---
Sunday, April 16, 2017
बहार आयी
---
Friday, March 23, 2012
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई?
Wednesday, April 27, 2011
जैत रे जैत
Friday, April 1, 2011
वाटा
जेव्हा ह्या वाटा निघतात इथून
दवात नि सांडलेल्या दुधात न्हाऊन
झाडूंनी खसाखसा अंग पुसून
गंधफुलांचे सडे माळून
मावळत्या दिव्यांत चाचपडत
बातम्या पोचवत
जातात इथून
आठेक वाजता जेव्हा
चहा पिऊन घरातून निघतात
तेव्हा जगबुडीच्या लगबगीने
स्टेशनकडे धावतात
नि गर्दीत स्वत्व हरवून
मिसळून जातात
मग ह्या बोळातून निघून
त्या गल्लीतून
तिकडच्या कंपाउंडवरून उडी मारून
चार घरं चुकवून
तिठ्यावरच्या चिंचेला वळसा घालून
गाड्यांना न जुमानता रस्ता क्रॉस करून
चौकात मेन रोडला लागतात
ही साधारण अकराएक वाजताची गोष्ट आहे
भर दुपारी
कल्हईवाले नि बोहारणींना
येणाजाणार्या मोलकरणींना
ईशान्त नाव असलेल्या मुलाला
कुणी थेट स्वयंपाकघरातून मारलेल्या
हाय पीच हाकांना
घराबाहेर टाकलेल्या कोळंबीवर
तुटून पडलेल्या कावळ्यांना
नि मांजरींच्या म्यावांना
खरकट्या पाण्याचे खिडकीतून
बिनदिक्कत खाली टाकलेले सडे झेलून
सुक्या पाचोळ्याने दिलेल्या करकरीत शिव्यांना
मुळीच भीक न घालता
बिल्डिंगांच्या आडोशाला
जऽरा पडतात
तेव्हा जिवाला किती गार वाटतात
दुपारच्या झोपेतून उठून
ग्लानीतच गप्पपणे
उन्हं कलण्याची वाट बघत
दबा धरून बसलेल्या वाटा
बटाटावड्यांच्या पहिल्या घाण्याबरोबर
अशा काही चुरचुरत जिवंत होतात
की दमलेला सूर्यसुद्धा
सावल्या लांब करून
कट्ट्याला रेलून
दाबेली नि वडापाव खात
त्यांच्याशी एकजीव होत होत
हरवून जातो
ह्या वाटांवरच्या संध्याकाळी
कधीच एकट्या येत नाहीत
कधी वारा येतो
कधी गजरा येतो
कधी चक्क वळवाचा पाऊस येतो
अनावर ओढीनं निघालेली
येणारी, जाणारी, परतणारी
माणसं दिसली
की वाटा लगोलग आपली दिशा बदलून
त्यांना वाट मोकळी करून देतात
तेव्हा वाटांच्या दुसर्या टोकांना
वाट पाहत उभी असलेली घरं, माणसं
नि समंजस वाटा
ह्यांच्यातलं आपलं नेमकं कोण
हे कळत नाही पटकन
ज्या विवक्षित वेळी
कूकरच्या शिट्ट्यांचे
टीव्ही सिरीअलच्या शीर्षकगीतांचे
नि सामुदायिक बोलण्यांचे
आवाज बंद होतात
तेव्हा कुठे वाटांवर रात्र होते
सोडिअम वेपरच्या प्रकाशात चमचमणारी
अभ्यासाच्या, इंग्लिश सिनेमांच्या
नि गजराअत्तरांच्या
काही चुकार वाटा सोडल्या
तर सगळे फूटपाथ,
रस्ते, पथ,
स्ट्रीट, रोड
बोळ, गल्ल्या,
लेन, आळ्या,
पाऊलवाटा
झोपेतसुद्धा जात असतात
कुठूनतरी कुठेतरी
कशासाठी कळत नाही
पण रोज रोज जात असतात
मी येत असतो तेव्हा
मी जात असतो तेव्हा
मी वाट पाहत असतो तेव्हा
नि नसतो तेव्हा
मी कामात गढून जातो तेव्हा
नि फुकट बसतो तेव्हा
मला राहून राहून आठवतात तेव्हा
नि हो, मी त्यांना विसरतो तेव्हा
हो, अगदी तेव्हासुद्धा.
त्या वाटा निघतात इथून
नि दूर दूर जात राहतात
आत आत काळोखात
Saturday, October 23, 2010
सोप्यासोप्याच्या सुलट्या उलट्या किंवा असंच काहीतरी...
