Saturday, October 27, 2007

मी एन. एम.

...

(उत्तरार्ध)

"...लोकांना इतरांचं बरं पाहवत नाही. मला इतक्या लोकांनी प्रशस्तिपत्रकं दिली. भारतातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ज्योति बसू बंगालचे मुख्यमंत्री होते नि असे बरेच, तेव्हा कोणी अशी अखिल भारतीय मुख्यमंत्री स्पर्धा घेतल्याचं कधी ऐकिवात नाही आलं. काम करण्यासाठी त्यांना काय इन्सेंटिव होतं कुणास ठाऊक? तर आमच्या राज्यातल्या लोकांचं जरा बरं चाल्लंय नि तसं सगळे म्हणताहेत तर काहींना ते पाहवत नाही. अर्थात हे काही नवीन नाही. पण उगीच निवडणूकांच्या तोंडावर असं काही आलं कानावर, तर नाही म्हटलं तरी जरा काळजी वाटतेच ना. म्हणजे मी किती वाईट, हे किती वेळा उगाळणार आहेत हे लोक. आम्ही आमच्या राज्यातल्या तमाम जनतेचे घडे पालथे घातले, तरी हे पाणी ओतायचं थांबत नाहीत. असू देत. कर नाही त्याला डर कशाला? म्हणून आमच्या राज्यात आम्ही कायदाच केला. प्रश्न विचारायला कुणी हात वर केला कि तो लगेच छाटून टाकायचा. माझ्या काही इतर योजनांच्या अंमलबजावणीबद्दल या प्रशस्तिपत्रकदात्यांनी कौतुक केलंच आहे. तसाच हा कायदा. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर आता मी म्हणू शकतो, "कर नाही त्याला डर कशाला?"

मागे २००७ सालच्या निवडणूका झाल्या, तेव्हासुद्धा असाच धुरळा उडवत होते हे लोक. परझानियाच्या प्रदर्शनावर निर्बंध घातले, तहलकाचा फार तहलका होणार नाही म्हणून टीव्ही बंद केले, आमीरचे चित्रपट बंद केले, अभ्यासाची पुस्तकं बदलली नि असं बरंच काही केलं. तरी यांची ओरड चालूच. म्हणजे देशातल्या इतर लोकांना जे आधीच कळतंय नि बर्‍याच अंशी वळतंय, त्यांनाच पु्न्हा पुन्हा ते सांगण्यात का उगाच श्रम, पैसा नि वेळ हे लोक वाया घालवतात कोण जाणे. आमच्या राज्यावर नि त्यातल्या लोकांवर याचा काही एक परिणाम होणार नाही याची आम्ही संपूर्ण खबरदारी घेतो. म्हणजे तसंच झालं पाहिजे ना? राजाचं कामच आहे ते. लोकशाही वगैरे नंतर आधी स्वतःच्या नावाला जागलं पाहिजे माणसानं. मीही तेच करतोय. राज्याभोवती संरक्षक भिंती...रशिया सारख्या...छे...रशिया काय...हा डावरा किडा कुठून आला डोक्यात...

पण एकंदरित लोक व्यर्थ पैसा वाया घालवताहेत हे सगळं करून. २००७,२००१२ साली नाही झाला काही उपयोग तर आता काय होणारे? एवढा पैसा झालाय का लोकांकडे? आमचं केंद्रात सरकार होतं तेव्हा कसा थोड्यांकडेच होता पैसा. मध्यंतरी ते अर्थतज्ज्ञ पंतप्रधान झाले. त्यांनी उगीच सगळ्यांकडे पैसा हवा असा एकच घोषा लावला होता. नि ते मनावर घेऊन प्रयत्न करायचे. पुढे आमचं सरकार आलंच नाही केंद्रात पण त्यामुळे पैसा फार लोकांकडे आला. म्हणून त्यांना असल्या वायफळ गोष्टींत तो दवडायला फार आवडत असेल.

