Thursday, October 14, 2010

तू असशील कुठेतरी

तू असशील कुठेतरी
असं धरून चालणं आवश्यक आहे मला
तुझ्या असण्यामुळेच
असं घरून निघणं रोज शक्य आहे मला

तुझे आकार, उकार आणि हुंकार
मला हवे तसे मी केव्हाच गृहित धरले आहेत
तुझ्या अस्तित्त्वाचे मूर्तिमंत नकार
मला नकोसे म्हणून मी नेहमीच नाकारले आहेत

स्पर्शांचे शब्द, डोळ्यांचे वाक्प्रचार, मौनाच्या म्हणी
ह्यांनी निर्माण होणारी भाषा तुलाही कळायलाच हवी
तिला अक्षररूप देऊन रचलेली ही उपासनेची वाणी,
अन्योक्ती तर अन्योक्ती, पण तुला कळायलाच हवी

तुझ्या असण्याचा प्रश्न
हा आता तुझ्या अस्तित्त्वाचा उरला नाही
माझ्या श्रद्धेच्या पुष्टीसाठी
तुझ्या असण्यावाचून पर्याय आता उरला नाही

तुझ्या सगुण-निर्गुण रूपांवर, नामांवर
जीव ओवाळून टाकताना पाहिलंय मी
तू भेटत नाहीस म्हणून बाजारात उतरून
तुला भेटवून घेताना पाहिलंय मी

माझं तुझ्यावर प्रेम आहे
असं मी तुला म्हणणार आहे
आणि खरोखरीच तुझ्यावरच
माझं प्रेम असणार आहे

तुला भक्त हवा असेल
तर लक्षात घे, मी तुला शोधतच नाहीये
मैत्रीचं म्हणत असशील
तर सख्याचा एक याचक बेट होऊन उभा आहे

भेटशील तू कधीतरी
म्हणून मी जिवंत आहे
अन्यथा माझ्या बेटाचा
बेट हाच अंत आहे

9 comments:

  1. माझं तुझ्यावर प्रेम आहे
    असं मी तुला म्हणणार आहे
    आणि खरोखरीच तुझ्यावरच
    माझं प्रेम असणार आहे

    खतरनाक. यातला उपरोध आणि हताशा आणि अपरिहार्यता निव्वळ खलास आहे.
    कुसुमाग्रजांच्या आणि संदीपच्या समांतर कवितांची आठवण आलीच. पण ही कविता तितकीच नाहिये...

    ReplyDelete
  2. Hahahahahahahahaha.

    (आई शपत - ईमानदारीत सांगतो आणखी काहीच सुचत नाहिये प्रतिक्रिया म्हणुन).

    ReplyDelete
  3. मेघना,

    आभार.

    अभिजित,

    तुझी प्रतिक्रिया दिलखुलास आहे हे उत्तम. पण दिलाचा नेमका होरा कळेना ब्वा. नेमक्या कुठल्या नशीवर बोट ठेवलं मी म्हणून एवढं लख्ख हसलास?

    ReplyDelete
  4. तुझ्या असण्याचा प्रश्न
    हा आता तुझ्या अस्तित्त्वाचा उरला नाही
    माझ्या श्रद्धेच्या पुष्टीसाठी
    तुझ्या असण्यावाचून पर्याय आता उरला नाही

    मस्तच!

    ReplyDelete
  5. तपस्या, मेघना, धन्यवाद.

    ReplyDelete
  6. अरे मस्तच.
    माझा गूगल रीडर गंडला होता त्यामुळे बर्‍याच अनरेड पोस्ट रेड म्हणून मार्क झाल्या, त्यात हे सुटले बहुधा.

    तुझ्या असण्याचा प्रश्न
    हा आता तुझ्या अस्तित्त्वाचा उरला नाही
    इथे गालिब आठवला
    जब की तुझ बिन कोई नही मौजूद
    फिर ये हंगामा ऐ खुदा क्या है

    ReplyDelete
  7. राज,

    धन्यवाद. ‘गालिब आठवला’, एवढ्यानेच मी रीतसर हुरळून गेलो! :-)

    ReplyDelete
  8. अप्रतीम!तुम्हीं कविता खरच जगता,असे वाटते आहे.
    छानच आहे कविता.ती नसताना ह्या कवितेतून तिच्याशी केलेला एक संवाद.कवीची सकारात्मक वृत्ती आवडली.
    ह्यातले नेमके भाव मी पूर्ण समजू शकते आहे.कधी कधी एखादी कविता तुम्हाला काही सांगून जाते तसच हि कविता काही सांगून जाते आहे.... :)

    ReplyDelete