात सगळं काही म्यानेज करायला, तर हे लोक स्वतः कामं करताहेत, असं पाहून आम्हांला नवल वाटलं. म्हणजे परिस्थिती खरंच हाताबाहेर चालली होती, नि मग हे आमचे म्यानेजर नेमकं कोणासाठी काम करीत होते? शेवटी न राहवून आम्ही कोलकत्त्याला फोन केला. हे लोक काही असे म्यानेजर बिनेजर घेणार नाहीत अशी आम्हांस खात्री होती. पण म्हटलं न जाणो, एकदा खात्री करून घेऊ. प्रथम आम्हांस वाटले, की क्रॉस कनेक्शन लागले आहे. कारण फोन लागला तेव्हा पलीकडे कुणीसं, "नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी" असं गात होतं. आम्हांला वाटलं, वैशाख चालू झालाय, तर वर्षारंभ साजरा करणार्‍या कुणा लाला टांगेवाल्यास ऐन वसंतात अर्ध्या रात्री पडलं असेल स्वप्न. म्हणून आम्हीही त्यांच्या सूरात सूर मिसळला. तर ते म्हणे, "हट्, हे तर शरदाचं चांदणं आहे". म्हटलं, "आत्ता?" आता भाबड्या समाजवाद्यांना शरदाच्या चांदण्यात एस. एम. दिसले, तरी आम्ही म्हणू ठीक आहे. आता वाटतं एकेकाला, काय करायचं आपण! पण चांगलं विवेकनिष्ठा वगैरेच्या गप्पा करणार्‍या, दर वाक्याला समोरचा राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्यागत चार संज्ञा त्यावर फेकणार्‍या, पोक्त कम्युनिस्टांनी ऐन वसंतात "शारद सुंदर चंदेरी राती.." गावं? " माया बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला, ऐका लाला गातो गाणे..." हे बालगीत गावं? ही म्हणजे हद्द आहे. आमच्या काही ती पचनी पडेना. त्यामुळे ह्यांनीच चक्क म्यानेजर ठेवला की काय? अशी एक पाल आमच्या मनात चुकचुकली. तर ते "म्यानेजर? तुम्ही भांडवलशाहांचे चेले,...." असं सुरू करून पुढे वदते झाले, तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. "हुश्श" करून आम्ही त्यांना बाय बाय केले. हल्ली आम्ही त्यांना बायच करतो. टाटा वगैरे म्हटलं की त्यांना वाटतं, आम्ही मुद्दामून त्यांच्या दुखर्‍या नशिवर बोट ठेवतो आहोत. हल्ली त्यांनाही बाय बाय चालतं, हेही नसे थोडके!

मग आम्हांस कळेना की हे थोर गृहस्थ नेमकं कुणासाठी काय म्यानेज करीत आहेत. आम्हांस थांगपत्ता लागू नये, हा म्हणजे आमचा अपमान होता. अस्मितेच्या चिंधड्या होताना पाहवेना. आता काय केलं म्हणजे हा बहुरूप्या "सू छे सू छे" म्हणत खडबडून जागा होईल नि स्वतःच कबुली देऊन बसेल, हे आम्हांस कळेना. मग आम्हीही धीर धरला. वाट पाहिली. पंधरा मे च्या रात्री आम्ही त्यांना शतपावल्या करताना गाठले. तर ते भलतेच चिंताग्रस्त वाटले. उद्या काय होणार, म्हणून ते चिंतित आहेत, असा एक सर्वसाधारण समज करून देण्यात आला होता. पण आम्हांस काही पटेना. एवढा चाणाक्ष म्यानेजर असा ऐन वेळी का बरे सैरभैर व्हावा. म्हणून आम्ही त्यांचा बारकाईने अभ्यास केला नि एकाएकी नूर ही नूर सा आम्हांस आसमाँ तलक दिसू लागला. आम्हांस त्यांचे दुखणे नेमके कळले. साहेबांनी हुशार खेळी केली होती. गेले तीन महिने म्यानेज केल्याचा नुसता आभास निर्माण केला होता. त्यांची पक्की धारणा होती, की यंदा आधी काहीही करून फायदा नाही, उगाच श्रम का दवडा? म्हणून ह्यांनी नुसता आभास निर्माण केला. पुढे काय काय म्यानेज करायचं ह्याचं त्यांनी चोख प्लानिंग केलं होतं. पण सुज्ञ भारतीय मतदाराला आपण फारच गौण लेखतो आहोत, अशी एक पाल ऐन वेळेला त्यांच्या मनात चुकचुकली होती. नि जर उद्या आपली अवस्था २००४ च्या मुलायमसिंगांसारखी झाली, तर आपले कसे होणार? ह्या एका विचाराने अखेर त्याही मुत्सद्द्याची झोप उडविली होती. ते मला दुसर्‍या दिवशी रात्री भेटले, तेव्हा आम्ही फक्त स्मित हास्यांतून बोललो. "हृदयाचे थेट हृदयात" पोहोचले होते. यंदा त्यांनीच समोरून प्रश्न केला, "दोन नवीन उद्योग सुरू केलेत. भागीदार होता काय?" म्हटलं, " आता काय नवीन?" तर म्हणले, "येथपासून पुढे कानाला खडा. अशी रिस्क पुन्हा घेणे नाही. त्यामुळे सर्वपक्षीय थिंक टँक म्यानेज करायचा धंदा काढलाय. आम्ही काही जण आणतो, काही तुम्ही आणा." म्हटलं, " धन्यवाद! उपक्रमास शुभेच्छा!" तशी म्हणाले, "अजूनही एक धंदा काढलाय". म्हटलं, "बोला." तर म्हणाले, "लोकांनी मतदानच केलं नाही, तर सगळी पंचाईत होईल, असा अजून एक धडा घेतलाय. म्हणून त्यांना घाबरविण्याचा धंदा काढलाय. रोज रात्री काहींना टारगेट करून घाबरवायचं. मतदान केलं तरच काही खरं आहे, असं सांगत राहायचं. मतदानाची इतकी दहशत निर्माण करायची, की त्यांची झोप उडली पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना घाबरविण्याच्या वेगवेगळ्या क्ऌप्ती तयार करणे सुरू केले आहे. ट्रेड सिक्रेट आहे, सगळंच काही सांगता येणार नाही. आपणही 'जागे व्हा!'" आमची पुढल्या पाच वर्षांसाठी झोप उडवून ते निघून गेले. तेव्हापासून आम्ही जागरूक झालो आहोत, असं आम्हांला उगाच वाटतंय.


