प्रति
आशुतोष गोवारीकर
चित्रपटासाठी भारताच्या तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भांचा canvas निवडण्याची तुमची ही तिसरी खेप आणि त्या canvas वर चित्रपटाची गोष्ट पार्श्वभूमीच्या आणि गोष्टीच्या बारकाव्यांसह समर्थपणे उभी करण्याचीही. त्यासाठी तुम्हांला तिसरा सलाम !
दिवसेंदिवस अधिकाधिक असहिष्णु होणार्या ह्या समाजमनाला परमतसहिष्णुतेविषयी इतकी कळकळ असणारा एक राजा ह्या देशावर राज्य करून गेला, ही गोष्ट सांगायचं ठरवलंत त्याबद्दलही सलाम. त्या राजाने ही सहिष्णुता एक राजा म्हणून, एक मुलगा म्हणून, एक नेता म्हणून, एक पती म्हणून, एक प्रियकर म्हणून, एक भाऊ म्हणून नि मुख्यत्वे एक माणूस म्हणून कशी जपली, हे दर्शविणार्या तरल अभिव्यक्तीलाही सलाम. ही गोष्ट जितकी अकबराची तितकीच जोधाची (अगदी "जैसे दो सूर हो मध्धम, ना कोई ज्यादा ना कोई कम राग में" इतकी). रयतेच्या हितासाठी प्रजाभिमुख राजाने केलेला व्यवहार, हे भयंकर प्राक्तन स्वाभिमानाने स्वीकारून एका बलाढ्य राजाला नि पर्यायाने राज्यसत्तेला प्रजाभिमुख करणार्या राजपूत युवराज्ञीची कथाही तितक्याच सशक्तपणे उभी केल्याबद्दलही सलाम.
तशा तिन्ही प्रेमकथाच. तिन्ही वेगळ्या. तिन्हींचे भिन्न संदर्भ. पहिल्या दोन्हींत खरं तर प्रेमकथा हा दुय्यम भाग होता, पण तुम्ही तोही अगदी हळुवार टिपला होतात. इथे प्रेमकथा केंद्रस्थानी होती. पण ही प्रेमकथा दोन राज्यसत्तांच्या राजकारणाची परिणती होती. साहजिकच तदनुषंगाने येणारे संदर्भ आणि व्यक्तिमत्त्वाचे पैलू हे प्रेमकथेइतकेच महत्त्वाचे असणार. ज्या व्यक्तींचे वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्य अभिन्न आहे, त्यांची प्रेमकथासुद्धा त्या संदर्भांशिवाय अर्थहीन ठरते. पण बर्याचदा फक्त प्रेमकथेला महत्त्व देण्याचा मोह दिसतो. आपण त्या मोहाला बळी न पडता जोधा व अकबर यांची स्वतंत्र व्यक्तिमत्त्वंही उभी केलीत, त्याबद्दलही सलाम.
सुरुवातीपासून अखेरपर्यंत जोधा व अकबर यांच्यावरचा focus जराही विचलित होऊ दिला नाहीत, हे आवडलं मला. जोधा - अकबराच्या कथेत बिरबलाच्या चातुर्यकथांचा मसाला भरला नाहीत, त्याबद्दल आभार. किती नानाविध माध्यमांतून तुम्ही नि तुमच्या सहकार्यांनी काही ना काही व्यक्त केलंय. म्हणजे माझं त्या सर्वच माध्यमांबद्दलचं ज्ञान अगाध असलं तरी माझ्या सामान्य बुद्धीला जे जे रुचलं ते ते पाहून तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं असं वाटलं. जोधाला परत घेऊन जाण्यासाठी आलेल्या अकबराच्या स्वागताच्या दृश्यात भगवा रंग नुसता भरलाय आसमंतात. याआधी भगवा रंग एवढा आल्हाददायक कुठे पाहिला होता हे आठवावंच लागेल. जलालचं अकबरीकरण होतानाच्या गाण्यात तर रंग नि नृत्याची नजाकत भरली आहे. पण जेव्हा "ख्वाजा मेरे ख्वाजा" म्हणताना हिंदुस्तानचा बादशाह तन मन अर्पून त्यात एकरूप झाला ना तेव्हा त्या नृत्याच्या सादगीतून केवढी मोठी अभिव्यक्ती केलीत तुम्ही. तेव्हाच इतिहासाचे, नि घटनांच्या तपशीलांबद्दलचे फिजूल प्रश्न संपूर्ण निरर्थक झाले. अकबराचं एवढं सुरेख interpretation विरळाच ! त्या गाण्यासारखंच संपूर्ण चित्रपटात राजेशाही डामडौलात जपलेल्या त्या काळाच्या उपजत साधेपणासाठी सलाम.
