Friday, January 30, 2009

सदूचा २६ जानेवारी

२६ जानेवारीची सुट्टी म्हणून सदू अंमळ आरामातच उठला. वीकांताला जोडून सुट्टी आली तरी त्याने यंदा काहीच प्ल॓न केला नव्हता. कुणी म्हणे रेल्वे हेच अतिरेक्यांचं लक्ष्य आहे, तर कुणी म्हणे महत्त्वाची पर्यटन स्थळं. कुणी विमानतळांचही नाव घेई. पण त्यातून फिरायचा सदूने कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे यंदा संक्रांत कोणावर येणार ह्याची वाट पाहत सदू बसला होता. त्याला असं प्रामाणिकपणे वाटत होतं की ह्या अतिरेकी हल्ल्यांच्या सूचना थोड्या दिवसांनी सगळं आलबेल म्हणून काढून घेतल्या जातील. इथल्या व्यवस्था त्याला येथपुढे ह्या ना त्या कारणावरून घाबरवित राहणार, असं काही त्याला सुचण्याची सुतराम शक्यता नव्हती. सदू तसा भाबडा मनुष्य आहे. साधारण कधीपर्यंत संक्रात येण्यापासून सावध रहायला हवं, ह्याचं उत्तर त्याने हळदीकुंकवांचं लॉजिक वापरून "रथसप्तमीपर्यंत" असं स्वतःशी ठरवलं होतं. शिवाय यंदा विलासरावही नव्हते. त्यांच्यावर यंदा संक्रांत रेट्रोअ॓क्टिवली आली होती. शासकीय व प्रतिशब्दवाल्यांच्या मराठीत ह्याला पूर्वलक्ष्यी प्रभावाने असं म्हणण्याची प्रथा आहे. त्यामुळे संक्रातीचा ताजा कोटा बाकी होता. वर काही च्यानेलं २६ ला अमावस्या आहे नि त्यातही सूर्यग्रहण असा भर पौषात उल्हसित होऊन शिमगा करीत होती. म्हणून विषाची परीक्षा नको म्हणून सदूने घरीच रहायचं ठरवलं.

सकाळी वर्तमानपत्रं हातात घेऊन तो पद्म पुरस्कारांची यादी वाचू लागला. नावं माहित असोत, नसोत, पण सदू ही यादी न चुकता वाचतो. ती यादी वाचताना तो एकदम कोसळलाच. चहाचा कप त्याने सावरला म्हणून नाही तर, शिमग्याच्या जोडीला रंगपंचमीही झाली असती. सदूने लागलीच गल्लीसुंदरी होऊ पाहणार्‍या आपल्या मुलीला प्रोत्साहन देऊन स्पर्धेत भाग घ्यायला लावला. हे असं अचानक कसं झालं, ह्या विचाराने मुलीला चहाच्या पहिल्या घोटातच ठसका लागला. "चाळीच्या गणेशोत्सवाच्या नाटकातसुद्धा तुला कुणी घेणार नाही," असं आपल्या मुलाला म्हणणारा सदू त्याला चक्क "तू फिल्ममध्ये का नाही करीअर करीत?" असं विचारू लागला, तेव्हा त्याच्या मुलाचा चेहरा भारतभूषणहून भावशून्य झाला. ऐश्वर्या राय व अक्षय कुमार हे तुमचे आदर्श असले पाहिजेत, असं त्यानं मुलांना समजावून सांगितलं व तो कृतार्थ भावनेने प्रजासत्ताक सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहू लागला. अनेक च्यानलवाले तो सोहळा थेट दाखविताना आपला मसाला कशास भरीत होते, हे काही त्यास उमगेना. रविवारी फारच मसालेदार जेवण झालेलं असावं असा त्याने एक अंदाज बांधला व तो निमूट पाहू लागला. सदू लाल किल्ल्यावर राष्ट्रगीत सुरू झालं, तरी घरात सीधा उभा राहणारा साधासीधा माणूस आहे. त्यामुळे त्यानं तो सोहळा अतिशय तन्मयतेने पाहिला. करकरे, कामटे, ओंबळे वगैरे नावं ऐकली तेव्हा त्याला दोन महिन्यांपूर्वीच्या आठवणीने गहिवरून आलं. त्यानं "आज गोडधोड करायचं नाही घरात" असं फर्मान सोडून दिलं. प्रजासत्ताक दिनाचं त्याला रीतसर स्फुरण चढलं होतं.

