Thursday, June 29, 2017

#NotInMyName

जेव्हा सरेल हा काळ एक दिवस
नि दिवसरात्र धाकधूक असणार नाही
रोज तांबडं फुटताना
अाभाळ रक्तानं माखणार नाही,
तेव्हा नुसत्या पश्चात्तापानं
फार काही साधणार नाही
किंवा थुंकीभर सॉरीनं
कुणाचंही भागणार नाही.
तेव्हा आठवेल - न आठवेल
रक्ताचा एकेक थेंब कसकसा उडत होता
फेसबुकची शपथ!
तुमच्या तर्जनीच्या नखावरही एक डाग शाबूत होता
तेवढी त्याची याद राखा
रक्त पुढे वाढवताना


---


“तीन दिवस डिसीला होते
एकदासुद्धा विचारलं नाही"
एक मित्र सांगत होता
“सांगितलं असतं कुठे हल्ली
पासपोर्ट विचारतील कळत नाही
गाडी थांबवून मागे एकदा
त्यांनी माझी पूर्ण झडती घेतली होती
हे सांगायला मी जिवंत अाहे
यात समाधान मानावे का कळत नाही
परवा एकाला त्यांनी म्हणे
विनाचौकशी अटकच केली
छे! छे! बेकायदेशीर नव्हता तो
असं केल्याशिवाय म्हणे सुव्यवस्था असत नाही
कुठेसा म्हणे चक्क एकाला अरब समजून ठार केला
बातम्यांनी मग दिवसभर अरब कोण हा धडा घेतला
खातरीलायकपणे अाता अरब समजून अरबच मारतील
बातम्यांमध्येही हल्ली एकेकदा मुद्दा काय तेच कळत नाही"


म्हटलं, समजते मला घालमेल तुझी
पण हेही विचारलं असतंस काय
उना दादरी सहारणपूर
मंदसौर किंवा बुऱ्हाणपूर
यांचं पुढे झालं काय
बाजूला घेत म्हणला मला,
“हळू जरा, इथे बरेच भक्त अाहेत.”
म्हटलं तूही तसा होतासच की
अाता अगदी उपरती झालीय?
“काय सांगू मित्रा तुला
डोळे गच्च बंद होते, बाकी काही आठवत नाही
भान अालं तेव्हापासून
पोटात ढवळत नाही असा एक दिवस जात नाही"


तुला जे दिसतंय लेका
ते त्यांना काय दिसत नसेल?
ज्यांच्या नावावर चाललंय सगळं
त्यांना काय कळतच नसेल?


---


पुरोगाम्यांचं एक जाऊ द्यात,
फुरोगामी म्हणून सोडून द्या
सेक्युलर असतील कुणी,
तर सिक्युलर म्हणून सोडून द्या
हे टिचभर लोक सोडले तर,
बाकी सगळे सुजाण अाहेत
रामराज्य येणार म्हणून
देव पाण्यात ठेवून अाहेत
"तुमच्यासाठी चाललंय सारं,"
त्यांना अावाहन करून पाहा,
"उद्धार तुमचा व्हावा म्हणून
येऊन झुंडीत सामील व्हा"
होतीलही सामील अनेक, नाही असं मुळीच नाही
कुतूहल अाहे मला, जे सामील होणार नाहीत
त्या न फुरोगामी, न सिक्युलर, न सामील
लोकांचं काय कराल?
राष्ट्रद्रोही ठरवाण्यापूर्वी
बोलायची जर संधी द्याल,
त्या प्रत्येकात असेल कदाचित
एक अनाम थोर बाई
वाल्या कोळी नवरा तिचा
ती त्याच्या पोरांची आई
ते लोक तुम्हाला सांगतील काय?
जे ती वाल्याला म्हणली होती
अगदी कॉपी पेस्ट डिट्टो सेम
वाट्टेल ते झालं तरी,
#NotInMyName