आठ आणे

परवा आम्हांस भयंकर स्वप्न पडले. आपण बोलत आहोत व आपल्या टुकारातिशय टुकार वक्तव्यावरसुद्धा कुणी उठून स्वतःचे पादत्राण आपल्या दिशेने भिरकावित आहे. आम्हांस तत्काळ आपण बुश ते मनमोहन मार्गे चिदंबरम, येडियुरप्पा वगैरे पंक्तीत जाऊन बसल्याचा साक्षात्कार झाला. मग आम्हीही रीतसर "जाऊ द्या, गरीबाला सोडा" वगैरे नाट्यप्रवेश केले. मग ही आपली संस्कृती नाही, असेही निवेदन केले. मग आम्हांस प्रश्न पडला, की पादुकांना पालखीत ठेवून त्यांची मिरवणूक काढणारी, त्यांना वंदन करणारी, त्यांना राजसिंहासनावर ठेवून त्यांच्या साक्षीने कारभार चालविणारी संस्कृती आपली. तीत एकाएकी यत्र तत्र सर्वत्र पादत्राणे भिरकविण्याची प्रथा का बरे रूढ होत चालली आहे? (रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याधारे शासन चालविणारा भरत हा कमजोर राजा आहे, असा आरोप त्याच्यावर कुणी केला होता काय, असा आम्हांस एक अभ्यासू उपप्रश्नदेखील पडला आहे. पण ते असो.) कुणा राजकीय व्यक्तीचे बोलणे आपल्यास पटले नाही, तर एवढे काय मनास लावून घ्यावयाचे? मग भले ते मनसे बोलत असोत. नि राग आला तरी आपले जोडे काढून सरळ फेकावेत नि मग तळपत्या उन्हात अनवहाणी (हा शब्द कसा लिहावा ह्याबद्दल यास्मिनताई शेख काय म्हणतात? अनवाणी असा प्रचलित उच्चार आहे, जो आमच्या मते व्युत्पत्तीने सिद्ध होत नाही (म्हणजे काय ते आम्हांस विचारू नका.) अनवहाणी म्हणजे नाहीत वहाणा पायांत ज्याच्या असा तो, असा नञ बहुव्रीही आम्हांस योग्य वाटतो.) फिरावे हा विचार आम्हांस कायतरीच वाटतो. मुळात आम्हांला भर सार्वजनिक ठिकाणी वहाण सोडून द्यावी नि पुढील मार्ग क्रमावा ही कल्पनाच कसनुशी वाटते. प्रत्येकवेळी विमानतळावर आमचं सर्व काही हरण करून आम्हांला नेसत्या वस्त्रानिशी त्या यंत्रातून पाठवितात त्या प्रत्येकवेळी ते अग्निदिव्य पार पडले की आम्ही पलीकडे जाऊन ल॓पटॉप वगैरेच्या आधी आमच्या चपला उचलतो. खरंच, धरणीमातेची शप्पथ! त्यामुळे असं कुणी उगीच उठून चप्पल फेकील हे काही आमच्या पचनी पडत नाही. नि प्रसिद्धीपरायणता वगैरे झूठ आहे. तेवढेच असेल तर एखादा सर्व हिंदी वृत्तवाहिन्यांना पत्र पाठवून "आज अवकाशातून काही पांढरे बूट घातलेले पांढर्‍या पायाचे लोक येऊन आमची गाय घेऊन गेले" असे कळवेल. आहे काय नि नाही काय. पण चपला? छे, आम्हांस नाही पटत. चपला एवढ्याही स्वस्त नाहीत. मग आम्ही अधिक विचार करता एकच शक्यता प्रकर्षाने आमच्या मनात आली. हा कुठल्यारी पादत्राणांची निर्मिती करणार‍्या कंपनीचा आपला खप वाढविण्याचा उद्योग असणार. चपला फेकायला लोकांना उद्युक्त करायचे. मग सगळे चपला फेकू लागले की वाढला आपला खप. मग त्या फेकलेल्या चपला गोळा करायला माणसं नेमायची, म्हणजे त्या पुन्हा विकून अधिक लाभ. शिवाय प्रत्येक क्ष पूर्णांक पंच्याण्णव शतांश किमतीच्या चपलांच्या जोडीमागे पाच पाच पैसे लाटून होईल तो नफा वेगळाच. मग हे असंच वाढत जाणार. विद्युतकण अभियांत्रिकीत (शासकीय महाविद्यालयात शिकलो आम्ही, काय एकेक नावं! विचारू नका.) ह्यालाच avalanche effect म्हणतात (ना? हो म्हणा.) तर असं चपलांचं वादळ क्षितिजावर घोंघावत आहे, अशा भीषण कोलाहलात दचकून आम्ही जागे झालो. "पादत्राणे - एक निषेधाचे माध्यम", ह्या विषयावरील परिसंवाद संपून पांगापांग झाल्यागत वाटत होती. अकल्पित गदारोळानंतरची शांतता आसमंतात होती. सपातांच्या जोडीतील एक अकेली विजोड होऊन व्यासपीठाशी पडली होती. भानावर येऊन दचकून आम्ही आमचे पाय पाहिले. आमच्या पायीची वहाण पायी पाहून जीव भांड्यात पडला. आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला, बूटांची सैल झालेली नाडी करकचून बांधली नि तिथून निमूट काढता पाय घेतला. दुसर्‍यादिवशीच्या वर्तमानपत्रात आम्ही स्वप्नात दंग असताना मिस केलेल्या गोंधळाबाबत "पायीची वहाण पायी बरी" अशा शीर्षकाचा अग्रलेख आला होता, तो वाचला. आम्हांस मात्र कालचा गोंधळ बरा होता, असे दिवसभर वाटत होते.

Sunday, May 10, 2009

जाता जाता...(२)

जाता जाता...(१)

...

डावीकडून अजून एक रस्ता. इकडून वाहनं तिकडून वाहनं. वाहनंच वाहनं चोहीकडे.
कुठली लेन सर्वांत वेगवान आहे?
सर्वांत डावीकडची...
नाही, बहुदा डावीकडून दुसरी.
का आपण सोडून सगळ्याच??
छे! नेहमीचंच हेही...असो. आता ही लेन आपली. तिचा वेग तो आपला वेग.
समोर पसाट.
अरेरे, हाही फसला. बाजूची लेन अधिक वेगवान वाटली त्याला. जा बाबा, अशीच भरभराट होवो तुझी. कट टू सुरेश भट...
"ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे,
मी मात्र थांबुन पाहतो, मागे किती जण राहिले?"


एक्झिट ३८.

ट्रॅफिक मी म्हणतोय. जरा म्हणून गाडी हलेल तर शपथ! हे एवढे सगळे जण कशासाठी गोल गोल फिरताहेत रोज ह्या रस्त्यावर?
समोर हिरवी होंडा अ॓कॉर्ड. होंडा म्हणलं की झाडून आतला माणूस देसी असला पाहिजे, असलं काहीतरी असोसिएशन. हो देसीच दिसतोय. वर्जिनिआची (मराठीत व्हर्जिनिया!) गाडी आहे म्हणजे ९०% गुल्टी असेल. अर्थात विंजिनिअर. अजून एक उंदिर अजगराच्या पोटातला....तोच मागे संवेदच्या एका गोष्टीत होता तसा? नि आपण?

दुनिया का नारा...जमे रहो!
मंज़िल का इशारा..जमे रहो!

....

एक्झिट ४९

वॉशिंग्टन डिसीला वेढणारा कॅपिटल बेल्टवे सोडून इंटरस्टेट ६६ वर. आता हा रस्ता संपेपर्यंत ह्याच्यावरच. का कुणास ठाऊक रस्त्याच्या शेवटपर्यंत जाण्यात मला कायच्या काही सही वाटतं. फलोरिडाला की वेस्ट ह्या अमेरिकेच्या मुख्यभूमीच्या दक्षिणतम टोकाला शिवून आलो तेव्हाही मायामीपासून कीवेस्ट पर्यंतच्या त्या चिंचोळ्या यु. एस. राऊट वन वर गाडी चालवताना त्या रस्त्याच्या शेवटपर्यंत आपण जाणार म्हणून मला असंच कायच्या काही सही वाटत होतं.

इंटरस्टेट ६६ उत्तर वर्जिनिआत पूर्व‍‍-पश्चिम वाहतो. वाहतो, कारण तो नदीसारखा अनेकविध परिसरांतून अक्षरशः वाहतो. अर्थात ट्र॓फिक नसेल तरच. एरवी मी रहदारीच्या वेळा टाळून बेधडक गाडी सोडतो, पण आज तसं नाही. आज मी अगदी "आ बैल मुझे मार" स्टाइलमध्ये ही वेळ निवडल्या. त्यामुळे बाजूच्या मोकळ्या एच ओ वी लेनमधून भरधाव जाणारी गाडी बघत मला मात्र मोह टाळून बाजूच्या, वाहनांनी गच्च भरलेल्या लेनमध्ये राहणं क्रमप्राप्त आहे. केवढी ती शिक्षा. मग स्थळ, काळ बदलून येणारी तीच ती नेहमीची परिस्थिती...ती वाहनांची भरगच्च गर्दी, रस्त्याच्या मधोमध धडधडत जाणारी मेट्रो रेल, त्याच्या बाजूच्या एच ओ वी लेनमध्ये सुसाट सुटलेली एखादी गाडी, त्या सुखापासून वंचित तिच्या बाजूच्या लेनमध्ये माझी गाडी, गाणी, सुहाना मौसम, मी आणि माझी तनहाई. तिलासुद्धा आताशा अक्सर बातें करून कंटाळा येत असणार, मला खात्री आहे. पण बिचारी सांगेल कोणाला? मीही विचारीत नाही. न जाणो, निर्भीडपणे "हो" म्हणाली, तर पंचाईत! पेक्षा "मौनं संमतिलक्षणम्" हाच आभास उत्तम!

मग मी तिला दाखवतो शहरीकरणाचे भार साहणारी ती मेट्रोरेल. तीच तर ठरवते शहरांची हद्द. शहरांच्या भौगोलिक सीमा ओलांडून माणसांच्या शहरीकरणाची सीमारेषा ठरविणारी तीच ती शहरांची जीवनवाहिनी. मग तिला मी दाखवितो त्या मेट्रोरेलला नि तिच्या अस्तित्त्वाला लाजविणारी ती वाहनांची समांतर, स्वतःच्या धुंदीत-मस्तीत वाहणारी मस्तवाल गर्दी. तिला दाखवावेच लागतात रस्ताच्या दुतर्फा रचलेले चकचकणारे कारखाने, त्यांत राबणारे पांढरपेशे मजूर - पिचलेले, नानाविध गोंडस नावं देऊन अंतिमतः वेठीस धरलेले नि सर्व शोषित घटकांप्रमाणे आपल्या होत असणार्‍या शोषणाबद्दल पूर्णतः अनभिज्ञ असणारे व परिणामी शोषणाची संस्कृती समृद्ध करण्यात गुंतलेले. ती केवळ देहबोलीतून म्हणते, की मी काहीतरीच बोलतो म्हणून. मीही फार ताणत नाही. मला तिला अस्वस्थ करवत नाही.

