Sunday, September 16, 2007

सेतू बांधा रे सागरी

||श्री||

प्रति
राष्ट्रीय सचिव,
क्ष डावी चळवळ,
यांसी

स.न.

महोदया/महोदय,

सामाजिक, राजकीय, बिनराजकीय सामाजिक, बिनसामाजिक राजकीय, व सामाजिक-राजकीय अशा सर्व डाव्या चळवळींचा शुभचिंतक या नात्याने मी आपणास हे अनावृत्त पत्र लिहित आहे. राजकीय क्षेत्रात घडत असलेल्या काही घडामोडी या पत्रामागच्या प्रेरणा ठराव्यात. मी जो हा लहान तोंडी मोठा घास घेत आहे, त्याबद्दल सुरुवातीलाच क्षमा मागतो. पण काही घटनाच अशा घडत आहेत की त्यांच्यापासून धडा घेऊन मागील चुका सुधारून पुढील वाटचाल करणे हितावह ठरावे. त्यासाठी हा पत्रप्रपंच करत आहे.

आंदोलनांदोलनांतून आंदोलने करताना आपण त्या त्या प्रसंगी लिहिलेल्या सोडचिठ्ठ्यांतील पाल्हाळ हा माझा प्रांत नसल्यामुळे मी थेट विषयाकडे वळत आहे. तर मुद्दा असा की, हल्लीच गीत रामायण मधील "सेतू बांधा रे सागरी" हे गीत मी अनेकविध गळ्यांतून ऐकले. काही जण सागरी सेतू बांधून दोन सागर जोडण्याबद्दल सांगत होते, तर काही वानरसेना कुठल्याशा नैसर्गिक सेतूसदृश भूभागावर आपला वारसाहक्क सांगत होत्या. तदनुषंगाने प्रसिद्धीमाध्यमांतून अवगत ज्ञानाच्या आधारे केलेल्या काही नोंदींवर आपल्याशी विचारविनिमय मी या पत्राद्वारे करत आहे. पत्राच्या पूर्वार्धात मी काही स्थानिक समस्या त्यांवर मार्ग निघावा या हेतूने आपल्यासमोर मांडत आहे. उत्तरार्धात या समस्यांच्या उत्तराच्या आधारे काही व्यापक प्रश्न कसे हाताळता येतील यावर मी माझे मतप्रदर्शन केले आहे.

तर उपरोक्त भूभाग हा नैसर्गिक असून त्याचा सेतूसदृश आकार हा केवळ योगायोग आहे व या सेतूच्या निर्माणकार्याचा कुठलाही पुरावा नाही अशा अर्थाचा खुलासा न्यायालयासमोर सादर करण्यात आला. परंतु काही लोकांच्या मते हा सेतू श्री. राम कौसल्या दशरथ यांच्या पर्यवेक्षणाखाली श्री. हनुमान अंजनी पवन या मुख्य अभियंत्याच्या हाताखालील फौजेने बांधला. त्यांनी तसेच काही उच्चपदस्थ सत्ताधिकार्‍यांनीही तो सेतू अशाप्रकारे बांधला गेलेला नाही या सरकारी दाव्याचा आधार काय असे विचारून त्या सरकारी दाव्यावरच आक्षेप घेतला आहे असे कळले. माझ्या मित्राच्या पणजोबांनी मौजे धर्माचा पाडा खु., ता. शहापूर, जि. ठाणे येथे एक गणपतीचे देउळ बांधले. गणपतीची मूर्ती स्वयंभू असून अनेक भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. त्याच्या पणजोबांपासून सर्व पिढ्या याच देवळातील एका खोलीत रहात आल्या आहेत. सदर जमीन ही मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित मध्य वैतरणा धरण प्रकल्पात प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहे. असंख्य भाविकांच्या भावनांचा आदर करून हा प्रकल्प थांबवावा अशी मागणी केली असता "मंदिरातील मूर्ती हा केवळ एक नैसर्गिक खडक असून ती गणपतीसारखी दिसत नाही, सबब ही मागणी निराधार आहे" असा युक्तीवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. तसेच सातबारा नाही म्हणून कुठलाही मोबदलाही नाकारण्यात येत आहे. त्या मूर्तीत गणपती नाही असे सिद्ध करणारा पुरावा सरकारकडे आहे काय? जमीनीवर हक्क शाबित करणे भूधारकांना आवश्यक नसून जर मोबदला द्यायचा नसेल तर त्या भूधारकांचा हक्क सदर जमीनीवर नाही हे सिद्ध करणारा सातबारा सादर करणे सरकारवर बंधनकारक आहे, अशी तरतूद कायद्यात आहे काय? या प्रश्नांची माहितीच्या अधिकारात अधिक माहिती काढून आम्हास सहकार्य करण्याची मी आपणास नम्र विनंती करत आहे.