आमच्या राज्यात एवढी सुबत्ता. सगळे उद्योगधंदे येऊ लागले. त्यासाठी इंधन हवं म्हणून इराणहून तेलाची पाईपलाईन थेट आमच्या राज्यात आणण्याचा प्रस्ताव मांडला. एकदम शाँर्टकट होता. उद्योग वाढीस लागावेत म्हणून राजधानीच्या शहरात यद्यावत विमानतळ उभारला. मध्यपूर्वेतील काही नावाजलेल्या विमानकंपन्यांना इथे आँफिसेस थाटण्यासाठी जागा दिल्या. पण या लोकांनी त्यांच्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेची हमी, त्यांच्या वसाहतींमध्ये प्रार्थनास्थळं असल्या अवास्तव मागण्या करायला सुरुवात केली. त्यांचं पाहून इतर परदेशी कंपन्याही नखरे करू लागल्या. इतका संताप आला होता मला. म्हणून मग फक्त देशी भांडवलाला प्रोत्साहन असा निर्णय घेतला. त्यानिमित्तानं केंद्राच्या नीतींना विरोधही करता आला. तर कम्युनिस्टांना मी त्यांचीच नीती चालवोतय असं वाटून उगीच सलगी दाखवायला लागले. म्हणजे मी न मागता उगीच लगट. नसता त्रास डोक्याला. मी डावरा वगैरे झालोय का हे बघायला डाव्या हातात पेन घेतलं. सरळ रेषा काढून बघितली. डाव्या हातात पेन घेतल्यावर ती रेषा नैसर्गिकपणे उजवीकडून सुरू होऊन डावीकडे थांबली...हिब्रू, उर्दू सारखी. हे काय अभद्र घडतंय म्हणून लगेच वही आगीत फेकून दिली.

पण काही म्हणा. स्वदेशात काही गोष्टी फार छान. म्हणजे या मुख्यमंत्री स्पर्धावाल्या संस्थांसारख्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर असं का नाही कुणी. काही मान्यता आहेत. पण एकूणात आंतरराष्ट्रीय निकषच वेगळे. त्यांना काम, भरभराट, प्रशासन एवढं पुरत नाही. त्यांना आमच्या रेझ्युमेवर सामाजिक बांधिलकी हवी; राज्यातील वातावरणात सांस्कृतिक, धार्मिक वैविध्य हवं; स्त्रिया, अल्पसंख्यांक विकासप्रक्रियेचा भाग हवेत; नि असं काहीच्या काही. म्हणूनच बाकीच्यांच्या नाकावर टिच्चून स्वतःच्या देशाची एवढी देदीप्यमान प्रगती होत असतानाही काही फालतू कारणांसाठी यांनी हिटलरला बदनाम केलं. काहीतरी घेऊन बसायचं मनात. हे सगळं काय करायचंय. कल्याणकारी राज्य संविधानात म्हणायला ठीक आहे. संविधानात तर आम्ही धर्मनिरपेक्ष नि समाजवादी आहोत असं पण लिहिलंय, नि बरंच काही. ते नाही पाळत तर कल्याणकारी राज्याचं काय एवढं. करायचीत काय लोकांची मतं वगैरे. विकास होतोय की नाही पहा डोळ्यात भरण्यासारखा...कम्युनिस्ट चीनसारखा...स्स्स्स्स...हे कुठलं डावरं भूत मानेवर येऊन बसलंय आज...

उद्या लगोलग नियम बदलले पाहिजेत. राज्यात सर्वत्र वाहतुकीच्या नियमांत बदल...आता "उजवीकडून चला". रेल्वेच्या रूळांवर जरा कठीण जाईल ते करणं पण. हे रेल्वेमंत्री अजून एक चौकशी समिती लावतील उगीच मागे. नि शिवाय त्यांचा धंदा नफ्यात आहे म्हणून राज्यातल्या काही नावाजलेल्या व्यवस्थापकीय प्रशिक्षण संस्थांत त्यांना मान आहे, म्हणून हात बांधले आहेत माझे. त्यामुळे रेल्वे सोडून.

सगळं असं आलबेल असताना हे असले विचार आले की आजकाल जरा उतारवयाचे वेध लागतात. जरा अंतर्मुख होतो. भीती वाटते. नाही नाही ते सुचतं...

त्वेषात कोरडा वारा, जलभार सोसुनी गेला
निःक्षात्र मेदिनी झाली, परशूच राहुनी गेला

भस्मासुरासही गर्वी वरदान शापसे झाले.
शापात सर्पदंशाच्या अहि जीभ चावुनी गेला.

बाप रे...

हे बाकीचे लोक म्हणतात ते खरं असेल तर असं काही वाढून ठेवलंय का आपल्यापुढे?...हिटलर, मुसोलिनीच्या यादीत बसवतात हे लोक मला. इटलीच्या लोकांविषयी मला विशेष प्रेम नाही पण हिटलर, मुसोलिनीच्या यादीत म्हणजे जरा अभिमानास्पदच आहे. पण आजकाल भलतंच मनात येतं...