रहमान, जावेद अख्तर हे तर "प्रतिभा गहाण टाकल्यास जग विकत घेता येईल" या categoryत मोडत असल्यामुळे ती बाजू उत्तमच असण्याची स्वाभाविक अपेक्षा होती. पण ह्या दोघांनी चित्रपटागणिक कलेला अधिक उंचीवर नेण्याची प्रथा इथेही अखंडित ठेवली आहे. लगानमध्ये त्यांनी "मितव्या"ला हाक मारली होती, स्वदेसमध्ये "देख त्यजकर पाप रावण, राम तेरे मन में है" अशी विचारघन वाक्यं सहज फेकली होती. नेहमीच चळवळींची गाणी वाटलीत ती मला. इथे तर म्हणजे थेट भजनापासून सुफी कलामांपर्यंत नि तरल प्रेमगीतांपासून भाटांनी राजाच्या स्तुतीसाठी लिहावं, अशा गीतापर्यंत प्रतिभा नुसती ओसंडून वाहतेय. ज्या प्रतिभेला तुमच्या बहुतांश समकालीनांच्या अगदीच सरधोपट कथांमध्ये वाव मिळणे कठीण आहे, तिची योग्य कदर केल्याबद्दल सलाम. रहमान तर बहुदा पहिल्यांदा वाक्यातले शेवटचे दोन शब्द आणि शब्दातील शेवटची दोन अक्षरं संगीतात दडपून न टाकता (बर्याच अंशी) गायला असेल.
माझ्याबरोबरच्या साधारण वीस पंचवीस लोकांना हा चित्रपट रटाळ वाटला, त्यामुळे हा काही सार्वत्रिक लोकप्रिय नाही. नसू देत. सोळाव्या शतकातल्या दोन राज्यसत्तेंमधल्या राजकारणातून जन्मलेली हळवी प्रेमकथा, त्यातून जन्मलेले एक परिपक्व नातं, त्यातून झालेली सांस्कृतिक देवाणघेवाण व त्याचा संबंधित राज्यसत्तांवर नि व्यक्तिमत्त्वांवर झालेला व्यापक परिणाम, हे सगळं एकविसाव्या शतकासारखं चित्तथरारक, वेगवान वगैरे वगैरे असावं अशी अवाजवी नि अर्थहीन अपेक्षा करणार्यांचा त्यात दोष आहे, तुमचा नाही. सर्व शांतताप्रिय, धर्मनिरपेक्ष भक्तीपंथांत (मग सुफी असो, वारकरी असो वा इतर) असणारा निखळ साधेपणा ज्यांना भावला नाही, ते ख्वाजा मेरे ख्वाजा ह्या गाण्याला हसले असतील. तो त्यांचा प्रश्न आहे, तुमचा नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही जोधा अकबर यशस्वी साकारला आहे आणि एक अजून छान चित्रपट पहायला मिळाल्याचं समाधान दिलं आहे.
जेव्हा बरेचसे इतर लोक अत्यंत थिल्लर चित्रपट खोर्याने काढत आहेत, तेव्हा तुम्ही ही तिसरी सशक्त कलाकृती निर्माण केली आहे. एकंदरीत सर्वत्रच द्वेष, असहिष्णुता यांचेच उदात्तीकरण दिसत असताना आपण आपल्या या तिन्ही चित्रपटांमधून नेहमीच प्रेमाला महत्त्व दिलं आहे, देशप्रेमासकट. मला वाटतं, हा आपल्या वृत्तीचा परिणाम असला पाहिजे. जोधा अकबर हे एक त्याच सर्जनाचं भव्य मूर्त रूप आहे. असे अनेक प्रेमाचे कलमे गाणार्या तुमच्यातल्या फरिश्त्याला सलाम !