Tuesday, January 29, 2008

कुणी जाल का, सांगाल का?

आघ्रातं परिचुंबितं ननु मुहुर्लीढं ततश्चर्वितम्
त्यक्तं वा भूवि नीरसेन मनसा तत्र व्यथा मा कृथा
हे सद्रत्न, तवैतदेव कुशलं यद्वानरेणादरात्
अंतःसारविलोकनव्यसनिना चूर्णीकृतं नाश्मना


दहावीत संस्कृतमध्ये हे सुभाषित होते. त्याचा साधारण अर्थ काय तर, "अरे चांगल्या रत्ना, वानराने तुला हुंगलं, चाटलं, तुझा पुन्हा पुन्हा वास घेऊन पाहिला, चावलं, निरीच्छीने जमीनीवर फेकून दिलं, तरी त्याची खंत करू नकोस. तुझं नशीब समज की, (तोडून फोडून)आत काय आहे हे पाहण्याची खोड असणार्‍या त्याने उत्साहाच्या भरात तुझा दगडाने चुरा केला नाही". भारतरत्नासाठी ज्या ज्या रत्नांचा असा उद्धार झाला, त्यांच्याबद्दल मला अतीव सहानुभूती वाटत आहे. नि ज्यांनी अकारण या रत्नांची नावे सुचवून व जाहिरात करून या रत्नांची भविष्यात कधीही भारतरत्न मिळण्याची संधी घालवली त्यांच्याबद्दल हा थोर सुभाषितकार आधीच वदता झाला आहे.



तर हा जो सगळा आधी खेळ नि मग खेळखंडोबा झाला त्याबद्दलची काही गोपनीय माहिती काही विश्वसनीय सूत्रांकडून नुकतीच हाती आली आहे. तर झालं असं की काही अगुजराती व्यक्तींनी गुजराती अस्मितेचा भलताच धसका घेतला आणि आपल्याला आपल्याच मतदारसंघातून हाकलतील की काय अशा भीतीने लगेच स्वतःला भावी पंतप्रधान करवून घेऊन भारतीय अस्मिता अंगीकारली. तेवढ्याने भागेना म्हणून माजी पंतप्रधानांना सन्माननीय मार्गाने घरी बसवावे असेही ठरले. भारतीय क्रिकेट संघटनेकडून 'खेळाडूला सन्मानपूर्वक कसे वगळावे, ज्येष्ठ खेळाडूला "तू आता घरी बस" हे कसे सांगावे', हया संदर्भात काही सल्ले घेतले गेले. पण त्यांचा अलिकडला याबाबतीमधला अनुभव फार चांगला नसल्याने ते सल्ले स्वीकारण्यात आले नाहीत. शिवाय माजी पंतप्रधानांचा प्रश्न असल्यामुळे काळजी घेणे भाग होते. याच विचारात एक नामी युक्ती सुचली. युक्ती झकासच होती. एकाच दगडात दोन पक्षी मारायचा बेत ठरला.

त्या माजी पंतप्रधानांना भारत सरकारचा सर्वोच्च सन्मान देण्यात यावा, अशी मागणी करण्याचा निर्णय झाला. ती कशी करावी ह्यात खरा धूर्तपणा होता. म्हणजे ह्या वेळेस आपला कोणता मुखवटा दाखवायचा असा प्रश्न होता. मग ज्यांना घालवायचे त्यांचाच मुखवटा घालावा असं ठरलं. म्हणून कवितेचा आधार घ्यायचा असं ठरलं. म्हणजे इतके दिवस ह्या मवाळ मुखवट्याची मक्तेदारी ज्यांची होती त्यांचा असा पर्दाफाश करून ती मक्तेदारी मोडून काढायची, असा प्रयत्न. त्यानिमित्ताने आपल्यालाही एक मुखवटा मिळेल ही आशा. मुखवट्याशिवाय जगणं कठीण असतं हो. म्हणजे ह्यांच्याकडेही होता, अगदीच नाही असं नाही. चांगला लोहपुरुषाचा लोखंडी मुखवटा होता. पण पक्षात काही ह्यांच्याहून हिंस्र श्वापदे आली (तीच ती गुजराती अस्मिता चित्र प्रस्तुत!) नि त्यांनी सरळ हिसकावून घेतला हो तो. त्यांचा म्होरक्या हे साधे श्वापद नसून गिरनारच्या जंगलातून पळालेला एक नरभक्षक सिंह आहे, अशी माहिती नुकत्याच शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेच्या लोकसत्तेमधील वृत्तांतात मिळाली (सौजन्यः माजी खासदार, दक्षिण मुंबई ऊर्फ भुलेश्वरीची भवानी, मराठी बोलीत "अमुक तमुक भवानी आहे किंवा ए भवाने" असा उल्लेख फार आदरपूर्वक करत नाहीत असा माझा समज आहे, असो.) तर या निमित्ताने आपल्याला एक मुखवटा मिळेल, या मुखवट्याचा पुढील निवडणूकीत सोयीने उपयोग करून घेता येईल हा विश्वास. शिवाय भारतरत्न देतानाच सोबत शालजोडीतून अधिकृतपणे सक्तीची निवृत्तीसुद्धा! म्हणून अशी कविता रचण्यात आलीः

"कुणी जाल का? सांगाल का? सुचवाल का मनमोहना?
रत्नास ह्या विसरू नको, भूषवू नको दुसर्‍या कुणा

आधीच दिल्ली दूरची, दृष्टीत येऊ लागली
परत आता कोणती जोखीम नाही चांगली
हार पूर्वी जो दिला, होतात पाहून वेदना
बसवून सुवर्णकोंदणी रत्नास या सजवाल ना?

