Tuesday, June 9, 2009

a Sane man is typing...

हे काही लिहायलाच हवं असं नाही, पण असं वाटलं ह्याची आठवण म्हणून.

आमुचा ब्लॉगु दोन वर्षांचा झाला म्हणून. इतके दिवस माझाच उत्साह टिकला ह्याचंच विशेष अप्रूप म्हणून. आपण अगदीच काही बकवास लिहित नाही, असल्या फाजील आत्मविश्वासापेक्षा आपण काही चांगलंही लिहू शकतो हा विश्वास निर्माण झाला ह्याची नोंद म्हणून नि ते सातत्याने जमायला हवं अशी स्वतःकडून अपेक्षा करायला सुरुवात केल्याची खूणगाठ म्हणून.

का लिहितो ह्याची कारणं सांगून झाली पूर्वीच. त्यांत अद्याप काहीही बदल नाही, ह्या पुनर्विचाराची दखल म्हणून.

आपण लिहिलेलं जगाने वाचावं अशा अर्थात असणार्‍या अपेक्षेने चालवलेला खटाटोप इतरही वाचतात ह्याचा अर्थात आनंद होतो, हे सांगावं म्हणून. त्या सगळ्या वाचकांना तह-ए-दिल से थँक यू म्हणण्यासाठी म्हणून.

जे वाचून निंदाप्रशंसाटीकात्मक प्रतिक्रिया देतात, त्यांचे विशेष आभार मानावेत म्हणून. प्रतिक्रियांची संख्या हे कसलंच द्योतक नसलं, तरीही त्यांच्यामुळे किती हुरूप येतो नि चारचौघांना वाटतं तसंच कसं मस्त वाटतं हे सांगावं म्हणून. इथे प्रतिक्रिया न देता इमेलद्वारे हमखास नि बर्‍याचदा खरमरीत प्रतिक्रिया पाठवून मला जमिनीवरच ठेवणार्‍या नि पुन्हा विचार करायला लावणार्‍या एका जवळच्या मित्राचेही जाहीर आभार मानावेत म्हणून. प्रतिक्रिया न देताही वाचणारे कोण व किती हे कळवून घेण्यासाठी ब्लॉगवर हेर नेमून वाचकांवर पाळत ठेवण्याचा अनाठायी आटापीटा न केल्यामुळे "वाचक किती?" ह्याचं उत्तर मी जरी "गावात कावळे किती?" ह्या प्रश्नाच्या बिरबलाच्या उत्तरासारखं "दिवसाला एकोणतीस" असं दिलं, तरीही ते आहेत ह्याचे पुरावे अनपेक्षित स्थळी, काळी अनपेक्षित व्यक्तींकडून मिळतात, ह्याची दखल घ्यावी व त्यांचेही आभार मानावेत म्हणून.

ब्लॉग हे माध्यम इहलोकात आहे, ही संपूर्णतः विस्मृतीत गेलेली गोष्ट पुन्हा एकदा नजरेस आणून दिल्याबद्दल स्नेहल व मेघनाचे जाहीर आभार मानावेत म्हणून. ती विस्मृतीत जाण्यापूर्वी केवळ इंग्रजीत माहित असणारी गोष्ट पुन्हा भेटली तेव्हा मराठीत सापडल्यामुळे मराठीला अगदीच तहानलेल्या मला केवढा दिलासा मिळाला होता, हे सांगावं म्हणून. नि ज्यांचे ब्लॉग बराच काळ निमूट वाचून आपण लिहिलेलं ब्लॉगावसं वाटलं व वाटत राहिलं, त्या बाठे, ट्युलिप, संवेद, मेघना मंडळींना एकलव्य होऊन याद करावं म्हणून. (की बोर्डची की वगैरे मागू नये, मिळणार नाही!)

दैनंदिन आयुष्यात भेटण्याची पुसटशीही शंका नसलेले व त्याचमुळे आपल्या जजमेंटलपणाच्या शापातून वाचलेले जे अनेक जण ब्लॉगमुळे भेटले व गोतावळ्यातलेच एक झाले त्या तुम्हां सर्व ब्लॉगरांना दोस्तीत थँक्स म्हणावं म्हणून!

नि एकूणात माझ्याच दृष्टीत बहुदा असणारं डिटेलिंग अधिक प्रगल्भ होत चाललंय की काय, असा एक दिलासा देणारा अनाहत नाद कुठल्याशा क्षणी ऐकू आल्याची नोंद ठेवणारा एक दस्तऐवज म्हणून!