फाशी मुसोलिनीचे ते इटलीत प्रेतही गेले
प्रारब्ध आज का माझे इतिहास सांगुनी गेला?

डावरा होण्यापर्यंत ठीक होतं, हे जरा जिवावरच बेततंय...असा एकटा पडलो तर शेजारी तरी थारा देतील का?...का तेही नाही....

राज्यात आज का राजा गुजराण शोधतो आहे?
रक्तात गुज्जरांच्या का दरबार वाहुनी गेला?

हा सगळा नाट त्या दिवसापासून लागलाय...तेव्हा काही वाटलं नाही त्याचं. पण पुन्हा पुन्हा तो प्रसंग आठवतो. वाटतं दाही दिशा उत्तरं मागताहेत. झोप नाही येत रात्र रात्र. कुठल्या तोंडाने द्यावं मी उत्तर? नि कुठल्या शब्दांत? आख्खं जग घालूनपाडून बोलतंय मला. बाप दाखव म्हणतात. माझ्याकडे काही कवचकुंडलं नाहीयेत त्यांच्याशी दोन हात करायला. एक नकोशी व्यक्ती मारली की दुसरी जन्म घेते. आत्तावर राज्यातली जनता शहाणी आहे. निमूट ऐकतेय माझं. पण तो तसला प्रसंग परत घडला नि लोक फिरले तर...एक चँनल...दोन चँनल...कितींची तोंडं बंद करणार?...छे...लोकांना बरं पाहवत नाही हेच खरं...

यज्ञात काल मी माझ्या हृदयास अर्पुनी आलो
का दान दोन शब्दांचे मज "कर्ण" मागुनी गेला?

Saturday, October 6, 2007

खरंय!

मी पडलो होतो, हेही खरेच आहे
मी चिडलो होतो, हेही खरेच आहे
एकटा एकदा, नजरा चुकवत, रुक्ष मनाने
मी रडलो होतो, हेही खरेच आहे

मी असे बोललो, हेही खरेच आहे
मी तसे बोललो, हेही खरेच आहे
बोलणे खुंटता, मूक बोल हे, उघडपणाने
मी कसे बोललो? हेही खरेच आहे

जग भकास होते, हेही खरेच आहे
मन उदास होते, हेही खरेच आहे
थांबल्या क्षणांचे, बेटावरले, खुल्या दिशेने
ते प्रवास होते, हेही खरेच आहे

मी कधी आलो, हेही खरेच आहे
मी कधी गेलो, हेही खरेच आहे
जाता येता, सांजसकाळी, हमरस्त्याने
मी कुणा दिसलो, हेही खरेच आहे

Wednesday, October 3, 2007

जे जे उत्तम...

मेघना टँग केल्याबद्दल धन्यवाद. इथे अमेरिकेत माझ्या हातात दोनतीनच पुस्तके आहेत, त्यामुळे तेवढेच पर्याय आहेत...शिवाय मी कुणाला खो द्यावा हा प्रश्नच आहे. पण धावत राहतो कुणाला खो देईपर्यंत...
........................................................................................................................................................................



"परमेश्वराचे स्वरूपच मुळी ज्ञान, असे भारतीय संस्कृतीत सांगितले आहे. परमेश्वराची, ब्रह्माची व्याख्या काय? "ज्ञानम् ब्रह्म" - ज्ञान म्हणजे ब्रह्म. ज्ञान म्हणजेच परमेश्वर. ईश्वराची याहून थोर व्याख्या जगाला कोणी दिली नाही. ईश्वराची उपासना करणे म्हणजे ज्ञानाची उपासना करणे, ज्ञानाची उपासना अनंत रूपांनी करणे। समाजशास्त्र असो, खगोलशास्त्र असो, भूगोल असो, इतिहास असो, आयुर्वेद असो, तत्त्वज्ञान असो, योग असो, कर्मयोग असो, गणित असो, संगीत असो, ती ती ज्ञानस्वरूप परमेश्वराचीच पूजा होय. एकाच ज्ञानसूर्याचे हे अनंत किरण आहेत. महाभारतातील श्लोकांइतकीच गणितातील प्रमेयेही पूज्य आहेत. श्रुति‍‍-स्मृतींच्या अभ्यासाइतकेच सृष्टिशास्त्राचे अध्ययन पवित्र आहे. सनातन धर्मातील ही थोर दृष्टी आपण पुन्हा उचलली पाहिजे. भारतीय संस्कृती तरच पुन्हा नवतेजाने नटेल. आज संस्कृतिरक्षणाच्या चळवळी होत आहेत. नवीन विचारांचे वारे येऊ नयेत म्हणून सनातनी नावाची मंडळे किल्ले-कोट बांधू पाहात आहेत. परंतु हे संस्कृतिरक्षक नसून संस्कृतिभक्षक आहेत. भारतीय संस्कृतीचे मढे ते कवटाळू पाहत आहेत व आतील प्राण गुदमरवीत आहेत. हे सनातनी नसून अ‍-सनातनी आहेत.