रस्त्यावर पुढे त्या मजूरांच्या लांबच लांब पसरलेल्या वसाहती दिसतात. मी दाखवतो त्या तिला. नीटनेटक्या, टुमदार, साचेबद्ध, शांत नि निरुपद्रवी. ती एक सार्थकतेचा निःश्वास सोडते नि प्रशंसापर कटाक्ष टाकते. मी विचारतो तिला, "कशा वाटतात तुला ह्या वसाहती?" तर आश्चर्याने पाहते ती, "छानच तर आहेत, मी काय वेगळं सांगणार आणखीन" असं काहीसं. मी जरा सविस्तरच विचारतो मग तिला, "तसं नव्हे, तू तर ह्या प्रत्येक वसाहतीत, प्रत्येक घरात, प्रत्येक खोलीत, इथल्या आसमंतात राहतेस, असं ऐकलंय मी. तुला जवळून माहित असेल म्हणून विचारलं." तशी ती बावचळते. तिला तिचं अस्तित्त्व असं दाखवून दिलं, की ती नेहमीच अशी बावचळते. स्वतःचं अस्तित्त्व नाकारण्याचा असा अट्टाहास तिच्याएवढा कुणीच करत नाही.

तिला ते पटणं अशक्यच असतं. तिला नेहमीप्रमाणे हेच वाटतं की माझे कायच्या काही गैरसमज आहेत. ती म्हणते, "मी नाही अशी सर्वव्यापी. मी नाही राहत इथे. आहेत काही गोष्टी ज्यांनी ह्या घराघरांमधल्या, खोल्याखोल्यांमधल्या जागा भरल्या आहेत. मला त्यात स्थान नाही. तुला इथून दिसतंय त्यावरून तसं वाटतंय फक्त. आपल्यापल्याड जग नसलेल्याला त्या नसण्याचं काहीच वाटत नसतं. त्यांच्यात असंच जगतात. नि त्याच्या योग्यायोग्यतेचे प्रश्न उपस्थित करशील, तर त्याचे निकष ठरविण्याचे अधिकार तुला कोणी दिले?" मला दिसत नाहीत त्या भरलेल्या जागा, पण तिचा युक्तिवाद चोख असतो. मी त्या प्रगत समाजाची समाजरचना आहे तशी मान्य करतो. पण माझ्या मनाने अजूनही ते स्वीकारलेलं नाही नि "अशा यदृच्छया कुठेतरी विसावलेल्या ह्या वास्तव्याला अस्तित्त्व कसं काय म्हणायचं? कसं काय कोणी असं सुटं सुटं राहू शकतं?" अशा प्रश्नांचे गुंते ते अजून सोडवतंय, हे कळतं तिला नेमकं. तीही काही बोलत नाही.

झरझर मागे जाणार्‍या समशीतोष्ण कटिबंधीय वृक्षमाला. मधूनच रिमझिमणारा, मधूनच बरसणारा पाऊस. आसमंतात भरलेला ओलसरपणा. शांत शांत रात्रीत विरघळणारी संध्याकाळ. शहरांची मागे राहिलेली लगबग, हळूहळू विरत जाणारे एकप्रतलीय निमशहरी प्रदेश. दिसतात मग सर्वदूर पसरलेले वनांचे बेवारशी भूभाग. दूर क्षितिजावरच्या अनाम पर्वतरांगा. ह्या सगळ्याच्या अधूनमधून डोकवणारे भूगोलाच्या पुस्तकात वाचलेले "विरळ लोकवस्तीचे प्रदेश". आपापल्या मकदूरावर त्या अनाम भूभागांवर उभे राहिलेले. पाय मातीत घट्ट रोवून, आभाळाच्या उंचीचा मान राखणारे. त्या स्वयंभू सूक्ष्म विश्वांना माझे मगासचे निकष लावायला कचरतो मी. तीही मग तो मौका साधून डोळ्यानेच प्रश्न विचारते...." हे नाहीत का असेच यदृच्छया विखुरलेले, जगाशी कुठलीही नाळ न जोडलेले प्रदेश? माझा पत्ता सापडला का इथेही कुठे तुला? हेही केवळ वास्तव्य की मानवी समाजाचं अस्तित्त्व? हे नाहीत का तसेच सुटे सुटे?" मी गोंधळलोय हे कळतं तिला. तशी ती आली तशी गायब होते. मला असं एकटं टाकून जायची तिला कोण हौस!

कुठे आहोत आपण, काय करतोय नि काय चाल्लंय काय?
हे असं काही आगापीछा नसणारे, कुठल्याही सागराच्या, पर्वताच्या भौगोलिक खुणांच्या संदर्भांशिवाय जगत आलेले समाज काय म्हणून जगत आले नि जगताहेत? का त्यांना हे विरळ, मिडल ऑफ नोवेअर वाटतंच नाही? नसेल वाटत कदाचित. त्यांच्या जाणीवांमध्ये असं वाटणं कधी रुजलंच नसेल कदाचित. ह्या समाजांना भौगोलिक खुणांचे संदर्भ लाभलेच नाहीत; इथे कधी नद्यांच्या खोर्‍यांमध्ये जगतात, तशी खोर्‍यानं माणसं जन्मली, जगलीच नाहीत त्याला ते काय करणार? खरंच का हे वास्तव स्वीकारण्याएवढं सोपं आहे? खरंच लागत नाही का ह्याहून अधिक काही जगण्यासाठी? असं विखुरलेलंही ह्यांना जगावसं वाटतं ते काय म्हणून? केवळ इथे पैदा झालो म्हणून? का हेच ते जाणीवेतलं संचिताचं अदृश्य देणं? नि मग का मला इथे वास्तव म्हणून मान्य करावसं वाटणारं तत्त्व त्या काही मैलांपूर्वीच्या शहरात माणसाची समाजशीलता हरवलेलं वाटतं? हाच काय तो फरक जगण्यांमधला? संस्कृती वगैरे? ती बांधते माणसांना, की नेमकं काय? कुठलासा टुकार सर्वे भरताना समोर आलेला तो एक प्रश्न, ज्याने चपापलो होतो आपण एकदा. बहुदा तोच खरा. बहुदा त्याचं उत्तरच ठरवत असावं अस्तित्त्वामागची अर्थपूर्णता.

Please answer the following with respect to your department:
"Do you feel included?"

(क्रमशः)

Monday, April 27, 2009

नैराश्याची आर्जवे किंवा असंच काहीतरी...

एक निराशा द्या रे कोणी
निखळ निराशा माझ्यासाठी
कोरा तुम्ही तुमची लेणी
एक गुहा द्या माझ्यासाठी

काय तुम्हांला देऊ सांगा
छिन्नी घ्या ही तुमच्यासाठी
कोरा तुम्ही तुमची शिल्पे
घाव घणाचा माझ्यासाठी

घडवा पुतळे, कोरा गाथा
नक्षीबिक्षी तुम्हां हवी ती
कभिन्न कातळ एक मला द्या
घोर शांतता माझ्यासाठी

प्रवीण पाथरवटही तुमचा
हसर्‍या मूर्ती बहुअंगांनी
भूलस्मिते ती तुम्हीच उधळा
अनाम मुखडा माझ्यासाठी

त्यात असू द्या फक्त निराशा
सर्वार्थाने माझ्यासाठी
मिट्ट तमाचा गच्च घनांचा
घट्ट मेखला माझ्यासाठी

आशेच्या त्या नको किनारी
जरीकोंदणे तुमच्यासाठी
भिन्न नको ते पैलू मजला
निस्तेज हिरा माझ्यासाठी

शुभ्र निराशा तुम्हीच घ्या ती
सुतकी तसली देखाव्याची
नेसुन यावी कोणी शेला
संक्रांतीचा माझ्यासाठी

नैराश्यालासुद्धा तुमच्या
कितीक नखरे, ग्लॅमर भारी
मिरवा तुम्ही, नको मला तो
अंश त्यातला माझ्यासाठी

कातळ माझा डोंगर तुमचा
बधिर शांतता, गुहाच माझी
शिरात घुमतो घाव घणाचा,
अरूप पुतळा माझ्यासाठी

एवढेच द्या, बाकी तुमचे
कराल का हो एक आणखी?
करुन निराशा माझ्या नावे
हक्कहि सोडा माझ्यासाठी

Sunday, February 15, 2009

ठाव

हलते न पान रानी, ऐसाच येथ वारा
भिजतो न चिंब रात्री, ऐसा इथे किनारा

जुळवून पाहतो मी नक्षत्र एक रात्री
असतो कमीच नेमे एखाद रोज तारा

जुळले कसे कधी ते, वृंदात साज सारे
पुरतो मलाच हल्ली माझाच एकतारा

सुचते नवे न हल्ली बोलावयास काही
हुडकीत कोश बसतो एकेक शब्द न्यारा

दिसते बरेच काही, जे पाहिजे बदलले
बसतो मनात मग मी घालीत येरझारा

चळती क्षणाक्षणांच्या मी चोख मांडलेल्या,
पण आवरू कसा मी मेंदूतला पसारा?