याच आधारवर काही महत्त्वाच्या चळवळींना दिशा लाभावी म्हणून काही सूचना येथे करत आहे. त्यांवर आपण व आपल्या समविचारी साथींनी साकल्याने विचार करावा ही विनंती.

१) वरील प्रश्नाच्या आधारे एक मोठी चळवळ संपूर्ण ठाणे जिल्ह्यात उभी राहू शकते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुंबईतील खुर्चीचा मार्ग ठाणे जिल्ह्यातून जाणार असल्याने त्याचा राजकीय लाभही व्हावा.

२) श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या वनाचा बराचसा भाग याआधीच सरदार सरोवर धरणाखाली नष्ट झाला आहे. निदान उर्वरित भाग तरी वाचावा व तो राष्ट्रीय वारसा म्हणून जतन करण्यात यावा या हेतूने या धरणाचे काम आहे त्या उंचीवर त्वरित थांबवावे अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात यावी. या मागणीला गुजरातसारख्या राज्यांतूनही व्यापक पाठिंबा मिळावा या हेतुने या चळवळीचे "दंडकारण्य बचाव आंदोलन" असे नामांतर करण्यात यावे. नामांतराला आपला नेहमीच पाठिंबा असल्यामुळे ही विनंती आपण उचलून धराल अशी आशा आहे.

३) श्रीराम‍, लक्ष्मण यांनी बाणगंगा जलाशय निर्मिला तेव्हा काही थेंब वाळकेश्वर येथून उडून नवी मुंबई, उरण व रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत पडले, अशी आख्यायिका नुकतीच ऐकिवात आली. हे प्रदेशसुद्धा राष्ट्रीय वारसा म्हणून जतन करण्यात यावे व त्यासाठी तेथील प्रस्तावित सेझ प्रकल्पांना मान्यता देऊ नये, अशी मागणी करण्यात यावी. उद्या हे असत्य आहे असा दावा करण्याचा प्रयत्न खाजगी क्षेत्रात काम करणारे माजी सरकारी अधिकारी करतील. "तो कुठल्या आधारे करण्यात आला अशी पृच्छा वरून होईल व आपली सत्ता जाईल" या भीतीने ते प्रयत्न हाणून पाडले जातील. शिवाय जनपथावरील दशमगृहाची सध्या कोकणच्या नेत्यांवर मेहेरनजर आहे असे म्हणतात. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोकणचा असणार असेही भाकीत मी ऐकून आहे. परिणामी या मागणीला विरोध संभवत नाही.

४) "रामराज्यात माझे पूर्वज रामाच्या दरबारात आचारी होते. आता सरयू नदीच्या पाण्यातही राम उरला नाही. रामाच्या नावाचा गजर करणारे काही जण ब्याण्णव साली आमच्या गावी आले होते. त्यांची कीर्ती ऐकून मी या गडावर आश्रयासाठी आलो. पण त्यांनीच मला कल्याण दरवाज्यात अडवून चोपले." अशी कैफियत परवा कोपर्‍यावरील भेळवाला भैय्या सांगत होता. कुठेच राम राहिला नाही असे मानणार्‍या या पीडितांचा वाढता पाठिंबा अशा चळवळींना मिळू शकेल.

