Tuesday, August 11, 2009

सोचते और जागते...

उत्कट नाती शोधायची सवय त्याला कधीपासून लागली, हे नेमकं सांगणं कठीण आहे. त्याच्या जडणघडणीच्या बेरजेचं ते उत्तर असावं, अशी एक शक्यता आहे. पूर्वी कधी त्याला उत्कटता शोधत बसावं लागलं नव्हतं. ती एक तर होती किंवा नव्हती. दोन्हींचा नकळत सहज स्वीकार होता. मुळात ही उत्कटतेची भानगडच त्याच्या गावी नव्हती.

हा सगळा झोल केव्हा सुरू झाला, हे आठवून पाहण्यासाठी जेव्हा तो नात्यांचे उगम एक्स्ट्रापोलेट करतो, तेव्हा त्याला "तू कोणाला जवळ येऊच देत नाहीस, तर जीवश्च मैत्र लाभणार कसे?" असं म्हणणारी ती आठवते. त्याला असा परखड प्रश्न विचारणारी ती पहिलीच. त्या वेळचं त्याचं असह्य चपापलेपणही त्याला लख्खं आठवतं. त्याला असं आरस्पानी चव्हाट्यावर उभं करणारी तीच पहिली, नि म्हणून ती त्याची पहिली सख्खी मैत्रीण. तीच त्याच्या कळत्या जाणीवेतली पहिली उत्कट मैत्री.

एकदा अस्तर टराटरा फाटल्यावर त्यानेही मग स्वतःला उधळून दिलं हरेक मैत्रीत. नि कुठलातरी खजिना सापडावा असे जीवाभावाचे मैत्र मिळत गेले. बोलण्यातलं मोजमाप सुटलं. वागण्यातला आखीवपणा संपला. परीघ रुंदावले नि मग त्या विस्तारलेल्या वर्तुळात अनेक परीघ गुंतले. फक्त आपल्यात गुंतलेल्या दुसर्‍या वर्तुळाच्या भागावरच हक्क सांगण्याचं भान ठेवलं त्याने. दोन परस्परभिन्न वर्तुळं गुंतवणंही कटाक्षानं टाळलं. त्यामुळे परीघांचा गुंता टाळता आला त्याला नि उत्कटतेला विश्वासाचा भक्कम पाया लाभला. वास्तविक तेव्हाही हे उत्कटतेचं प्रकरण काही फारसं कुठे वाटेत आलं नव्हतं. त्यासाठी अजून पुढे जावं लागेल.

कुठल्यातरी जिवाभावाच्या एका मित्राला त्यानं नकळत भावासारखं म्हटलं, तिथं आपल्याला थांबावं लागेल. त्यानं हे म्हटलं खरं, अगदी मनापासून. पण त्याच सुमारास त्याला लक्षात येऊ लागलं की काहीतरी बिनसतंय. त्याच्याच चांगुलपणाचं जरतारी कुंपण त्याच्याचभोवती घातलं जातंय हे त्याला कळेपर्यंत फार उशीर झाला होता. ह्या आपण न मागताच घातलेल्या कुंपणात श्वास कोंडू लागला. कुंपणाच्या जरीच्या तारा असहायपणे तोडताना तो वरचेवर रक्तबंबाळ होऊ लागला. त्याच्या ह्या आतल्याआत धुमसण्याने गूढाचं वलय वाढवायला मदतच झाली नि त्यात तो पार अडकला. त्यातून बाहेर पडण्याचे निकराचे प्रयत्न तो करीत राहिला, पण त्याने त्याच्याकडून गुंतवणं टाळलेले परीघ कट केल्यासारखे आपणहून गुंतले नि त्याची तडफड पाहून हास्याचे विखार फेकीत राहिले. जेव्हा काही वर्तुळं आतवर येऊन थेट गाभ्यावर हल्ला करू लागली, तेव्हा तो सावध झाला. आपल्याभोवतीचा जुना कोष तो भराभर पुन्हा निर्माण करू लागला. पण झालं असं की, सगळं तोडता येईना नि पुन्हा जोडण्याची आशा त्याला हार मानू देईना. जिथे खात्री झाली तिथे तो दुहेरी वीण घालत गेला नि जिथे आशा होती तिथे तो टीप घालायला धजेना. मग ह्यातल्या काही उसवलेल्या जागा अशा काही भळाळू लागत की त्या शिवता शिवल्या जात नसत. हे सगळे संभ्रम जेव्हा आ वासून ठाकले, तेव्हा मग कोषाची जाणीवपूर्वक जोडणी नि तोडणी सुरू झाली नि तिथे हा उत्कटतेचा चोखंदळपणा सुरू झाला. चांगल्या सुटसुटीत मैत्रीला भावासारखं वगैरे म्हटलं की मग ते नातं फार आत येऊ न देता अंतर ठेवून मैत्रीशिवायही निभावत रहावं लागतं अशी पक्की खूणगाठ त्याने बांधली नि तेव्हापासून हे असे मित्रांचे भाऊ करणं तो कटाक्षाने टाळत गेला, नि बहुदा तेवढ्या जवळ पोहोचणं नि पोहोचू देणंसुद्धा.

