जाता जाता...(१)
...
डावीकडून अजून एक रस्ता. इकडून वाहनं तिकडून वाहनं. वाहनंच वाहनं चोहीकडे.
कुठली लेन सर्वांत वेगवान आहे?
सर्वांत डावीकडची...
नाही, बहुदा डावीकडून दुसरी.
का आपण सोडून सगळ्याच??
छे! नेहमीचंच हेही...असो. आता ही लेन आपली. तिचा वेग तो आपला वेग.
समोर पसाट.
अरेरे, हाही फसला. बाजूची लेन अधिक वेगवान वाटली त्याला. जा बाबा, अशीच भरभराट होवो तुझी. कट टू सुरेश भट...
"ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे,
मी मात्र थांबुन पाहतो, मागे किती जण राहिले?"
एक्झिट ३८.
ट्रॅफिक मी म्हणतोय. जरा म्हणून गाडी हलेल तर शपथ! हे एवढे सगळे जण कशासाठी गोल गोल फिरताहेत रोज ह्या रस्त्यावर?
समोर हिरवी होंडा अ॓कॉर्ड. होंडा म्हणलं की झाडून आतला माणूस देसी असला पाहिजे, असलं काहीतरी असोसिएशन. हो देसीच दिसतोय. वर्जिनिआची (मराठीत व्हर्जिनिया!) गाडी आहे म्हणजे ९०% गुल्टी असेल. अर्थात विंजिनिअर. अजून एक उंदिर अजगराच्या पोटातला....तोच मागे संवेदच्या एका गोष्टीत होता तसा? नि आपण?
दुनिया का नारा...जमे रहो!
मंज़िल का इशारा..जमे रहो!
....
एक्झिट ४९
वॉशिंग्टन डिसीला वेढणारा कॅपिटल बेल्टवे सोडून इंटरस्टेट ६६ वर. आता हा रस्ता संपेपर्यंत ह्याच्यावरच. का कुणास ठाऊक रस्त्याच्या शेवटपर्यंत जाण्यात मला कायच्या काही सही वाटतं. फलोरिडाला की वेस्ट ह्या अमेरिकेच्या मुख्यभूमीच्या दक्षिणतम टोकाला शिवून आलो तेव्हाही मायामीपासून कीवेस्ट पर्यंतच्या त्या चिंचोळ्या यु. एस. राऊट वन वर गाडी चालवताना त्या रस्त्याच्या शेवटपर्यंत आपण जाणार म्हणून मला असंच कायच्या काही सही वाटत होतं.
इंटरस्टेट ६६ उत्तर वर्जिनिआत पूर्व-पश्चिम वाहतो. वाहतो, कारण तो नदीसारखा अनेकविध परिसरांतून अक्षरशः वाहतो. अर्थात ट्र॓फिक नसेल तरच. एरवी मी रहदारीच्या वेळा टाळून बेधडक गाडी सोडतो, पण आज तसं नाही. आज मी अगदी "आ बैल मुझे मार" स्टाइलमध्ये ही वेळ निवडल्या. त्यामुळे बाजूच्या मोकळ्या एच ओ वी लेनमधून भरधाव जाणारी गाडी बघत मला मात्र मोह टाळून बाजूच्या, वाहनांनी गच्च भरलेल्या लेनमध्ये राहणं क्रमप्राप्त आहे. केवढी ती शिक्षा. मग स्थळ, काळ बदलून येणारी तीच ती नेहमीची परिस्थिती...ती वाहनांची भरगच्च गर्दी, रस्त्याच्या मधोमध धडधडत जाणारी मेट्रो रेल, त्याच्या बाजूच्या एच ओ वी लेनमध्ये सुसाट सुटलेली एखादी गाडी, त्या सुखापासून वंचित तिच्या बाजूच्या लेनमध्ये माझी गाडी, गाणी, सुहाना मौसम, मी आणि माझी तनहाई. तिलासुद्धा आताशा अक्सर बातें करून कंटाळा येत असणार, मला खात्री आहे. पण बिचारी सांगेल कोणाला? मीही विचारीत नाही. न जाणो, निर्भीडपणे "हो" म्हणाली, तर पंचाईत! पेक्षा "मौनं संमतिलक्षणम्" हाच आभास उत्तम!