आनंदुनी गेलो जरासा मी सुखाते लाभता
इतक्यांत यांची वाजली शब्दांमधील शांतता
कळवाल का मनमोहना, की आस होती लागली
अन खुर्चीसाठी कुणी रात्र जागून काढली"

येता जाता सर्वांसमोर आपल्या कवित्वाचं प्रदर्शन होऊ लागलं. पण काहीच होईना. म्हणजे कवित्वाचंच कौतुक फक्त. मग मुखवट्याचा फार त्रास होऊ लागला. (म्हणून नेहमी आपल्या मापाचाच मुखवटा घालावा. दुसर्‍याचा घातला तर हेच व्हायचं.) म्हणून शेवटी सरळ तो झुगारून थेट सांगूनच टाकलं ह्यांनी, रोख ठोक. कविता बिविता सगळं बाजूला ठेवून सरळ एक दहाकलमी खलिताच धाडला. नि कविता उघड उघड गाऊनही लोकांना कळेना म्हणून ह्या खलित्याबाबत जराही गुप्तता वगैरे न ठेवता तो पंतप्रधानांच्या आधी पत्रकारांना धाडण्यात आला. कसं सगळ्यांना एकदम कोंडीत पकडलं या भ्रमात असतानाच, बंगाली वाघ आधी गर्जले नि नंतर सरळ पुरस्कारांनाच मानत नाही असं सांगून मोकळे झाले. जरा हुश्श झालं. पण हा हन्त! हन्त! नलिनीं गज उज्जहार! निळ्या हत्तीने आपलाही वजीर पुढे केला नि कमळात दडलेल्या भुंग्यांना काहीच सुधरेना. मग बिहारची प्यादी पुढे आली पण त्यांच्या राजकीय वारशाचा हक्क नेमका जदयु चा कि राजद चा हेच समजेना. शेवटी पंचांनी सिडनीचा आदर्श समोर ठेवून खेळाडूंना खेळू दिलं नि शेवटी आपलं ते खरं केलं. फरक एवढाच की येथे अजून हाराकिरी न होता सामना अनिर्णीत सुटला.

मला वाटलं झालं आता. पण नाही. नुकतीच खर्‍या कवीने "सर सलामत तो नकाब पचास" या न्यायाने एक कविता पाडली असं ऐकलं नि ती प्रयत्नपूर्वक मिळवली. ही कविता अजून जाहीर झालेली नाही. पण राहवत नाही म्हणून तुम्हाला सांगतो -

"कुणी जाल का? सांगाल का? सुनवाल का वेणूधरा
आता तरी गाऊ नको दमवू नको या जर्जरा

आधीच संध्याकाळची सुरुवात आहे जाहली
परत आता कोणती इच्छाच नाही राहिली
हार पूर्वीचा दिला तो वाळता केला चुरा?
आता करा ना सांगता, अपमान झाला हा पुरा

सांभाळुनी माझ्या जिवाला मी जरासे घेतले
इतक्यात कानी वाजले ह्यांनी फुका जे गायले
कळवाल का वेणूधरा, की खंत आता वाढली
अन वाचण्या खुर्ची कुणी रात्र जागून काढली? "

तेवढं जरा कुठे बोलू नका म्हणजे झालं!

(मूळ गीतः "कुणी जाल का, सांगाल का", गीतकारः कवी अनिल)


Thursday, January 24, 2008

नव्याने तेच!

आर्त मी गातो तराणे, सूर हा आहे नवा
शर्थ ही आहे पुराणी, नूर हा आहे नवा


ह्याच सूर्यातील अग्नी वाहणारा तो दिवा
रोज त्याचा उदय तोची, दूर हा आहे नवा

"थांबला तो संपला" हा बोल का आहे नवा?
रोखतो काळास जो, तो शूर हा आहे नवा

मारणारी तीच शस्त्रे, त्याच मर्त्य जाणीवा
धार काढे अमर, ऐसा क्रूर हा आहे नवा

तेच गाणे पावसाचे, तोच 'दर्दी' पारवा
वाहणार्‍या त्याच जखमा, पूर हा आहे नवा

Friday, December 28, 2007

अडखळलेले शब्द ‍२

तोच जिंकणार होता, हे माहितच होतं
पण तो जिंकेल तेव्हा एवढं वाईट वाटेल असं वाटलं नव्हतं
द्वेष पसरवून जिंकता येतं असं?
सर्व काही आलबेल असल्यासारखं, अनिरुद्ध, द्वेष, दहशत नि विजयोन्माद
नि माझे अडखळलेले शब्द.