परवा कुठल्याशा ओल्या पार्टीला त्याला आपण एक तर तर्र लोकांच्या नवीन तर्री मारलेल्या त्याच जुन्या विनोदांवर केविलवाणे हसत राहू किंवा अत्यंत रँडम लोकांशी तोंडदेखलं हसत बोलू, एवढ्या दोनच शक्यता दिसत होत्या, म्हणून त्याने चक्क त्याला पकेल हे न येण्याचं कारण सरळ सांगितलं नि विषय संपवला. तर हा त्याच्या दृष्टीने अगदीच क्षुल्लक असणारा विषय वाढवून जेव्हा एक मित्र त्याला "एवढं स्पष्ट बोलणं लोकांना आवडत नाही, तू काहीतरी दुसरं कारण द्यायला हवं होतंस," असं म्हणाला, तेव्हा तो पारच हादरला. "मित्रांशी बोलतानाही?" ह्या त्याच्या जेन्युइन प्रश्नावर पलिकडून "आयुष्य असंच आहे" असं जेव्हा तद्दन भिकार उत्तर आलं, तेव्हा तो पुरता कोसळला. "शोर बड़पा है ख़ाना ए दिल में, कोई दीवार सी गिरी है अभी" हा नासीरचा शेर त्याला तेव्हा कुठे खरा भिडला.

आधी जवळ येऊ द्यायचं की आधी उतू जाऊ द्यायचं, हा गुंता तो नव्याने सोडवताना दिसतो हल्ली कधीकधी. रोज उठून अभिनिवेशशून्य उत्कटता शोधत वणवण करताना तिला ते एका दमात कसं जमलं, ह्याचं कुतूहल त्याला नेहमीच वाटतं. त्यामुळेच कदाचित तो ही रोजची वणवण रोज नव्या आशेने करतो. पायाखालची अंतरं वाढली, तसे हल्ली वरचेवर फोन होत नाहीत त्यांचे. पण जेव्हा होतात अधूनमधून तेव्हा बोलणं न खुंटता मागल्या फोनवरून पुढे अस्खलित सुरू राहतं त्यांचं. नेहमीच. ती, तिचा तो नि त्यांचं प्रेम ह्यांबद्दल ती उत्कटतेने सांगत राहते, नि आपला तो त्याची वणवण फक्त तिलाच त्याच उत्कटतेने सांगत राहतो.

पाऊस पडता पडत नाही, आषाढ सरता सरत नाही
गच्च ढग झरण्यासाठी वणवण फिरत राहतो
पौर्णिमा सरली तरी चातकढग दुष्काळीच
थांबणार कधी? भिजणार कोण?
उत्कटतेने झरवेल कोण?
रात्र रात्र आत आत नेमाने झरत असतो
भार भरता भरत नाही नि ढग झरता झरत नाही.

10 comments:

  1. मस्त लिहिलयस. नात्यांमधली भावनिक गुंतवणूक, त्यातून येणारे अनुभव किती नेमकेपणान मांडलेस. कवितासुद्धा आवडली.