सनातन या शब्दाचा अर्थच काय? "सनातनो नित्य नूतनः|" जे नेहमी नवीन नवीन स्वरूप प्रकट करील तेच टिकेल. ज्या झाडाला नवीन पालवी फुटेनाशी झाली, ते झाड मरणार असे समजावे. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर म्हणतातः

"हे नित्यनूतन देखिजे| गीतातत्त्व||"


गीतेतील शब्दांचे अर्थ निरनिराळे दिसू लागतील. कारण त्या शब्दांकडे आज विसाव्या शतकातील परिस्थितीतून आपण पाहणार. अर्थाचा विकास होत असतो. शब्द लहान असतो, परंतु त्यातील अर्थ अनंत आहे. विचारांची उत्क्रांती सदैव होत असते.
भारतीय संस्कृतीची भव्य इमारत नवीन विचारांच्या वार्‍याने पडेल, अशी का या संस्कृतिरक्षकांना भीती वाटते? या नवीन विचारांच्या वार्‍यांनी जर ती पडण्यासारखी असेल, तर ती टिकण्यात तरी अर्थ काय? जरा आलेली वार्‍याची झुळूक ज्याला सहन होत नाही, तो क्षयी लवकरच मरणार, असाच नाही का ध्वनी निघत? भारतीय संस्कृती का अशी लेचीपेची आहे? आमच्या दृष्टीने ती तशी नाही. ज्ञानावर, अनुभवावर ज्या संस्कृतीचा पाया रचला आहे., त्या संस्कृतीला कधीही भय नाही. किल्लेकोट बांधून, भिंत बांधून ती बुरखा घेऊन बसणार नाही. हे बुरख्यातील बावळट पावित्र्य भारतीय संस्कृतीस नको आहे. नवीन विचारांचे भारतीय संस्कृतीस वावडे नाही. जगातील कोणतीही अनुभवाच्या कसोटीवर उतरलेली, ज्ञानावर उभारलेली संस्कृती आणा, भारतीय संस्कृतीचा तिच्याशी विरोध नाही.
जगातील प्रयोगांचा भारत उपयोग करून घेईल. भारतीय संस्कृतीचे दरवाजे मोकळे आहेत. साम्यवादाचे विचार आले, तर त्यात श्रीकृष्णाचे बालचरित्र भारतीय संस्कृतीस दिसेल. गोकुळातील लोणी चोरणारा श्रीकृष्ण, सर्व पददलितांची बाजू घेणारा श्रीकृष्ण, सर्व साम्राज्ये धुळीस मिळवणारा श्रीकृष्ण, त्याचेच दर्शन साम्यवादात भारतीय संस्कृतीचा आत्मा ओळखणार्‍यास होईल. "सत्याअसत्याशी मन केले ग्वाही" असे म्हणणार्‍या तुकारामाचेच दर्शन, "स्वतःच्या बुद्धीला पटेल ते करा" असे सांगणार्‍या ध्येयवादी नवविचारवंतात खर्‍या संस्कृतीच्या उपासकाला घडेल ! भारतीय संस्कृतीस भीती, नाश व मरण हे शब्द माहीत नाहीत. कारण ज्ञानाला नाश नाही, आणि ज्ञानावर ही संस्कृती उभी आहे."
-- साने गुरुजी, "भारतीय संस्कृती", १९३७.

Friday, September 28, 2007

एका तळ्यात...

दोस्तांतला कुणी कधीच हरला नाही
एकांत बोचरा सरात सरला नाही

पाण्यात पाहुनी नभात उडता कोणी
आधार द्यावया जळी उतरला नाही

खोळंबले कधी सुवर्णकण अस्ताशी
संधिप्रकाश तो पुन्हा पसरला नाही

रात्रीस काजवे खुशाल लपले रानी
अंधार साथ ही कधी विसरला नाही

पंखांत चंद्र तो जरा वितळला रात्री
सूर्यास पाहता परांत ठरला नाही