स्वर त्याच्या सांध्यांचा हलका किणकिण मिणमिण आलेला
भाळाशी ओघळ घामाचा निथळत निथळत आलेला
भुवयांशी येता अडलेला झिरपत झिरपत मुरलेला
बुबुळांना स्वर तो वातीचा कातर कातर दिसलेला
वाराही जातायेताना हळवा हळवा तुटलेला
रात्रीच्या काखी मौनाचा दरवळ दरवळ सुटलेला
तो रोज सकाळी नेमाने लवकर बिवकर उठणारा
सवयीने चूळा दिवसाच्या खळखळ खळखळ भरणारा
देहावर उरल्या रात्रीच्या खाणाखूणा पुसणारा
रात्रीही त्याच्या वर्जिनशा उष्ट्या बिष्ट्या नसणार्या
स्वप्नांच्या निष्ठा रातींच्या कह्यात बिह्यात असणार्या
दिवसा ना डोळा केव्हाही इकडे तिकडे चळणारा
शारीरी स्वास्थ्यासाठी तो सैरावैरा पळणारा
मौनाशी श्वासाश्वासांचा चाळा ताळा केलेला
उकलेचा उकलेशी गुंता उलटा सुलटा केलेला
स्वप्नांनी येताजाताना हल्ला कल्ला केलेला
रस्त्याशी रस्ता पायांचा अडला नडला भ्यालेला
पाण्याशी ओढा पाण्याचा पाणी पाणी झालेला
डोक्याचा गाभा डोळ्यांनी हलका हलका केलेला
जगण्याने रडण्याला अपुला हसता हसता केलेला
तो कसली पर्वा नसणारा लाइफ वाइफ जगणारा
कोणाच्या चिंतांची त्याला चिंता बिंता नसणारा
जगण्याच्या धुंदी मेंदूच्या जागोजागी असणारा
नि तरीही त्याला मद्याचा प्याला प्याला चढलेला
पोटाने ओकार्या करता ओक्साबोक्शी रडलेला
तो ओका ओका कोनाडा भडभड भडभड भरलेला
डोक्याचा ताबा सुटताना डोळा डोळा सुटलेला
Thursday, October 14, 2010
तू असशील कुठेतरी
Friday, September 24, 2010
‘...आणि त्यांनी आमचं खरंच ऐकलं तर?’
Sunday, August 15, 2010
बुद्ध
Saturday, July 24, 2010
उपद्व्यापी खो खो- मावशीबोलीतल्या कविता
संवेदच्या खोखोमध्ये पब्लिक ज्या तडफेनं आणि वेगानं उतरतंय ते पाहून हे लोक पेटण्यासाठी ठिणगीची वाट पाहत का बसले होते, काही कळेना.
***
मी भाषांतर करणार नाही आता, केलं तरी छापणार नाही ब्लॉगावर, येत नाही मला ते करता ह्या मताचा मनात नि जनात उच्चार केला नि संवेदने हा दुष्ट खो चालू केला. वर आम्हांला आग्रहाचं आवताण. आता भोगा.
***
एकंदरीत ब्लॉगविश्वात युरोपिअन भाषांना (युरोपाचा एकंदरीत भाव सध्या उतरला असला तरी) भलताच भाव दिसतोय. आपली सरड्याची धाव इंग्लिश, हिंदी नि गेलाबाजार उर्दूपर्यंतच. ह्या भाषा येणार्यांना ह्यातल्या कवितांच्या भाषांतराचं काहीसुद्धा कवतिक नसतं. शप्पत्थ! (घर की मुर्गी ... असो.) संस्कृताचं उठून भाषांतर करावं असा काही संस्कृताचा आपला अभ्यास राहिला नाही, ह्याचं एक राहून राहून वाईट वाटलं. त्यामुळे आमची ही आमचं सख्य असणार्या सख्ख्या मावश्यांची भाषांतरं.
***
बॉब डिलनविषयी मज पामराने काय बोलावे. येथे पाहा. त्याचं हे नितांतसुंदर गाणं.
Blowin' In The Wind
How many roads must a man walk down
Before you call him a man?
Yes, ’n’ how many seas must a white dove sail
Before she sleeps in the sand?
Yes, ’n’ how many times must the cannonballs fly
Before they’re forever banned?
The answer, my friend, is blowin’ in the wind
The answer is blowin’ in the wind
How many years can a mountain exist
Before it’s washed to the sea?
Yes, ’n’ how many years can some people exist
Before they’re allowed to be free?
Yes, ’n’ how many times can a man turn his head
Pretending he just doesn’t see?
