Monday, October 26, 2009

अन्वय

तळ्यावरी हिरव्या तेव्हा
लाटांचे सावट आले
मन हिरवे हिरवे सारे
अन सैरावैरा झाले

कमळावर थेंब निसटला
विस्कटली पिंपळनक्षी
माशाचा श्वास अडकला
ग्रहणाशी चकला पक्षी

वास्तव संयोग सगळे
नियती होऊन हसले
सैरावैरा होण्याचा
मन अन्वय शोधत बसले

धाग्याची टोके जुळली
मध्याशी तुटला धागा
'जैसे थे' सगळ्या गोष्टी
माझा विस्कटला त्रागा

होती ती टोके दूर
की मीच ठेवली दूर?
माझा का हुकला ताल
जुळताना त्यांचा सूर?

अन्वयाचे बाप चकवे
मी सुयोधनाचा अंश
मी सलज्ज साहत असतो
मोकळ्या जटांचे दंश

आंधळ्यास कुठले चकवे?
दृष्टीला डोळस शाप
नि कोमेजण्याचा आहे
उमजल्या फुलांना श्राप

काठांची उत्कट उर्मी
लाटांचे संचित मस्ती
साचल्या तळ्यावर तेव्हा
श्वासांची जिवंत वस्ती

लाटांचे उगम तळाशी
तळेच उन्मळून पडते
नि खोल गढूळ होताना
वाहण्याचे स्वप्न बघते

5 comments:

  1. liked the poem but frankly could not get complete meaning/feel of what you want to convey. Please write about how the words came to you! you seem to have fascination of characters of MAHABHARAT. Any particular story from this great epic that inspired you to write this poem? Keep writing more & more. Chitra Nitsure.

    ReplyDelete
  2. व्वा ! प्रतिमांच्या भाषेत,अगदी तळ हलवून टाकणारं असं लिहता आपण..ही कविता तर अगदीच वेगळ्या घाटाची,पुर्णतः आतून उमलत आलेली अशी वाटली.इतरही कविता अतिशय मनस्वी वाटल्या. एकंदरीत भाषेची जातकुळी,शब्दबांधणी अर्थाचं प्रवाहित्व हे अतिशय ओरिजिनल वाटल. शुभेच्छा पुढिल लिखाणासाठी.

    ReplyDelete
  3. @ क्रांती, गौरव,
    धन्यवाद!

    @ चित्रा काकू,
    स्पष्ट प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

    कुठल्याही नेमक्या एका कारणाशिवाय आलेल्या विचित्र बेचैनीत सुचलेली कविता आहे. तशा सैरभैर अवस्थेतही त्यामागची संगती शोधण्याचा यत्नही नेहमीचाच. अन्वयार्थाचे गुंते सोडवताना होणारी त्रेधातिरपीट नि हाती लागलेले घटनाक्रमांचे/व्यक्तीविशेषांचे धागेदोरे - असे धागे की ज्यांची टोकं कधीच आपल्या अवाक्यात नव्हती/नसतात. त्यामुळे आपण सोडून कुणालाच काही फरक पडत नाहीये, असं वाटून येणारी निरर्थकता. नि यातून सरतेशेवटी हाती लागणारी केवळ आपल्या जिवंतपणाचा पुरावा देणारी उमजण्याची कुवत - असं काहीसं ह्या कवितेत आहे.

    अन्वयाचे गुंते सोडवायचे म्हटले की द्रौपदीच्या मोकळ्या केसांची कारणं दुर्योधनाच्या निर्लज्जपणात शोधायची की मयसभेत त्याला पाण्यात पडल्यावर आंधळ्या म्हणणार्‍या तिच्यात की अजून कुठे हे चकवेही नेहमीचेच. महाभारताशी इतिहास-धर्म-संस्कृती इत्यादींचे संदर्भ जोडले, की हे चकवे आपापल्या सोयीने सोडवता येतात. वस्तुनिष्ठपणे पाहताना ती सोय नसते. संदर्भ नि शब्द नेमके कुठून येतात, हे सांगणं अवघड आहे. पण पार्श्वभूमीला दुर्गा भागवतांच्या ‘व्यासपर्व’मधून कादंबरी/काव्य म्हणून प्रकर्षाने सापडलेलं महाभारत, दुर्योधनावरील एका मणिपुरी नाटकात अवाक्षरही कळलं नसताना डोक्यात पक्कं बसलेलं त्यातलं ‘सुयोधन’ हे प्रयोजन नि ‘भारत एक खोज’ मधल्या महाभारतावरील भागातील दुर्योधनवधाचं प्रत्ययकारी (विचार)चित्रण एवढं सगळं एकदम असलं पाहिजे!

    ReplyDelete
  4. कवितेमागलं निर्मितीसूत्र देखील फार रंजक आहे आणि आपण ते अगदी नेमकेपणे शब्दात उरतवलतं.हेच कठीण असतं कधीकधी.अन्वय शब्दाचे इतके अर्थकंगोरे असू शकतील असा विचार कधी स्पर्शला नाही हो..तुम्हाला ते दिसले अन मागोवा घेत तुमच्या शब्दातून बरसले हे तुमचं निर्वीवाद यश..अभिनंदन आणि शुभेच्छादेखील.
    रामचंद्र सडेकर यांनी लिहलेले "पांचजन्य" हेदेखील एक महाभारतावरील एक वाचनीय पुस्तक आहे.

    ReplyDelete