निमिषास वेग नाही, वेगास ठाव नाही,
भ्रमत्या सुसाट चित्ता लाभे कसा निवारा!

Friday, January 30, 2009

सदूचा २६ जानेवारी

२६ जानेवारीची सुट्टी म्हणून सदू अंमळ आरामातच उठला. वीकांताला जोडून सुट्टी आली तरी त्याने यंदा काहीच प्ल॓न केला नव्हता. कुणी म्हणे रेल्वे हेच अतिरेक्यांचं लक्ष्य आहे, तर कुणी म्हणे महत्त्वाची पर्यटन स्थळं. कुणी विमानतळांचही नाव घेई. पण त्यातून फिरायचा सदूने कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे यंदा संक्रांत कोणावर येणार ह्याची वाट पाहत सदू बसला होता. त्याला असं प्रामाणिकपणे वाटत होतं की ह्या अतिरेकी हल्ल्यांच्या सूचना थोड्या दिवसांनी सगळं आलबेल म्हणून काढून घेतल्या जातील. इथल्या व्यवस्था त्याला येथपुढे ह्या ना त्या कारणावरून घाबरवित राहणार, असं काही त्याला सुचण्याची सुतराम शक्यता नव्हती. सदू तसा भाबडा मनुष्य आहे. साधारण कधीपर्यंत संक्रात येण्यापासून सावध रहायला हवं, ह्याचं उत्तर त्याने हळदीकुंकवांचं लॉजिक वापरून "रथसप्तमीपर्यंत" असं स्वतःशी ठरवलं होतं. शिवाय यंदा विलासरावही नव्हते. त्यांच्यावर यंदा संक्रांत रेट्रोअ॓क्टिवली आली होती. शासकीय व प्रतिशब्दवाल्यांच्या मराठीत ह्याला पूर्वलक्ष्यी प्रभावाने असं म्हणण्याची प्रथा आहे. त्यामुळे संक्रातीचा ताजा कोटा बाकी होता. वर काही च्यानेलं २६ ला अमावस्या आहे नि त्यातही सूर्यग्रहण असा भर पौषात उल्हसित होऊन शिमगा करीत होती. म्हणून विषाची परीक्षा नको म्हणून सदूने घरीच रहायचं ठरवलं.

सकाळी वर्तमानपत्रं हातात घेऊन तो पद्म पुरस्कारांची यादी वाचू लागला. नावं माहित असोत, नसोत, पण सदू ही यादी न चुकता वाचतो. ती यादी वाचताना तो एकदम कोसळलाच. चहाचा कप त्याने सावरला म्हणून नाही तर, शिमग्याच्या जोडीला रंगपंचमीही झाली असती. सदूने लागलीच गल्लीसुंदरी होऊ पाहणार्‍या आपल्या मुलीला प्रोत्साहन देऊन स्पर्धेत भाग घ्यायला लावला. हे असं अचानक कसं झालं, ह्या विचाराने मुलीला चहाच्या पहिल्या घोटातच ठसका लागला. "चाळीच्या गणेशोत्सवाच्या नाटकातसुद्धा तुला कुणी घेणार नाही," असं आपल्या मुलाला म्हणणारा सदू त्याला चक्क "तू फिल्ममध्ये का नाही करीअर करीत?" असं विचारू लागला, तेव्हा त्याच्या मुलाचा चेहरा भारतभूषणहून भावशून्य झाला. ऐश्वर्या राय व अक्षय कुमार हे तुमचे आदर्श असले पाहिजेत, असं त्यानं मुलांना समजावून सांगितलं व तो कृतार्थ भावनेने प्रजासत्ताक सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहू लागला. अनेक च्यानलवाले तो सोहळा थेट दाखविताना आपला मसाला कशास भरीत होते, हे काही त्यास उमगेना. रविवारी फारच मसालेदार जेवण झालेलं असावं असा त्याने एक अंदाज बांधला व तो निमूट पाहू लागला. सदू लाल किल्ल्यावर राष्ट्रगीत सुरू झालं, तरी घरात सीधा उभा राहणारा साधासीधा माणूस आहे. त्यामुळे त्यानं तो सोहळा अतिशय तन्मयतेने पाहिला. करकरे, कामटे, ओंबळे वगैरे नावं ऐकली तेव्हा त्याला दोन महिन्यांपूर्वीच्या आठवणीने गहिवरून आलं. त्यानं "आज गोडधोड करायचं नाही घरात" असं फर्मान सोडून दिलं. प्रजासत्ताक दिनाचं त्याला रीतसर स्फुरण चढलं होतं.

दुपारची जेवणं झाली नि सदू प्रजासत्ताकाच्या स्फुरणातच वामकुक्षी काढण्यासाठी पडला. पण त्याच्या डोक्यात मात्र सकाळचंच चालू होतं. इशारा, धोका, पिवळा रंग, केशरी रंग, लाल रंग असे रंगीत धोके त्याला दिसू लागले, आज तारीख २६ असं त्याला वारंवार कुणीतरी बजावतंय, असे भास होऊ लागले. आपल्याच घरात सुट्टीच्या दिवशी दुपारी भयंकर स्वप्नं पडू लागली तेव्हा सदू हैराण झाला. उठून तो एक चक्कर मारून येतो असं म्हणून बाहेर पडला. त्याने पाऊल बाहेर टाकायच्या आधी त्याच्या बायकोने देव पाण्यात ठेवले. सदू निमूट बाहेर पडला. चौकाचौकात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारे फलक झळकत होते. सकाळचे झेंडे पडून पायतळी लोळत पडले होते. लोक लगबगीने कुठेतरी जात होते. सुट्टीचे म्हणून असतील जात भटकायला असं सदूला वाटलं. तर ते सगळे मॉलमध्ये विंडो शॉपिंग करण्यासाठी जात होते. म्हणजे ती महत्त्वाची पर्यटन स्थळं म्हणजे मॉल असं सदूला लक्षात आलं. तेव्हा आपल्याला त्यांच्यापासून भ्यायचं कारण नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याचा जीव जरा भांड्यात पडला. जरा मोकळी हवा खाल्ल्यावर त्यालाही बरं वाटू लागलं. नि हवेपासून धोका आहे असं कुणी अद्याप सांगितलं नसल्याचं त्याला आठवलं. तो मनोमन प्रसन्न झाला. त्या धुंदीत तो इतका सुखावला, की थेट रात्रीच घरी परतला.

एवाना बायकोने उत्साहाला आवर घालून देव बाहेर काढून ठेवले होते. झोपताना प्रसन्न चित्ताने झोपावं म्हणून त्याने त्याचा सर्वांत आवडता गाण्याचा कार्यक्रम लावला. ह्या निखळ आनंदाने त्याला गेले काही महिने भुरळ घातली होती. सूर तेच होते, पण आज तिथेही वेगळाच नूर होता. कुठल्याशा हिंदू राष्ट्राचा प्रजासत्ताक दिन ते साजरा करीत होते. एक आजोबा मधाळ भाषेत बोलत होते. पण जे काही ते बोलत होते ते मधाळ होतं की जहरी, हे काही सदूच्या अल्पमतीस कळेना. लहान लहान मुलं जिवाच्या आकांताने "आर्यांच्या राज्यावर म्लेच्छांचा घाला" असं काहीतरी गाऊ लागली, तेव्हा सदू गांगरला. त्याने मुलांना आत पाठवलं. प्रजासत्ताक दिन म्हणून "हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा" असं गाणं लागल्यावर सदूचा चेहरा पडला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य नव्हे तर राजेशाही असते, हे आपल्याला कधीच कसं कळलं नाही ह्या विचाराने त्याला अपार खिन्नता आली. त्याने दिवसभर जपलेल्या लोकशाही प्रजासत्ताकाविषयीच्या अभिमानाचा असा चक्काचूर होताना त्याला पाहवेना. त्याला अन्न गेलं नाही. त्याने नाही म्हणताच बायकोने पटापटा लवकरच जेवणं उरकून घेतली. आवरता आवरता "आज कसं शांतचित्ताने असंभव पाहता येईल" असं ती म्हणत होती. सदू असंभव पाहत नाही. त्याला गीतेचा दुसरा अध्याय तो खूप मोठा आहे, म्हणून शाळेपासूनच आवडत नाही. तिथे आत्मे कपड्यांसारखी शरीरं बदलू लागले की तो मुकाट कपडे बदलून झोपून जातो. पण आज त्याला काय संभव, काय असंभव तेही कळेना. म्हणून तो असंभवसुद्धा निमूट पाहू लागला. त्याचबरोबर त्याच्यावर लादण्यात आलेली यदृच्छा भीती पुन्हा एकदा चौफेर दाटून आली. त्यात दाखवितात ते संभव की असंभव, ह्या विचाराने तर तो पुन्हा गोंधळून गेला. घरच्या लोकांपासूनही आता सावध रहायला हवं असं काहीसं त्याला एका अज्ञात क्षणी वाटलं नि त्याचं उसनं अवसान पुन्हा एकदा गळून पडलं. त्याच्या डोक्यात एकच गाणं त्याला रूढार्थाने झोप लागेपर्यंत घोळत राहिलं..."मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई, ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई".

