Saturday, December 27, 2008
उरलं-सुरलं
क्षितिजावर उमटे रेघ
विरघळते बरेच काही
मज दिसतो केवळ मेघ
सनातन काळोख येतो
घेऊन नवा कल्लोळ
अन त्याची नांदी गाते
पक्ष्यांची भ्याली ओळ
त्या तसल्या भयाण काळी
मज नसते कसले भान
किंवा सवयीने बहुदा
मज जमेल तसली तान
सवयीने सगळे जमते
साहणे त्रास तर खास
जगण्याला विटलेलाही
सवयीने घेतो श्वास
समजावतो मीच मजला
ना अजून झाली रात्र
क्षितिजाचे अजून आहे
तेजाने फुलले गात्र
सवयीने हल्ली मीही
आळवतो सुरेल यमन
काळोख जसा नित्याचा
तेजःकण तसेच गहन
ना ग्रहणाची धास्ती वा
चंद्राचा पोकळ मोह
पण मजला अवकाशाचा
आवडतो वास्तव डोह
मग रोजच्याच नेमाने
क्षितिजावर उमटे रेष
जे विरघळते ते त्याचे,
माझे जे उरते शेष
ते उरलेसुरले काही
हळुवार घालते साद
क्षितिजाचे बंधन तुटुनी
समईची येते याद
Wednesday, December 3, 2008
स्पिरीट
आपल्या प्रभावाखाली अनियंत्रित कृती करण्यास प्रवृत्त करणे
हा अल्कोहोलचा गुणधर्म आहे
धुंदी, नशा, व्यसन ह्यांचे नाते विलक्षण आहे
"व्यसने मित्रपरीक्षा" होत असल्याने
त्या परीक्षेत वारंवार उत्तीर्ण होणारा माणूस
ओघानेच व्यसनाधीन होत जातो.
स्पिरीटचे दिवेही असतात
साधारणपणे विज्ञानप्रयोगांच्या साहित्यात ते आढळतात
जळणे हाही स्पिरीटचा गुणधर्म आहे
जळणे व जाळणे ह्यांचेही नाते विलक्षण आहे
जाळणारा जळणार्या गोष्टीच जाळतो
वात असेल तर ज्योत तेवत राहते
वात नसेल तर भडका उडतो.
स्पिरीट जखम स्वच्छ करण्यासाठी वापरतात
जखम चिघळून त्याद्वारे होणारा संसर्ग टाळणे
हादेखील स्पिरीटचा गुणधर्म आहे
जखम व स्पिरीट ह्यांचे नातेही विलक्षण आहे
स्पिरीटने जखमा स्वच्छ होतात, पण बर्या होतीलच असे नाही
औषधाशिवाय बरे होणे, न होणे
हा ज्या त्या जखमेचा स्वभाव असतो.
स्पिरीटचा एक थेट अर्थ आत्मा असाही आहे
संदर्भानुसार हा आत्मा सहृदय किंवा दुष्ट असतो
अविनाशी असणे हा आत्म्याचा गुणधर्म आहे
विनाश व अविनाश हे नातेसुद्धा विलक्षण आहे
विनाशाच्या पार्श्वभूमीवर अविनाशाला महत्त्व आहे
विनाश अटळ असला तरी तो केवळ एक बदल आहे
परिणामी अविनाशसुद्धा अटळ आहे.
स्पिरीटचा खरा गुंता मनोधैर्याशी आहे
वारंवार खचूनसुद्धा राखेतून उभे राहणे हा मनोधैर्याचा
नि उभे राहणार्याला पाडणे हा संकटाचा गुणधर्म आहे
मनोधैर्य, पडणे, उभे राहणे, हे नाते अर्थातच विलक्षण आहे
पण कधी असंही खचावं की उभं राहिल्यावर पुन्हा खचावं लागू नये
मग संकट अस्मानी असो की सुलतानी
तारीख सव्वीस जुलै असो की सव्वीस नोव्हेंबर.
Sunday, November 30, 2008
Dear terrorists,
We tried so hard
To tell Mr. Raj –
Mumbai belongs to
And so does Taj
He didn’t listen
And he didn’t care
Someone had to tell
But who would dare?
And there were you -
A dedicated crew.
Then Indians fought for
Or non-mumbaikars for Mumbai, as He would say
Now shall he dare
Even a glance or stare
He shall fall flat on his face.
It’s all your grace!
We first saw the ATS
And accusations next
People hard on terror
At hypocritical best
A bandh round the corner
And investigations at stake
You came in Kuber
When all were awake
They came later and made a loud roar
They must be Kuber with a pack of crore
Finest officers lost – we saw the graphic scene
But what followed later – was purely obscene
Exposing this face, all the years spent
You did it in a flash with plain simple bullet
Guarding the home, a spineless minister
Casual behavior and formal attire
Blasts after blasts, he stuck to his task
Morality, resignation was too much to ask
Then a sudden transition, thanks to your youth
Had you not been there, it wouldn’t have been so smooth
And the targets you chose - what a marvel!
I mean - a marvelous choice, not the white marble
Nobody cares when the lifelines bleed
Icons have to suffer before the elite heed
It took us years to reinforce our claim
You took three days – to say the same
Yes, I am angry; but that will be over
I shall be in my senses, it won’t take longer
The heritage I treasure, is not what you burnt
It lies in forgiving, which you hadn’t learnt
A day shall come, when I will forgive you
But not a single day, when I will forget you
And then every day, when I’ll remember you,
With a Buddha like smile, I'll say a plain “thank you!”
Saturday, November 1, 2008
बोल के लब आज़ाद हैं तेरे
He knows all about them, boys
He knows all about everything...
There's an old man called the Mississipi
That's the old man I would like to be
What does he care
If the world has got troubles
What does he care, if the land ain't free.
Old man river,
That old man river,
He must know something
But don't say nothing
He just keeps rolling
He keeps on rolling along...
मिसिसिपी नदीवर बोटीतून प्रवास करणार्या नाटक कंपनीत कामं करणारा एक कृष्णवर्णीय "जो" कुठल्या कळकळीने मिसिसिपीला हे बोल लावत असेल? बहुतेक तो आता मनातून थकलाय. अन्याय होतोय ह्यासारखं स्वाभाविक वास्तव पटवून द्यायला लागतंय ह्याचा त्याला कंटाळा आलाय. म्हणजे माणूस माणसाला माणसासारखं वागवत नाही, हे समोर दिसत असताना त्यासाठी वेगळा संघर्ष कशाला करायला हवाय? असंही त्याला कदाचित वाटत असेल. शिवाय ज्यांनी ऐकायला हवं ते कानावर हात ठेवून बसल्यावर सांगायचं तरी कुणाला?
म्हणूनच बहुदा त्याला वाटत असेल की ज्या नदीवर आपलं आयुष्य चाललंय, असा एकही क्षण नाही आयुष्यातला जो तिने पाहिला नाही, सगळ्यांच्याच आयुष्यातला खरं तर, त्या नदीने तरी बोलावं काही. का? कारण बहुदा ती आहे म्हणून. ती निरपेक्ष आहे म्हणून. ती ऐकते, पाहते म्हणून. ती न्यायाने वागते नि वागवते म्हणून. नि हे सर्व ज्यांनी करायला हवं त्यांनी आंधळ्या, बहिर्याचं सोंग घेतलंय म्हणून. बोलू शकणार्या सगळ्यांनी मौन धरलंय म्हणून.
म्हणूनच त्याला चीड आहे की जिच्याकडून किमान अंधाराविरुद्ध वाचा फुटायला हवी तीदेखील धीरगंभीर रूप धारण करून अलिप्तपणे संथ वाहत आहे.
***
किंवा असं असेल की त्याला नदीला जाणीव करून द्यायची आहे, की तुझ्यावर वेळ येईपर्यंत थांबू नकोस. किती दिवस सहन करशील, गप्प राहशील, उद्या तुझ्यावर ही वेळ आली तर तेव्हा म्हणू नकोस की माझ्या बाजूने बोलायला कुणी उरलं नाही. त्यावेळच्या तुझ्या एकटेपणाचं कारण तुझंच आत्ताचं मौन असेल.
कसली ही बेफिकिरी? कसलं हे मौन? सर्व डोळ्यांदेखत बिनसत जात असताना इतकं शांत राहूच कसं शकतं कोणी. का?
अन्याय, द्वेष, असहिष्णुता पुन्हा पुन्हा का मूळ धरतात इथे? प्रजाभिमुख व्यवस्था कशाच्या नि कुणाच्या जीवावार इतक्या मुर्दाड होतात?
ह्या गोष्टींना स्थल-काल-व्यक्ती ह्या सीमा ओलांडून अस्तित्त्व का असावं?
पण ते असतं. त्यामुळेच पॉल रॉबसनचा आर्त आवाज दशकांनंतर भूपेन हजारिकाच्या मनाचा ठाव घेतो. तेही रिलेट होऊ शकतात म्हणूनच बहुतेक त्या आर्ततेने गातात,
विस्तार है अपार, प्रजा दोनों पार, करे हाहाःकार,
निःशब्द सदा, ओ गंगा तुम, गंगा बहती हो क्यूँ?
***
मान्य आहे की न्याय्य ते बोलणारे बोलत असतील. मान्य आहे की त्यांचा आवाज कोणी ऐकत नाही. मान्य की ऐकण्याचं नि ऐकवण्याचं काम असणारी माध्यमंही न ऐकता बोलण्याचं काम करत आहेत. मान्य की जे बोलायला हवं ते इतकं स्वाभाविक आहे, कि बोलायंचं कशाला? मान्य की ज्यांचा आवाज मोठा ते परस्परविरोधाभासात जगत आहेत नि स्वार्थी आहेत. तरीही नि उद्याच्या एकटेपणाचं कारण आत्ताचं मौन होऊ नये म्हणून. बोललं पाहिजे. पुन्हा पुन्हा बोललं पाहिजे. माणसांना नाही जमलं तर निर्जीव पुराव्यांना बोलतं केलं पाहिजे. तेही तितकेच साक्षीदार आहेत सगळ्याचे. बोललं पाहिजे. बोलतं केलं पाहिजे.
...
बोला हो तुम्ही, बोला हो तुम्ही
फलाट दादा, आली गाडी
उरात गुपिते कितिक तुमच्या
बोला हो तुम्ही, गेली गाडी ...
***
१. बोल के लब आज़ाद हैं तेरे - फ़ैज़ अहमद फ़ैज़ ह्यांची नज़्म (सौजन्यः YouTube)
२. Old man river - १९३६ साली प्रदर्शित झालेल्या शोबोट ह्या चित्रपटातील पॉल रॉबसनच्या आवाजातील हे गाणं. (सौजन्यः YouTube)
३. गंगा बह्ती हो क्यूँ - भूपेन हजारिका ह्यांनी old man river चं केलेलं हिंदी रूपांतर. (सौजन्यः YouTube)
४. फलाट दादा, फलाट दादा - बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेचं नुकतंच मायबोलीच्या दिवाळी अंकात डॉ. श्रीराम लागू ह्यांनी केलेलं वाचन.(सौजन्यः मायबोली दिवाळी अंक, हितगुज २००८)
Wednesday, October 29, 2008
सुसंस्कृत
कुठल्याशा इसमानं लोळवलं एकाला
म्हणून अखिल सर्पजातीच्या अस्तित्त्वाचे प्रश्न
त्यांना अद्याप पडलेले नाहीत.
नि तमाम सर्पजातीच्या रक्षणाचा मक्ता कुणीही न सांगता घेऊन
खलनिग्रहणाय पेटून उठण्यासाठी उद्युक्त करणारं
सूडदार विष अद्याप भिनलं नाही त्यांच्यात.
त्यामुळेच असावं
सर्व नाग, घोणस, फुरसे, मण्यार अजगरासारखे पडून आहेत.
कुठल्याशा कल्पनेतील भयाने बिथरून
सर्वत्र फुत्कार करीत फिरण्याची
आपल्या हालाहलाने चराचर जाळून टाकण्याची
प्रसंगी एखाद्यावर दंशप्रहार करण्याची
व हे सर्व करताना आपल्या अंगात भिनलेलं विष
दुसर्यांच्याही रोमारोमांत पेरत जाण्याची
त्यांना अद्याप गरज वाटत नाही.
नाही म्हणायला काही नाग आहेत
जे सांगत फिरताहेत सगळ्यांना की
उठा, बिळातून बाहेर या, आपल्या विळख्यात जखडून टाका
ह्या जगातले सगळे व्यवहार.
आताशा असेही सांगतात ते
की आम्हीच शेतीचे तारणहार,
"उंदिर, घुशींना मारणार कोण?
आमच्याशिवाय आहेच कोण?"
बाकी सगळे बाहेरचे
आम्ही इथल्या मातीचे
आम्हांला माराल तर याद राखा
विषाचा आमच्या मान राखा.
पण म्हणून बिळाबिळांतून बाहेर येण्याची
सर्पसृष्टीला अद्याप गरज वाटली नाही.
उद्या आपण रस्त्यावर आलो
तर हेच नागोबा
आपल्या आयत्या बिळात
करतील घरोबा
हे समजण्याएवढी बुद्धी त्यांनी अद्याप शाबूत ठेवली आहे
साप अजून सुसंस्कृत आहेत.
त्यांचं सुसंस्कृतपण फक्त तेवढ्यापुरतंच नाही.