The answer, my friend, is blowin’ in the wind
The answer is blowin’ in the wind
How many times must a man look up
Before he can see the sky?
Yes, ’n’ how many ears must one man have
Before he can hear people cry?
Yes, ’n’ how many deaths will it take till he knows
That too many people have died?
The answer, my friend, is blowin’ in the wind
The answer is blowin’ in the wind
(चालीतला अनुवाद)
वाटा किती सांग झाल्या पायाखालच्या
की म’ माणसास माणूस म्हणवणार?
नि हो, पाखरू किती सागर मागे टाकले
की म’ काठावर पंख पसरणार?
नि हो, नेमक्या कितीदा ह्या तोफा धडाडल्या
की म’ कायमची बंदी घालणार?
उत्तर, अरे यार, ना दडलंय कुठे आत
उत्तर तर उडे वारियात
किती काळ सांग हा पर्वत ठाकणार
नि म’ सागरात वाहून जाणार?
नि हो, किती काळ सांग कुणी लोक कंठणार
मुक्तीवाचून कसे थोपणार?
नि हां, कितीदा कुणी सांग नजरा फेरणार
नि दिसत नसल्याचं सोंग वठवणार?
उत्तर, अरे यार, ना दडलंय कुठे आत
उत्तर तर उडे वारियात
मान कितीदा वर लागते करावी
कुणा आभाळ दिसावं म्हणून?
नि हो, कान पाहिजेत किती एका व्यक्तीला
कानी आक्रोश शिरावा म्हणून?
नि हो, कित्ती लोक अजून मेले की म’ कळेल
गेले हकनाक बरेच ब्वा, म्हणून
उत्तर, अरे यार, ना दडलंय कुठे आत
उत्तर तर उडे वारियात
***
The American Poetry & Literacy Project हा प्रकल्प अमेरिकेत कविता जनमानसांपर्यंत नेऊन पॉप्युलर करण्यासाठी राबवला गेला/जात आहे/असावा असं त्यांनी प्रसिद्ध केलेल्या 101 Great American Poems पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय. त्या वरवर चाळल्या नि रॉबर्ट फ्रॉस्टची रम्य रानं नि पायाखाली नसलेले रस्ते सोडून पुढे गेलो तर थेट फक्त १०१वी कविता (अर्थात मधल्या काही गाळून-चाळून तिथे पोहोचल्यावर) वाचता क्षणी आवडली. ती ही W. H. Auden ची कविता (त्याच्याबद्दल इथे वाचा). तर हा मूळचा इंग्लिशमन निघाला! (घ्या...एका दगडात). वास्तविक ती कविता वाचूनच कळतं, ‘हे अमेरिकनाचे काम नोहे’. (जालीय प्रताधिकारमुक्त (बहुदा) स्रोत: http://www.poets.org/viewmedia.php/prmMID/15549)
The Unknown Citizen
(To JS/07/M/378 This Marble Monument Is Erected by the State)
He was found by the Bureau of Statistics to be
One against whom there was no official complaint,
And all the reports on his conduct agree
That, in the modern sense of an old-fashioned word, he was a saint,
For in everything he did he served the Greater Community.
Except for the War till the day he retired
He worked in a factory and never got fired,
But satisfied his employers, Fudge Motors Inc.
Yet he wasn't a scab or odd in his views,
For his Union reports that he paid his dues,
(Our report on his Union shows it was sound)
And our Social Psychology workers found
That he was popular with his mates and liked a drink.
The Press are convinced that he bought a paper every day
And that his reactions to advertisements were normal in every way.
Policies taken out in his name prove that he was fully insured,
And his Health-card shows he was once in hospital but left it cured.
Both Producers Research and High-Grade Living declare
He was fully sensible to the advantages of the Instalment Plan
And had everything necessary to the Modern Man,
A phonograph, a radio, a car and a frigidaire.
Our researchers into Public Opinion are content
That he held the proper opinions for the time of year;
When there was peace, he was for peace: when there was war, he went.
He was married and added five children to the population,
Which our Eugenist says was the right number for a parent of his generation.
And our teachers report that he never interfered with their education.
Was he free? Was he happy? The question is absurd:
Had anything been wrong, we should certainly have heard.
(अनुवाद)
अनाम नागरिक
(अ.त./०७/पु/३७८ ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्मारक शासनाच्या निधीतून उभारण्यात आले.)
राज्य सांख्यिकी आयोगाकडे उपलब्ध माहितीनुसार
ह्यांच्याविरुद्ध कोणत्याही अधिकृत तक्रारीची नोंद नव्हती,
व ह्यांच्या वर्तनासंबंधित सर्व अहवाल निर्विवाद सांगतात
की आधुनिक संदर्भांनुसार त्यांची वर्तणूक ‘संत’ व्यक्तीप्रमाणेच होती,
कारण त्यांनी आपल्या हरेक कामात नेहमीच व्यापक समाजाचे हित पाहिले.