:)

- a Sane man

ता.क. चांगला बाजारात मिळणारा नवा अंगा ब्लॉगुला घालावा हा विचार मी अतिउत्साहात हाणून पाडला नि कापड आणून तो घरी शिवायचा घाट घातला. शेवटी तो बड्डेच्या दिवसापर्यंत शिवून झालाच नाही. पण तो जुना रुक्ष अंगा उन्हाळ्यात चिवचिव व्हावी तसा अगदीच साहवेना. म्हणून हे चेरी ब्लॉसमचं ठिगळ लावून थोडा वसंत आणला आहे. रंग आणि लैंगिकता ह्यांचं नातं रंग व प्रकाशाची तरंगलांबी ह्यांच्याइतकं नैसर्गिक व सूत्रबद्ध आहे असं मानणारे इंद्रधनुषी चष्मे आपण डोळ्यांवर चढवले असतील, तर तुम्हांस ते लखलाभ असोत. ते काढून जगाकडे सताड डोळ्यांनी पहावं अशी विनंतीवजा सूचना. ते असो. पूर्ण अंगा कधी शिवून होईल कोण जाणे!

17 comments:

  1. मस्त आहे हो अंगा. (खरा म्हणजे तितका ग्रेट मस्त नाहीय. पण नवीन
    आहे, हे काय कमी आहे?!)

    फाजील आत्मविश्वास आणि साधार अपेक्षा ठेवणारा खराखुरा आत्मविश्वास यांच्यातली तू केलेली तुलना डोळे उघडायला लावणारी आहे.

    दोन वर्षं हा तसा मोठा कालावधी नव्हेच. पण आपल्या लिहिण्याच्या आणि मैत्रीच्या संदर्भात महत्त्वाचा मात्र नक्कीच आहे.

    'हॅट, वाढदिवसाबद्दल काय लिहायचं?' असं झटकून न टाकता इतक्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींची आठवण करून दिल्याबद्दल (आणि आभार मानल्याबद्दल!) आभार.

    शुभेच्छा वगैरे आहेतच, असतातच. किती काही झालं तरी औपचारिकपणे 'पुढील लिखाणासाठी शुभेच्छा' असं काही मी लिहिणार नाहीय. ह्याप्पी बड्डे!

    ReplyDelete
  2. tuzya blog la happy b'day!! ajun consistently ani ajun jast utsaahaane lihit rahaa. :)

    ReplyDelete
  3. मला रंगीलाचा पिवळा आमिर आठवला...आज आपून का हैप्पी बड्डे है...
    मनापासून शूभेच्छा.

    ताजा कलम प्रचंड चांगला झालाय..खुपच

    संवेद

    ReplyDelete
  4. hehe blogu la happy bdday! :)

    navin anga khuup cute! pavasaLyamadhe kache shejari basun jambhaLya shaaIne lihilelya vahichya panasarkha vattay!

    ReplyDelete
  5. हॅप्पी बड्डे ब्लॉगला! :)
    तुझं अधिकाधिक लेखन वाचायला मिळो ही शुभेच्छा.

    ReplyDelete
  6. अरे वा झकास! ब्लॉगचं नाव मस्त दिसतय ह्या नव्या ड्रेसात. आणि तु दोनच वर्षाचा आहेस अजून? वाटत नाही:P
    आता वाढदिवसाच्या मुहुर्तावर तुझी ती लॉन्ग अवेटेड कथा लिहून टाक पाहू.
    बेस्ट विशेस.

    ReplyDelete
  7. ब्लॉग्जचे वाढदिवस साजरे करणं ही चुत्येगिरी आहे हे मी आधीच कुठेतरी लिहिलंय. पण तु अगदी केक बिक कापणं वगैरे प्रकार न करता सिंहावलोकन प्रकार केल्याने (आणि थोर लोकांच्या यादीत माझी वर्णी लावल्याने) बहुतेक मी वाचलेलं हे पहिलंच सह्य/सहनीय वाढदिवस पोस्ट असावं. झबलं बिबलं प्रकारावर पण माझा फारसा विश्वास नाही. कलर, सीझन, फॉरमॅलिटी वगैरे निकष लावुन माझ्या (कपड्यांनी भरलेल्या आणि अक्षरश: वॉक इन) क्लॉझेटमध्ये नेहमी तीनच शर्ट कसे उरतात आणि तरी त्यातला एक शर्ट सिलेक्ट करायला मला दहा मिनिटं कशी लागतात ते मला कळत नाही. तरी झबलं प्रकारावर माझा विश्वास नाही. तरी हे झबलं चांगलं दिसतंय कि!
    तुझा लेख चांगला आहे, पण शेवटचा पॅरा भयानक लिहिलायस. पहिलं वाक्य वाचतात वाचता माझा श्वास अडकायला लागला म्हणुन मी प्रयत्न सोडुन दिला.
    एका पिक्चरमध्ये पाहिलं होतं कि व्यसनमुक्ती केंद्रातुन सुटणारा पेशंट डॉक्टरला विचारतो - कि मी आता लग्न करण्याएवढा जबाबदार झालोय का? तर डॉक्टर त्याला म्हणतो कि - असं कर. घरी जा आणि एक फुलझाड आणि एक कुत्रा विकत घे. झाडाला पाणी घाल आणि कुत्र्याला खाऊ घाल. वर्षभरानंतर दोघांतलं एकही जिवंत असेल तर स्वत:ला जबाबदार समजुन खुशाल लग्न कर!
    तसं म्हणावंसं वाटतंय तुला - दुसऱ्या वाढदिवसाचं अभिनंदन वगैरे ठीक, पण तिसऱ्या वाढदिवसापर्यंत ब्लॉग जगव. Believe me - ते वाटतं तितकं सोपं नाहिए!