ते बिळात वेटोळे करून बसल्यावरसुद्धा
भूमिगत राहून
हळू आवाजात त्या विखारी नागांबद्दल
सहानुभूती दाखवत नाहीत.
ते त्यांना जराही भीक घालत नाहीत.
ते दिवसा स्वस्थ बसून राहतात.
नि रातोरात उंदिरादी भक्ष्य गिळून
आपलं पोट भरतात
शेताचं रक्षण करतात
नि कर्मण्येवाधिकारस्तेच्या चालीने
उंदीर रवंथ करत
आपापल्या बिळांत सुखी राहतात.
कधी नाहीच मिळाला एखादा उंदीर
तरीही ते
पोटातली आग विष ओकून
वाढवत नाहीत
व ओकून वाया गेलेले विष
जहरी विचारांनी पुन्हा मिळवत नाहीत
ह्याचे श्रेय
त्यांच्या निसर्गतःच नसलेल्या कानांना नसून
निसर्गतःच असणार्या अंगभूत लवचिकपणाला आहे
म्हणूनच
साप अजून सुसंस्कृत आहेत.
एरवी समस्त मानवजातीला
नकुलांच्या समान तोलून
त्यांच्याविरुद्ध गरळ ओकणारे
नि पंचमीला स्वतःला ओवाळून घेणारे
हे स्वयंभू नाग
आणि ते आपल्यासारखंच वागून आपल्यापेक्षा सरस ठरू पाहतात
म्हणून त्यांचा मत्सर करणारे
व स्वतःचं गोत्र थेट शिवाच्या नागाशी सांगणारे
काही शिवराळ बोलीचे नाग
जर वगळले
तर समग्र सर्पसृष्टी
आपली विविधतेमधील एकता जपून आहे.
केवळ फणा काढता येतो
म्हणून नागांचे नेतृत्व
सर्पजातीला मान्य नाही.
फण्याच्या धाकाला न डरण्याइतका
निर्भीड बाणा ते अद्याप राखून आहेत.
त्यांचं नशीबही असं थोर की
सर्पराज्याची सत्ता अजगरांच्या हातात नाही.
सामान्य सर्प चार शेतं फिरलेल्या सापांचं नेतृत्व मान्य करतात.
स्वसंरक्षणासाठी लाभलेल्या उपजत शक्तींवर त्यांचा विश्वास आहे.
त्यांना विषाचं उसनं अवसान आणावं लागत नाही.
एखादा मण्यार शेतात आला म्हणून
घोणस त्याला हुसकावून लावत नाही.
आपल्या विषाचा मान ते स्वतःच राखून असतात
नि आपल्या दंशाचे परिणाम
आपल्या बांधवांना भोगावे लागू नयेत म्हणून ते सतर्क असतात.
जर कळलीच एखादी दुर्दैवी घटना,
आपल्या बांधवाच्या खुनाची
तर दिसणार्या प्रत्येक माणसात
त्या अपराध्याचा चेहरा पाहून
पृथ्वी निर्मनुष्य करण्याची
आततायी परशुरामी प्रतिज्ञाही ते करत नाहीत.
क्षात्र उचलून पृथ्वी निःक्षत्रिय करण्यातला फोलपणा कळलाय त्यांना.
ऐकतात कानावर येतं ते
नि असतात काही माणसं
सापाच्या जातीची
असं म्हणून अंतःकरणातील बंधुभावाला स्मरून
त्यांना मोठ्या मनाने माफ करतात.
फार कमी उरलेत विषारी त्यांच्यात.
त्यांच्या विषाची लस
विष उतरवते,
भिनवत नाही.
त्यांचा एकूणच प्रवास विष उतरविण्याकडे आहे,
कदाचित म्हणूनच,
साप अजून सुसंस्कृत आहेत!
Tuesday, October 21, 2008
रेषेवरची अक्षरे
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपण आपली प्रतिक्रिया रेषेवरची अक्षरे २००८ ह्या ब्लॉगवर नोंदवू शकता.
शुभ दीपावली!
Thursday, October 16, 2008
पाऊस, पर्जन्य, आणि वृष्टी
इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व हे तिघे बंधू| (प्रेरणाः कुमारभारती इ. १०वी, गद्य विभाग, प्रकरण १ नरींद्रबासां भेटि अनुसरण. नववी किंवा दहावीतील काहीतरी उद्धृत केल्याशिवाय काही (अति)शहाण्या इसमांना विनोदी लेख पुढे लिहिताच येत नाही. नाइलाज!) इतरेतरांमधील द्वंद्व "आणि" ह्या अव्ययाने सोडवतात. समाहारांमधील द्वंद्वात "इतर वगैरें"ना ओढून वड्याचं तेल वांग्यावर काढतात. वैकल्पिक द्वंद्व मात्र दोहोंपैकी एकच विकल्प लॉक करावा लागेल असे म्हणून, हे "किंवा" ते, असे विकल्पाने सोडवतात. तर आयुष्यातील वैकल्पिक अनुभवदर्शक समाहारसदृश असंबद्ध गोष्टी इतरेतरसूचक अव्ययाने जोडून त्यावर ब्लॉग लिहिणे अशी हल्लीची फ्याशन आहे. पण आपण काळाबरोबर राहूनही काही तर्कशुद्ध केले पाहिजे, म्हणून आम्ही तीन समान गोष्टी, पाऊस, पर्जन्य, आणि वृष्टी, "आणि" ने बांधल्या आहेत. फ्याशनची फ्याशन वर आम्ही rational ते rational. शिवाय आणिच्या आधी स्वल्पविराम टाकून विंग्रजीत रिपोर्ट लिहून शिकलेल्या गोष्टीची मराठी व्याकरणात भर टाकल्याचं इंटरडिसिप्लिनरी श्रेय.
हा चक्क चक्क प्रताधिकाराचा भंग आहे, असं सांगणारा संवादिनीचा आर्त षड्ज आम्हांस ऐकू येत आहे. तो खालचा की वरचा हे आम्हांस ते दोन्ही सूर एकामागोमाग एक वाजवून दाखविल्याशिवाय कळत नाही. पण तारसप्तकातलाच असावा, भावनोत्कट. पण आम्हांस त्याची फिकीर नाही. इथे कुणीच कायदेशीर प्रताधिकार बाळगून नाही, हे आम्ही जाणून आहोत. प्रताधिकारावरील सर्व सपट व सपाट महाचर्चा आम्ही वाचून आहोत. त्यामुळे कोणाला जे म्हणायचे ते म्हणो. शिवाय आम्हांस अनाम वीरांचीही भीती नाही. आम्ही कमेंट मॉडरेशन बंद करूनसुद्धा अनामवीरांना इथे लढावंसं वाटत नाही. त्यामुळे आमचा ब्लॉग एवढा फेमस नसल्याचे हे फायदे आम्ही खूब जाणून आहोत. प्रतिक्रिया ह्या हे संवादाचे माध्यम असल्याच्या निदर्शक आहेत. त्यामुळे त्यांचं स्वागतच आहे. आता संवादाचा च्यानल म्हटला की त्याच्याबरोबर additive white gaussian noise सुद्धा येणार हे आम्ही जाणून आहोत. तो काढून टाकण्यासाठी फिल्टर लागतात हे आम्ही थिअरॉटिकली सांगू शकतो. पण आम्ही त्याहून खालच्या सर्किट पातळीवर जात नाही. तो आमचा प्रांत नव्हे. आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्किटविषयी व लो लेवल सर्किट डिझाइन विषयी बोलत आहोत. उगीच गैरसमज नसावा. पण सर्किट म्हटलं की इथून तिथून सारखंच. आम्हांला हवं तेव्हा बंद पडणारं. (अतिरेक्यांची चालत नाहीत, तर आमचं काय! वाचकांत कुणी अतिरेकी विंजिनिअर असतील तर त्यांच्यासाठी - ही ५५५ टायमर वाली सर्किटं अगदीच बिनभरवशाची असतात, नाही का हो?) काही ब्लॉग जसे अंगात येऊन भूमिगत होतात तशी. मग आम्ही काय चतुराई केलीय की आम्ही ब्लॉग सापडला की त्याला गूगलच्या रीडरमध्ये टाकतो. मग लोकांनी एकदा का काही प्रसिद्ध केलं की आमच्याकडे ते गूगलची मेहेरबानी आहे तोवर राहतं, त्यांनी मग त्याचं काय पण करो. आपलं सर्किट चाललं नाही, तर आधीच्या गटाची निरीक्षणं घेऊन फर्मास निष्कर्ष काढून प्रयोग सिद्धिस नेण्याचा विंजिनिअरींगचा चार वर्षांचा दांडगा अनुभव आहे आमच्याकडे. "अनु"भव काय फक्त जावा प्रोग्रामरकडेच असतात? आता अशाच काही प्रोग्रामरच्या अनुभवांची पारायणं करतो आम्हीही आमचा प्रोग्राम काहीबाही एक्सेप्शन फेकू लागला की. समदु:ख दुसरं काय! वास्तविक आमच्या कोडमध्ये जराही चूक नाही, हा उगीच फेकतोय धावताना चूक चूक म्हणून, अशी आमची ठाम समजूत असते. पण तोही हट्टाला पेटलेला असतो. मग तशा दिग्मूढ अवस्थेत आम्हांला ब्लॉग सुचतात, चारचौघांना सुचतात ना अगदी तस्सेच.
"कसं ना असतं आयुष्य आपलं...<आयुष्य? नक्की?>...
आपण मन लावून काम करतो, एखाद्या कोडसाठी आपलं सर्वस्व पणाला लावतो, पण शेवटी तो आपल्या मनासारखा चालतोच असं नाही...खूप दुःख होतं मग...<हुंदका अधिक अश्रू>.
नि मग आपल्याला काहीच सुचत नाही...की माझ्याबरोबरच असं का व्हावं? आपण तर इतकी जिवापाड मेहनत केलेली त्यासाठी...खूपच हताश...सगळं कसं अंधारून आल्यासारखं...<हमसून हमसून रडणं>...
मग आपण खूप खूप शोधतो, गूगलवर वगैरे, काय करायचं पुढे ह्याबद्दल...<आयुष्यात? की कोडमध्ये?>
मग काही मदतीचे हात नि काही भरवशाचे हात सोडून गेलेले आपल्याला...<ढसाढसा रडणं जमायला हवं इथवर>...
मग आपण स्वतःच मार्ग काढतो, कोड चालतो, नि कळतं आपल्याला की धिस इज लाईफ यू नो! <आनंदाश्रू, कित्ती गं माझी गुणाची बाय ती>
...पण तेही फार काळ राहत नाही...तो प्रोजेक्ट संपतो, आपण दुसरं काहीतरी करायच्या मागे. एवढं सगळं आपण केलेलं मागे सोडून जायचं?...ते हापिस, तो आपला पीसी...ते आपले बरे वाईट सहकारी...त्याचं ते "इथे चुकीचा अरे इंडेक्स वापरतेयंस तू" असं झटकन सांगणं आणि...तो --- आपला कोड <धाय मोकलून रडणं>
...*******//<पुढची अक्षरे फक्त डोळ्यांवर आसवांचा थर असेल तरच दिसतील>"
मग असंच काहीसं आम्हीही ब्लॉगतो. अगदी मनमोकळं. मग त्यावर खूप खूप प्रतिक्रिया येतात. त्यात लोक खूप खूप छान छान लिहितात. फार फार लोकांनी मानसशास्त्राचा सखोल अभ्यास केलाय असं आम्हांला लगेच कळतं. मग त्या सगळ्यांचा कित्ती कित्ती आधार वाटतो. पण तरीही काही खोचक लोक त्यात उगीच साहित्य शोधतात नि खूप खवचट प्रतिक्रिया देतात. आता नाही आमची शैली मेघनाताईंसारखी कमावलेली. म्हणजे मेघना पेठे बरं का! नाही आमचं लिखाण संधिप्रकाशात हसणार्या ट्युलिपच्या फुलांसारखं सुंदर. पण म्हणून काय आम्ही आमचं मन चारचौघांत मोकळं करूच नये? गूगल फुकटात जागा देतंय, लोक फुकटात देवनागरी फाँट देताहेत, तर ह्या लोकांचं काय जळतंय? जग फार फार वाईट आहे, नाही? हेही खरं तर त्याच ब्लॉगमध्ये पुढे लिहिणार होतो आम्ही. भाग बिग पाडून नव्हे..तिथ्थेच. पण नाही केलं तसं. एक वेगळं पोस्टच टाकलं, ह्याच्याखाली क्रमशः असं नुसतं टाकून. कारण असं की, एक तर मुळात अशा तिथ्थेच पुढे लिहिण्याच्या अभिजात कल्पना आम्हांला शिवतसुद्धा नाहीत. नि शिवाय तिथ्थेच पुढे लिहिलं तर गुगल रीडर वर अपडेट येत नाही हो. मग लोकांना कळणार कसं आम्ही ब्लॉगलोय ते? नि मग ते वाचणार कोण? शिवाय आपल्याच ब्लॉगवर आपणच प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया लिहून मूळ पोस्टपेक्षा मोठ्ठं नि चांगलं लिहावं अशीही काही आमची प्रतिभा नाही. त्याला आता आम्ही काय करणार?
मग आम्हांला कळतच नाही की आपण प्रतिभा "आणि" प्रतिमेच्या जगात आहोत की ब्लॉगच्या? लिहिताना ज्यात त्यात कसल्या प्रतिमा? आपल्या पुरवून संपल्या की मग इतरांच्या. हिंदी गाणी बिणि लिहितात हो मध्ये मध्ये. कसे अर्थ लागतात? आमचं अगाध हिंदी म्हणजे...