दुपारची जेवणं झाली नि सदू प्रजासत्ताकाच्या स्फुरणातच वामकुक्षी काढण्यासाठी पडला. पण त्याच्या डोक्यात मात्र सकाळचंच चालू होतं. इशारा, धोका, पिवळा रंग, केशरी रंग, लाल रंग असे रंगीत धोके त्याला दिसू लागले, आज तारीख २६ असं त्याला वारंवार कुणीतरी बजावतंय, असे भास होऊ लागले. आपल्याच घरात सुट्टीच्या दिवशी दुपारी भयंकर स्वप्नं पडू लागली तेव्हा सदू हैराण झाला. उठून तो एक चक्कर मारून येतो असं म्हणून बाहेर पडला. त्याने पाऊल बाहेर टाकायच्या आधी त्याच्या बायकोने देव पाण्यात ठेवले. सदू निमूट बाहेर पडला. चौकाचौकात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारे फलक झळकत होते. सकाळचे झेंडे पडून पायतळी लोळत पडले होते. लोक लगबगीने कुठेतरी जात होते. सुट्टीचे म्हणून असतील जात भटकायला असं सदूला वाटलं. तर ते सगळे मॉलमध्ये विंडो शॉपिंग करण्यासाठी जात होते. म्हणजे ती महत्त्वाची पर्यटन स्थळं म्हणजे मॉल असं सदूला लक्षात आलं. तेव्हा आपल्याला त्यांच्यापासून भ्यायचं कारण नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याचा जीव जरा भांड्यात पडला. जरा मोकळी हवा खाल्ल्यावर त्यालाही बरं वाटू लागलं. नि हवेपासून धोका आहे असं कुणी अद्याप सांगितलं नसल्याचं त्याला आठवलं. तो मनोमन प्रसन्न झाला. त्या धुंदीत तो इतका सुखावला, की थेट रात्रीच घरी परतला.

एवाना बायकोने उत्साहाला आवर घालून देव बाहेर काढून ठेवले होते. झोपताना प्रसन्न चित्ताने झोपावं म्हणून त्याने त्याचा सर्वांत आवडता गाण्याचा कार्यक्रम लावला. ह्या निखळ आनंदाने त्याला गेले काही महिने भुरळ घातली होती. सूर तेच होते, पण आज तिथेही वेगळाच नूर होता. कुठल्याशा हिंदू राष्ट्राचा प्रजासत्ताक दिन ते साजरा करीत होते. एक आजोबा मधाळ भाषेत बोलत होते. पण जे काही ते बोलत होते ते मधाळ होतं की जहरी, हे काही सदूच्या अल्पमतीस कळेना. लहान लहान मुलं जिवाच्या आकांताने "आर्यांच्या राज्यावर म्लेच्छांचा घाला" असं काहीतरी गाऊ लागली, तेव्हा सदू गांगरला. त्याने मुलांना आत पाठवलं. प्रजासत्ताक दिन म्हणून "हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा" असं गाणं लागल्यावर सदूचा चेहरा पडला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य नव्हे तर राजेशाही असते, हे आपल्याला कधीच कसं कळलं नाही ह्या विचाराने त्याला अपार खिन्नता आली. त्याने दिवसभर जपलेल्या लोकशाही प्रजासत्ताकाविषयीच्या अभिमानाचा असा चक्काचूर होताना त्याला पाहवेना. त्याला अन्न गेलं नाही. त्याने नाही म्हणताच बायकोने पटापटा लवकरच जेवणं उरकून घेतली. आवरता आवरता "आज कसं शांतचित्ताने असंभव पाहता येईल" असं ती म्हणत होती. सदू असंभव पाहत नाही. त्याला गीतेचा दुसरा अध्याय तो खूप मोठा आहे, म्हणून शाळेपासूनच आवडत नाही. तिथे आत्मे कपड्यांसारखी शरीरं बदलू लागले की तो मुकाट कपडे बदलून झोपून जातो. पण आज त्याला काय संभव, काय असंभव तेही कळेना. म्हणून तो असंभवसुद्धा निमूट पाहू लागला. त्याचबरोबर त्याच्यावर लादण्यात आलेली यदृच्छा भीती पुन्हा एकदा चौफेर दाटून आली. त्यात दाखवितात ते संभव की असंभव, ह्या विचाराने तर तो पुन्हा गोंधळून गेला. घरच्या लोकांपासूनही आता सावध रहायला हवं असं काहीसं त्याला एका अज्ञात क्षणी वाटलं नि त्याचं उसनं अवसान पुन्हा एकदा गळून पडलं. त्याच्या डोक्यात एकच गाणं त्याला रूढार्थाने झोप लागेपर्यंत घोळत राहिलं..."मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई, ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई".