५) रामभक्तांच्या संघांशी संगनमत करून चळवळींची उद्दिष्टे साधण्याची नामी संधी तीस वर्षांनी पुन्हा आली आहे. तिचा सदुपयोग करून घ्यावा. फक्त यंदा तुमच्या जीवावर त्यांना उभे राहू न देता, त्यांच्या जीवावर तुम्ही उभे रहाण्याचा शहाणपणा दाखवावा. आपापसातील मतभेद तूर्तास बाजूला ठेवावेत. अराजकीय भूमिका घेऊन अराजक माजवू नये. क्ष सेना, क्ष देशाचा कम्युनिस्ट पक्ष अशा समविचारी संघटनांनी यावेळेस तुमच्या बाजूने सलगी दाखवली तर त्यांना अस्पृश्य वागणूक देऊ नये. याच आधारे अनेक प्रश्न मार्गी लावता येतील. रामाप्रमाणेच इतर धर्मातील श्रद्धास्थानांबद्दल आख्यायिका प्रसृत कराव्यात. अशा श्रद्धास्थानांची संख्या लक्षात घेता एकतरी आख्यायिका चळवळीचे उद्दिष्ट साध्य करेलच. वेळ पडल्यास अं.नि.स.शी सध्या फारकत घ्यावी.

अशा माझ्या काही अनाहुत सल्ल्यांची कृपया मनाचा मोठेपणा दाखवून दखल घ्यावी. माझी काही प्रामाणिक मते मी येथे मांडली आहेत. आपला अनादर करण्याचा हेतू नसून, तसा झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.

धन्यवाद.

Tuesday, September 4, 2007

विषयांतर

नववीमध्ये असताना आम्हाला एक धडा होता, काळे केस. धडा आठवत नाही पण हे नाव आठवतंय. ते स्वाभाविक आहे, कारण त्या धड्यात एकही धड गोष्ट नव्हती. नुसता काही पानांचा असंबद्ध मजकूर. नि त्याला म्हणे लघुनिबंध म्हणतात. "बादरायण संबंधाने जोडलेल्या विभिन्न विषयांवरील अनेक लहान लहान लेखांचा दीर्घ एकसंध गद्य मजकूर म्हणजे लघुनिबंध", अशी एक प्रदीर्घ व्याख्या मी तेव्हापासून मनात बाळगून आहे. अजूनही काथ्याकूट करून ही व्याख्या लांब करण्याचा मला मोह होत आहे पण, "दीर्घसूत्री विनश्यति" या सुवचनाचे स्मरण करून मी तो मोह टाळत आहे. हे लिहितानाच, असाच एखादा दीर्घ लघुनिबंध वाचून कुण्या एका सुज्ञास हे वचन सुचले असावे का, असा प्रश्न मनात येत आहे. तर आपणही असा एक लघुनिबंध लिहावा असा एक विचार अनेक दिवस मनात आहे. एखाद्या क्षुल्लक गोष्टीवर विचार करताना वेगाने रूळ बदलून भलत्याच विषयावर घसरण्यात माझं मन प्रकाशालाही हार जात नसल्यामुळे आणि हे रूळ बदलणं केवळ वेगात नव्हे तर अव्याहत चालू राहू शकत असल्यामुळे आपण हा साहित्यप्रकार हाताळू शकू असा मला प्रचंड आत्मविश्वास आहे. त्याच जोरावर मी हे धाडस करत आहे.