"तुम कायकू लिखता?"
"कायकू? हम हायकू लिख रहे हैं"
"हायकू? कायकू?"
"ऐसैच"...
असंच?...असंच आपलं सहज सुचलं म्हणून हे लोक काहीही लिहितात हो! मागे मीही एक कविता लिहिलेली, अर्थात मराठीत.
"हे अर्घ्य तुला रे प्रभू
मी संध्याकाळी देतो
तूच मला शिकविली
स्तोत्रे मी सावध गातो
अर्पितो मी तुज प्रेमाने
ही जास्वंदाची फुले
गणपतीस वाहून झाली
हे तुझ्याचसाठी उरले
बहरली नगरी जैशी
उज्जैनी क्षिप्रेकाठी
आरती तुजला गाते
सप्रेम निरोपासाठी"
ह्यावर वाचून गप्प बसावं ना? तर ते नाही. कवितेवर कविता करतात...
"कवितेत कविता ग्रेसांची, आरती माझ्या श्वासांची." अजून मला हा संदिग्ध अर्थाचा उखाणा उलगडला नाहीये. वास्तविक ही आरती म्हणजे आरती प्रभू का? नि त्यांची कविता तुमच्या श्वासाश्वासांत भरलीये की कविता हाच तुमचा श्वास आहे व ती तुम्हाला दैवतासमान आहे? की तुमच्या हिचं नाव आरती आहे? असे काही प्रश्न विचारावेसे वाटत होते आम्हाला. पण नाही लिहिली प्रतिप्रतिक्रिया. उगाच सगळे जण धावून आले असते नि आम्हाला चक्रव्यूहात पकडलं असतं, खाजगी प्रश्न कशाला म्हणून. मग मला फडणवीस नानांना विचारावं लागलं असतं, की चक्रव्यूह कसा फोडतात?
एका स्वतःला (अति)शहाण्या म्हणवून घेणार्या इसमाने काय लिहावं? "जरा वृत्तात मार खाल्लाय"...अरे (न)शहाण्या माणसा, जाळ ती वृत्तं. वृत्ताबित्तात कसल्या लिहितोस कविता? सोडा ते चाकोरीबद्ध विचार...छे! त्यावर त्याची प्रतिप्रतिप्रतिक्रिया काय असावी? "असेन मी नसेन मी, तरी असेल वृत्त हे". अरे आवरा ह्याला...एका गझलेचं काय भाषांतर केलं, तर हा असेन नसेन स्वतःला शांता शेळके अधिक सुरेश भट समजू लागलाय का? हद्द आहे. दोन साहित्यिकांचे असे दाखले देऊन टिका करताच आम्हांला आम्ही साहित्यिक होण्याच्या वाटेवर आहोत असे वाटू लागले. पण पुढच्याच प्रतिक्रियेने आम्हाला जमिनीवर आणलं.
"ही न-साहित्यिक प्रार्थना म्हणायची का? तुम्ही एक नवा पायंडा पाडता आहात. कारण ब्लॉग साहित्यिकांची प्रार्थना तर आधीच ठरली आहे...'अनुदिनि अनुतापे तापलो रामराया'...". म्हणजे थोडक्यात आम्ही कविता लिहूनही साहित्यिक नाही. एक तर अनुदिनी हा शब्द आम्हांला अनुदिन बोचतो. आम्हांला हे काव्य पूर्ण माहित नाही, पण ह्याच्या पुढची ओळ, 'कठिण समय येता कोण कामास येतो' अशी असल्याची आमची ठाम समजूत आहे. नाहीये का तसं? म्हणून वृत्ताबित्तांच्या फंदात पडत नाही आम्ही. आम्हांला 'न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते' ह्या चालीवरचं सगळं सारखंच वाटतं.
मग म्हटलं असो. आपण आपलं स्टँडर्ड ब्लॉगवालं पोस्ट लिहू. पाऊस व घरव्याकुळता (ही पण बहुतेक ह्या ब्लॉगवाल्यांचीच भर शब्दसंपदेत). मग म्हटलं त्यात आपलं काहीतरी वेगळेपण हवं. मग पावसाला कशी लोकांनी वेगवेगळी नावं ठेवली आहेत (!), नि कसा त्या प्रत्येकांत आपला नॉस्ट्याल्जिया आषाढाच्या आभाळासारखा भरलाय...झरतो तर रितं रितं वाटतं नि नाहीच तर अडकल्यासारखं...ह्यावर लिहावं. पोस्ट लिहून झालं नि नावावर घोडं अडलं...पाऊस, व्याकुळ, पर्यावरण, सृष्टी, ग्लोबल प्रेसिपिटेशन - लोकल मेमरीज...छ्या!....मग आम्हीही फ्याशनेबल व्हायचं ठरवलं नि एक फक्कड नाव देऊन मोकळे झालो. पाऊस, पर्जन्य, आणि वृष्टी. कसंकाय वाटतंय?
Friday, September 26, 2008
जाता जाता...
एक्झिट २८.
शेवटी एकदाची गाडी हो नाही हो नाही करत वाहनांच्या गर्दीत.
निळ्या फोर्डचे आभार आत येऊ दिल्याबद्दल. संध्याकाळच्या पाच वाजता घर सोडलं तेव्हाच वाटलं होतं की, ट्र॓फिक आज जीव खाणार. पण इलाज नाही.
किती वेळ लागेल पोहोचायला आज?
सगळं सुरळित असताना साडेचार तास लागतात. आज पाच?
आत शिरल्यापासून ब्रेकवरचा पाय जसाच्या तसा...
मग थोडा हिय्या करून नि शेजारच्या लेनमधल्या एकदोन गाड्यांना बेसावध गाठून मी सर्वांत डावीकडल्या लेनमध्ये.
एक्झिट २९.
आज बहुतेक सहा तास?....सहा?
बारा पर्यंततरी पोहोचायला हवं. गाडी दोन फूट पुढे.
हवा काय सहिये आज. दिवसभर मळभ नि जोरदार वारा.
थंडी सुरू होणार आता. नि मग बर्फ..
मरो...
आज हवा छान आहे. आत्ताच थोडा पाऊस झालाय. एक पातळसं ज॓केट पुरतंय.
मागची गाडी फारच लगट करतेय. गाडी तर अम्रू दिसतेय, अरेच्चा नि आतला माणूसही. भाऊ, नका फिरत जाऊ फार देसी लोकांबरोबर. कुठून लावून घेतलात हा वाण?
एक्झिट ३०.
अजून इथेच! कठीण आहे. परत जावं का? उद्या सकाळी निघू लवकर.
नको.
दिवस वाया जाईल. आत्ताच जाऊ. काय होईल ते होईल.
पण किती वेळ लागेल! नि फार रात्र होईल डोंगरदर्यांचे रस्ते येईपर्यंत. मग तिथे जंगलात एकटंच भुतासारखं जात रहायचं?
पहिल्यांदा तर जातोय रात्रीचा, कुणी पाहिलंय एकटेच असणारोत हे? आज जाऊन बघू मग पुढच्या वेळेस आपोआपच ठरवता येईल असल्या अडनिड्या वेळेला निघायचं का ते...
बरं...जाऊया पुढे...
अजून वेळ आहे पण मागे जायला...पण असो...
देखूँ जिधर भी इन राहों में
रंग पिघलतें हैं निगाहों में
ठंड़ी हवा है, ठंड़ी छाँव है...
दूर वह जाने किसका गाँव है...
बादल ये कैसा छाया
दिल यह कहाँ ले आया
सपना यह क्या दिखलाया है मुझको..
हर सपना सच लगे, जब प्रेम अगन जले
जो राह तू चले अपने मन की
हर पल की सीप से मोती ही तू चुने
जो तू सदा सुने अपने की...
यूँही चला चल राही....कितनी हसीन यह दुनिया है.....
एक्सिट ३१.
"पाऊस अल्लद
स्वप्नातल्या हिनकळ्या सावलीसारखा"...
एक थेंब, दोन थेंब....काचभर थेंब...
वायपर एकदा इकडून तिकडे...थेंब दूर. पाण्याचा एकसंध हलकासा थर...काच स्वच्छ....वायपर बंद.
एक थेंब, दोन थेंब....काचभर थेंब...
वायपर एकदा इकडून तिकडे...थेंब दूर. पाण्याचा एकसंध हलकासा थर...काच स्वच्छ....वायपर बंद.
चालूच राहू देत की वायपर.
नको. एवढाही नाही पडताहे पाऊस. हे बरंय...
तसं दुसरं काय आहे करण्यासारखं?
खेळत रहा...
...
भरली काच...वायपर...नको इतक्यात....अजून भरू देत...पण समोरचं काही दिसतंय तरी का?
समोरच्या करोलाचे मागचे लाल दिवे दिसताहेत. ह्याहून अधिक काहीही दिसणं गरजेचं नाहीये. नि त्या करोलातही कोणी बघण्यासारखं बसलं नाहीये!....
पानं कसली हिरवीगार आहेत झाडांची....निथळतोय हिरवा रंग....चकाचक....
आत्ताच न्हाऊन ओले केस घेऊन निवांत उभी आहेत...."सोज्वळ मोहकतेने..." टाईप....
फार दिवस नाही उरले...एखादं पान लालसर व्हायला लागलंयसुद्धा...पण झाडाला त्याचं काहीच नाही...क्षमाशीलता कशी भरल्या रंध्रारंध्रांत...
पाऊस कसा अलगद विसावलाय पानांत...दवालाही हेवा वाटेल...
देखो इन्हें ये हैं ओस की बूँदें
पत्तों की गोद में आसमाँ से कूदे
अंगड़ाई ले फिर करवट बदलकर
नाज़ूक से मोती हँस दे फिसलकर...
एक्झिट ३२.
मोरमॉन का काहीसं चर्च...हे लोक टेंपल म्हणतात बहुदा...कोण जातं त्यात हे कोडंच आहे...पण काहीतरी गोपनीय नि एकदम सो हायक्लास प्रकार आहे म्हणतात...ही जमात फार पैसेवाली आहे...ते तर त्या सोनेरी कळसांवरूनच दिसतंय म्हणा...रात्री काय सही दिसतं पण ते.....आत्ताही पावसाळी हवेत कशी स्पेशल वॉशची सफ़ेदी की चमकार डोळ्यात भरतेय...ह्यांच्यासाठी स्पेशल पाऊस पडतो? का आपला चारचौघांसाठी पडतो तोच, श्रीमंती प्रदूषणात विरघळलेला?
गाडी त्याला जाऊन धडकेल सरळ असं वाटतानाच आपण नेहमीसारखे त्या वळणावर....स्पीड लिमिट ५०....कुणासाठी? इथे ५ वर गाडी चालत नाहीये....असो...
बाय द वे....रस्त्याला कसलं बँकिंग आहे....ह्या सर्वांत डावीकडच्या लेनमधून डावीकडे वळताना...बाकीच्या लेनमधली वाहनं घरंगळून अंगावर पडतील असं वाटतंय....ते उल्हासनगरच्या जवळ रेल्वेगाड्या तिरक्या होतात ना वळताना...तितकं जाणवतंय....तरीच असल्या वळणावरही स्पीड लिमिट बरंच आहे...वळणावर असं निवांत थांबलं की कळतं ना एकेक...ते किती अवघड आहे नि ते आधीच कोणीतरी कसं सोपं करून ठेवलंय ते....वळणांवर थांबता आलं पाहिजे...नुसतं वेग कमी करून त्यांना टाळून जाण्यात अर्थ नाही!
अर्रर्र....निळी अ॓क्युरा मध्ये...इतकंही नकोय रमून जायला रस्त्यात...पण ठिक आहे तसाही त्या सोनेरी करोलाचा कंटाळाच आला होता...ही निळाई हवामानाला साजेशी आहे.
एक्सिट ३३.
शहराला कसा वाहनांचा वेढा पडलाय...शहराला विळखा घालून बसलेला हा रस्ता...नि त्यात अजगराच्या शरीरात उंदीर हळूहळू पुढे सरकावा, तितक्याच संथपणे सरकत असलेली वाहनं. रस्ता गिळून तृप्त. म्हणजे रोज ह्या वेळेला वरून स्नँपशॉट घेतला तर शहराला खरोखरीच वाहनांचा वेढा पडलाय असं दिसेल नाही?...पण रस्त्याने गिळलेली वाहनं नि वाहनांनी गिळलेली माणसं...शहरात काय होतंय ह्याबद्दल सोयरसुतक नसलेली. किंवा कदाचित असलेली पण आपली क्रयशक्ती हरवून बसलेली...
शहराला वेढा देऊन बसला असेल कुणी एक, आता ही नोकरी किती दिवस टिकतेय असा घरी जाताना विचार करत...कुणी आजच कदाचित पिंक स्लीप घेऊन घरी चालला असेल. उद्या कुठला रस्ता? असा विचार करत. शहराच्या आत त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी ७० कोटींच्या बळीचा बकरा कोण? ह्यावर काथ्याकूट करत असतील. अरे आज तर पीएम पण आत असतील, सकाळीच न्यूयॉर्कहून इथे येणारेत असं बरखा दत्त म्हणत होती खरी तिच्या च॓नेलवर...कुणाला तरी "उरका आता, निवडणुकीच्या प्रचाराला जायचंय," असं झालं असेल...कुणी तरी म्हणत असेल, "हे काय आणलंय १२३ कराराचं मध्येच....इथे घरचं झालंय थोडं!"..
