Friday, December 28, 2007

अडखळलेले शब्द ‍२

तोच जिंकणार होता, हे माहितच होतं
पण तो जिंकेल तेव्हा एवढं वाईट वाटेल असं वाटलं नव्हतं
द्वेष पसरवून जिंकता येतं असं?
सर्व काही आलबेल असल्यासारखं, अनिरुद्ध, द्वेष, दहशत नि विजयोन्माद
नि माझे अडखळलेले शब्द.

नवीन काहीच नव्हतं
फक्त ते इतिहासातून वर्तमानात आलं होतं
नि मी तेव्हा तिथे होतो एवढंच.
कसं जमतं काळाला हे असं बारीक सारीक अलगद पकडून पुन्हा पुन्हा उभं करणं?
हे असं उभं करत करत फक्त पुढे जाणारा काळ
नि माझे अडखळलेले शब्द.

हुकूमशाहीच्या उदयाची कारणे
भ्रष्ट प्रशासन, लोकनियुक्त प्रतिनिधींवरचा उडलेला विश्वास इ.
उत्प्रेरकेः
आत्यंतिक राष्ट्रवाद, द्वेष
हीच गोष्ट मी जर्मनीतल्या हिटलरची म्हणून वाचली होती.
ती गुजरातमधल्या नरेंद्राची म्हणून पुन्हा पाहिली इतकंच.
सारं काही माहित असलेलं
कृष्णधवल चित्रांतून आता रंगीत चलचित्रात दिसावं
नि माझे अडखळलेले शब्द.

कशी जुनीच गोष्ट नवीन वाटते
कधी बाहेर पडू नये असं वाटतं
नि कधी बाहेर पडण्याचा मार्गच दिसेनासा होतो.
हतबलतेचा कडेलोट
नि माझा शब्दातीत dyslexia
अर्थात माझे अडखळलेले शब्द.

अडखळलेले शब्द ‍१

नवर्‍याला दोन अंड्यांचं आँम्लेट, मोठ्या मुलालाही तसंच नि धाकट्याला मात्र एकाचंच, साधं, मिर्ची न घालता.
प्रत्येक फुटलेल्या अंड्याबरोबर वाढत जाणारा घड्याळाचा वेग, आईची धांदल
हे सगळं ईशानसारखं थंडपणे सहज पकडणारा दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार इ.
नि माझे अडखळलेले शब्द.



तीन गुणिले नऊ बरोबर?
कुणाला तीन असं लिहून जग सोडाच पण विश्व जिंकल्याचा आनंद.
त्यामागचा तर्क बघून आम्ही अवाक
नि तोंडात मारल्यासारखे
सत्तावीसवर माझे अडखळलेले शब्द.

बेधडक रस्ता क्राँस करताना अडखळणार्‍या प्रत्येक टँक्सीच्या ब्रेकसह चुकलेला ठोका
नि न अडखळता चालणारा ईशान
भरधाव धावणारी डबल‍ डेकर
नि माझे अडखळलेले शब्द.

"तुम्हें सब है पता" नि "मेरी माँ" यांच्यामध्ये थांबलेला तो क्षण
नि काठाशी येऊन थबकलेलं पाणी
"मेरी माँ" म्हणताच फुटलेले बांध
नि माझे अडखळलेले शब्द.

"मुहल्ले की रौनक गलियाँ हैं जैसे,
खिलने की जिद पर कलियाँ हैं जैसे"
प्रतिभेच्या कुठल्या शिखरावर मिळतात हे शब्द?
थेट हृदयाच्या तळाशी जन्माचे ठिकाण सांगणारा आनंद
नि कुणाचे कदाचित तिथूनच जन्मलेले शब्द
नि माझे अडखळलेले शब्द.

तोच जिंकणार होता, हे माहितच होतं
पण त्याने अशी मिठी मारून डोळे क्वचितच भिजवले होते
नि त्याचा मित्र एवढ्या निरागसपणे खूश होणार होता?
सर्व काही न अडखळता सांडणारं, आनंद, हास्य, अश्रू
नि माझे अडखळलेले शब्द.

