मेघना टँग केल्याबद्दल धन्यवाद. इथे अमेरिकेत माझ्या हातात दोनतीनच पुस्तके आहेत, त्यामुळे तेवढेच पर्याय आहेत...शिवाय मी कुणाला खो द्यावा हा प्रश्नच आहे. पण धावत राहतो कुणाला खो देईपर्यंत...
........................................................................................................................................................................
........................................................................................................................................................................
"परमेश्वराचे स्वरूपच मुळी ज्ञान, असे भारतीय संस्कृतीत सांगितले आहे. परमेश्वराची, ब्रह्माची व्याख्या काय? "ज्ञानम् ब्रह्म" - ज्ञान म्हणजे ब्रह्म. ज्ञान म्हणजेच परमेश्वर. ईश्वराची याहून थोर व्याख्या जगाला कोणी दिली नाही. ईश्वराची उपासना करणे म्हणजे ज्ञानाची उपासना करणे, ज्ञानाची उपासना अनंत रूपांनी करणे। समाजशास्त्र असो, खगोलशास्त्र असो, भूगोल असो, इतिहास असो, आयुर्वेद असो, तत्त्वज्ञान असो, योग असो, कर्मयोग असो, गणित असो, संगीत असो, ती ती ज्ञानस्वरूप परमेश्वराचीच पूजा होय. एकाच ज्ञानसूर्याचे हे अनंत किरण आहेत. महाभारतातील श्लोकांइतकीच गणितातील प्रमेयेही पूज्य आहेत. श्रुति-स्मृतींच्या अभ्यासाइतकेच सृष्टिशास्त्राचे अध्ययन पवित्र आहे. सनातन धर्मातील ही थोर दृष्टी आपण पुन्हा उचलली पाहिजे. भारतीय संस्कृती तरच पुन्हा नवतेजाने नटेल. आज संस्कृतिरक्षणाच्या चळवळी होत आहेत. नवीन विचारांचे वारे येऊ नयेत म्हणून सनातनी नावाची मंडळे किल्ले-कोट बांधू पाहात आहेत. परंतु हे संस्कृतिरक्षक नसून संस्कृतिभक्षक आहेत. भारतीय संस्कृतीचे मढे ते कवटाळू पाहत आहेत व आतील प्राण गुदमरवीत आहेत. हे सनातनी नसून अ-सनातनी आहेत.
सनातन या शब्दाचा अर्थच काय? "सनातनो नित्य नूतनः|" जे नेहमी नवीन नवीन स्वरूप प्रकट करील तेच टिकेल. ज्या झाडाला नवीन पालवी फुटेनाशी झाली, ते झाड मरणार असे समजावे. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर म्हणतातः
"हे नित्यनूतन देखिजे| गीतातत्त्व||"
गीतेतील शब्दांचे अर्थ निरनिराळे दिसू लागतील. कारण त्या शब्दांकडे आज विसाव्या शतकातील परिस्थितीतून आपण पाहणार. अर्थाचा विकास होत असतो. शब्द लहान असतो, परंतु त्यातील अर्थ अनंत आहे. विचारांची उत्क्रांती सदैव होत असते.
भारतीय संस्कृतीची भव्य इमारत नवीन विचारांच्या वार्याने पडेल, अशी का या संस्कृतिरक्षकांना भीती वाटते? या नवीन विचारांच्या वार्यांनी जर ती पडण्यासारखी असेल, तर ती टिकण्यात तरी अर्थ काय? जरा आलेली वार्याची झुळूक ज्याला सहन होत नाही, तो क्षयी लवकरच मरणार, असाच नाही का ध्वनी निघत? भारतीय संस्कृती का अशी लेचीपेची आहे? आमच्या दृष्टीने ती तशी नाही. ज्ञानावर, अनुभवावर ज्या संस्कृतीचा पाया रचला आहे., त्या संस्कृतीला कधीही भय नाही. किल्लेकोट बांधून, भिंत बांधून ती बुरखा घेऊन बसणार नाही. हे बुरख्यातील बावळट पावित्र्य भारतीय संस्कृतीस नको आहे. नवीन विचारांचे भारतीय संस्कृतीस वावडे नाही. जगातील कोणतीही अनुभवाच्या कसोटीवर उतरलेली, ज्ञानावर उभारलेली संस्कृती आणा, भारतीय संस्कृतीचा तिच्याशी विरोध नाही.
जगातील प्रयोगांचा भारत उपयोग करून घेईल. भारतीय संस्कृतीचे दरवाजे मोकळे आहेत. साम्यवादाचे विचार आले, तर त्यात श्रीकृष्णाचे बालचरित्र भारतीय संस्कृतीस दिसेल. गोकुळातील लोणी चोरणारा श्रीकृष्ण, सर्व पददलितांची बाजू घेणारा श्रीकृष्ण, सर्व साम्राज्ये धुळीस मिळवणारा श्रीकृष्ण, त्याचेच दर्शन साम्यवादात भारतीय संस्कृतीचा आत्मा ओळखणार्यास होईल. "सत्याअसत्याशी मन केले ग्वाही" असे म्हणणार्या तुकारामाचेच दर्शन, "स्वतःच्या बुद्धीला पटेल ते करा" असे सांगणार्या ध्येयवादी नवविचारवंतात खर्या संस्कृतीच्या उपासकाला घडेल ! भारतीय संस्कृतीस भीती, नाश व मरण हे शब्द माहीत नाहीत. कारण ज्ञानाला नाश नाही, आणि ज्ञानावर ही संस्कृती उभी आहे."
-- साने गुरुजी, "भारतीय संस्कृती", १९३७.