नवीन काहीच नव्हतं
फक्त ते इतिहासातून वर्तमानात आलं होतं
नि मी तेव्हा तिथे होतो एवढंच.
कसं जमतं काळाला हे असं बारीक सारीक अलगद पकडून पुन्हा पुन्हा उभं करणं?
हे असं उभं करत करत फक्त पुढे जाणारा काळ
नि माझे अडखळलेले शब्द.

हुकूमशाहीच्या उदयाची कारणे
भ्रष्ट प्रशासन, लोकनियुक्त प्रतिनिधींवरचा उडलेला विश्वास इ.
उत्प्रेरकेः
आत्यंतिक राष्ट्रवाद, द्वेष
हीच गोष्ट मी जर्मनीतल्या हिटलरची म्हणून वाचली होती.
ती गुजरातमधल्या नरेंद्राची म्हणून पुन्हा पाहिली इतकंच.
सारं काही माहित असलेलं
कृष्णधवल चित्रांतून आता रंगीत चलचित्रात दिसावं
नि माझे अडखळलेले शब्द.

कशी जुनीच गोष्ट नवीन वाटते
कधी बाहेर पडू नये असं वाटतं
नि कधी बाहेर पडण्याचा मार्गच दिसेनासा होतो.
हतबलतेचा कडेलोट
नि माझा शब्दातीत dyslexia
अर्थात माझे अडखळलेले शब्द.

अडखळलेले शब्द ‍१

नवर्‍याला दोन अंड्यांचं आँम्लेट, मोठ्या मुलालाही तसंच नि धाकट्याला मात्र एकाचंच, साधं, मिर्ची न घालता.
प्रत्येक फुटलेल्या अंड्याबरोबर वाढत जाणारा घड्याळाचा वेग, आईची धांदल
हे सगळं ईशानसारखं थंडपणे सहज पकडणारा दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार इ.
नि माझे अडखळलेले शब्द.



तीन गुणिले नऊ बरोबर?
कुणाला तीन असं लिहून जग सोडाच पण विश्व जिंकल्याचा आनंद.
त्यामागचा तर्क बघून आम्ही अवाक
नि तोंडात मारल्यासारखे
सत्तावीसवर माझे अडखळलेले शब्द.

बेधडक रस्ता क्राँस करताना अडखळणार्‍या प्रत्येक टँक्सीच्या ब्रेकसह चुकलेला ठोका
नि न अडखळता चालणारा ईशान
भरधाव धावणारी डबल‍ डेकर
नि माझे अडखळलेले शब्द.

"तुम्हें सब है पता" नि "मेरी माँ" यांच्यामध्ये थांबलेला तो क्षण
नि काठाशी येऊन थबकलेलं पाणी
"मेरी माँ" म्हणताच फुटलेले बांध
नि माझे अडखळलेले शब्द.

"मुहल्ले की रौनक गलियाँ हैं जैसे,
खिलने की जिद पर कलियाँ हैं जैसे"
प्रतिभेच्या कुठल्या शिखरावर मिळतात हे शब्द?
थेट हृदयाच्या तळाशी जन्माचे ठिकाण सांगणारा आनंद
नि कुणाचे कदाचित तिथूनच जन्मलेले शब्द
नि माझे अडखळलेले शब्द.

तोच जिंकणार होता, हे माहितच होतं
पण त्याने अशी मिठी मारून डोळे क्वचितच भिजवले होते
नि त्याचा मित्र एवढ्या निरागसपणे खूश होणार होता?
सर्व काही न अडखळता सांडणारं, आनंद, हास्य, अश्रू
नि माझे अडखळलेले शब्द.

नावाच्या पाट्या सरकताना नि निम्मं थिएटर रिकामं होत असताना
कदाचित बहुतेकांनी त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केलं असेल
ती मुलं मात्र निखळ निरागसपणे हसत होती
"कभी बाते जैसे दादी नानी" म्हणताना मोठ्यांच्या चपला घालून ती चिमुकली चालत होती
नि काही जण मात्र जाणीवपूर्वक त्यांना पडद्यावर उभं करत होते.
कसं बारीक सारीक टिपतात काही जण
कशी आजूबाजूचीच गोष्ट नव्याने सांगतात काही जण
नि कशी नवीन दिसते ती त्यांच्या डोळ्यांतून बघताना
फक्त पहात रहावंसं वाटतं
डोळ्यांवरल्या पाण्याच्या पडद्याआडून
ते न थांबता झरणारं पाणी
एका अफाट सुंदर, अफाट निरागस नि अफाट प्रतिभेच्या जगातून बाहेर पडूच नये म्हणून चाललेली अथक धडपड
शब्दांतून कसं व्यक्त होतात त्या जगात?
माझा शब्दातीत dyslexia
अर्थात माझे अडखळलेले शब्द.