नावाच्या पाट्या सरकताना नि निम्मं थिएटर रिकामं होत असताना
कदाचित बहुतेकांनी त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केलं असेल
ती मुलं मात्र निखळ निरागसपणे हसत होती
"कभी बाते जैसे दादी नानी" म्हणताना मोठ्यांच्या चपला घालून ती चिमुकली चालत होती
नि काही जण मात्र जाणीवपूर्वक त्यांना पडद्यावर उभं करत होते.
कसं बारीक सारीक टिपतात काही जण
कशी आजूबाजूचीच गोष्ट नव्याने सांगतात काही जण
नि कशी नवीन दिसते ती त्यांच्या डोळ्यांतून बघताना
फक्त पहात रहावंसं वाटतं
डोळ्यांवरल्या पाण्याच्या पडद्याआडून
ते न थांबता झरणारं पाणी
एका अफाट सुंदर, अफाट निरागस नि अफाट प्रतिभेच्या जगातून बाहेर पडूच नये म्हणून चाललेली अथक धडपड
शब्दांतून कसं व्यक्त होतात त्या जगात?
माझा शब्दातीत dyslexia
अर्थात माझे अडखळलेले शब्द.

Friday, December 7, 2007

एक अर्धवट कविता

मी उन्हात होती प्याली
छाया ती वृक्षाखाली
ती ऊब शांत छायेची
पानांसह गळून गेली

जी ढगांत दडली माया
वर्षते पुरावा द्याया
शिशिराच्या मेघीं भोळी
गोठून जाय ती वाया

मी उन्हात होता प्याला
बर्फाचा काळा गोळा
त्याने थंडावा पोटी,
हिमवर्षावाने गोळा

ही वणवण नवीन नाही
ऊनही कोवळे नाही
पण शिरिषावाणी मोठी
शिशिराची माया नाही
.....

जी विहिर एकेकाळी
तापल्या उन्हाचीसुद्धा
तहान शमवत होती,
ती शाल हिमाची ओढून
पोटचे पाणी दडवून
गुपचूप बैसली होती.
.....

बाहेर विंटर सुरु झाला आहे, नावापुरता दिवस आहे अन्यथा अंधारच अधिक माजला आहे, लवकरच स्नो‍ पडणार आहे, तुम्ही आधीच जरा वैतागलेले किंवा निराश आहात असल्या परिस्थितीत ही कडवी पडली. त्यातून काहीच घडेना. म्हणजे पुढे काहिच नाही. उगीच आपलं स्वघोषित नैराश्य कुरवाळत बसायचं...मग तेच ते नि तेच ते निरनिराळ्या उपमा देत बरळत बसायचं...सुचेल काहितरी यातून अधिक गहिरं वगैरे...म्हणजे काय? याहून भीषण की उगीच "sugar coated weakness" सारखी त्याला उदात्त किनार द्यायची, का "हेही खरेच आहे" असली अगदीच अलिप्त वाक्यं फेकायची? समजेना म्हणून सोडून दिलं.

आणि स्नो झालाच...अगदी नको तेव्हा...मग अजून वैताग...लक्षणं अधिक भीषण कडवी पडण्याचीच होती.

तेवढ्यात कुणीसं म्हटलं, "स्नो पडतोय? सहीच...I am missing snow...मला पावसासारखाच स्नो हा शुभशकुन वाटत आलाय. एकदम आनंदी मूड निर्माण करणारा". अरेच्चा, हा असा कधी विचारच केला नव्हता. म्हणजे शकुनापशकुन अगदीच बकवास विचार होता. ते गेलं खड्डयात..पण पाऊस जसा मूड मस्त करणारा आहे तसा स्नो होऊ शकतो? हं...Interesting...हा जरा वेगळा प्रकार आहे. म्हणजे पावसाच्या पाण्यासारखाच स्नो साचलाय, सगळीकडे पांढरा चिखल आहे, आपण मद्दामून तो तुडवत आहोत, पावसात भिजावं तसं स्नोमध्ये खेळत आहोत, स्नो मुळे अतिपावसामुळे मिळावी तशी सुट्टी मिळाली आहे, नि आपण फक्त पाऊस बघावा तसा स्नो बघतोय, एकूणात मोसम सुहाना वगैरे आहे...चित्र तेच होतं पण कोण जाणे ते असं कधीच वाटलं नव्हतं...नि जेव्हा कळलं की हो...स्नो ही मस्त असू शकतो...तेव्हा स्वतःवर यथेच्छ हसून घेतलं...स्नो चा मातम फोल ठरल्यावर स्वतःच्या स्वतःच निर्माण केलेल्या भीषण परिस्थितीचा शोक त्याहून टुकार वाटू लागला... नि परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ही कविता अर्धवटच सोडली...

याआधी अर्धवट राहिलेल्या कुठल्याही गोष्टीचं मला एवढं समाधान वाटलं नव्हतं.