Sunday, September 16, 2007

सेतू बांधा रे सागरी

||श्री||

प्रति
राष्ट्रीय सचिव,
क्ष डावी चळवळ,
यांसी

स.न.

महोदया/महोदय,

सामाजिक, राजकीय, बिनराजकीय सामाजिक, बिनसामाजिक राजकीय, व सामाजिक-राजकीय अशा सर्व डाव्या चळवळींचा शुभचिंतक या नात्याने मी आपणास हे अनावृत्त पत्र लिहित आहे. राजकीय क्षेत्रात घडत असलेल्या काही घडामोडी या पत्रामागच्या प्रेरणा ठराव्यात. मी जो हा लहान तोंडी मोठा घास घेत आहे, त्याबद्दल सुरुवातीलाच क्षमा मागतो. पण काही घटनाच अशा घडत आहेत की त्यांच्यापासून धडा घेऊन मागील चुका सुधारून पुढील वाटचाल करणे हितावह ठरावे. त्यासाठी हा पत्रप्रपंच करत आहे.

आंदोलनांदोलनांतून आंदोलने करताना आपण त्या त्या प्रसंगी लिहिलेल्या सोडचिठ्ठ्यांतील पाल्हाळ हा माझा प्रांत नसल्यामुळे मी थेट विषयाकडे वळत आहे. तर मुद्दा असा की, हल्लीच गीत रामायण मधील "सेतू बांधा रे सागरी" हे गीत मी अनेकविध गळ्यांतून ऐकले. काही जण सागरी सेतू बांधून दोन सागर जोडण्याबद्दल सांगत होते, तर काही वानरसेना कुठल्याशा नैसर्गिक सेतूसदृश भूभागावर आपला वारसाहक्क सांगत होत्या. तदनुषंगाने प्रसिद्धीमाध्यमांतून अवगत ज्ञानाच्या आधारे केलेल्या काही नोंदींवर आपल्याशी विचारविनिमय मी या पत्राद्वारे करत आहे. पत्राच्या पूर्वार्धात मी काही स्थानिक समस्या त्यांवर मार्ग निघावा या हेतूने आपल्यासमोर मांडत आहे. उत्तरार्धात या समस्यांच्या उत्तराच्या आधारे काही व्यापक प्रश्न कसे हाताळता येतील यावर मी माझे मतप्रदर्शन केले आहे.

तर उपरोक्त भूभाग हा नैसर्गिक असून त्याचा सेतूसदृश आकार हा केवळ योगायोग आहे व या सेतूच्या निर्माणकार्याचा कुठलाही पुरावा नाही अशा अर्थाचा खुलासा न्यायालयासमोर सादर करण्यात आला. परंतु काही लोकांच्या मते हा सेतू श्री. राम कौसल्या दशरथ यांच्या पर्यवेक्षणाखाली श्री. हनुमान अंजनी पवन या मुख्य अभियंत्याच्या हाताखालील फौजेने बांधला. त्यांनी तसेच काही उच्चपदस्थ सत्ताधिकार्‍यांनीही तो सेतू अशाप्रकारे बांधला गेलेला नाही या सरकारी दाव्याचा आधार काय असे विचारून त्या सरकारी दाव्यावरच आक्षेप घेतला आहे असे कळले. माझ्या मित्राच्या पणजोबांनी मौजे धर्माचा पाडा खु., ता. शहापूर, जि. ठाणे येथे एक गणपतीचे देउळ बांधले. गणपतीची मूर्ती स्वयंभू असून अनेक भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. त्याच्या पणजोबांपासून सर्व पिढ्या याच देवळातील एका खोलीत रहात आल्या आहेत. सदर जमीन ही मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित मध्य वैतरणा धरण प्रकल्पात प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहे. असंख्य भाविकांच्या भावनांचा आदर करून हा प्रकल्प थांबवावा अशी मागणी केली असता "मंदिरातील मूर्ती हा केवळ एक नैसर्गिक खडक असून ती गणपतीसारखी दिसत नाही, सबब ही मागणी निराधार आहे" असा युक्तीवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. तसेच सातबारा नाही म्हणून कुठलाही मोबदलाही नाकारण्यात येत आहे. त्या मूर्तीत गणपती नाही असे सिद्ध करणारा पुरावा सरकारकडे आहे काय? जमीनीवर हक्क शाबित करणे भूधारकांना आवश्यक नसून जर मोबदला द्यायचा नसेल तर त्या भूधारकांचा हक्क सदर जमीनीवर नाही हे सिद्ध करणारा सातबारा सादर करणे सरकारवर बंधनकारक आहे, अशी तरतूद कायद्यात आहे काय? या प्रश्नांची माहितीच्या अधिकारात अधिक माहिती काढून आम्हास सहकार्य करण्याची मी आपणास नम्र विनंती करत आहे.