Monday, January 19, 2009

मु.पो. वॉशिंग्टन

आज सोमवारी अमेरिका मार्टिन ल्यूथर किंग ह्यांची सत्तरावी जयंती साजरी करत आहे व उद्या मंगळवारी बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ ग्रहण करतील. सत्तर वर्षांपूर्वीसारखी घरघर लागलेली अर्थव्यवस्था योगायोगाने पार्श्वभूमीवर आहे. सत्तांतराच्या ह्या सोहळ्याला न भूतो असा जनसागर उसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संपूर्ण वॉशिंग्टन, डी. सी. व आजूबाजूच्या भागात रस्त्यावर वाहने चालविणे व कुठेही जाणे दुरापास्त होण्याची शक्यता आहे. अनेक रस्ते, मेट्रो ट्रेन स्टेशन बंद असणार आहेत. अनेक ठिकाणी ह्या उद्घाटन सोहळ्याचं व त्यातील संचलनाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक जण आधीच शहरात व आसपासच्या परिसरात आगाऊ येऊन राहिले आहेत. संचलनाच्या मार्गाच्या आजूबाजूचा परिसर, शहरातील इतर निवासी भाग, आजूबाजूचे मेरीलँड, वर्जिनिया राज्यांचे भाग येथे केवळ ह्या सोहळ्यासाठी म्हणून अमेरिकेच्या इतर भागांतून आलेल्या अनेक जणांनी काही दिवस, आठवडा, काही आठवडे, महिना अशा विविध कालावधींसाठी घरे भाड्याने घेतली आहेत. सर्व हॉटेलांमधील आरक्षण आधीच भरलं आहे. रस्त्यावरील संभाव्य वाहतुकीची कोंडी, बंद ठेवण्यात येणारे रस्ते, शहरात उसळणारी संभाव्य अलोट गर्दी ह्यासंबंधी सूचना देणार‍्या साईन सर्वत्र दिसू लागल्या आहेत. कडाक्याच्या थंडीला न जुमानता अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करण्यासाठी एक भव्य सोहळा होणार अशी चिह्ने आहेत व त्या सोहळ्याचे पडघम आता अधिकाधिक जोरात वाजू लागले आहेत.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा नेहमीच जगाच्या चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे २००८च्या निवडणूकांनाही अर्थातच जागतिक महत्त्व होतं. पण अमेरिकेत विद्यापीठात शिकणे म्हणजे कम्युनिस्ट राज्याच्या वरताण भिंतींनी वेढलेल्या बेटावर राहिल्यासारखा प्रकार असल्यामुळे मी सर्व निवडणूक प्रचार, धामधूम ह्यांपासून प्रथमपासूनच अलिप्त होतो. दूरदर्शन नामक प्रसारमाध्यमाशी दुरान्वयानेही संपर्क नसल्यामुळे चोवीस तास कोणीही बातम्या माथी मारत नव्हते. नाही म्हणायला अमेरिकेत शिकून अमेरिकेतच नोकरी करू लागलेल्या मित्रांकडून टीव्हीवरील बातम्या कधीमधी कळत होत्या. पण मला काही त्यांच्यातील बर्‍याच जणांप्रमाणे आजूबाजूला जग आहे असं नव्याने कळलं नव्हतं. नि त्यामुळे तेही पहावं असं वाटून राजकारण, अर्थकारण ह्यांत अवास्तव रस दाखविण्याची हुक्की आली नव्हती. राजकारणाविषयी असली नव्याची नवलाई नसल्याने मी आपली नेमाने मिळेल ती माहिती वाचून, ऐकून, पाहून होतो. कधी मित्रांत थोड्या चर्चा वगैरे. पण ह्याहून अधिक काही नाही. बराक ओबामा आमच्या विद्यापीठात भाषण ठोकायला आले होते तेव्हाही कुठल्याश्या टुकार पण न टाळता येणार्‍या मीटिंगपायी ते ऐकायला न जाण्याचा करंटेपणा माझ्या हातून घडला होता. वास्तविक तेव्हा माझी प्रथम पसंती हिलरीताईंना असल्यामुळेही मी ती मीटिंग टाळण्याचा फार आटापीटा केला नाही. त्यामुळे ह्या सगळ्या विषयावर माझा खळखळाट मी कटाक्षाने टाळला होता. परंतु जेव्हा एक डोळा अमेरिकेवर नि दुसरा डोळा अमेरिकाविरोधकांवर ठेवणार्‍यांचे खास अमेरिकन निवडणूकांवरील स्तंभ वर्तमानपत्रात वाचले तेव्हा मात्र एवढं सुमार तर आपणही लिहू शकू असा एक आत्मविश्वास मनात निर्माण झाला. आज वरातीमागून घोडे दामटविण्यासाठी वेळ मिळाला व त्यातूनच हा लेखप्रपंच.

जेव्हा निवडणूकपूर्व पक्षांतर्गत निवडणूका सुरू झाल्या तेव्हा बराक ओबामा हे नाव मी प्रथम ऐकलं नि हिलरी क्लिंटन वगळता अनोळखी असणार्‍या इतर संभाव्य उमेदवारांच्या यादीत ढकलून दिलं. कालांतराने एकेक नाव मागे पडलं नि सरतेशेवटी हिलरीताई व बराकभाऊ उरले. रिपब्लिकन लोकही प्रसारमाध्यमांमधील वास्तव्य टिकवून ठेवण्यासाठी म॓केन ह्यांनी जवळपास निश्चित अशी आघाडी घेऊनही काही दिवस निवडणूका घेत राहिले, पण पुढे पक्षांतर्गत स्पर्धेचा आव आणणे कठीण होत चालल्यामुळे बहुदा त्यांची उमेदवारी जाहीर करून विषय संपवून स्वस्थ बसले. डेमोक्र॓टिक लोकांचं मात्र भिजत घोंगडं चिक्कार दिवस तसंच पडून राहिलं नि त्या पार्श्वभूमीवर हिलरीताई व बराकभाऊंच्या बाजूने व विरोधात वादविवादांच्या अनेक फैरी झडल्या. त्याच वेळी अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष जर डेमोक्र॓टिक पक्षाचा झाला तर अमेरिकेला प्रथम महिला किंवा प्रथम अ॓फ्रो‍-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लाभून इतिहास घडणार हे निश्चित झालं होतं. डेमोक्र॓टिक पक्षाचा कोणीही उमेदवार विजयी होईल अशी स्थिती होती म्हणून डेमोक्र॓टिक पक्षाने महिला अथवा अ॓फ्रो‍-अमेरिकन व्यक्तीला उमेदवारी देण्याचं धाडस केलं का? हा प्रश्न माझ्यासाठी कुणीच सोडविला नाही. त्यासाठी मला बहुदा २०१२ पर्यंत थांबावे लागेल. कारण आता हा प्रश्न कुणीही विचारणार नसला तरीही लोकांची मानसिकता काही एका निवडणूकीत बदलत नसते.