मग मी तिला दाखवतो शहरीकरणाचे भार साहणारी ती मेट्रोरेल. तीच तर ठरवते शहरांची हद्द. शहरांच्या भौगोलिक सीमा ओलांडून माणसांच्या शहरीकरणाची सीमारेषा ठरविणारी तीच ती शहरांची जीवनवाहिनी. मग तिला मी दाखवितो त्या मेट्रोरेलला नि तिच्या अस्तित्त्वाला लाजविणारी ती वाहनांची समांतर, स्वतःच्या धुंदीत-मस्तीत वाहणारी मस्तवाल गर्दी. तिला दाखवावेच लागतात रस्ताच्या दुतर्फा रचलेले चकचकणारे कारखाने, त्यांत राबणारे पांढरपेशे मजूर - पिचलेले, नानाविध गोंडस नावं देऊन अंतिमतः वेठीस धरलेले नि सर्व शोषित घटकांप्रमाणे आपल्या होत असणार्या शोषणाबद्दल पूर्णतः अनभिज्ञ असणारे व परिणामी शोषणाची संस्कृती समृद्ध करण्यात गुंतलेले. ती केवळ देहबोलीतून म्हणते, की मी काहीतरीच बोलतो म्हणून. मीही फार ताणत नाही. मला तिला अस्वस्थ करवत नाही.
रस्त्यावर पुढे त्या मजूरांच्या लांबच लांब पसरलेल्या वसाहती दिसतात. मी दाखवतो त्या तिला. नीटनेटक्या, टुमदार, साचेबद्ध, शांत नि निरुपद्रवी. ती एक सार्थकतेचा निःश्वास सोडते नि प्रशंसापर कटाक्ष टाकते. मी विचारतो तिला, "कशा वाटतात तुला ह्या वसाहती?" तर आश्चर्याने पाहते ती, "छानच तर आहेत, मी काय वेगळं सांगणार आणखीन" असं काहीसं. मी जरा सविस्तरच विचारतो मग तिला, "तसं नव्हे, तू तर ह्या प्रत्येक वसाहतीत, प्रत्येक घरात, प्रत्येक खोलीत, इथल्या आसमंतात राहतेस, असं ऐकलंय मी. तुला जवळून माहित असेल म्हणून विचारलं." तशी ती बावचळते. तिला तिचं अस्तित्त्व असं दाखवून दिलं, की ती नेहमीच अशी बावचळते. स्वतःचं अस्तित्त्व नाकारण्याचा असा अट्टाहास तिच्याएवढा कुणीच करत नाही.
तिला ते पटणं अशक्यच असतं. तिला नेहमीप्रमाणे हेच वाटतं की माझे कायच्या काही गैरसमज आहेत. ती म्हणते, "मी नाही अशी सर्वव्यापी. मी नाही राहत इथे. आहेत काही गोष्टी ज्यांनी ह्या घराघरांमधल्या, खोल्याखोल्यांमधल्या जागा भरल्या आहेत. मला त्यात स्थान नाही. तुला इथून दिसतंय त्यावरून तसं वाटतंय फक्त. आपल्यापल्याड जग नसलेल्याला त्या नसण्याचं काहीच वाटत नसतं. त्यांच्यात असंच जगतात. नि त्याच्या योग्यायोग्यतेचे प्रश्न उपस्थित करशील, तर त्याचे निकष ठरविण्याचे अधिकार तुला कोणी दिले?" मला दिसत नाहीत त्या भरलेल्या जागा, पण तिचा युक्तिवाद चोख असतो. मी त्या प्रगत समाजाची समाजरचना आहे तशी मान्य करतो. पण माझ्या मनाने अजूनही ते स्वीकारलेलं नाही नि "अशा यदृच्छया कुठेतरी विसावलेल्या ह्या वास्तव्याला अस्तित्त्व कसं काय म्हणायचं? कसं काय कोणी असं सुटं सुटं राहू शकतं?" अशा प्रश्नांचे गुंते ते अजून सोडवतंय, हे कळतं तिला नेमकं. तीही काही बोलत नाही.