मधला युद्धाचा काळ वगळला, तर ह्यांनी निवृत्त होईपर्यंत
एकाच कारखान्यात विनाखंड काम केले नि कामावरून कमी करणं तर दूर
उलट ‘फज मोटर्स’ ह्या त्यांच्या उद्योगसमूहाचे मालक त्यांच्या कामाबद्दल नेहमी समाधानी राहिले.
पण म्हणून काही हे मालकांचे पंटर नव्हते,
कारण त्यांनी युनिअनच्या सभासदत्वाची वर्गणीही नियमितपणे भरली,
(ह्यांच्या युनिअनसंबंधी प्राप्त अहवालात कोणत्याही गैरप्रकाराची नोंद नाही.)
आणि आमच्या समाजसेवकांनी मिळवलेल्या माहितीनुसार
हे आपल्या गोतवळ्यात सर्वांचेच आवडते होते व एखाद ड्रिंक आवडीने घेत.
वृत्तपत्रांचे प्रतिनिधी खातरीलायकपणे सांगतात की ते दररोज वर्तमानपत्र विकत घेत
आणि जाहिरातींवरील त्यांच्या प्रतिक्रिया चारचौघांसारख्याच सामान्य असत.
ह्यांच्या नावे काढण्यात आलेल्या विमा पॉलिसींवरून हे स्पष्ट आहे की त्यांचा हरप्रकारे विमा उतरवण्यात आला होता
आणि ह्यांच्या आरोग्याचा दाखला दर्शवतो की त्यांना एकदा दवाखान्यात दाखल करण्यात आले होते,
जिथून ते सुखरूप बरे होऊन परतले.
‘प्रोड्युसर्स रीसर्च’ व ‘हाय-ग्रेड लिविंग’ ह्या दोहोंच्या मते
ते आपल्या मासिक हफ्ता योजनेचे फायदे जाणून होते
आणि आधुनिक मानवाला आवश्यक त्या सर्व सुखसोयी, जसे की -
ग्रामोफोन, रेडिओ, मोटारगाडी, फ्रीज इ. बाळगून होते.
आमचे जनमताचे विश्लेषक समाधानकारक अहवाल देताना सांगतात,
की ते वेळोवेळी त्या त्या वेळी योग्य अशी मतं राखून होते -
जेव्हा शांतता नांदत होती, तेव्हा ते शांततेचे पुरस्कर्ते होते;
नि जेव्हा युद्धाची वेळ आली, तेव्हा ते युद्धाच्या आघाडीवरही गेले.
हे विवाहित होते व ह्यांनी लोकसंख्येत पाच अपत्यांची भर टाकली,
आमच्या सुमानववंशतज्ज्ञांच्या मते त्यांच्या पीढीसाठी पाच ही अपत्यसंख्या योग्यच होती,
आणि आमच्या शिक्षकांच्या मते ह्यांनी कधीही आपल्या पाल्यांच्या शिक्षणात ढवळाढवळ केली नाही.
ते स्वतंत्रमुक्त, स्वच्छंदीआनंदी होते का?
हा काय अचरट प्रश्न आहे, हे काय विचारणं झालं?
जर तसंच काही असतं
तर आम्हांला नक्कीच कळलं असतं.
***
अजून भोगा. जावेद अख्तर हा आपला उगाच गुलज़ारी जरीची आसमानं आणून चमकदार शब्द न पेरणारा वास्तवाचा कवी. केवळ आपली रुची अभिजात का काय ती आहे हे ठसविण्यासाठी गुलज़ारचं प्रेम असेल तर तुम्हांस ते लखलाभ असो; मला जावेद अख्तरही तेवढाच आवडतो. (एक आकाशात विहरणारा surreal कवी नि एक जमिनीवरून चालणारा real कवी असा एक मोघम फरक वाटतो मला --- दोन्हीही चांगल्या अर्थानेच. वाद नकोत. वादंग तर मुळीच नकोत.) त्याच्या सोप्या गाण्याच्या सोप्या अनुवादाचा प्रयत्न.