आता काहीही लिहायचं हे ठीक असलं तरी कुठून तरी सुरुवात करावीच लागणार. म्हणजे काहीतरी आकर्षक सुरुवात हवी. बरंच काही वाट्टेल ते सुचतंय नि ते कुठल्या अदृश्य धाग्यांनी जोडायचं तेही. पण सुरुवात सुचेना. "अदृश्य धागे" या शब्दसमुच्चयाचा कुठलाही प्रगल्भ, काव्यात्म अर्थ न घेता शब्दशः अर्थ येथे अभिप्रेत आहे. लिखाण निःसंदिग्ध असावं या भावनेतून हा ऊहापोह. तर असं काहीही सुचतंय पण सुरुवात सुचेना. पुन्हा एकदा स्पष्टीकरण...या अथांग विश्वात आपण केवळ भरकटत आहोत आकाशगंगांसारखे, उगम आणि अंत याविषयी अनभिज्ञ...असा कोणताही प्रगल्भ अर्थ कटाक्षाने टाळावा. माझ्या लिखाणाची एवढी झेप नाही. विनय म्हणून नव्हे, वास्तव म्हणून. तर हे असं फारंच रटाळ सुरु झालंय. पण सुरुवात शोधता शोधता हे जे दोन परिच्छेद खरडले ते सुरुवात म्हणून ग्राह्य धरता नाही का येणार? असा एक कोंबडी आधी की अंडे आधी ढंगाचा प्रश्नही या निमित्ताने मला पडला आहे.

आताशा मला हे असे काहीबाही प्रश्न फार पडू लागले आहेत. म्हणजे आमचं काही कमावलेलं शरीर नाही. एकंदरीत अंगमेहनतीच्या कामात गती कमीच. पण तळाला लागलेली भांडी, "हे निघत नाही", असं खुशाल जाहीर करून रूममेट निघून गेल्यावर माझ्या हातून कशी बर्‍यापैकी लख्खं होतात? मुळात या बल्लवांचा रोज भात खाली लागतोच कसा? एकदा लागल्यावर पुढल्यावेळी पाणी जास्त नाही का घालता येत? बराच वेळ शिट्टीच झाली नाही, या गोष्टीची दखल बर्‍याच वेळानंतर घेण्यापेक्षा जरा आधी घेता येत नाही का? का शिट्टया ऐकूच येत नाहीत? मला कमी ऐकू येतं, मग मी उगाच प्रश्न विचारत राहतो यावर माझ्या मित्रमंडळींचं एकमत आहे. असेल बुवा. वास्तविक व्यासपीठावरून केलं गेलेलं, आपल्याला अडचणीत टाकणारं वक्तव्य आपण ऐकलंच नाही, असं सांगून कानावर हात ठेवणार्‍या महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांसारखी नामुष्की आमच्यावर आजवर कधी ओढवलेली नाही. हेच ते सर होते ना ज्यांनी मग आम्हाला नैतिक शिक्षण देण्याचा घाट घातला? तर असेल मला कमी ऐकू येत. पण घरात शिरल्या शिरल्या दारातच मला स्वयंपाकघरातील वाहत्या नळाचा नि बाथरूममधील निथळत्या शाँवरचा जो आवाज ऐकू येतो तो तेथे उपस्थित तमाम जनतेला का ऐकू येत नाही? किती पाणी वाया गेलं असेल या विचाराने येणारी अपार खिन्नता इतरांना का शिवतसुद्धा नाही? घरभाड्यात पाणी, वीज, इंधनाचा वायू इ. सुविधा मोफत मिळतात म्हणून त्यांचा वाटेल तसा वापर करणारे हे अमेरिकास्थित पैसा, शिक्षण, भारतातील सामाजिक स्तर या सर्वार्थांनी उच्चभ्रू भारतीय लोक आणि मोफत वीज वाटेल तसा वापरणारा भारतातील सामान्य शेतकरी यांची तुलना करण्याचा मोह मी इथे उपमा, उत्प्रेक्षा की रूपक अलंकार योग्य होईल या गहन विचारात सोडून देतो. तरीपण हा उधळण्याची वृत्ती जोपासणारा प्रकार चळवळ करून थांबवला पाहिजे असं मला वाटतं. भले मला स्वतःलाही माझ्या राहत्या घरासाठी घरभाड्याखेरीज अजून काही पैसे मोजावे लागतील. हरकत नाही. मी मोठ्या मनाने तो त्याग करीन. जमीन पुनर्रचनेसाठी कम्युनिस्टांनी दिलेल्या योगदानाप्रमाणे घरभाडे पुनर्रचनेसाठी मी दिलेल्या या योगदानाचे युगान् युगे कौतुक होईल का? या प्रसिद्धीपरायण प्रश्नावर मला माझीच कीव येत आहे. नि हा असला क्षुद्र विचार बँकस्पेस ने नाहीसा करावा की मागे जाऊन डीलीट ही कळ वापरून तो पुसावा असा मी विचार करत आहे.