त्या सगळ्यांना जाऊन सांगायचं...आत्ता एक बातमी आलीय, राजधानीला वेढा पडलाय...रनगाड्यांसारखी धुडं आहेत, ती अमेरिकन बनावटीचीच आहेत...पण जपानी, कोरियन बनावटीची सामग्री भरल्या नुसती. कारण कळत नाहीये. गोंधळ आहे काहीतरी. आपण तर इतक्यात कुठे मोठा हल्ला नाही केलाय, नाही? व्हाईट हाऊस ने सैन्यही आऊटसोर्स केलंय का हल्ली? व्हाईट हाऊस मध्ये पीएम साहेबांच्या ताफ्यातला कुणी गुल्टी अधिकारी चिंतेत पडेल, हे १२३ करार ठिकेय हो. पण आता माझ्या भाच्याकडे कसा जाऊ व्हर्जिनियात? ह्या पुढल्या इलिप्समध्ये एखादं हेलिकॉप्टर उतरवता येईल का हो? त्या मॉन्युमेंटवर न आपटता?
हिहि...
वेड लागलंय का?
अजून तीन मिनिटांत एक्झिट ३४ नाही आलं तर लागेल.
एक्झिट ३४.
इथं का जायचंय सगळ्यांना!...हुश्श...उगीच वाट अडवून बसलेत मागच्यांची...
५, १०, १५, २५, ४०, ५५, ६५...स्पीडलिमिट अधिक दहा...पुरे!
विस्कटलेला ट्र॓फिक...
शहाणपण शाबूत...
उंदीर वेगात पुढे...
बहुदा साडे पाचच तास...
अर्थहीन विचारांच्या वेढयातून सुटका...
एक्झिट ३७.
ब्रेक...
धत्....क्षणभंगुर...हेसुद्धा?
(क्रमशः)
सामाजिक खोखो
खरं तर संवादिनीचं पोस्ट वाचलं तेव्हा सुरुवातीला ब्लॉगर्सपैकी कोणाला समाजाशी काही पडलंय हे वाचून बरं वाटलं. पण आपण आपलं उठून रक्तदान करून यावं नि समाजाचं ऋण वगैरे फेडलं बिडलं म्हणावं, हे काही झेपेना. त्यामुळे ते वाचल्यावर "तिडिक" ते "असो" असा विचारांचा एक प्रवास झाला. पण अनिकेतचं पोस्ट वाचून जरा जिवात जीव आला.
वास्तविक सामाजिक जाणीवेच्या भव्य कल्पना एवढ्या मर्यादित पातळीवर उतरून सीमित झाल्या, तेव्हा ह्या सामाजिकतेची, सामाजिक बांधिलकी वगैरेची, किंबहुना सामाजिक कामाच्या स्वरूपाची एक वर्गवारीच करावीशी वाटली.
पहिला गट त्या कामांचा जी अगदीच वैयक्तिक असतात, त्यातून गरजूंना मदत होते, पण आपल्या जीवाला नगण्य किंवा शून्य तोषिष लागून. ह्या कामासाठी दानत लागते. रक्त, डोळे, शरीर, पैसे, कपडे, अन्न, पुस्तकं वगैरे देणं हे आलं ह्यात. ह्या सगळ्या दातृत्वाचं श्रेष्ठत्व मानूनसुद्धा बहुतांशवेळा दिलेली गोष्ट आपल्याकडे एकतर अतिरिक्त असते किंवा ती भरून काढता येते (शरीर सोडून, तो वेगळाच भाग आहे पण). सुदैवाने अशा गोष्टी इतक्या प्रतिक्षिप्त क्रीयेसारख्या नकळत केल्या जातात, की त्या आठवून त्यांना सामाजिक काम म्हणायला माझी जीभ धजावेना. त्यामुळे त्यांची जंत्री येथे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण अशी दानत असणं हेसुद्धा दुर्मिळ झालेलं आजूबाजूला पाहताच लक्षात आलं नि मग म्हटलं की असेल एखाद्याला मिळत असं करून सामाजिक काम केल्याचं समाधान, तर मला काय त्याचं? चांगल्याच हेतूने तर करतात सगळे. तेव्हा असो!
ह्या गटात एक वैयक्तिक नैतिक कामे स्वरूपाचा उपगट घालूयात. ह्यात आपण कायदेशीर नि नैतिक वागून समाजाला अप्रत्यक्ष मदत करत असतो. वीज वाचवण्यापासून लाच न देण्यापर्यंत. ते नमूद करायला हरकत नाही. नुकतंच मी गाणी, चित्रपट बेकायदेशीर डाऊनलोड करणं किंवा इतरांकडून अशी फुकटची ती घेणं बंद करायचं ठरवलंय. सध्या जी आहेत त्यांचं काय? तर प्रांजळ कबुली की ती डिलिट करायचं धैर्य अजून नाही. तेही लवकरच येवो अशी इच्छा. तुम्ही कधी बंद करताय?
दुसरा गट म्हणजे संघटित स्वरूपाचं, साधारण समाजसेवी एनजीओ, सामाजिक संघटनांसारखं. (ज्या संघटना संघटित होऊन पहिल्या गटातली कामं फ्याशन म्हणून करतात त्यांचा काही संबंध नाही.) किंवा एखाद्या विशिष्ट समस्येवर, प्रश्नावर केलेलं काम (प्रश्नाविषयी जागृती करण्यासकट). किंवा एखाद्या दुर्लक्षित समाजघटकांसाठी केलेलं काम. काही वैचारिक बांधिलकी असणारं, charity च्या पलिकडलं, जरा स्वतःला तोषिष लावून.
नि इथे मला अगदी लाजेनं मेल्यासारखं वगैरे वाटू लागलं. वास्तविक अशी कामं पूर्ण वेळ करणारी मंडळी घरात असताना, आपण अगदी खानदानाला धब्बा वगैरे आहोत असं वाटू लागलं. नि हा खोखो आपल्यापर्यंत नाहीच आला तर बरं होईल, नाही तर त्यावर लिहायला लागलो तर अजून लाज वाटेल असा एक सोयीस्कर पळपुटा विचार मनात आला. पण अगदी दुसर्याच खेपेला तो आला नि मला बेसावध गाठलं, नि शिवाय अनिकेत नि अगदी विचारपूर्वक वगैरे दिला होता हे वाचून तर अधिकच त्रास.
मग ठरवलं फार झालं. जे इतके दिवस करता येण्यासारखं आहे असं नुसतं म्हणत होतो, त्याची माहिती गोळा केली. तर आमच्या विद्यापीठात पर्यायी स्प्रिंग ब्रेक नावाचा एक उपक्रम चालतो. ह्यात अमेरिकेच्या विविध भागांत वा अमेरिकेबाहेर अभ्यासगट, कृतिगट पाठवले जातात. प्रत्येक भेटीमागे विशिष्ट उद्देश असतोः पर्यावरणीय समस्या, शिक्षणामधील तफावत, जागतिकीकरणाचे दुष्परिणाम, आपद्कालीन मदतीमधील भेदभाव वगैरे. तर येत्या स्प्रिंग ब्रेक मध्ये अशा अभ्यास/कृतिगटात जायचं नक्की केलं. मी ह्या चार उद्दिष्टांसंदर्भात काम करायला जाणार्या गटांमध्ये सहभागी व्हायला उत्सुक आहे असे अर्जात पर्याय देणार आहे. म्हणजे मी ठरवलंय. रीतसर अर्ज, मुलाखती असा सोपस्कार आहे. त्यामुळे निवड व्हावी लागणारे. पाहूयात. निवड झाल्यावर खर्चाचं काय हाही प्रश्न आहे, पण निधी उभारण्यासाठीही काही उद्योग करतात म्हणे. नाहीतर पदरचे मोडीन. तसेही स्प्रिंग ब्रेक मध्ये लांबलचक सहलीवर उडवीनच पैसे...तर ते दुय्यम आहे. निवड झाली तर जाईनच, नि ते अनुभव इथे लिहिनंच. नाही झाली तरीही त्याच केंद्राच्या अजून एक दोन गोष्टी बघून ठेवल्यात त्याचा पाठपुरावा करीन. ही अर्थात पहिली पायरी, शिक्षण संपेपर्यंत बहुतेक सुट्ट्यांमध्येच, पुढंचं पुढे...
तिसरा गट हा व्यापक आहे. म्हणजे व्यापक सामाजिक-राजकीय स्वरूपाचा. राजकारण व समाजकारण हे काहीतरी भिन्न आहे असं मला जराही वाटत नाही. अशी समजूत असणारे दोन गट: समाजकारणाशी नातं तोडलेले राजकारणी नि राजकारण व समाजकारणाशी नातं तोडलेले शिकले सवरलेले लोक. मला हे असं अलिप्त जगणं अशक्य आहे. वास्तविक अराजकीय भूमिका घेऊन केलेलं समाजकारणसुद्धा मग बर्याचदा मर्यादित राहतं, असं आपलं माझं मत. पण ते सगळं करायची ही वेळ नाही. मागे हे सगळं सांगितल्यावर एका मित्राच्या आईने "आधी शिक्षण पूर्ण कर बाबा" असं सांगितलं होतं. मलाच त्यांची दया आली. मी पोट धरून हसून, "काकू, मी काय उद्या उठून राजकारणात शिरत नाहीये" असं सांगितलं होतं, तेव्हाही त्यांच्या चेहर्यावर मी काहीतरी भयंकर करणारे आयुष्यात असाच भाव होता. पण त्या सगळ्याला वेळ आहे, नि नेमकं कसं काय होईल कुणास ठाऊक. पण रक्तातच उतरलंय बहुतेक माझ्यात, अराजकीय होताच येत नाही, त्याला काय करणार...पण ते असो....ही ती वेळ नव्हे.
हे वर्गीकरण माझ्यापुरतंच...ते वर्गही अर्थातच mutually exclusive and exhaustive नाहीत. त्यामुळे नाही पटले तर सोडून द्या. गट १ हा अगदी विनम्रपणे माझ्यासाठी सवयीचा भाग आहे, त्यामुळे त्या कामांना मी कमी लेखून उगीच कुणाला दुखावलं वगैरे असेल तर जाहीर माफी. गट २ हा खरा गाभा आहे नि त्यासाठी हालचाल सुरू करायला कारण ठरल्याबद्दल ह्या खोखोचे आभार. गट ३...पाहूयात!
गट२ शी असलेली बांधिलकी ज्यांच्या लेखांतून वेळोवेळी व्यक्त झालेली आहे, त्या कसंकाय व क्षिप्रा ह्यांना माझा खो!
Friday, August 22, 2008
कविता
------------------------------------------
१.
पाऊस अल्लद
स्वप्नातल्या हिनकळ्या सावलीसारखा.
दिवसाआधीच्या झांजरझापीतला.
झाडांच्या फांद्यांवर; थेंबथेंब पानांवर
अल्लद स्वप्नातला, पाऊस झोपेतला.
पाऊस पक्ष्यांच्या पंखांवर निसटता
हलका, हेलकावता, थेंबाथेंबीचा
पिवळ्या जर्द पहाटेच्या
अंगणात पाखडल्या चिमण्यांच्या
चिवचिव चोंचीतल्या गाण्यातला.
पाऊस चढतीचा
आषाढ गढतीचा
दुपारच्या निःशब्द तळ्याच्या पाण्यावर
संथ सरपटता
केतकी कबूतरी पंखांच्या दाटीत
गर्भार गढतीचा.-पाऊस चढतीचा
पाऊस उतरल्या सांजेच्या काळोखात
गडदगर्द गहिरा
डोंगर कठड्याशी झिंगून काजळी काळोख पिणारा
निमूट झोपलेल्या खोर्याखोर्यांवर
विक्राळ बरळता मदमस्त पाऊस.
पाऊस रात्रीचा
कभिन्ह-माध्यान्ही
धसमुसळा, काळा, वैर्यासारखा.
उध्वस्त डोळ्यांतल्या सांदीसांदीतून
खिंडार पाडणारा.
विजेच्या विळख्यांनी वेटाळत जाणारा...
-सर्पाहून गहिरा.
--- ना. धों. महानोर (पावसाळी कविता)
------------------------------------------
२.
तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे,
निद्रिस्त शांतकाय आता पडून आहे.
गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी
हा वेल मोगर्याचा पानीं मिटून आहे.
अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाबः आता रोखून श्वास आहे.
जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फूट गीत मंद हुरहूर बोलताहे.
वनवेळु वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी निःश्वास टाकताहे.
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे.
बोले अखेरचे तोः "आलो इथे रिकामा,
सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे."
---आरती प्रभू, (नक्षत्रांचे देणे)
------------------------------------------
माझा खो आनंद आणि जास्वंदी ह्यांना.
Wednesday, August 6, 2008
दिल में एक लहर सी...