याच आधारवर काही महत्त्वाच्या चळवळींना दिशा लाभावी म्हणून काही सूचना येथे करत आहे. त्यांवर आपण व आपल्या समविचारी साथींनी साकल्याने विचार करावा ही विनंती.

१) वरील प्रश्नाच्या आधारे एक मोठी चळवळ संपूर्ण ठाणे जिल्ह्यात उभी राहू शकते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुंबईतील खुर्चीचा मार्ग ठाणे जिल्ह्यातून जाणार असल्याने त्याचा राजकीय लाभही व्हावा.

२) श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या वनाचा बराचसा भाग याआधीच सरदार सरोवर धरणाखाली नष्ट झाला आहे. निदान उर्वरित भाग तरी वाचावा व तो राष्ट्रीय वारसा म्हणून जतन करण्यात यावा या हेतूने या धरणाचे काम आहे त्या उंचीवर त्वरित थांबवावे अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात यावी. या मागणीला गुजरातसारख्या राज्यांतूनही व्यापक पाठिंबा मिळावा या हेतुने या चळवळीचे "दंडकारण्य बचाव आंदोलन" असे नामांतर करण्यात यावे. नामांतराला आपला नेहमीच पाठिंबा असल्यामुळे ही विनंती आपण उचलून धराल अशी आशा आहे.

३) श्रीराम‍, लक्ष्मण यांनी बाणगंगा जलाशय निर्मिला तेव्हा काही थेंब वाळकेश्वर येथून उडून नवी मुंबई, उरण व रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत पडले, अशी आख्यायिका नुकतीच ऐकिवात आली. हे प्रदेशसुद्धा राष्ट्रीय वारसा म्हणून जतन करण्यात यावे व त्यासाठी तेथील प्रस्तावित सेझ प्रकल्पांना मान्यता देऊ नये, अशी मागणी करण्यात यावी. उद्या हे असत्य आहे असा दावा करण्याचा प्रयत्न खाजगी क्षेत्रात काम करणारे माजी सरकारी अधिकारी करतील. "तो कुठल्या आधारे करण्यात आला अशी पृच्छा वरून होईल व आपली सत्ता जाईल" या भीतीने ते प्रयत्न हाणून पाडले जातील. शिवाय जनपथावरील दशमगृहाची सध्या कोकणच्या नेत्यांवर मेहेरनजर आहे असे म्हणतात. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोकणचा असणार असेही भाकीत मी ऐकून आहे. परिणामी या मागणीला विरोध संभवत नाही.

४) "रामराज्यात माझे पूर्वज रामाच्या दरबारात आचारी होते. आता सरयू नदीच्या पाण्यातही राम उरला नाही. रामाच्या नावाचा गजर करणारे काही जण ब्याण्णव साली आमच्या गावी आले होते. त्यांची कीर्ती ऐकून मी या गडावर आश्रयासाठी आलो. पण त्यांनीच मला कल्याण दरवाज्यात अडवून चोपले." अशी कैफियत परवा कोपर्‍यावरील भेळवाला भैय्या सांगत होता. कुठेच राम राहिला नाही असे मानणार्‍या या पीडितांचा वाढता पाठिंबा अशा चळवळींना मिळू शकेल.

५) रामभक्तांच्या संघांशी संगनमत करून चळवळींची उद्दिष्टे साधण्याची नामी संधी तीस वर्षांनी पुन्हा आली आहे. तिचा सदुपयोग करून घ्यावा. फक्त यंदा तुमच्या जीवावर त्यांना उभे राहू न देता, त्यांच्या जीवावर तुम्ही उभे रहाण्याचा शहाणपणा दाखवावा. आपापसातील मतभेद तूर्तास बाजूला ठेवावेत. अराजकीय भूमिका घेऊन अराजक माजवू नये. क्ष सेना, क्ष देशाचा कम्युनिस्ट पक्ष अशा समविचारी संघटनांनी यावेळेस तुमच्या बाजूने सलगी दाखवली तर त्यांना अस्पृश्य वागणूक देऊ नये. याच आधारे अनेक प्रश्न मार्गी लावता येतील. रामाप्रमाणेच इतर धर्मातील श्रद्धास्थानांबद्दल आख्यायिका प्रसृत कराव्यात. अशा श्रद्धास्थानांची संख्या लक्षात घेता एकतरी आख्यायिका चळवळीचे उद्दिष्ट साध्य करेलच. वेळ पडल्यास अं.नि.स.शी सध्या फारकत घ्यावी.

अशा माझ्या काही अनाहुत सल्ल्यांची कृपया मनाचा मोठेपणा दाखवून दखल घ्यावी. माझी काही प्रामाणिक मते मी येथे मांडली आहेत. आपला अनादर करण्याचा हेतू नसून, तसा झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.

धन्यवाद.

2 comments:

  1. अफलातून. जिओ...
    शैली, आशय, पोटतिडीक... सगळंच अफलातून.

    ReplyDelete