"विंडोज"च्या "मँक" नावाच्या एका सावत्र बहीणीबरोबर एकदा काम करताना तिच्या पटलावार बँकस्पेस अशी कळच नाही नि डीलीट नावाची कळ बँकस्पेसचे काम करते हा जावईशोध मला लागला होता. मला तिची फारच दया आली होती तेव्हा नि मग तिच्यातून उगवलेलं ते पांढरंशुभ्र सफरचंद मला पांढरंफटक दिसू लागलं होतं. रंग आणि जोडशब्द यांचं या अर्थचमत्कृतींमुळे अतूट नातं आहे. परवा एक नवीन मराठी अल्बम ऐकताना "निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये..." अशी ओळ ऐकून मी स्मित हास्य केलं होतं. काही लोक याला कुत्सित असंही म्हणतात. मला निळंशार माहित होतं. निळंभोरवर मी जरा घुटमळलो होतो. "एकतर निळेभोरवर एवढं खटकायचं काही कारण नाही नि शिवाय जर आपल्याला अशा कविता, गाणी लिहिणं झेपत नाही तर जे करतात त्यांच्यावर हसू नये" असं माझं मन मला ओरडत होतं. हे बरं आहे, जरा आमच्या कानाला खटकलं नि आम्ही हसलो तर एवढं काय त्यात? इंजिनिअरींगच्या तोंडी परीक्षांच्या वेळी आम्हाला केवळ मूक करण्याच्या हेतुने काही प्राध्यापक वाटेल ते विचारायचे, चुकीचंही. चूक आहे म्हणून सांगायची सोय नाही परत. तेव्हा आम्ही नाही कधी म्हणालो त्यांना ते की, "तुम्हालाही नाही येत हे, उगाच हसू नका". वास्तविक दोष त्यांचा नसे. स्वतःला फार शहाणे न समजणारा इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचा शिक्षक नि काँप्युटर इंजिनीअरींगचा विद्यार्थी विरळाच ! काँप्युटर इंजिनीअरींगला प्रवेश घेतला की प्रवेशासह हा आगाऊपणा मोफत मिळतो. पण इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगच्या शिक्षकांच्या अंगचा "अहं सर्वास्मि" हा भाव कमावलेला असतो. त्यामुळे तो त्यांच्या हरएक कृतीत दिसून येतो. काँप्युटर इंजिनीअरींगचे शिक्षक बहुदा सतत न्यूनगंडाने ग्रासलेले असतात. काँप्युटर इंजिनीअरींगचा गंधही नसणारा माणूस आपला बँक अकाऊंट चालविण्यासाठी प्रणाली लिहून आपल्या तिप्पट पैसा ओढत आहे, "मी इतर नोकरी मिळाली नाही म्हणून नाही तर स्वेच्छेने शिक्षक झालो आहे " हा आव आणणे कठीण होत चालले आहे, आपल्या विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक आहे, आपले विद्यार्थी आपल्याला गुंडाळून टाकतात, अशा अनेक गोष्टींचा तो परिपाक असावा. काँप्युटर इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांच्या आगाऊपणाचे कहर ऐकून मला या शिक्षकांची अगदी कीव येत असे. इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचं तसं नाही. इथे प्रत्येक शिक्षक स्वतःला अनभिषिक्त सम्राट समजतो आणि आपली प्रयोगशाळा नामक गढी राखत असतो.

इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचे विद्यार्थी तर सतत बावरलेलेच असतात. एकतर आपण काय शिकत आहोत आणि इंजिनीअरींगनंतर नेमकं काय कारणार याचा शेवटपर्यंत पत्ता लागू देत नाहीत. मग काही धोपटमार्गी साँफ्टवेअरकडे जातात. त्यांना आपलं प्रोग्रामिंग दुसर्‍या सत्राच्या परीक्षेनंतर कधी पुढे गेलंच नाही ही भीती असावी. काही धिटाई दाखवून इलेक्ट्राँनिक्सकडे वळतात. तिथे इलेक्ट्राँनिक्सकच्या मुला‍‌मुलींशी स्पर्धा. नि काही राहिलेच इलेक्ट्रिकलमध्ये तर बहुदा त्यांना त्यांचे वरीष्ठ सांगत असतील की, "ती डि सी मोटर कोणी वापरत नाही आता. ए सी मोटर नि थ्री फेज ट्रान्सफाँर्मर महत्त्वाचं". मग त्यांना धडकी भरत असेल. या दोन गोष्टींवर त्यांच्या इंजिनीअरींगची मोटर आचके देत बंद पडली होती. मोटर चालू होताना ती प्रचंड करंट खेचते त्यामुळे ती शंभर गोष्टींची खातरजमा करून व अत्यंत सावधपणे चालू केली पाहिजे, हे त्यांच्या मेंदूवर इतकं ठसवलेलं असतं की ती बंद पडलेली मोटर पुन्हा चालू करण्याचं धाडस त्यांनी घाबरत घाबरतंच केलेलं असतं. त्या दिव्याची आठवण मनाला सुन्न करत असेल. अशा विपरीत परिस्थितींतही न डगमगता वीज, सर्किट व प्रोग्राम असं वाट्टेल ते पुरवू शकणार्‍या या विद्यार्थ्यांचं मला कौतुक आहे.

झाली पंचाईत आता? इंजिनीअरींगकडे वळू नको असं बजावत होतो. एकदा यात शिरल्यावर आता कुठल्याही विषयाकडे वळता येत नाही. या फक्त आत पावलं जाणार्‍या गुहेत, नव्हे गर्तेत, मी असा कृष्णविवरात खेचल्यासारखा पडतो. बाहेर पडायचा मार्ग नाही. कृष्णविवरेही मरतात व त्यांच्यातील माहिती नष्ट न होता अन्य स्वरूपात विश्वात राहते, असं स्टिफन हाँकिंग म्हणाले तेव्हा मला केवढा दिलासा वाटला होता. त्याच आशेने, या गोड आठवणीवर या दीर्घनिबंधाचे "विषयांतर" अशा समर्पक शीर्षकाने बारसे करून विषय अधिक न वाढवता थोडक्यातच इतिश्री करत आहे.

Sunday, August 26, 2007

लेणे

एक लेणे खोदीन म्हणतो
कोरीवकाम करीन म्हणतो
अतिसूक्ष्म
दगडाच्या कणालाही छेदणारं
विश्वाचं गूढ उकलणारं
काळ्या कातळात थंड गुहेत एकांतात बसेन म्हणतो
जगापासून अलिप्त दूर विश्वाचं रहस्य उलगडीन म्हणतो
तीक्ष्ण आयुधं तयार आहेत
सूक्ष्माचा वेध घ्यायला नजर माझी तीक्ष्ण आहे
काळा कातळ शोधत आहे
इतरत्र तो दिसत नाही
मनालाच कणखर बनणं प्राप्त आहे.

Thursday, August 9, 2007

निकड शांततेची आता कुणास आहे?
गजबजीत ऐका एकांत वाजताहे

अथक रोखणे हे तूफान व्यर्थ आहे
गलितपर्णराशी धारांत वाजताहे

गरज गर्जण्याची वार्‍यास काय आहे?
खवळली कधीची लाटांत गाज आहे

अनल भास्कराच्या गाभ्यात व्यर्थ आहे
तरुण रात्र आभा तार्‍यांत मोजताहे

गरज शीर्षकाची काव्यास काय आहे?
सहज अर्थवाही शब्दांत साज आहे