तुमको देखा तो ये ख़याल आया
ज़िंदगी धूप तुम घना साया
आज फिर दिल ने एक तमन्ना की
आज फिर दिल को हमने समझाया
तुम चले जाओगे तो सोचेंगे
हमने क्या खोया हमने क्या पाया
हम जिसे गुनगुना नहीं सकते
वक़्त ने ऐसा गीत क्यूं गाया
(अनुवाद)
तुला पाहून काही आत उमललं
अन रोजच्या लाहीत खुप गार वाटलं
आज मन पुन्हा वाहावत गेलं
त्याला मग समजावून परत आणलं
तू गेल्यावर मग करीन ताळा
काय जमवलं नि काय गमावलं
मला गुणगुणताही न यावं असं
काळानं गाणं का बरं गायलं
खरं तर तारकशमधल्या काही कवितांची मागे केली होती भाषांतरं. पुन्हा केव्हातरी. आता पुरे!
माझा खो ‘नंदन’ला.
Saturday, July 10, 2010
इतरचे ऋतू
Friday, June 25, 2010
मुझसे पहली सी मोहब्बत
Tuesday, May 25, 2010
यह जफ़ा-ए-ग़म का चारा
Monday, May 24, 2010
आठवतात अजून
Wednesday, April 21, 2010
निमिषा,
Thursday, March 18, 2010
अब के हम बिछड़े
Saturday, March 13, 2010
रायटर्स ब्लॉक
वाहणं-बिहीणं सोडून एक वाईट खोड चिकटली
पाहून तिला पडताना चार जण म्हणाले
पारणं फिटली डोळ्यांची, श्रम सारे निमाले
झिरपत झिरपत जायचं दूर, उरात साठवून उधाणपूर
झोकून देण्या कड्यावरून, दरीकपारी घुमवत सूर
हे सोडून, तिने तेव्हा उंची मोजण्याचा घातला घाट
घुटमळली ती, लोकांनीच मग काठावरती बांधला घाट
लिहिता लिहिता त्याने चक्क समीक्षेचा घाट घातला
त्याच्यामधला कवी मग पॉलिट ब्युरोत दाखल झाला
हिमालय मोजता मोजता सह्याद्री खुजा झाला
'रायटर्स ब्लॉक' म्हणत त्याने कवी थोडा जगवत ठेवला
Wednesday, March 10, 2010
थोड़ी सी रात और है…
सकाळी सकाळी स्नूझ स्नूझ करत तडफडतानासुद्धा
तुझं डोकं
“जागे हैं देर तक हमें कुछ देर सोने दो…”
असं ग़ुलज़ारू होत असेल ना?
मग पुन्हा गजर खणखणण्यापूर्वीची पाच मिनिटं
तू कशी काढतोस?
रात्रभर चाललेला
कानठळ्या बसविणारा
प्रतिमांचा अनियंत्रित जागर
शमला ह्या सुखात,
की त्या कोलाहलातून
नाहक उरून
घर करून बसलेलं
काकूछाप अनाम बाईचं
“
हो, हो, मला सोळा भाषा येतात,”
असलं संदर्भहीन वाक्य
आता भंडावून सोडत
आपल्याला स्वत:समोर खुजं करत
आंतर्बाह्य पोखरून काढणार ह्या भीतीत,
की बेलगाम धावणाऱ्या मेंदूला
स्वप्नांचं गोंडस रूप देऊन
भास भास म्हणत
त्याची जबाबदारी तुला आता जागेपणी झटकता येणार नाही
ह्या दडपणात,
की आजूबाजूची प्रत्येक गोष्ट ग्रहण करत सुटलेल़्या
पंचेंद्रियांचं अनाठायी ओझं
मेंदूला आता पेलणार नाही, ह्या चिंतेत?
तुझ्या चेहऱ्यावरचा सकाळीचा थकवा
अशांत रात्रीचा,
की
आ वासून ठाकलेल्या
अनिवार्य दिवसाचा,
की प्रतिभेची
वाट बघत
वास्तवाचे
रंग, पोत,
गंध, नाद
रवंथ करत
निव्वळ साचणाऱ्या
संचिताच्या कोवळ्या ऋतूंचा?
कळ्या घ्या, फुलं
द्या
असल्या ह्या प्रतिभेसाठी
एवढं असं झुरत राहणं
खरंच का आहे वर्थ?
सामावून घेत राहण्याला
खरंच का आहे अर्थ?
विक्षिप्तसे वाटेलही
तरीही ऐकून घे
डोक्याचे हे फिर फिर फिरणे
प्रतिक्षिप्तसे झाले आहे.
थोडा वेळ तरी तुझे
प्रश्न जरा आवरून घे
किती काळ
डोळे असे
ठेवायचे मी सताड उघडे?
दिवसरात्र जाऊ देत
पहाटे तरी निदान मला
पाच मिनिटं झोपू दे.