Monday, April 27, 2009

नैराश्याची आर्जवे किंवा असंच काहीतरी...

एक निराशा द्या रे कोणी
निखळ निराशा माझ्यासाठी
कोरा तुम्ही तुमची लेणी
एक गुहा द्या माझ्यासाठी

काय तुम्हांला देऊ सांगा
छिन्नी घ्या ही तुमच्यासाठी
कोरा तुम्ही तुमची शिल्पे
घाव घणाचा माझ्यासाठी

घडवा पुतळे, कोरा गाथा
नक्षीबिक्षी तुम्हां हवी ती
कभिन्न कातळ एक मला द्या
घोर शांतता माझ्यासाठी

प्रवीण पाथरवटही तुमचा
हसर्‍या मूर्ती बहुअंगांनी
भूलस्मिते ती तुम्हीच उधळा
अनाम मुखडा माझ्यासाठी

त्यात असू द्या फक्त निराशा
सर्वार्थाने माझ्यासाठी
मिट्ट तमाचा गच्च घनांचा
घट्ट मेखला माझ्यासाठी

आशेच्या त्या नको किनारी
जरीकोंदणे तुमच्यासाठी
भिन्न नको ते पैलू मजला
निस्तेज हिरा माझ्यासाठी

शुभ्र निराशा तुम्हीच घ्या ती
सुतकी तसली देखाव्याची
नेसुन यावी कोणी शेला
संक्रांतीचा माझ्यासाठी

नैराश्यालासुद्धा तुमच्या
कितीक नखरे, ग्लॅमर भारी
मिरवा तुम्ही, नको मला तो
अंश त्यातला माझ्यासाठी

कातळ माझा डोंगर तुमचा
बधिर शांतता, गुहाच माझी
शिरात घुमतो घाव घणाचा,
अरूप पुतळा माझ्यासाठी

एवढेच द्या, बाकी तुमचे
कराल का हो एक आणखी?
करुन निराशा माझ्या नावे
हक्कहि सोडा माझ्यासाठी