मूळ ग़ज़लेचे देवनागरी transliteration (ह्याला मराठीत काय म्हणायचं? अक्षरांतर?)(संदर्भ):
दिल में एक लहर सी उठी है अभी
कोई ताज़ा हवा चली है अभी
शोर बरपा है ख़ाना-ए-दिल में
कोई दीवार सी गिरी है अभी
कुछ तो नाज़ुक मिज़ाज हैं हम भी
और यह चोट भी नई है अभी
भरी दुनिया में जी नहीं लगता
जाने किस चीज़ की कमी है अभी
तू शरीक़-ए-सुख़ाँ नहीं है तो क्या
हमसुखाँ तेरी ख़ामोशी है अभी
याद के बेनिशाँ जज़ीरों से
तेरी आवाज़ आ रही है अभी
शहर की बेचराग़ गलियों में
ज़िंदगी तुझको ढूँढती है अभी
सो गए लोग उस हवेली के
एक खिड़की मगर खुली है अभी
तुम तो यारों अभी से उठ बैठै
शहर में रात जागती है अभी
वक़्त अच्छा भी आएगा 'नासीर'
ग़म ना कर ज़िंदगी पडी है अभी
ग़ज़लेचं भाषांतर ग़ज़लेच्या स्वरूपातच करावं असं वाटलं. ते खालीलप्रमाणे. भाषांतर कितपत जमलं हा भाग अलाहिदा. पण त्या प्रयत्नात शांता शेळके यांचं एक वाक्य संपूर्ण पटलं, जे काहीसं असं होतं - "भाषांतर हा एखाद्या साहित्यकृतीचा रसास्वाद घेण्याचा एक सर्वोत्कृष्ट मार्ग आहे"...शांताताई..अगदी खरं! भाषांतराचा प्रयत्न काहीसा असा...
आत्ताच लहर जराशी उठली अभ्यंतरी
ताजीच झुळुक हवेची आली कुठली तरी
गेहात उठे मनाच्या कसला कल्लोळसा
एखाद भिंत कुठेशी नुकती ढळल्यापरी
नाजूक, मृदुल म्हणा वा हळवा ढंगच खरा
ओलीच जखम तशी ही, नवीच तीही खरी
सुख भरून वाहे जरी, मन हे दुःखी तरी
आहे उणीव कशाची? उमगे ना हे परी
खुंटून जरी 'संवादी' नुरले शब्दच तुझे,
मौनही तुझे बोलते, साथ तीच सोयरी
स्मृतींची बेटे ज्यांची नव्हती खूणच कधी
तेथून तुझ्या स्वरांच्या झरती कानी सरी
शहरात उजळ दिव्यांच्या नुरल्या वाटा जरी
आयुष्य वणवण शोधे तुज त्या रस्त्यांवरी
निद्रिस्त समस्त वाडा, पहुडे तिमिरावरी
एकली सताड उघडी खिडकी वाड्यावरी
भलत्याच अशा अवेळी उठला तुम्ही कसे?
रात्रीस येतसे जाग शहरी ह्याच प्रहरी
आश्वस्त रहा "नासीर", काळ येईल भला
सोडून खंत बघ, जिणे उरे केवढेतरी
Monday, July 28, 2008
वायफळ सूर
काही निवांत क्षणांना हे जाणीवे-नेणीवेमधले वायफळ सूर कानांमध्ये रेंगाळतात. तसेच तेव्हाही रेंगाळत होते. घरपरतीच्या वाटेवरती. बँगा भरताना, पाऊस पाहताना, विमानात, धावपट्टीवर विमान उगीच रेंगाळत उभं असताना, विमानतळावर रिकामा बसलो असताना. सगळीकडेच. थेट शहरात पाय ठेवेपर्यंत नि त्यानंतर बरेच दिवस. अन्वयार्थांचे गुंते सोडवण्यात हशील नाही हे लवकरच उमगलं हे बरं झालं होतं. पुष्कळ दिवसांनी "काहीच काम नाही" अशी स्थिती आली की, अशा कामांच्या यादीहीन वेळेला वाटणारं "काहीतरी काम विसरतोय आपण नक्कीच" अशा अर्थाचं उसनं भय सुद्धा चेपलं होतं एव्हाना.
तेव्हाच लहानपणीच्या अलिबागच्या आठवणींत आधीची पिढी दंगली होती. सिनेगॉगपाशी घुटमळणारा वायफळ सूर आत्याच्या अलिबागच्या समुद्राजवळच्या ज्यू कुटुंबांच्या आठवणींशी जुळला. अलिबागचा नॉस्ट॓ल्जिया बालाजी मंदिरासमोर घोळवला जात असताना. तिथल्या प्रत्येक गल्लीच्या, वाड्याच्या, सरकारी इमारतीच्या नि त्या सगळ्यांतल्या साध्या सरळ माणसांच्या काही ना काही आठवणी ऐकून हसताना. त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नव्हतं. नॉस्टॆल्जिया उगाळण्याची ती पहिली का खेप होती त्यांची? पण वाटलं...नॉस्टॆल्जिया किती कालसापेक्ष असतो ना? म्हणजे आपण जगायला लागतो एखादी जागा तिथपासून आपल्या आठवणी सुरु...नॉस्टॆल्जिया हा एक memoryless random variable सारखा प्रकार आहे असा काहीसा साक्षात्कार तिथून घरी परत येता येता झाला.
परत आल्यावर स्टेशन गाठलं तेव्हा त्या चिरेबंदी बांधकामाशी स्पर्धा करणारे काँक्रिटचे स्तंभ दिसले. काही दिवसांनी जेव्हा तो स्टेशनपासून सुरु होणारा उड्डाणपूल नेमका कुठेतरी उतरेल तेव्हा त्याच्याखालचा रस्ता कितीतरी लोकांच्या नॉस्टॆल्जियाचा भाग असणं बंद होऊन जाईल. स्थितीशीलतेचे चोचले वाईटच पण शहर विकासाच्या कुठल्यातरी अचाट कल्पनांच्यापायी हे असे किती रस्ते नॉस्टॆल्जियाचा भाग असणं बंद होणार? हे रस्ते असेच नीरस होत जाणार? तशीच शहरंही त्या अमेरिकन शहरांसारखीच भकास होणार? मग ज्या रस्त्यांवरून मुळात कुणी चालणारच नाही, तिथे पाऊलखुणांचे काळाशी मेळ कसे काय जुळणार? असे काही अतिरेकी प्रश्न मनात आले.
अशा वेळी काय करावं? नॉस्टॆल्जिया हा एक memoryless random variable सारखा प्रकार आहे, ह्या साक्षात्काराचा बोध घेऊन सरळ एखादं शहर पहिल्यापासून परत जगायला लागावं का? आठवणींचं नवीन संचित निर्माण करण्यासाठी? स्तोत्रांत गुणगुणणारे वायफळ सूर खरंच वायफळच. "जे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे" असं स्मरणालाच म्हणायचं? ग्रेसांचे शब्द कधी कुठले संदर्भ घेऊन अर्थपूर्ण होतील हे शोधण्याइतकंच अनाकलनीय सारं. काळाच्या वशात् सगळे रस्ते स्मृतिपथम् जातील याचं भय नाही, ते होणारंच. पण त्या रस्त्यांनी जपलेली मूल्यं? तीसुद्धा? भय का जात नाही त्याच मार्गाने?
सारं उमलून आलेलं निवांतपण कसं वायफळ सूरांसारखं नकळत विरलं. म्हटलं नव्हतं? हा निमिषांचा निमिषांशी निमिषार्धासाठी खेळ!
Saturday, July 12, 2008
वायफळ सूर
हा चौक आणि त्याच्यापुढचं जैन मंदिर यांच्यामधोमध एक जुनाट वाडा होता. तो कित्येक दिवस तसाच भर रस्त्यात उभा होता. म्हणजे खरं तर तो आपल्याच जागी होता. त्याला हळूहळू रस्त्यावर आणलं होतं. ह्या जैन मंदिराच्या बरोबर समोर आणिक एक मंदिर आहे. कधीच गेलो नाही मी तिथे. का कुणास ठाऊक? जैन मंदिराचीसुद्धा खरं तर फार आठवण राहिली नसती. पण काही शिल्पकार अशी काही जादू करतात की आपल्या एखाद्या शिल्पाची आठवण कुणी वर्षानुवर्षे काढतंय ह्याची त्यांना कल्पनाही नसेल. त्यांच्या बोटांमधली जादू बघून जग खूश होताना त्यांची पोटं भरली होती की नाही कोण जाणे? ताजमहाल बांधणार्या हातांची आठवण न येता ताजमहाल पाहता येतो का? मला तरी नाही. तसेच ते हत्ती पाहताना. देवळाच्या दाराशी दोन बाजूला दोन देखणे निळे हत्ती. कधीही ह्या रस्त्यावरून जाताना सवयीने मान वळायची हत्ती पाहायला. जैन मंदिर नि द्वारपालासारखे सोंड वर करून उभे असणारे हत्ती असं एक विचित्र पण पक्कं समीकरण डोक्यात बसलंय माझ्या लहानपणापासून. मागे मंदिराचा जिर्णोद्धार झाला नि एक भव्य पांढरी इमारत उभी राहिली आजूबाजूला. सुदैवाने ते हत्ती तसेच राहिले, फक्त एका पांढर्या हत्तीची भर.
खरं तर तसंच पुढे जायचं कोपर्यावरच्या कचराकुंडीपर्यंत. पण मंदिराच्या पुढे जरासं आतल्या गल्लीतून जायचं. एका आतल्या रस्त्यावरच्या कचराकुंडीच्या, नि त्रिकोणी बागेच्या बाजूने. आता आपलं जन्मस्थळ ही काही राष्ट्राने जतन करून ठेवण्याची वास्तू नसली, तरी कौतुक असतंच ना निदान आपल्याला तरी. तीच ती जागा. त्याच्या चार पावलं पुढे घर. नि त्याच्या अजून चार पावलं पुढे मशीद. कानात भरलेली ती बांग. शब्द कधीच कळले नाहीत आजवर. स्तोत्रांचे अर्थ कोणाला कळतात म्हणा. पण ते जे सूर लागतात ना. ऐकत रहावं. आर्त ह्याशिवाय दुसरा शब्दच सुचत नाही मला. पुढे "स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे" ही ओळ ऐकल्यावर मला सर्वांत प्रथम ते सूर आठवले होते. ते दिवसभर घुमणारे आर्त सूर, जाईची नाजूक वेल, जाळीचं कोरीवकाम, सर्व गोष्टींत भरलेली पांढरी हिरवी रंगसंगती नि ह्या सगळ्यामुळे आपसुक येणारा असीम शांतपणा. हेच सगळं इथूनच गझलेध्ये उतरलं असेल का?
कुठे सुरांच्या आठवणी तर कुठे साजांच्या. मी कधीच ऐकलं नाही ते वायोलिन पण म्हणे कोपर्यावरच्या एका ज्यू कुटंबात कुणी रोज वाजवायचं. कसलं वाटत असेल ना रोज ऐकताना? आतली गल्ली मूळ रस्त्याला मिळते तिथेच. हल्ली त्याला सिनेगॉग चौक म्हणतात. त्याच गल्लीच्या खालच्या कोपर्याला. हल्ली त्याचाही जिर्णोद्धार होतोय. त्याच्यावरची दगडाची पाटी तशीच होती पण, नि ती चांदणी. शाळेत सगळ्यात पहिले शिकतो ना आपण चांदणी काढायला, एकात एक दोन त्रिकोण, एक वर बघणारा नि एक खाली बघणारा, तशी, सहा कोनांची, मूलभूत. वय वाढलं की हात न उचलता पाच टोकांची चांदणी शिकतो आपण, चंद्राबरोबर काढतात तशी. धर्मांचंही काहीसं असंच झालंय का? कोण कुठले कधी आले नि ह्या मातीचे कधी झाले, सारंच विचित्र. सर्वसमावेशकता, धर्मनिरपेक्षता हे शब्द काय संविधानाने ह्या भूमीला दिले? आधी आडात असावंच लागतं. मोठेपणा त्या चवदार पाण्याची चव कळण्यात असतो. कुणी तो पाणवठा इतरांसाठी खुला करतो, तर काहींना आपल्या रसशून्य गर्दभवृत्तीचाच आत्यंतिक अभिमान. सिनेगॉगच्या बाजूने वाहणारा नाला नि पुढे नाल्यापलीकडल्या वस्ती. त्या द्रष्ट्याच्या नावाच्या रस्त्याला धरून अजून उभ्या आहेत.
(क्रमश:)
Saturday, July 5, 2008
वायफळ सूर
तळ्याच्या कोपर्यावर उजव्या हाताला जरा आतल्या बाजूला एक गणपतीचं देऊळ. बाजाराच्या गजबजाटात लपलेलं. या गणपतीला रोज वेगवेगळी आरास. कधी जास्वंद, कधी दुर्वा, कधी नारळ नि असं बरंच काही. रोज वेगळी. नि रोज सुरेख. प्रसाद पण छान मिळायचा. मला त्याचीच मजा. गणपतीच्या मूर्तीबद्दल लिहायला ती एवढी निरखून पाहिलीय कोणी? खरं तर मूर्तींमध्ये काय डावं उजवं करायचं? तसंही गणपतीला येणार्या बोळिंजकरांच्या गणपतीच्या मूर्तींच्या अतीव नाजूक डोळ्यांपुढे बाकी सगळ्या मूर्ती साध्याच!