8 comments:

  1. Ata Sadu nehmi asach bhit bhit aayushya kadhnar ka?

    ReplyDelete
  2. तिथे आत्मे कपड्यांसारखी शरीरं बदलू लागले की तो मुकाट कपडे बदलून झोपून जातो.
    :)

    ReplyDelete
  3. कसलं लिहीलस रे, धड हसता ही येत नाहीए. पण सगळ्यांची अवस्था अशीच होती.

    तुझाच
    सदु

    बालगीतांच्या कार्यक्रमावरची तुझी कॉमेन्ट आणि आजच्या लोकसत्तात नाडकर्ण्यांचं पत्र एकदम डिट्टॊ सेम. कहीं तुम वो तो नही? पण मला त्या कार्यक्रमात फार गैर नाही वाटलं. शत्रुपक्षाच्या व्याख्या धर्माशी निगडीत होत्याच तर त्याला काय करणार? समाजवाद असा काही नसतो अरे. दरवेळी गांधी आणि बाबाच्या आरत्या गायल्याकीच समाजवादीपण सिद्ध होतं असं नाही.

    जाता, जाता. मी हा विकांत शब्द हल्ली बरयाच वेळा वाचला. नाही पटला. Xकांत यात एका भयाची, शोकाची छाया आहे असं मला वाटतं. अर्थात मी काही भाषा तज्ञ नाही. त्यामुळे चुभुदेघे

    ReplyDelete
  4. संवेद,

    तू म्हटलास म्हणून मी लगेच जाऊन ते पत्र वाचलं. नि खरंच मला त्यातलं एकूण एक वाक्य माझ्या जिभेवरचं वाटलं. कमलाकर नाडकर्णी ह्यांना अनेकानेक धन्यवाद!!! मी तो कसा असेन? काहीतरीच आपलं!

    तू जे म्हणतो आहेस, त्यावर त्या पत्रात लिहिलेलं वाक्य नि वाक्य उत्तर म्हणून पुरेस ठरावं. मुद्दा सावरकरवादाच्या योग्यायोग्यतेचा, शिवछत्रपतींच्या स्वराज्यामागे धार्मिक प्रेरणा असण्याचा-नसण्याचा, ती गाणी कविता गाणी म्हणून आपापल्या परीने बरीवाईट असण्याचा-नसण्याचा नाहीच. प्रजासत्ताक दिनाचं निमित्त करून काहीतरी ओढूनताणून बादरायण संबंध जुळवून नाडकर्णींच्या भाषेत नथीतून तीर मारण्याचा हास्यास्पद प्रयत्न का, कशासाठी हा आहे. शिवाय त्यांतली अनेक विधान जी नाडकर्णींनी पत्रात लिहिली आहेत, ती मला ऐकता क्षणीच खटकली होती. नि सगळी चर्चा कितपत प्रजासत्ताकाच्या कल्पनेशी सुसंगत होती हे तपासून पहावंच लागेल.

    क्रांतीचा जयजयकार चाल बदलून गर्जला नाहीच, हे मी मला नाही आवडली चाल, इथवर सोडून दिलं, नाडकर्णींनी तेही जाहीरपणे मांडलं त्याबद्दल पुन्हा त्यांचे आभार.

    नि वीकांत हा वीकेंड चं एक गोंडस खोडसाळ मराठीकरण आहे. सप्ताहांत असं मराठीकरण करता येईल. पण तुला कांत का बरं खटकतोय? मुळात तो वीक + अंत आहे. नि कांत तर लक्ष्मीकांत, रमाकांत असा वापरतात. तुझ्या डोक्यात चुकून माकून "क्लांत" किंवा "क्रांत" आहे का? मला नाही कळलं नेमकं.

    ReplyDelete
  5. प्रामाणीकपणे सांगू तर ... एकदम बाऊंसर गेले! काहीतरी मीस् केलेय मी, हे नक्की.

    ReplyDelete
  6. कसलं लिहीलस रे, धड हसता ही येत नाहीए. पण सगळ्यांची अवस्था अशीच होती.

    Samved mhanalyapramanech zalay!

    ReplyDelete
  7. @आनंद,

    कुणास ठाऊक? आहे ते बदलण्याची सदूच्यात कितपत इच्छा आहे, त्यावर ते अवलंबून आहे.

    @राज, क्षिप्रा, जास्वंदी,

    धन्यवाद!

    @संग्राम,

    काही इकडचे तिकडचे संदर्भ, सोडून दे! :)

    ReplyDelete