    ReplyDelete
  8. @मेघना, सर्किट, यशोधरा,

    ब्लॉगुच्या वतीने थँक यु! :)

    @संवेद,

    रंगीलाचा पिवळा आमीर...खिखिखि...:D
    धन्यवाद!

    @भाग्यश्री,

    गंमतच आहे. हे मागचं खरं तर गुलाबीसर आहे. माझ्या ल॓पटॉपवर तू म्हणते तसंच जांभळट, लवेंडर टाइप दिसतं ति ल॓बमधल्या डेस्कटॉप पुन्हा गुलाबीच. असं का होत असावं? दोन्ही तितकंच बरं किंवा वाईत दिसतंय, त्यामुळे असो! थँक यू! :)

    @ ट्युलिप,

    थँक यू!
    दोन नाही मग किती वर्षांचा वाटतो? ;)

    ती कथा...आहे हं लक्षात अजून! :)

    @अभिजीत,

    सौ टका सहमत. म्हणूनच मी एक वर्ष झालं तेव्हा काहीही विशेष वाटवून घेतलं नाही, कारण पुढे टिकला उत्साह तर काही अर्थ म्हणून! दोन झाली तेव्हा माझं मला त्याची नोंद घेण्यासाठी पुरेसं वाटलं. पण आता तिसर्‍याची तू म्हणतोस तशी काळजी घेतलीच पाहिजे. जाणीवपूर्वक प्रयत्न करीन. धन्यवाद! :)

    ReplyDelete
  9. अरे मेघना म्हणाली मला म्हणुन घाईघाईने येऊन वाचला मी तुझा ब्लॉग... वाढदिवसाच्या शुभेच्छा...
    असे आभार वगैरे मानले आहेस तर मग आशीर्वाद :)
    असंच उत्तरोत्तर ब्लॉगत रहा...
    आणि हो... नविन अंगा पूर्ण शीव अर्धवटच झालाय तो...

    and its needless to say... i love the way u write... love u dear

    ReplyDelete
  10. congratulations. tumhara blog jiye hajaro saal, saalake dinho pachaas hajaar.

    vadhadivas sajara karaNa hi chutyegiri asel, tar tu ti kelis mhanun tuza hardik abhinandan.

    ReplyDelete
  11. "a Sane man is typing..."
    हे नाव मस्त आहे वाढदिवसाच्या पोस्टसाठी. सही वाटते, आयुष्य घालवले चॅटींगमधे पण ह्या वाक्याचा असा उपयोग करता येईल हे डोक्यात नव्हते आले.
    दुसऱ्या ब्लॉढदिवसाच्या शुभेच्छा :)

    ReplyDelete
  12. Vadhadivsachya Shubhechcha :) Mala ajun regular posts vachayla avadtil matra!

    ReplyDelete
  13. heartiest congrats on completing 2 years :)
    navin template pan ekdam chaan!
    wish u the best for the future!

    ReplyDelete
  14. अभिनंदन ! ठिगळ लावलेला अंगा शोभून दिसतो आहे.

    ReplyDelete
  15. @ स्नेहल, निलेश, यॉ.डॉ., प्रितम, केतन, क्षिप्रा

    धन्यवाद!

    @ निलेश,

    हाहाहाहाहाहाहाहा!!! :D:D

    ReplyDelete
  16. अभिनंदन निमिष, ट्युलिप म्हणते तसा खरोखरच 'टेरिबल टू'चा वाटत नाही; जास्त प्रगल्भ (याला सोपा मराठी प्रतिशब्द कोणता? :)) वाटतो अर्थातच.

    ReplyDelete