रस्त्याच्या जेवढ्या अंतरावर हे देऊळ, साधारण तेवढ्याच अंतरावर डाव्या बाजूला त्या भव्य, प्रशस्त चर्चचं प्रवेशद्वार. संध्याकाळी आजीकडून घरी जाताना तिथे जायचा हट्ट. चर्चची काँन्व्हेंट शाळा नुकतीच सुटलेली नि मुलं घरी गेल्यावर शाळांना येणार्या भयाण सुन्नपणामध्ये ऐकू येणारी ती चर्चची पोक्त घंटा. कधी सहा वेळा वाजायची, कधी सात वेळा. ती वाजायची थांबेपर्यंत हलायचं नाही तिथून. आत गेल्यावर कुठल्याही चर्चमध्ये असते तशी उंच, स्तब्ध शांतता. तिथे जाऊन दोन मिनिटं बसायचं. तिथे तसं कुणाचंच कुणाकडे लक्ष नसायचं. कधीतरी फक्त कोणा आजीबाईंचं चेहर्याची ओळख सांगणारं स्मित हास्य. एरवीसुद्धा सणाचं वातावरण असावं असा प्रसन्न चर्च नाताळात, ईस्टरला विशेष सजायचा. मग मी आईबरोबर सार्वजनिक सजावटी बघायला जातानाच्या कुतूहलपूर्ण उत्साहात ती सजावट बघायला तिकडे. त्या सजावटीमधला थेट समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित वृक्षांशी नातं सांगणारा हिरवा रंग, त्याच रंगाच्या झाडांवरचे ते लालबुंद गोळे नि तो आकाशातला तारा. शांत आणि आश्वासक.
चर्च, मंदिरं, मशिदी ह्यांना, तुम्ही जा वा न जा, टाळून जाताच येत नाही नि त्याही कधी टाळत नाहीत. पण जरासंच पुढे गेल्यावर विलक्षण अलिप्तपणे उभी असलेली ती अग्यारी नि मी एकमेकांना नेहमी टाळतच आलो आहोत. आजवर मी कुठलीही अग्यारी आतून पाहिलेली नाही, सिनेमात पण नाही. कशी असेल आतून कुणास ठाऊक? ह्यांच्या स्मशानासारखीच अग्यारी पण एक वैचित्र्यपूर्ण गोष्ट वाटत आली आहे मला. हे लोक मेलेली माणसं कोरड्या विहिरींत टाकतात नि मग गिधाडं येऊन ती खातात ही गोष्ट विज्ञानात गिधाडं अन्नसाखळीत आणि इतर नैसर्गिक चक्रांमध्ये येईपर्यंत माझ्या कधी पचनीच पडली नव्हती. तसाच त्या पांढरट, फिकट पिवळट वास्तूचा विचित्र पण न बोचणारा अलिप्तपणा. तिच्यासमोरचा तो निर्जीव रस्ता मी "वरचा माँब्रिन दादा इथे येतो नि आम्ही पूर्वी ह्याच कोपर्यावर राहायचो" ह्या दोनच गोष्टींवर कापला आहे. बाकी बघण्यासारखं नि सांगण्यासारखं काहीच नाही.
ह्या रस्त्याला पूर्वी फक्त वर्षातून एकदा नवरात्रीच्या नऊ रात्री नि दहा दिवस जान यायची, पुढच्याच चौकात बसणार्या देवीमुळे. त्या चौकात एक हौद होता असं मला काहीसं आठवतंय. अगदीच उथळ. बहुदा घोडे पाणी पित असावेत त्यात. कारण तिथेच टांग्यांचं टर्मिनस होतं. तिथून स्टेशन, स्टेशनहून परत. झापडं लावली नसती तरी नाकासमोर सरळच जावं लागलं असतं. तिथेच नवरात्रात देवी बसते. गेली कित्येक वर्षे ती तशीच नि तितकीच प्रसन्न मूर्ती मी बघत आलोय. दरवर्षी तश्शीच, वाघासकट! धार्मिकतेच्या नावाखालची वैशिष्ट्यपूर्ण राजकारणी अशी पैशांची उधळण मी सर्वात प्रथम तिथेच पाहिली. आता ह्यांच्या देवीसारखी जत्रा त्यांच्या गणपतीला भरते, नि त्यांची हंडी नऊ थरांवर फुटली की ह्यांची दहा थरांवर फुटते. लाखांनी काळ्याचे पांढरे होतात. जीवाशी खेळ करणार्या धैर्यशील चिमुकल्यांचा पराक्रम उभा महाराष्ट्र घरबसल्या थेट पाहतो. त्यांच्या जीवावर आपली कीर्ती दिगंत करणार्यांचा तमाशा डोळ्यांत तेल घालून पाहणार्या मुर्दाड माणसांनी रस्ता अजून एक दिवस जिवंत होतो एवढंच.
(क्रमशः)
Friday, July 4, 2008
वायफळ सूर
रेल्वेची चार स्टेशनं दिसतात तसंच एक स्टेशन. भारतातली पहिली आगगाडी कधीतरी येऊन थांबल्याच्या पुसलेल्या खूणा जपणारे काही दगड असतील कदाचित पूलांचे भार सोसत उभे आडोशाला नि तो दाराशी असलेला भला मोठा वृक्ष नि त्याचा पार. तो अजून तसाच उभा आहे. कधीपासून कुणास ठाऊक? एनर्जी स्टाँल हे लोकांचं भेटायचं ठिकाण होतं तेव्हाही नि नसलेला एनर्जी स्टाँल हे भेटायचं ठिकाण झालं तेव्हाही. एक नंबरचा इंडिकेटर ही भेटण्याची जागा होती तेव्हाही नि ती जुन्या एक नंबरवरचा इंडिकेटर अशी झाली तेव्हाही. तो होताच. तसाच. माझ्या नाँस्टँल्जियात. तिथूनच बाहेर पडायचं स्टेशनकडे पाठ फिरवून नाकासमोर सरळ चालत. रस्ता वळेल तसं वळायचं.
तशा फूटपाथवरच्या फुटलेल्या सगळ्याच लाद्या सवयीच्या. अंधारातही चालता आलं असतं इतक्या. म्हणजे कुठल्या लाद्या अर्ध्या फुटल्या आहेत, कुठल्या लाद्या बाजूच्या वडापावच्या गाडीच्या गळक्या पिंपात भिजलेल्या असतात, कुठल्या ठिकाणचा फूटपाथ चढता उतरताना पाय किमान दीड फूट उचलावा लागतो, पावसाळ्यात पाणी साचल्यावर कुठल्या चार लाद्यांवरून कमीत कमी लांब उड्या मारून चालता येतं, फूटपाथच्या कुठल्या भागावरून चाललं म्हणजे रस्त्यावरून जाणार्या गाडीने उडविलेलं पाणी अंगावर उडत नाही, कुठलं गटारावरचं झाकण कधीकधी उघडं असतं ह्याचे नकाशे वाचायला पायांना डोळे थोडीच लागतात? तसंच सवयीने चालत राहिलं की थोड्या अंतरावर पहिल्यांदा नजर वळायची उजवीकडच्या बागेकडे. आजोबा कधी कधी घेऊन यायचे तिथे. स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत दगडावर कोरलेलं अण्णांचं नाव दाखवायला. हल्ली उघडी असते का ती बाग?
त्याला लागूनच असलेलं शंकराचं मंदिर. तसे आजूबाजूला पुष्कळ देव होते. पण मुख्य शंकर. एका छोट्याशा दारातून पायर्या उतरून खाली गेलं की प्रशस्त गाभार्यामधली शंकराची भली मोठी पिंड नि त्याच्यावर अभिषेक करणारा कलश. त्याच्याबाहेरचा तो पांढराशुभ्र भला मोठा नंदी. हा नंदी पिंडीच्या दिशेने अणुभर की अशाच काहीतरी सूक्ष्म अंतराने म्हणे सरकतो नि तो जेव्हा पिंडीशी पोहोचेल तेव्हा जलप्रलय होणार. आपण मोठे होऊ तोवर तो निदान एक दोन वीत अंतर तरी सरकेल असं मला तेव्हा फार वाटायचं. नंतर नंदीची चाल कधी मोजली नाही पण जलप्रलयसदृश परिस्थिती २६ जुलैला पाहिली. देवळासमोरचा भलामोठा तलाव भरून वाहणं हे पावसाच्या कहराचं परिमाणसुद्धा थिटं पडलं तेव्हा. रस्त्याच्या डाव्याबाजूला असणारं हे तळं पूर्वी म्हणे देवळाला लागून होतं. मग रस्ता बांधला मधे. असेलही. तो रस्ता माझ्या आधीच्या पिढ्यांच्या नाँस्टँल्जियाचा भाग नसेल कदाचित.
हे तळं मागे एकदा गाळ काढायला म्हणून संपूर्ण उपसलं होतं. बिल्डींगची पाण्याची टाकी रिकामी करावी ना तसं रिकामं केलं होतं. पाणी कुठे गेलं कोणास ठाऊक, गाळ मात्र शहरभर पसरला होता. तेव्हा त्या तळ्याच्या मधोमध असलेल्या एका सुरेख कमळात असणार्या शंकराच्या पिंडीपर्यंत चालत जाता येत होतं. एका संध्याकाळी तळ्यात तसं चालून आलेलंही मला आठवतंय. पुढे गाळ निघाला, तळं भरलं, सुशोभिकरणाच्या भन्नाट कल्पनांमध्ये ते सुंदर कमळ तुटलं नि एक मोठ्ठं बटबटीत देऊळ तळ्यात उभं राहिलं. त्यानंतर त्या तळ्यात बोटीतून फिरतानाही ती मधलं बटबटीत वास्तू डोळयात खुपायची. लहानपणी जवळपास दर महिन्याला त्या बोटींमध्ये बसलो असेन. फक्त बोटीत बसता येत होतं तेव्हा. हातात धडाधड फोटो घ्यायला डिजिटल कँमेरे नव्हते नि ती बोट राइड व्हीडियो शूट करायला ते कँमेरे मूव्ही मोड मध्ये टाकून सज्ज राहायची अनावश्यक धडपडही नव्हती. हात मोकळेच असायचे. माझे पाण्यात घालायला नि आईचे मला धरायला.
(क्रमशः)
Tuesday, May 20, 2008
निवांत क्षणांचे अन्वयार्थ किंवा असंच काहीतरी...
फुंकरही व्हावी वात, अन फूल घालते शीळ
संन्यस्त कातळावरली ती गजबजलेली वेळ
त्या खडकापाशी आज क्षण शांत भेटले चार
बाष्पास दिसावे सहज घन सांद्र, गोठले, गार
पाऊलखुणांचा तेथे काळाशी जुळला मेळ
त्या स्तब्ध ठिकाणाहून कितीदा गेलो नि आलो
पण काळ थांबला स्तब्ध, तेव्हाच स्तब्ध मी झालो
क्षण सुन्या फलाटापाशी ती धुक्यात थबके रेल
स्मरतात वायफळ सूर, रेंगाळत येता सांज
ते चर्च सांगते वेळ, राउळी वाजते झांज
नि आर्त सूरांनी सजते मशिदीत शुभ्र ती वेल
निःशब्द, असेच निवांत क्षण हळूच उमलून यावे
अनन्वयच त्यांची खूण, भय त्यांच्याशी विसरावे
हा निमिषांचा निमिषांशी निमिषार्धासाठी खेळ
Monday, April 28, 2008
मैत्रीच्या भुताचे दशावतार किंवा असंच काहीतरी...
मैत्रीचे कसले बंध?
वार्याला अजून स्मरतो
सुकल्या जाईचा गंध
मी उगीच भावुक होतो
मैत्रीस समजून नाते
वार्याशी खेळुन सुकते
रानात तृणाचे पाते
कुठल्या नियमाच्याधारे
मैत्रीचे नाते व्हावे?
वाहणे सुकेना म्हणुनी
पाण्याने पारा व्हावे
मौनाने स्पष्ट करावा
मस्तकात भिनला पारा
तुज मात्र सोडून भगवा
वाटला अबोली तारा?
वागेन कसाहि कधीही
हे बंधन अतूट गमते
डोहात ठरेना तारा
अन रिती अंजली भिजते
का मला कधी ना कळले
मैत्रीचा नसतो रस्ता
मग धूमकेतू दुरूनी
सूर्याशी आला नसता
त्या रस्त्यावर भर दिवसा
मी मुक्त मनाने हसलो
फसलो मी, कळले मी त्या
सूर्याला मित्र समजलो
मग हेही मला उमगले
सूर्याला नाही वैरी
त्याच्या अस्ताशी झडती
स्तोत्रांच्या सावध फैरी
तेव्हा मैत्रीची सारी
व्याख्या एकेरी झाली
एकाची मैत्री झाली
एकाने मैत्री केली
ना कधी गायली कोणी
मैत्रीची सहस्र नावे
मंतरल्या काळासाठी
'भूत' एवढेच म्हणावे
Saturday, April 12, 2008
1.2.3.4.
1.
Before the irresponsible electronic media hijacks the issue, before the urban – upper caste – and so called learned people spam my inbox and orkut with ‘apocalypse now’ messages, and before the otherwise proudly apolitical people get selfishly political, let me laud the Indian judiciary as a whole and the apex court in particular for one of the most satisfying, landmark, and just judgments of recent times.
2.
As it is high time that opponents of reservations need to suggest alternate ways, supporters also need to experiment and figure out if there are any better ways. I think we have to admit that reservations alone are not going to help. It is high time we find more efficient alternate solutions for bringing the social equality into reality. Till then, there could be mechanisms running parallel to reservation schemes – that work on keeping the social fabric intact and maturing the social conscience. These mechanisms and experiments may become mainframe solutions when they are proved to be feasible in practice.