झरझर मागे जाणार्या समशीतोष्ण कटिबंधीय वृक्षमाला. मधूनच रिमझिमणारा, मधूनच बरसणारा पाऊस. आसमंतात भरलेला ओलसरपणा. शांत शांत रात्रीत विरघळणारी संध्याकाळ. शहरांची मागे राहिलेली लगबग, हळूहळू विरत जाणारे एकप्रतलीय निमशहरी प्रदेश. दिसतात मग सर्वदूर पसरलेले वनांचे बेवारशी भूभाग. दूर क्षितिजावरच्या अनाम पर्वतरांगा. ह्या सगळ्याच्या अधूनमधून डोकवणारे भूगोलाच्या पुस्तकात वाचलेले "विरळ लोकवस्तीचे प्रदेश". आपापल्या मकदूरावर त्या अनाम भूभागांवर उभे राहिलेले. पाय मातीत घट्ट रोवून, आभाळाच्या उंचीचा मान राखणारे. त्या स्वयंभू सूक्ष्म विश्वांना माझे मगासचे निकष लावायला कचरतो मी. तीही मग तो मौका साधून डोळ्यानेच प्रश्न विचारते...." हे नाहीत का असेच यदृच्छया विखुरलेले, जगाशी कुठलीही नाळ न जोडलेले प्रदेश? माझा पत्ता सापडला का इथेही कुठे तुला? हेही केवळ वास्तव्य की मानवी समाजाचं अस्तित्त्व? हे नाहीत का तसेच सुटे सुटे?" मी गोंधळलोय हे कळतं तिला. तशी ती आली तशी गायब होते. मला असं एकटं टाकून जायची तिला कोण हौस!
कुठे आहोत आपण, काय करतोय नि काय चाल्लंय काय?
हे असं काही आगापीछा नसणारे, कुठल्याही सागराच्या, पर्वताच्या भौगोलिक खुणांच्या संदर्भांशिवाय जगत आलेले समाज काय म्हणून जगत आले नि जगताहेत? का त्यांना हे विरळ, मिडल ऑफ नोवेअर वाटतंच नाही? नसेल वाटत कदाचित. त्यांच्या जाणीवांमध्ये असं वाटणं कधी रुजलंच नसेल कदाचित. ह्या समाजांना भौगोलिक खुणांचे संदर्भ लाभलेच नाहीत; इथे कधी नद्यांच्या खोर्यांमध्ये जगतात, तशी खोर्यानं माणसं जन्मली, जगलीच नाहीत त्याला ते काय करणार? खरंच का हे वास्तव स्वीकारण्याएवढं सोपं आहे? खरंच लागत नाही का ह्याहून अधिक काही जगण्यासाठी? असं विखुरलेलंही ह्यांना जगावसं वाटतं ते काय म्हणून? केवळ इथे पैदा झालो म्हणून? का हेच ते जाणीवेतलं संचिताचं अदृश्य देणं? नि मग का मला इथे वास्तव म्हणून मान्य करावसं वाटणारं तत्त्व त्या काही मैलांपूर्वीच्या शहरात माणसाची समाजशीलता हरवलेलं वाटतं? हाच काय तो फरक जगण्यांमधला? संस्कृती वगैरे? ती बांधते माणसांना, की नेमकं काय? कुठलासा टुकार सर्वे भरताना समोर आलेला तो एक प्रश्न, ज्याने चपापलो होतो आपण एकदा. बहुदा तोच खरा. बहुदा त्याचं उत्तरच ठरवत असावं अस्तित्त्वामागची अर्थपूर्णता.
Please answer the following with respect to your department:
"Do you feel included?"
(क्रमशः)
A really nice post ... khoop awadli. Especially the exit 49 part...very well written!
ReplyDeleteBtw, suresh bhatt kon aahe? I find the name familiar...those lines are just excellent...is it a song or a poem [Te loka hote wegale...]?
@ Tapasya,
ReplyDeleteThanks. Suresh Bhat is one of the tallest Marathi poets and the one who established the semantics of Marathi Gazal. This is a 'sher' from one of his Gazals. If you have not listened to his Gazals before, listen this:
http://www.youtube.com/watch?v=1WxTxtSWhlM&feature=PlayList&p=A7FD6D0EFC557C9E&playnext=1&playnext_from=PL&index=2
http://www.dhingana.com/play/tarun-ahe-ratra-ajuni/MzQ0NDM%3D/pop/1
There is lot more on youtube!
राडा पोस्ट आहे राव. वाचून सोडलेलं. वीकेंडला परवा सॅक्रेमॅंटोवरून परत येताना ट्रॅफीकमधे अडकलो. तुझे पोस्ट घुमत होते राव डोक्यात! तनहाई म्हणा, किंवा बजुची घरं म्हणा! फक्त एक मेट्रो नव्हती बजुला.
ReplyDelete@ Sangram,
ReplyDelete:)