Tuesday, September 1, 2009

पैलतीरावरून

न्यारीच मनाची मापे
पायांना अंतर लांब
तो सागरसेतूचाही
केव्हाच कलथला खांब

वार्‍याचे अल्लद कण्हणे
भुणभुणतो किणकिण ओढा
ती चंद्रकोर गुणगुणते
का सत्ताविसचा पाढा?

मेघांचे देश निराळे
दूतांच्या परक्या वार्ता
नि पैलतीरावर जाता
मी व्याकुळ मंदाक्रांता

वाटसरू मुकाट जातो
टाळूनच रडकी झाडे
कैफियत रुतल्या बिजाची
जगतात मुक्याने झाडे

9 comments:

  1. फारच सुंदर. अगदी मराठीच्या पाठ्यपुस्तकात घालण्यासारखी अविस्मरणीय कविता!

    ReplyDelete
  2. न्यारीच मनाची मापे
    पायांना अंतर लांब
    तो सागरसेतूचाही
    केव्हाच कलथला खांब

    वार्‍याचे अल्लद कण्हणे
    भुणभुणतो किणकिण ओढा

    नि पैलतीरावर जाता
    मी व्याकुळ मंदाक्रांता

    या ओळी अप्रतिम आहेत. सत्तावीसाचा पाढाही सुंदर. सगळी कविताच नेमकी,भिडणारी झाली आहे.

    ReplyDelete
  3. अरे हो भानस म्हणजे भाग्यश्री नचिकेत सरदेसाई.:)

    ReplyDelete
  4. ती चंद्रकोर गुणगुणते
    का सत्ताविसचा पाढा?

    कैफियत रुतल्या बिजाची
    जगतात मुक्याने झाडे

    yaa oLi aavaDalya. kavita sunder

    kshipra

    ReplyDelete
  5. फार फार सुरेख.
    विशेषत: तो सत्ताविसाचा पाढा. कसले कसले अन्वयार्थ लागत जातात. कविता सोडून मधेच हिंडून यावं लागतं तिथून.
    आणि ’रुतल्या बिजाची कैफियत मुक्याने जगणारी झाडे’. रडकी झाडे टाळणारा मुकाट वाटसरू आणि रुतल्या बिजाची कैफियत मुक्याने जगणारी झाडे.
    न्यारीच मनाची मापे... खरंच.

    ReplyDelete
  6. शप्पथच राव!! एकदम सिक्सर मारलीस!

    ReplyDelete
  7. "व्याकूळ मंदाक्रांता" अतिशय भिडली :)
    कविता मनस्वी वाटली.छानच जमलीय.
    आभार.

    ReplyDelete
  8. सर्वांचे आभार!

    ReplyDelete