In order to minimize the known fall-outs of reservations, make sure that benefits go to those who need them, and improve parallel mechanisms, it is possible to set continuous monitoring mechanisms – continuous evaluation of reservations as a methodology along with its manifestation, encouragement for timely discontinuation of such schemes and leaving the economic elite out of the circle of beneficiaries. I had stated these in my earlier article on digitalization, though in a different context. It is immensely satisfying to see that the apex court’s judgment addresses all these issues. I always believed that such a middle ground - accepting reservation as a policy and optimizing its manifestation – always existed. Though I would have liked to see these views coming out through discussions in the very house that unanimously amended the constitution, I must appreciate that at least the apex court has shown a great character in departing from the bipolar view on the issue and finding out an optimized solution.
3.
I do not even want to write about media and electronic media in particular, for I am tired getting irritated with them. Forget about looking at it in the light of social justice, forget about exploring models for social justice, forget about emphasizing on discontinuing hatred and discrimination, they seemed keener on telling the story of how “two thakurs (V.P. Singh and Arjun Sigh)” did it. I just hope that they will some day realize that they can play an important role in social experimentations and strengthening the democracy.
4.
I hope that the government and the parliament will look into the remarks of the apex court and establish mechanisms to ensure effective implementation. And I mean mechanisms to not only ensure that benefits reach to the affected people but also make this a dynamic policy and a space for social experimentation. I hope that the definition of creamy layer will be modified to reflect the increase in annual income after the sixth pay commission has been implemented. I hope that the creamy layer will be redefined in terms of ratio of annual income to the cost of higher education. I hope that we will come up with models and methodologies for implementing the principle of social justice. This is not just in this case. It is important we do that now, for we are going to need it in future – for, as I said, we just love discrimination.
Saturday, April 5, 2008
देखावा
संतूर भारल्या वेळा
दीठीत रक्तिमा तान्हा
ना दिपल्या अजून ज्वाळा
ती फेनफुलांची दुलई
गुरफटून जलधी घेई
पुळणावर उठून बसली
माडांची तिरकी राई
क्षण राग उषेचा गावा
नि निरोप निशेचा घ्यावा
जग प्रसन्न म्हणते ऐसा
दूरून दिसे देखावा
तो मधला साहिल माझा
तो अलिप्त म्हणून माझा
देखाव्यात हरवलेला
बंदिस्त किनारा माझा
सौंदर्य जळाचे दिसले
अन रंग नभाचे टिपले
माडांच्या पार्श्वी कोणी
अन गृहीत त्याला धरले
कुणी ठाव त्याचा घ्यावा
त्याच्याही जावे गावा
अंतरात शिरून त्याच्या
भावही जरा देखावा
तो उदासवाणा नाही
देखावा जरूर पाही
पण भ्रामक प्रसन्नतेची
व्याख्या त्या माहित नाही
ती लाट फुटे एखादी
सोडून सख्यांची गर्दी
तो भिजतो अन ती रुजते
क्षण तेवढेच संवादी
क्षण चिंब तो ओघळावा
उत्स्फुर्त रंग मिसळावा
विस्कटल्या चित्रामधुनी
रंगतो खरा देखावा
Wednesday, April 2, 2008
आवरा...
तर थोडंसं "आवरा" विषयी. साध्या अर्थाने हा शब्द साधारणपणे, "आव्रा" असा भसकन उच्चारतात नि मोकळे होतात. पण ह्या शब्दाची खरी मजा तो "आव'राऽऽ" किंवा "आ'वराऽ" अशा काहीशा उच्चारांमध्ये आहे. म्हणजे थोडा वैतागवाणा 'आ', अगदी जोर देऊन भक्कम उच्चारलेला 'व', आणि जरा हेल काढून म्हटलेला 'रा'. साधारणपणे "पुरे आता", "बास", "अति झालं", "ही व्यक्ती सुटल्या, तीला कुणीतरी थांबवा", "निघा आता", असे अनेक प्रसंगानुरुप अर्थ असलेला हा शब्दप्रयोग पुण्यात उदयास आला आहे, असा एक मतप्रवाह आहे. पण हे अशक्य आहे, असेही काही अशक्य पुणेकर सांगतात. असो. पुणेकर नसल्यामुळे माझ्यावर या गोष्टीवरून चर्चेला तोंड फोडायची कोणतीही नैतिक जबाबदारी नाही. (पुन्हा एकदा एक आतला आवाज: आवरा...)
मी बहुदा निर्बुद्धच निपजलोय, असा एक सार्वत्रिक भ्रम समस्त विश्वाने करून घेतल्याचे काल सकाळपासून दिसून आले. म्हणजे आज इतक्या दिवसांनी सगळी शिरस्त्राणं, उबदार पोशाखांची ओझी न वाहता जाण्याजोगी हवा होती. तर म्हटलं दिवस मजेत जाईल. पण नाही, "एक एप्रिल बरं का आज"...असं अगदी जागोजागी ठसवत होते. सकाळी लोकसत्तेनं "अखेर मुख्यमंत्री बदलले" असा एक माफक प्रयोग करून पाहिला. म्हटलं "बऽर...". माझ्या आठवणीत काही वर्षांपूर्वी मुंबई टाइम्सने सगळ्यांत आधी हा हसावाफसवीचा खेळ केला होता. स्मार्ट मित्राच्या चंट पुरवणीचे बाष्कळ चाळे. (आता राज्यसभेची अधिकृत उमेदवारी मिळाल्यावर या स्मार्ट संपादकांनी ही असली चंट पुरवणी बंद करावी, तसेच वृत्तपत्राचे नावही मराठी पाहिजे म्हणून "महाराष्ट्र काल" (काल म्हणजे काळ, वेळवाला काळ, कालच्या बातम्या वगैरे काही संबंध नाही) असं नामांतर करावं, असा आग्रह सुरु केला आहे, असं ऐकतो. खरं का हो?) त्यानंतर सगळेच ते करताहेत. मध्यंतरी काही दृकश्राव्य माध्यमातील वृत्तवाहिन्यांनीही हा खेळ खेळून पाहिला म्हणतात. पण त्यांच्या एरवीच्या बातम्या नि त्या तसल्या फसव्या बातम्या ह्यांच्यात काहीच फरक न आढळल्यामुळे लोकांना आपण रोजच फसवले जात आहोत, असं वाटू लागलं व TRP कमी झाला. म्हणून तेवढा नाठाळपणा थांबला. पण तसा नाठाळपणा करणारी व थांबवणारी आमचीच वाहिनी पहिली असं मग त्यांनी मिरवून घेतलं. तर एक एप्रिलला फसवू पाहणार्या समस्त पत्रकारांनो, आ'वराऽ!
लोकसत्ता बंद करून जीमेल उघडलं. यंदा काय कर्तव्य पार पाडलंय त्यांनी एक एप्रिल निमित्त ते पाहाण्यासाठी. मागे एकदा एक एप्रिलला ह्या लोकांनी तुमचे सर्व इमेल प्रिंट करून धाडण्याची मोफत सोय आम्ही केली आहे असं सांगितलं. तेव्हा उंचावलेल्या भुवयांनंतरसुद्धा मी दर एक एप्रिलला फसावं अशी ह्यांची समजूत असेल तर त्यांच्या निरागसपणाची कदर केली पाहिजे. यंदा म्हणे काय तर तुमच्या दहा इमेलची वेळ बदलून देऊ. (एक आतला आवाज: बऽर...). त्यानंतर म्हणे काही जण ही सुविधा म्हणताहेत खरे जीमेल वाले, पण अजून सापडत नाहिये इमेल compose करताना, अशी तक्रार करत होते. म्हणजे लोक फूल असतात तर. जीमेलवाले खूश झाले असतील. किती टक्के लोक फसले म्हणजे ही marketing/ advertising/ creative/ किंवा ज्या कुठल्या प्रकारात मोडत असेल त्या प्रकारची कल्पना यशस्वी झाली असं व्यवस्थापन तज्ज्ञ (म्हणजे थोडक्यात जो कुणी उठतो तो) मानतात? (एक कुतूहल.) तर झाली असेल यशस्वी वा नसेल. पण हे लोक एवढ्यावर थांबत नाहीत. ह्यावर एक आख्खं webpage खाणारी माहिती देतात. त्यात एक सूत्र मांडलेलं की दहाच इमेल का, कुठलासा एक paradox शोधून काढलेला नि त्याची wikipedia ची link. आजकाल हे एक बरं झालंय, उठसूठ wikipedia च्या links द्यायच्या. तीन कारणं असावीत. एक - एकदा wikipedia ची link दिली की तुम्ही सुटलात. वर संदर्भ दिल्याची मिजास. दोन - लोक wikipedia ची link उघडून तिकडे गेले की त्यात गुंतून पुन्हा परतत नसावेत. म्हणजे तुम्ही परत सुटलात. तीन - तरीही काही परत आलेच तर त्यांना ज्ञान वाटल्याचं श्रेय मोफत. पण मुळात कशावरून ही wikipedia ची लिंक जे काही बरळते ते तुम्हीच लिहिलं नसेल. तिथे काय कुणीपण कायपण लिहू शकतं. (पुन्हा एकदा एक आतला आवाज : आ'वराऽ...) तर अशी एक wikipedia ची लिंक, अजून बरीच अगम्य माहिती नि आम्ही कित्ती कित्ती हुशार असा आव असलेला मजकूर. म्हणजे ह्या लोकांना सवयच आहे ती. फसवतानासुद्धा शिस्तीत, पद्धतशीरपणे व आपल्या चातुर्याचं प्रदर्शन करून फसवतात. अशा काही साम्राज्यवादी शक्तींच्या वसाहती अमेरिकेच्या पश्चिमकिनारी नांदतात. लोकांना आपल्या अधीन करणे, सतत आपल्या चातुर्याने एकमेकांवर कुरघोड्या करणे, काळ मागे लागल्यासारखे धावत सुटणे व पर्यायाने इतरांना तुम्ही काळाच्या किती मागे आहात असा न्यूनगंड देणे असा ह्या सर्व साम्राज्यवादी शक्तींचा चारकलमी कार्यक्रम आहे. तर एक एप्रिलला फसवण्याचा परवाना असल्यामुळे अधिकृतपणे व एरवी अनधिकृतपणे हसवाफसवीचे खेळ खेळणार्या सर्व पश्चिमेच्या शक्तींनो, आ'वराऽ!
(पुन्हा एकदा एक आतला आवाज: जरा जपून...नाही ब्लाँगपण त्यांचाच आहे.
दुसरा आवाज: असू देत. मग ही ब्लाँगच्या आत्महत्येआधीची चिठ्ठी आहे असं समजा.
पहिला आवाज: बऽर.)
हे सर्व करून एक तास वर्गात बसून आलो. सुदैवाने प्रोफेसरने आवरा म्हणायची वेळ काल आणली नाही. एरवी तो ती वारंवार आणतो. परत lab मध्ये आलो तर दारावर प्रोफेसरच्या नावाने एक चिठ्ठी डकवलेली. "आज lab बंद आहे". निम्मी चिंकी मंडळी आपण ह्या गावचेच नाही अशा नेहमीच्या तंद्रीत होती. उरलेली स्वतःवर उगीच हसत होती. (नेमकं कारण कळू शकलं नाही त्यामुळे हेच असावं). नि माझं त्या अज्ञात संदेशवाहकाला एकच सांगणं होतं, "अरे सद्गृहस्था, जर तुला हा खेळ खेळायचाच होता तर चोरून रात्री भिंतींवर पोस्टर्स लावतात तसं तू ते काल रात्रीच करायला हवं होतंस. किमान सकाळी lab मध्ये आपण शेवटी येणार नाही याची तरी काळजी घ्यायला हवी होतीस. conference साठी परगावी गेलेल्या प्रोफेसरचं नाव तरी खाली टाकायला नको होतंस. नि मुख्य म्हणजे हे सगळं करणं तुला भागच होतं का? तेव्हा भाऊ, आ'वराऽ!"
(पुन्हा एकदा एक आतला आवाज: आता तुम्ही आवरा...) तर एक एप्रिलच्या निमित्ताने दैनंदिन आयुष्यात नाहक नाट्यमयता आणू इच्छिणार्या या केविलवाण्या प्रयत्नांच्या व त्यांच्या कर्त्यांच्या उदाहरणांवरून (आ. आ.: आवरा...) (व्याकरणातला कर्ता नव्हे हं)(आ. आ.: आवरा...) लोकांना आवरतं घेता येत नाही हे आपल्यासारख्या सुज्ञ वाचकास कळले असेलच. ह्या विषयाची तोंडओळख म्हणूनच या लेखाकडे पाहिलं जावं, ह्या विषयावरील समग्र माहितीचे संकलन व त्यानुरूप विवेचन (आ.आ.: आ'वरा...) हे ह्या लेखाच्या सीमित व्याप्तीत बसणं शक्य नाही...(आ.आ.: आ'वराऽ...). ह्या शब्दाचा वारंवार वापर करण्याच्या संधी वारंवार प्राप्त होत असतातच. तर त्या त्या वेळी ह्या शब्दाचा खाजगी अथवा जाहीर वापर करून आपण त्याच्या भाषिक व व्यावहारिक सौंदर्याची व सामर्थ्याची अनुभूती जरूर घ्यावी. (आ.आ.: आ'वराऽऽऽ...). तेव्हा मा. सोनियाताईंचा आदर्श समोर ठेवून आतल्या आवाजाच्या विनंतीस मान देऊन...इत्यलम्!
Monday, March 24, 2008
I think, therefore...