हिलरीताईंच्या बहुतांश योजना विशेषतः आरोग्यसुरक्षाविषयक धोरण हे अधिक तपशीलवार व सुसंगत आहे असं माझं आपलं एक प्राथमिक मत. पण सर्वसाधारणपणे ह्या विषयावर सर्व डेमोक्र॓टिक जनता सरदार सरोवर प्रकरणी तमाम गुजरात एक होतो तद्वत एक होत असल्यामुळे हा काही फार महत्त्वाचा मुद्दा नसावा असं मला वाटत होतं. पण मध्ये ह्याच विषयावरून दोघांत खडाजंगी होऊन जुंपली. तेव्हाही बराकभाऊ आपल्या प्रियंवदा बोलीत फार मोघम बोलतात असं आपलं माझं मत. शिवाय बराक ओबामा ह्या नावावर जीव ओवाळून टाकलेल्या जनतेपैकी किमान ९० टक्के जनता त्यांच्याविषयी बोलताना प्रथम वाक्य, "काय सुंदर वक्ता आहे तो" असं घेत असल्यामुळे मी त्यांच्यापासून अधिक दूर. कारण चांगलं काय नरेंद्र मोदीसुद्धा बोलतात असं माझं एक त्यावर ठेवणीतलं उत्तर होतं. भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी ते अजित जोगी ह्या एकेकाळच्या मला चांगलं बोलतात म्हणून आवडणार्‍या पक्षप्रवक्त्यांनी एक तर मुख्यमंत्री झाल्यानंतर मला तोंडघाशी पाडलं. तेव्हापासून मी कोणी चांगला बोलतो ह्या क्वॉलिफिकेशनला जराही भाव देत नाही. फार फार तर बुशकाकांच्या बहुचर्चित वक्तृत्वाच्या पार्श्वभूमीवर वक्तृत्वाला महत्त्व देण्यास मी तयार होतो, पण तेवढंच. शिवाय मला कुठल्यावेळी काय आठवेल ह्याचा नेम नसल्यामुळे माझ्या डोक्यात आपलं एकच "दुर्जनो प्रियवादी च नैतद् विश्वासकारणम्..." त्यामुळे माझ्यालेखी त्याच्या अमोघ वकीली वक्तृत्वाला शून्य किंमत होती. शिवाय माझा राजकारणातील तथाकथित घराणेशाहीविरुद्ध कुठलाही लढा नसल्यामुळे बुश-क्लिंटन घराण्यांच्या गेल्या वीस वर्षांच्या सत्तेतून अमेरिका मुक्त झाली पाहिजे असली कोणतीही नैतिक जबाबदारी माझ्यावर नव्हती. बराकभाऊ आऊटसोर्सिंगच्या बाजूनेही फारसे उत्साही नसल्यामुळे त्याही फ्रंटवर त्यांची भूमिका तद्दन भूमिपुत्रवादी वाटत होती. बरं माणूस जर एवढा थोर आहे, तर त्याने युद्धाविरोधी न बोलता युद्धखोरीविरोधी बोलावं, तर तेही नाही. पुन्हा इराकयुद्धाला प्रखर विरोध करून अफगाणिस्तानात दुर्लक्ष होतंय असं हा माणूस बिनबोभाट खुलेआम बोलतो. अमेरिकन संसदेत पक्षादेश वगैरे भानगड दोनच पक्ष असल्यामुळे नसावी. त्यामुळे कुठल्याही विधेयकावर कुठल्याही पक्षाचा कोणीही उठून आय, नाय कायपण म्हणतो. त्यामुळे कुणी कुठल्या विधेयकाच्या बाजूने मतदान केले अथवा विरोधात केले, किती विधेयकांवर तसे केले ह्याची आकडेवारी एकमेकांवर फेकणे हा येथील निवडणूकपूर्व वादविवादांचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे हिलरीताईंनी इराक युद्धाला पाठिंबा दिला होता ह्याचं भांडवल किती करावं ह्याला माझ्या लेखी मर्यादा होत्या. शेवटी वाहत्या गंगेत विधेयकाच्या बाजूने मत देणे नि राष्ट्राध्यक्ष म्हणून युद्ध पुकारणे ह्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. नि एक महिला राष्ट्राध्यक्ष युद्धखोरीविरोधात अधिक मानवतावादी व सम्यक भूमिका घेईल अशी माझी एक (भाबडी) समजूत आहे. परिणामी माझ्या लेखी तरी बराकभाऊंचं पारडं काही जड होईना. सरतेशेवटी पक्षांतर्गत निवडणूकीचा कौल शिरसावंद्य मानून बराकभाऊ डेमोक्र॓टिक पक्षाचे उमेदवार झाले. हिलरीताईंनी त्यांना राजकारणात दुर्मिळ असणार्‍या जिंदादिलीने संपूर्ण सहकार्य करण्याची राणाभीमदेवी घोषणा केली व माझ्यासाठी मला तो विषय संपवावा लागला. तेथून पुढे व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा, मत व्यक्तीला नव्हे तर पक्षाला द्यायचं असतं, ह्या संसदीय लोकशाहीच्या पक्क्या धारणा अध्यक्षीय लोकशाहीसाठी वापरून केवळ डेमोक्र॓टिक पक्षाचा उमेदवार म्हणून बराकभाऊंना मी माझं मत जर संधी असती तर दिलं असतं.

ह्या सर्व प्रकारात डेमोक्र॓टिक पक्षाच्या मध्यममार्गी भूमिकेशी असणारी तत्त्वत: जवळीक ही पार्श्वभूमीला होती. म्हणजे डाव्या-मध्यममार्गी भूमिकेच्या जवळ उजव्यांपेक्षा मधले असतात, नि हे दोन सोडून अमेरिकेत कोणीच म्हणावे असे नसतात म्हणून. पण भारतीय राजकारणात एकतर स्वारस्य नसलेली, असल्यास डोळे झाकून उजवी असलेली तमाम देसी जनता इथे किस खुशी में डेमोक्र॓टिक पक्षाच्या बाजूने आहे ह्यो काय मला अजून समजलेला नाही. म्हणजे एकाच वेळेस मोदी व ओबामा ह्यांचे समर्थक असण्यासाठी लागणारी वैचारिक सुसंगती कुठे शिकवतात, हे मला कुणी सांगेल का? नि जर ती न शिकवता कळण्याएवढी स्वाभाविक असेल तर मी किती बेअक्कल आहे हा विचार मला राहून राहून त्रास देत आहे. हा केंद्रात सत्तेत, आसामात विरोधात, राज्यात एकांबरोबर, पुण्यात दुसर्‍यांबरोबर अशासारखा एखादा राष्ट्रवादी विचार आहे काय, की आपण मारे आपले कृष्णवर्णीयविरोधाचे पूर्वग्रह, वांशिक भेद मनापासून जपले तरी इथला श्वेतवर्णीय शेवटी आपल्यालाही भाव देत नाही अशी झालेली उपरती आहे, की कुठल्याशा वस्तुनिष्ठतेच्या अनाकलनीय कसोट्या ह्यांना अवगत आहेत, ज्या आधारे त्यांना असे निर्णय बिनदिक्कत घेता येतात, की हाही केवळ स्वार्थी सोयीस्कर पर्याय आहे हे मला अद्याप कळलेले नाही.

उमेदवारी जाहीर होईस्तोवर एवढा गहजब करूनही शेवटपर्यंत काही कुणी ठामपणे सांगेना कोण जिंकेल ते. वास्तविक उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये झालेल्या वादविवादानंतरही जर प्रश्न उरले असतील तर म्हणजे कठीण काम होतं, म्हणजे उद्या म॓केन निवर्तले तर सारा प॓लिन राष्ट्राध्यक्ष होतील ह्या भीतीने नव्हे. मूळात म॓केन हे कसे म्हातारे आहेत, त्यांना कसा क॓न्सर झाला होता, नि त्यामुळे त्यांच्या पश्चात साराताई, नको, साराबाई कशा काय सांभाळणार कारभार, हा काही चर्चेचा विषय असू शकतो का? एखाद्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराचा मृत्यू होईल, हे काही चर्चेचं गृहीतक असू शकतं का? नि वर ते गृहीतक किती शक्य आहे ह्याचे दाखले देऊन गृहीतक सबळ होत असलं तरी त्याधारित केलेली चर्चा समर्थनीय होऊ शकते का? हे प्रश्न संपूर्ण अमेरिकेत फक्त मलाच पडलेत की काय असंही मला राहून राहून वाटत होतं. मला एक तर काही तरी सदैव प्रश्न उभे करणारा मानसिक आजार झाला आहे किंवा लवकरच होणार आहे अशी मला खात्री वाटत चालली आहे. तर ह्या भीतीने नव्हे, पण ह्या मिस अलास्का बाई जे बरळत होत्या त्यावरूनच त्यांना मत द्यायचं का हा विषय संपायला हवा होता. ह्या रिपब्लिकन पक्षाच्या सुषमाताई स्वराज त्या चर्चेत "आम्ही वॉल स्ट्रीटवरील बेबंदशाही मोडून काढू" असं म्हणाल्या तेव्हा त्यांचं भाषण प्रकाश करातांनी लिहून दिलंय का असं मला प्रामाणिकपणे वाटलं होतं. पण ह्या बाई त्याच श्वासात "सरकारने लोकांमध्ये फार लुडबूड करता कामा नये" असं काहीसं म्हणाल्या. म्हंजे कसं ते? म्हणजे मान्य आहे की, स्वतःच्या राष्ट्रात किमान लुडबूड करून इतर राष्ट्रांमध्ये कमाल लुडबूड करणे हा अमेरिकन लोकशाही शासनांचा मंत्र आहे, पण तरीही एका दमात बोललेल्या ह्या दोन वाक्यांची सुसंगती काही मला घडेना. म्हणजे आता कोणी साराबाईंवर असिफ अली झरदारी स्टाईल भाळून त्यांना मत देणार असेल तर भाग निराळा, पण एरवी कुठल्याही प्रश्नावर अलास्का प्रोटोटाईप उत्तर देणार्‍या ह्या बाईंना मत द्यायची काही एक गरज नव्हती. पण विरोधासाठी एवढे ठोस मुद्दे असताना त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे असमर्थनीय प्रयत्न का केले हेही एक कोडंच. त्यांच्याविरुद्ध केवळ एक महिला उमेदवार म्हणून झालेल्या गैर व परिणामी असमर्थनीय प्रचाराचाही तीव्र शब्दांत निषेध केलाच पाहिजे.

