Saturday, December 27, 2008

उरलं‍-सुरलं

ती रोजच्याच नेमाने
क्षितिजावर उमटे रेघ
विरघळते बरेच काही
मज दिसतो केवळ मेघ

सनातन काळोख येतो
घेऊन नवा कल्लोळ
अन त्याची नांदी गाते
पक्ष्यांची भ्याली ओळ

त्या तसल्या भयाण काळी
मज नसते कसले भान
किंवा सवयीने बहुदा
मज जमेल तसली तान

सवयीने सगळे जमते
साहणे त्रास तर खास
जगण्याला विटलेलाही
सवयीने घेतो श्वास

समजावतो मीच मजला
ना अजून झाली रात्र
क्षितिजाचे अजून आहे
तेजाने फुलले गात्र

सवयीने हल्ली मीही
आळवतो सुरेल यमन
काळोख जसा नित्याचा
तेजःकण तसेच गहन

ना ग्रहणाची धास्ती वा
चंद्राचा पोकळ मोह
पण मजला अवकाशाचा
आवडतो वास्तव डोह

मग रोजच्याच नेमाने
क्षितिजावर उमटे रेष
जे विरघळते ते त्याचे,
माझे जे उरते शेष

ते उरलेसुरले काही
हळुवार घालते साद
क्षितिजाचे बंधन तुटुनी
समईची येते याद

10 comments:

  1. नव्या वर्षाच्या शुभेच्छा! छान झालीय कविता

    ReplyDelete
  2. फार सुरेख ओघ आहे कवितेचा नेहमीसारखाच.
    पण 'चंद्राचा पोकळ मोह...'? का रे?

    ReplyDelete
  3. Apratim!

    जे विरघळते ते त्याचे,
    माझे जे उरते शेष
    - kya baat hai!

    ReplyDelete
  4. Khoop Chhan

    Kavita equation sarakhi asate. Everytime when you read tells something new.

    Madhavi

    ReplyDelete
  5. जे विरघळते ते त्याचे,
    माझे जे उरते शेष

    sahi

    ReplyDelete
  6. @ यशोधरा, सुमेधा, आनंद, संवेद, मेघना, नंदन, माधवी, क्षिप्रा,

    धन्यवाद!!

    @ मेघना,

    चंद्राचा पोकळ मोहः नेमकं कसं सांगायचं माहित नाही. पण हा चंद्र भासमान सौंदर्याचं नि तेजाचं प्रतीक आहे, नि त्याचं पराकोटीचं आकर्षण व उदात्तीकरण टाळण्याचा प्रयत्न!

    ReplyDelete
  7. सवयीने सगळे जमते
    साहणे त्रास तर खास
    जगण्याला विटलेलाही
    सवयीने घेतो श्वास

    Wonderful!!

    ReplyDelete