समुद्रात बंदिस्त राहून कंटाळल्यामुळे किनार्यावर येताच जरा वाट सोडून धावत असाव्यात. समुद्राच्या भरती ओहोटीशी एकरूप होऊन किनार्यावर त्या जाणीवा उमटवत असाव्यात. गंगोत्रीत पाझरलेल्या थेंबापासून दक्षिण गंगोत्रीत वितळलेल्या हिमाच्या थेंबापर्यंतचं आपलं सारं अनुभवाचं गाठोडं किनार्यावर सोडत असाव्यात. कधी मधेच आलेल्या खडकावर फुटून उत्स्फुर्तपणे व आर्ततेने किनार्यावर झरत असाव्यात. कधी गर्त्याच्या खोलीचा किनार्याला नेमका अंदाज देत असाव्यात. कधी त्यांच्यातील लयीचं संगीत करत असाव्यात तर कधी त्या लयीवर स्वार होत गुणगुणत पाण्याचे थेंब किनारा गाठत असावेत. किंवा कदाचित कुठल्याशा पृथ्वीवरही नसणार्या चंद्रसूर्यांच्या तालावर नाचत असाव्यात. प्रत्येक वेळी या प्रश्नाचं उत्तर वेगळं असेल. पण हे सगळं सामावून घेणारं एक उत्तर सध्या असं वाटतंय की, ह्या लाटा समुद्राची सगळी ऊर्मी किनार्यावर उधळून देत आहेत, चंद्रसूर्य केवळ निमित्तमात्र.
लिखाणाची ही ऊर्मी नेमकी कशात आहे हे सांगणं कठीण आहे. अनेक गोष्टींची ती एकत्रित परिणती आहे. कधी गाज नसलेला पाऊस ती जागवतो तर कधी भयाण शिशिर. कधी स्वतःची मनःस्थिती एखादी लहर निर्माण करते, किंवा बर्याचदा तीची अव्यक्तता तशी लहर निर्माण करते. कधी एखादी नितांत सुंदर अभिव्यक्ती दाद द्यायला भाग पाडते. कधी कुठल्या क्रौर्याने आलेल्या विषण्णतेवर एखादी लाट फुटत असते. आसपासची राजकीय, सामाजिक परिस्थिती तर नेहमीच लाटा प्रवृत्त करत असते. बर्याचदा यातली एखादी गोष्ट निमित्तमात्र ठरते नि उठणारी लाट जाणीवेत असणारे सर्व विचार पार्श्वभूमीला ठेवते. कधी एक खेळकर ऊर्मी असते, चालीशी, शब्दांशी खेळण्याची. वरवर खेळ, पण बर्याचदा विचारपूर्वक अभिव्यक्ती. निदान उथळ पाण्याचा खळखळाट न करण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न.
मला वाटतं जर एका शब्दात उत्तर द्यायचं असेल की काय आहे म्हणून लिहिणं आहे, तर "विचार" असं मी म्हणेन. अगदी रेने देकार्तेच्या "I think, therefore I am" च्या धर्तीवर "I think, therefore I write" असंही म्हणेन. ते मूळ आहे. मग त्यानुरुप माध्यम. चीड व्यक्त करायला उपहास, थेट मनातलं असेल तर कविता हे सगळं नंतरचं. सर्वांच्या मूळाशी अव्याहत चाललेला विचार. निदान काही जाणवलेलं व्यक्त करण्यापेक्षा त्याचं विश्लेषण करून ते व्यक्त करण्याचा, काही नवीन करण्याचा प्रांजळ प्रयत्न. किनार्यावर उमटलेल्या प्रत्येक लाटेसह विचार प्रगल्भ व्हावेत व लेखन समृद्ध व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे.
हा विचार डोक्यात आणवल्याबद्दल मेघनाचे नि ही लाट निर्माण करायला निमित्त ठरल्याबद्दल राजचे मनापासून आभार.
माझा खो केतनला.
Friday, March 21, 2008
जगता जगता
मेघनाच्या जगता जगता या लेखावर एक प्रतिक्रिया...
जोडलेल्या नाळेवर कुढत काढले दिवस होते, गर्भामध्ये जगता जगता
तोडलेल्या नाळेवर कुढत काढले दिवस होते, विश्वामध्ये जगता जगता
काही नाळ तुटूनही जन्मभर फिरत राहतात, त्या काजळी कोपर्यांकरता
पृथ्वीही त्याचसाठी अव्याहत जाळते इंधन, गाभ्यामध्ये, जगता जगता
दवामधून विखुरणारे रंग कधी पाहत असेल, फुलपाखरू हलकेच उडता
सापडतही असेल कधी सुरवंटाचा रंग त्याचा रंगांमध्ये, जगता जगता
शिखरावर पाझरलेला थेंब व्यर्थ शोधत असेल, संथ नदीही वळता वळता
कोसळताना अवचित तो तुषार होऊन दिसत असेल सार्यांमध्ये, जगता जगता
चुकून कोकिळ स्वर चुकला, फांदीवर नुसताच बसला, आंब्यावरती गाता गाता
सूर आत जुळला होता, कधी कानांवर पडलेला, अंड्यामध्ये जगता जगता
Wednesday, February 20, 2008
कोई कलमा मुहब्बत का दोहराते फरिश्ते हैं
आशुतोष गोवारीकर
चित्रपटासाठी भारताच्या तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भांचा canvas निवडण्याची तुमची ही तिसरी खेप आणि त्या canvas वर चित्रपटाची गोष्ट पार्श्वभूमीच्या आणि गोष्टीच्या बारकाव्यांसह समर्थपणे उभी करण्याचीही. त्यासाठी तुम्हांला तिसरा सलाम !
दिवसेंदिवस अधिकाधिक असहिष्णु होणार्या ह्या समाजमनाला परमतसहिष्णुतेविषयी इतकी कळकळ असणारा एक राजा ह्या देशावर राज्य करून गेला, ही गोष्ट सांगायचं ठरवलंत त्याबद्दलही सलाम. त्या राजाने ही सहिष्णुता एक राजा म्हणून, एक मुलगा म्हणून, एक नेता म्हणून, एक पती म्हणून, एक प्रियकर म्हणून, एक भाऊ म्हणून नि मुख्यत्वे एक माणूस म्हणून कशी जपली, हे दर्शविणार्या तरल अभिव्यक्तीलाही सलाम. ही गोष्ट जितकी अकबराची तितकीच जोधाची (अगदी "जैसे दो सूर हो मध्धम, ना कोई ज्यादा ना कोई कम राग में" इतकी). रयतेच्या हितासाठी प्रजाभिमुख राजाने केलेला व्यवहार, हे भयंकर प्राक्तन स्वाभिमानाने स्वीकारून एका बलाढ्य राजाला नि पर्यायाने राज्यसत्तेला प्रजाभिमुख करणार्या राजपूत युवराज्ञीची कथाही तितक्याच सशक्तपणे उभी केल्याबद्दलही सलाम.
तशा तिन्ही प्रेमकथाच. तिन्ही वेगळ्या. तिन्हींचे भिन्न संदर्भ. पहिल्या दोन्हींत खरं तर प्रेमकथा हा दुय्यम भाग होता, पण तुम्ही तोही अगदी हळुवार टिपला होतात. इथे प्रेमकथा केंद्रस्थानी होती. पण ही प्रेमकथा दोन राज्यसत्तांच्या राजकारणाची परिणती होती. साहजिकच तदनुषंगाने येणारे संदर्भ आणि व्यक्तिमत्त्वाचे पैलू हे प्रेमकथेइतकेच महत्त्वाचे असणार. ज्या व्यक्तींचे वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्य अभिन्न आहे, त्यांची प्रेमकथासुद्धा त्या संदर्भांशिवाय अर्थहीन ठरते. पण बर्याचदा फक्त प्रेमकथेला महत्त्व देण्याचा मोह दिसतो. आपण त्या मोहाला बळी न पडता जोधा व अकबर यांची स्वतंत्र व्यक्तिमत्त्वंही उभी केलीत, त्याबद्दलही सलाम.
सुरुवातीपासून अखेरपर्यंत जोधा व अकबर यांच्यावरचा focus जराही विचलित होऊ दिला नाहीत, हे आवडलं मला. जोधा - अकबराच्या कथेत बिरबलाच्या चातुर्यकथांचा मसाला भरला नाहीत, त्याबद्दल आभार. किती नानाविध माध्यमांतून तुम्ही नि तुमच्या सहकार्यांनी काही ना काही व्यक्त केलंय. म्हणजे माझं त्या सर्वच माध्यमांबद्दलचं ज्ञान अगाध असलं तरी माझ्या सामान्य बुद्धीला जे जे रुचलं ते ते पाहून तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं असं वाटलं. जोधाला परत घेऊन जाण्यासाठी आलेल्या अकबराच्या स्वागताच्या दृश्यात भगवा रंग नुसता भरलाय आसमंतात. याआधी भगवा रंग एवढा आल्हाददायक कुठे पाहिला होता हे आठवावंच लागेल. जलालचं अकबरीकरण होतानाच्या गाण्यात तर रंग नि नृत्याची नजाकत भरली आहे. पण जेव्हा "ख्वाजा मेरे ख्वाजा" म्हणताना हिंदुस्तानचा बादशाह तन मन अर्पून त्यात एकरूप झाला ना तेव्हा त्या नृत्याच्या सादगीतून केवढी मोठी अभिव्यक्ती केलीत तुम्ही. तेव्हाच इतिहासाचे, नि घटनांच्या तपशीलांबद्दलचे फिजूल प्रश्न संपूर्ण निरर्थक झाले. अकबराचं एवढं सुरेख interpretation विरळाच ! त्या गाण्यासारखंच संपूर्ण चित्रपटात राजेशाही डामडौलात जपलेल्या त्या काळाच्या उपजत साधेपणासाठी सलाम.
रहमान, जावेद अख्तर हे तर "प्रतिभा गहाण टाकल्यास जग विकत घेता येईल" या categoryत मोडत असल्यामुळे ती बाजू उत्तमच असण्याची स्वाभाविक अपेक्षा होती. पण ह्या दोघांनी चित्रपटागणिक कलेला अधिक उंचीवर नेण्याची प्रथा इथेही अखंडित ठेवली आहे. लगानमध्ये त्यांनी "मितव्या"ला हाक मारली होती, स्वदेसमध्ये "देख त्यजकर पाप रावण, राम तेरे मन में है" अशी विचारघन वाक्यं सहज फेकली होती. नेहमीच चळवळींची गाणी वाटलीत ती मला. इथे तर म्हणजे थेट भजनापासून सुफी कलामांपर्यंत नि तरल प्रेमगीतांपासून भाटांनी राजाच्या स्तुतीसाठी लिहावं, अशा गीतापर्यंत प्रतिभा नुसती ओसंडून वाहतेय. ज्या प्रतिभेला तुमच्या बहुतांश समकालीनांच्या अगदीच सरधोपट कथांमध्ये वाव मिळणे कठीण आहे, तिची योग्य कदर केल्याबद्दल सलाम. रहमान तर बहुदा पहिल्यांदा वाक्यातले शेवटचे दोन शब्द आणि शब्दातील शेवटची दोन अक्षरं संगीतात दडपून न टाकता (बर्याच अंशी) गायला असेल.
माझ्याबरोबरच्या साधारण वीस पंचवीस लोकांना हा चित्रपट रटाळ वाटला, त्यामुळे हा काही सार्वत्रिक लोकप्रिय नाही. नसू देत. सोळाव्या शतकातल्या दोन राज्यसत्तेंमधल्या राजकारणातून जन्मलेली हळवी प्रेमकथा, त्यातून जन्मलेले एक परिपक्व नातं, त्यातून झालेली सांस्कृतिक देवाणघेवाण व त्याचा संबंधित राज्यसत्तांवर नि व्यक्तिमत्त्वांवर झालेला व्यापक परिणाम, हे सगळं एकविसाव्या शतकासारखं चित्तथरारक, वेगवान वगैरे वगैरे असावं अशी अवाजवी नि अर्थहीन अपेक्षा करणार्यांचा त्यात दोष आहे, तुमचा नाही. सर्व शांतताप्रिय, धर्मनिरपेक्ष भक्तीपंथांत (मग सुफी असो, वारकरी असो वा इतर) असणारा निखळ साधेपणा ज्यांना भावला नाही, ते ख्वाजा मेरे ख्वाजा ह्या गाण्याला हसले असतील. तो त्यांचा प्रश्न आहे, तुमचा नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही जोधा अकबर यशस्वी साकारला आहे आणि एक अजून छान चित्रपट पहायला मिळाल्याचं समाधान दिलं आहे.
जेव्हा बरेचसे इतर लोक अत्यंत थिल्लर चित्रपट खोर्याने काढत आहेत, तेव्हा तुम्ही ही तिसरी सशक्त कलाकृती निर्माण केली आहे. एकंदरीत सर्वत्रच द्वेष, असहिष्णुता यांचेच उदात्तीकरण दिसत असताना आपण आपल्या या तिन्ही चित्रपटांमधून नेहमीच प्रेमाला महत्त्व दिलं आहे, देशप्रेमासकट. मला वाटतं, हा आपल्या वृत्तीचा परिणाम असला पाहिजे. जोधा अकबर हे एक त्याच सर्जनाचं भव्य मूर्त रूप आहे. असे अनेक प्रेमाचे कलमे गाणार्या तुमच्यातल्या फरिश्त्याला सलाम !