चार नोव्हेंबरला अमेरिकन जनतेने कौल दिला व शेवटचं मत मोजलं जाण्यापूर्वीच निर्णय मान्य करणार्‍या जगातल्या सर्वांत शक्तीशाली लोकशाहीत एक सत्तांतर घडलं. बराक ओबामा ह्यांनी दणदणीत विजय मिळवला. ते जाहीर होताच संपूर्ण अमेरिकेत संचारलेली उत्साहाची लाट व झालेला जल्लोष रोमांचकारी होता. ह्यावेळी मी भाषणांचं थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी हुकवली नाही. जॉन म॓केन ह्यांनी निवडणूक हरल्यानंतर केलेलं भाषण हे माझ्यादृष्टीने पराभव ग्रेसफुली मान्य करण्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हटलं पाहिजे. पराभूत उमेदवाराचं एवढं सुरेख भाषण मी तरी आजवर ऐकलेलं नाही. बराक ओबामांचं विजयी झाल्यानंतरच्या भाषणापेक्षाही तिथे असणारं भारलेलं वातावरण अधिक अंगावर रोमांच उभे करणारं होतं. बोलण्यात खरंच जादू होती. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची दुर्मिळ भाषा होती. "मेन स्ट्रीट यातना सहन करत असताना वॉल स्ट्रीट आपल्या मस्तीत धुंद राहू शकत नाही", अशी अनअमेरिकन भाषा होती. ती ऐकताना भाषणादरम्यान अंगावर काटे आले खरे नि नक्कीच एक विश्वास वाटला. माणूस नुसता प्रभावी वक्ता नाही तर अशी भाषा बोलणारा आहे म्हणून हायसंही वाटलं. नक्कीच स्वप्नं बघण्याची क्षमता त्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. पण स्वप्न दाखविणारी निवडणूकपूर्व भाषणांची भाषा आता नव्हती. किंबहुना ती स्वप्नं साकार होणं कठीण आहे, वेळ लागेल, पण अशक्य नाही असा सूर होता. त्यात आश्चर्य काहीच नव्हतं. पण मत मिळवण्याची भाषा एक असते व सत्ता मिळवल्यानंतरची एक असते हे वास्तव ओबामांनाही दूर सारता आलं नाहीच. ते नंतर बोलले ते योग्यच होतं, पण आधी बोलले ते अतिरंजित नव्हतं? आऊटसोर्सिंगला असणारा विरोध मतं मिळविण्यासाठी ठीक आहे, पण ते प्रत्यक्षात येऊ न शकणारं धोरण आहे व ओबामा ते बदलतीलच, असं अमर्त्य सेन म्हणाले. तसं होईलही कदाचित. पण मग त्यांच्यात नि वीजमाफीवर मतांचा जोगवा मागून मग ते न देणार्‍या सरकारांमध्ये काय फरक राहिला? वीजमाफी न देणे, आऊटसोर्सिंग बंद न करणे ही अधिक समर्थनीय धोरणं असली तरी पण मग मतांच्या जोगव्यासाठी आधी का अवास्तव काही बोलायचं? थोडक्यात काय तर मतदानपूर्व व शपथग्रहणोत्तर भाषांमधला फरक ओबामांनाही करावाच लागला, लागेल. माणूस चांगला वक्ता आहे ह्याला मर्यादेबाहेर काहीच महत्त्व नाही हे पुन्हा अधोरेखित करून त्या भाषणानंतर मी एक मनातल्या मनात छद्मीसं हसून घेतलं. हिलरी क्लिंटन ह्यांना सेक्रेटरी आ॓फ स्टेट करून त्यांनी दुर्मिळ स्टेट्समनशिप दाखविली आहे. त्यांच्याकडून आता राईसबाईंपेक्षा नक्कीच जास्त अपेक्षा आहेत. शिवाय मला पडलेले काही प्रश्न त्यामुळे सध्यातरी मिटले आहेत.

सर्वसाधारणपणे शासनाला विटलेल्या जनतेने इतिहासात आजवर लोकशाही मार्गाने फ॓सिस्ट हुकूमशहांना निवडून दिले आहे. पण लोकशाहीच्या मार्गाने अतिरंजित स्वप्नाळू भाषणांच्या जोरावर निवडून येणारा व सर्वसमावेशक राज्याची भाषा करणारा नेता निवडून दिल्याची उदाहरणं कमी आहेत. ह्यासाठी अमेरिकन लोकशाहीचं अभिनंदन केलंच पाहिजे. परंतु, पुन्हा एकदा हे अभिनंदन नेमकं कशाचं? लोकशाही व्यवस्थांचं व मूल्यांचं सशक्तीकरण झालं का? की पुन्हा एकदा स्वप्न दाखवणारा, ती पूर्ण करण्याची जोरदार भलामण करणारा व आपल्या वक्तृत्वाने मन जिंकणारा पण सर्वसमावेशक राज्याची कल्पना करणारा एक कल्याणकारी हुकूमशहाच व्यवस्थेने निवडून दिला? हुकूमशहाच हवा, पण कल्याणकारी, असं मानणार्‍या उजव्या सुप्त मानसिकतेचाच हा विजय आहे का, नि ओबामा हे त्याचं केवळ एक मूर्त स्वरूप आहे का? ह्यातच तमाम देसी जनतेच्या सोयीस्कर राजकीय भूमिकेचं उत्तर आहे का? हे प्रश्न अजून अनुत्तरीत आहेत. तो धर्म, वर्ण ह्यांचं भांडवल करीत नाही, म्हणून त्याचं कौतुक करणारी जनता त्याला वेळ देईल का, सहकार्य करेल का? तेच लोक जर त्याने काही चूका केल्या तर त्या केवळ एक माणूस म्हणून मान्य करतील की तेव्हा मात्र त्यांचं नातं त्याच्या वर्णाशी, घराण्याशी जोडण्याचा करंटेपणा करतील? पहिला कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होणे ही नक्कीच ऐतिहासिक घटना आहे, पण ती बदलत्या मानसिकतेचं दर्शन आहे का, हे मात्र अजून अनुत्तरीत आहे. शासनव्यवस्था अधिक पारदर्शी करण्याबद्दल बोलणारा हा नवा नेता ती अधिक लोकाभिमुख करू शकेल का? संस्थात्मक भ्रष्टाचार दूर करू शकेल का? युद्धखोरीला आळा घालू शकेल का? युद्धांवर चालणार्‍या अर्थव्यवस्था त्याशिवाय उभारू शकेल का? हेही प्रश्न अजून सुटलेले नाहीत. म्हणूनच भारतात असा ओबामा केव्हा होणार अशा चर्चांनी ऊत आणलेल्या वृत्तवाहिन्यांवरील चर्चा मला अर्थहीन वाटतात. कोणी एक कुठून येईल व आपल्याला तारेल, एक कल्याणकारी नेताच हवा...व्यवस्था नको, ही मानसिकता काही जात नाही हे विदारक वास्तव आहे. नि जर शेकडो वर्ष जुन्या लोकशाहींतही ती अजून तशीच असेल, तर काहीतरी चुकतंय. काहीतरी बदलायला हवंय. एरवी अवास्तव अपेक्षा केल्या नसत्या पण "तुम आशा विश्वास हमारे" अशा नजरेतून ज्याला पाहिलं जात आहे, तो हे मूलभूत बदल घडवू शकेल काय हे विचारणे क्रमप्राप्त आहे. सर्वसाधारणपणे होत असलेला ओबामाचा उदो उदो स्वाभाविक आहे. त्यांचं अमेरिकेच्या सर्वोच्चपदी विराजमान होणं नक्कीच प्रशंसनीय, अभिनंदनीय व स्वागतार्ह आहे. परंतु ह्या घटनेला प्रेरणादायी ऐतिहासिक घटना म्हणण्यापूर्वी ह्या प्रश्नांची उत्तरं मिळावी किंवा मिळवावी लागतील. अर्थातच ती कालांतराने मिळतील, पण शोधली तर. सध्या ह्या प्रश्नांची उत्तरं नकारात्मक नसली तरी सकारात्मकही नाहीत. त्यामुळे सध्या फक्त उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे!