    ReplyDelete
  2. Meghana Bhuskute:

    गोष्ट आवडली. पण -
    मला गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न करताना (इथे ’आटापिटा करताना’ असं वाचलं तरी चालेल.) जे वाटलं ते इथेही जाणवलं. सगळंच्या सगळं या गोष्टीला लागू होणार नाहीही, पण लिहितेच. तूच ठरव, यातलं तुला काय पटतं ते.
    १. मी शेवटाबद्दल प्रचंड गोंधळात असते. शेवट आधी ठरवायचा की नाही? जर आधी ठरवला तर ती इसापनीतीमधली बोधकथा होईल अशी भीती. आणि नाही ठरवला तर ’लिहू कधीतरी’ असं म्हणत म्हणत गोष्ट कल्पान्तापर्यंत पूर्णच न होण्याचा अनुभव.
    २. घटना काय असाव्यात? असाव्यात का? माझ्या गोष्टीत जनरली लोक स्वत:च्या मनोव्यापारांमधे इतके अडकलेले असतात, की मेजर घटना त्याच्याशीच निगडीत असतात (म्हणजे सोप्या मराठीत घटना नसतातच असं म्हटलं तरी चालेल.). अशा वेळी गोष्टीत काही घडतंय की नाही, की जीए म्हणतात तसं आपल्याच पिंढरीवर नखानं गिरगुट्या काढून त्यात विश्वरूप पाहण्याचा फोल प्रयत्न चाललाय हे काही केल्या ठरवता येत नाही.
    ३. लिहिता लिहिता मधेच येणारा कंटाळा आणि त्यामुळे गोष्टीचा अकाली गळा घोटून टाकणे. (आणि मग आपण फापटपसारा टाळून अत्यंत नेमकं लिहितो त्यामुळे असं होतं अशी स्वत:ची समजूत काढणे.)
    तुलाही असं होतं का गोष्ट लिहिताना?
    (आवडलेल्या गोष्टीवर इतकी भीषण प्रतिक्रिया लिहिणं क्रूरपणाचंच. पण कण्टेण्ट आवडण्याबरोबरच सहानुभूती दाखवण्याचा मोहही आवरला नाही, म्हणून. माफी असावी... :) )

    ReplyDelete
  3. भावलं. सुरवात मनापासून झालेली, मध्यही जीव धरून होता....नंतर बहुतेक तू( अरेतुरे करतेय....चालेल हे गृहीत धरून ) स्वत:च कोषात मिटून गेल्यासारखं झालंय.तरीही मला आवडलं.
    मैत्रीत नात्याला नाव द्यायची वेळ येते तिथेच तिच्यातला जीव गुदमरायला सुरवात होते असे मला नेहमीच वाटत आलेय.

    ReplyDelete
  4. स्फुट आवडले. :)

    ReplyDelete
  5. सर्वांना धन्यवाद!

    अपर्णा, तुझी पहिल्यांदाच प्रतिक्रिया असावी ही. तुझं ब्लॉगवर स्वागत!

    भानस, तुमचंही स्वागत. अरे,तूरे,कारे अर्थात चालेल! नेमकं कुठे फसलं तुमच्या दृष्टीने ते नीटसं नाही कळलं. पण आवडलं हे वाचून बरं वाटलं. बाय द वे, तुमचं हे खरं नाव आहे की टोपणनाव?

    राज, पुष्कळ दिवसांनी आलास. बरं वाटलं. तुझा हात का थंडावलाय सध्या?

    मेघना, आपलं झालं ह्यावर बोलणं. इथे काय परत लिहित नाही. माफी वगैरे...*&^%

    ReplyDelete
  6. Too good! bass baaki bolt naahi ithe..

    ReplyDelete
  7. Poem khupach chhan aahe. Nice alliteration, very flowing, and very deep !

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. "हे सगळे संभ्रम जेव्हा आ वासून ठाकले, तेव्हा मग कोषाची जाणीवपूर्वक जोडणी नि तोडणी सुरू झाली नि तिथे हा उत्कटतेचा चोखंदळपणा सुरू झाला."

    :)
    I could co-relate with some of the events...

    ReplyDelete