Saturday, January 17, 2009

हे सूरांनो चंद्र व्हा...

हाती आलेला अपराधरहित मोकळा वेळ दवडला जाऊ नये म्हणून काय करायचं, तर निरपेक्ष आनंद मिळेल असं काहीतरी करायचं. म्हणूनच आज बसून झी मराठीच्या साईटवरून आर्या, कार्तिकी, प्रथमेश, रोहित, मुग्धा, अवंती, शाल्मली व शमिका ह्यांची गाणी रीतसर डाऊनलोड केली. सध्या तीच ऐकणे चालू आहे. हे सूर म्हणजे २००८ सालाची महत्तम देणगी म्हटली पाहिजे. वास्तविक कोणी चांगलं गात असताना आपण तिथे बोलू नये हे नि हेच खरं असलं तरीही ह्या कार्यक्रमाची नि ह्या कलाकारांची विशेष नोंद घेणे हे आवश्यक आहे. नजीकच्या भूतकाळात ह्या तोडीची हृद्य व दिल खुश करणारी घटना अन्य नसावी. विशेषतः दिवसागणिक क्रौर्याचे नवनवीन अविष्कार नजरेसमोर येत असताना निरागस, निष्पाप आनंद व सुकून ह्यांनी ओतप्रोत भरलेलं असं काही दिसणं हा एक सुखद दिलासा आहे व निर्ढावलेल्या आशावाद्यांसाठी एक आशेचा किरण आहे.

संगीताला सीमा माहित नसतात हे जरी खरं असलं तरीही ज्यांचं गाणं कधीही ऐकलेलं नाही, जे प्रस्थापित नाहीत, अशांपैकी कोणाच्या गाण्याने काही युटयूबवरच्या क्लिपमधून मन जिंकावं हा एक विरळा अनुभव आहे. आर्याच्या 'युवती मना'वर आपण फिदा का होतो, प्रथमेशच्या 'काळ देहासी आला खाऊ' मध्ये भक्तिरसात न्हाऊन अद्वैतावस्थेत पोहोचलेल्या तुकारामांपासून सुफी दरवेशांपर्यंतचे सर्वजण का साक्षात्कार देऊन जातात, कार्तिकीच्या काळ्या मातीचा पोत असणार्‍या आवाजातून कधी मंत्रमय आर्त सूर, कधी पावसाळी सुगंधाचा दरवळ, तर कधी मातीचे हुंकार व पुकार उमटून हृदयाचा ठाव कसा घेतात, रोहितच्या अदाकारीवर पाय का थिरकतात, मुग्धाच्या 'राधाधर मधुमिलिंद जयजय'मधले क्रोमँटिक सूर ते म्हणजे काय हे कळत नसूनही कसे थेट मुग्ध करतात ह्या प्रश्नांना उत्तरं नाहीत. ती नाहीत म्हणूनच माझ्यासारख्या सामान्यातिसामान्य श्रोत्याला हा एक वास्तवातीत अनुभव आहे. स्पर्धांचे नियम सोयीने 'वरून' अनेकदा बदलतात नि मग ते तसे बदलण्याचेही पायंडे पडतात, परंतु लोकाग्रहाच्या व उच्चप्रतीच्या कलाविष्काराच्या तादात्म्यातून 'खालून' नियम बदलले जाणं हे एक विशेष म्हणावे लागेल. खरं तर संगीतामधलं अवाक्षर, किंवा अगदीच विनोद करायचा तर अवस्वर न कळणार्‍या माझ्यासारख्या कानसेनांना ह्या विषयावर जाहीर बोलण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही. पण लोकाश्रयावर अवलंबून असणार‍्या कलेने लोकांचा आवाज ऐकणे क्रमप्राप्त आहे. अर्थात लोकांनीही जाणकारांचा आवेश आणता कामा नये व कलाकारानेही लोकमताचा अनादर करता कामा नये. एरवी काय करावं ह्याचं कलाकारावर नि काय बोलावं ह्याचं जनतेवर बंधन नाहीच नि ते नसलंही पाहिजे.

सारेगमप ह्या कार्यक्रमाचा व त्यातल्या देवकी पंडित ह्यांच्यासारख्या परीक्षकांचा मी एक सामान्य श्रोता म्हणून अत्यंत ऋणी आहे. ह्याचं कारण असं की गाणं ऐकण्यासाठी कान घडविण्याचं मोठं श्रेय ह्या लोकांकडे जातं. ह्या पर्वापूर्वीच्या पर्वांचं फलित हेच की गायकाने काय गावं नि श्रोत्याने काय ऐकावं ह्याचे संस्कार तमाम श्रोतृवर्गावर घडले. तसे ते घडतही राहतील. त्याच्याच जोरावर ह्या पर्वातलं गाणं एक सामान्य श्रोता म्हणून मी अधिक चांगल्या प्रकारे पारखू शकलो हे नमूद करावंच लागेल. सारेगमपचा फॉर्मट भांडकुदळ परीक्षकांपासून हटके जाणकार परीक्षकांच्या जाणीवेतून केलेल्या परीक्षणासारखा ठेवल्याबद्दल वाहिनीचे आभार येथे मानलेच पाहिजेत. ज्या कार्यक्रमाने कलेशी फारकत न घेता, तिच्यातील आदरस्थानांचा अनादर न करता व्यावसायिक यश मिळवलं आहे, अशाच कार्यक्रमातून हे असं देणं संगीतसृष्टीला व विशेषतः मराठी संगीताला लाभावं हा केवळ योगायोग नसून ते एक जाणीवपूर्वक प्रयत्नांचं फलित आहे. त्याचमुळे आज संगीतातील विविध प्रकार सराईतपणे हाताळणारी एक गायकांची फौज क्षितिजावर दिसते आहे व साहजिकच ती प्रादेशिक, भाषिक, जातीय ह्या सर्वच दृष्टीने सर्वसमावेशक आहे, हेही विशेष नोंद घेण्यासारखे आहे. ह्या सर्व गोष्टींवरून भेद निर्माण करण्यातच धन्यता मानणे हे सर्वदूर दिसत असताना हे सर्वसमावेशक स्वरूप विशेष समाधानकारक आहे. ह्या कार्यक्रमाची दखल महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनाही घ्यावी लागते नि तो अग्रलेखाचा विषय होऊ शकतो ह्यात आश्चर्य नाही व वावगे तर काहीच नाही.

सुमारे वर्षभरापूर्वी अशाच एका निरागस कलाविष्काराने माझ्या मनावर जादू केली होती. आज पुन्हा एकदा तारकादळे भूवर अवतरल्याचा एक रोमहर्षक अनुभव नजरेस पडतो आहे. यंदाही ह्या अस्खलित सूरांपुढे माझे शब्द तसेच अडखळत आहेत. ईशानला जेता ठरविणे ही आमीर खानची व्यावसायिक गरज होती असं म्हणतात. ह्याचा एक अर्थ असा की ईशानने स्पर्धेत प्रस्थापित संकेतांनुसार जिंकलंच पाहिजे अशी लोकप्रिय मानसिकता आहे. पण दुसरा अर्थ असाही होतो की त्या मानसिकतेला छेद देण्याचं व लोकमत अधिक जागरूक करण्याचं धैर्य आमीर खानकडे कलाकार व माणूस म्हणून असेल वा नसेल, पण एक व्यावसायिक म्हणून नक्कीच नव्हतं. लोकमताचा आदर करणं हे ठीकच पण ते अधिक समंजस करण्यासाठी काही प्रस्थापित संकेतांना छेद देण्याचं धैर्यही असलं पाहिजे. लोकप्रियतेच्या शिखरावर असणार्‍यांनी हे धाडस करायचं नाही तर आणखीन कोणी? स्पर्धेला विराम देऊन कलावैविध्याचा सन्मान करण्याचा व एका मर्यादित पातळीच्या पल्याड स्पर्धाविरहीत असंही काही असलं पाहिजे असे ठामपणे सांगण्याचा एक नवा पायंडा हा कार्यक्रम व झी वाहिनी पाडणार का? ह्या प्रश्नाच्या उत्तरात भविष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं सापडण्याची क्षमता असू शकते.