Friday, June 25, 2010

मुझसे पहली सी मोहब्बत

ह्या कवितेच्या वेगवेगळ्या स्रोतांमध्ये ओळींचा क्रम व काही ओळींचा अंतर्भाव-अभाव ह्याबाबत काही पाठ्यभेद आढळले. मल्लिका-ए-तरन्नुम नूरजहाँ ह्यांनी पाकिस्तान सरकारच्या ‘ही फ़ैज़ अहमद फ़ैज़ ह्यांची कविता आहे, म्हणून ती गाऊ नका’ ह्या दबावाला न जुमानता ही कविता एका सार्वजनिक कार्यक्रमात सादर केली. त्यांच्या ह्या बंडखोरपणाचं कौतुक म्हणून फ़ैज़ ह्यांनी नूरजहाँ ह्यांना "ही कविता आता तुमची झाली," असं म्हणून बहाल केली. अशी गोष्ट नूरजहाँनीच त्यांच्या एका मुलाखतीत सांगितली आहे. त्यामुळे, नूरजहाँ ह्यांच्या आवाजातील आवृत्ती हीच इथे मूळ आवृत्ती म्हणून वापरली आहे [१].

मूळ कवितेचे देवनागरी अक्षरांतर [२, ३] ---

मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब ना माँग

मैंने समझा था की तू है तो दरख़्शाँ है हयात
तेरा ग़म है तो ग़म-ए-दहर का झगड़ा क्या है
तेरी सूरत से है आलम मे बहारों को सबात
तेरी आँखों के सिवा दुनिया में रक्खा क्या है
तू जो मिल जाये तो तक़दीर निगूँ हो जाये
यूँ ना था मैंने फ़क़त चाहा था यूँ हो जाये

अनगिनत सदीयों के तारीक बहिमाना तलिस्म
रेशम-ओ-अतलस-ओ-कमख़्वाब में बुनवाये हुये
जा-ब-जा बिकते हुये कूचा-ओ-बाज़ार में जिस्म
ख़ाक में लिथड़े हुये खून में नहलाये हुये
लौट जाती है उधर को भी नज़र क्या कीजे
अब भी दिलकश है तेरा हुस्न मग़र क्या कीजे
और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा
राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा

--- फ़ैज़ अहमद फ़ैज़
(संगीत व स्वर: नूरजहाँ)

मराठी भाषांतराचा प्रयत्न [३] ---

आधीची तसलीच प्रीत फिरुनी मागू नको तू अता

हे आयुष्य झळाळते तुजमुळे हे लख्ख दीठी ठसे
खंता सर्व तुझ्या मनास छळता शल्ये जनांची कुठे
होण्या तो मधुमासही अमर ही गाली सुचित्रा वसे
डोळे ते वगळून सांग उरते बाकी युगांची कुठे
होता तू मम नाचवीन नियती माझ्याच तालावरी
हे काही नव्हतेच, केवळ मला वाटे असावे जरी

काळ्याकुट्ट भयाण कैक करण्या केल्या युगांनी किती
गंडेदोर नि भर्जरी, अतलसी, धादांत ते रेशमी
बाजारांत खुल्याच देह विकले जाती हटांनी किती
काया त्या धुळमाखल्या निखरण्या रक्तास नाही कमी
जाताना वळते फिरून तिकडे दृष्टी; करावे कसे?
आताही तव रूप बावनकशी, त्या मी भुलावे कसे?
प्रीती ही जगती न अंतिम व्यथा, बाकी व्यथा केवढ्या
बाकीही असतात हर्षद कथा, ज्या मीलनाला उण्या

[१] खालील दुव्याद्वारे आपण अन्य संकेतस्थळावर पुनर्निर्देशित केले जाल. त्या संकेतस्थळावरील संभाव्य प्रताधिकारभंगाचे उत्तरदायित्व ह्या सूचनेद्वारे नाकारण्यात येत आहे.
दुवा - http://www.youtube.com/watch?v=3-9DxXRJPwE
[२] ह्या मूळ कलाकृतीचे प्रताधिकार मूळ प्रताधिकारधारकांकडे, लागू होत असल्यास, सुरक्षित आहेत.
[३] मूळ साहित्यकृतीचे अक्षरांतर, अक्षरांतरित पुनर्मुद्रण, किंवा भाषांतराने कोणत्याही प्रताधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे त्या प्रताधिकारधारकांनी निदर्शनास आणून दिल्यास सदर मजकूर ह्या संकेतस्थळावरून वगळण्यात येईल.

Tuesday, May 25, 2010

यह जफ़ा-ए-ग़म का चारा

अबिदा परवीन ह्यांच्या स्वरातील गझलेची आवृत्ती येथे ऐकता येतील [१].

मूळ गझलेचे देवनागरी अक्षरांतर [२, ३] ---

यह जफ़ा-ए-ग़म का चारा, वह नजात-ए-दिल का आलम
तेरा हुस्न दस्त-ए-ईसा, तेरी याद रूह-ए-मरिअम

दिल-ओ-जाँ फ़िदाएँ राहें, कभी आ के देख हमदम
सर कू-ए-दिल फ़िगाराँ, शब-ए-आरज़ू का आलम

तेरी दीद से सिवा है, तेरी शौक़ में बहाराँ
वह चमन जहाँ गिरी है तेरी गेसूओं की शबनम

लो सुनी गयी हमारी, यूँ फिरें हैं दिन के फिरसे
वहही गोशा-ए-क़फ़स है, वहही फ़स्ल-ए-गुल का मातम

यह अजब क़यामतें हैं, तेरी राहगुज़र में गुज़रा
ना हुआ के मर मिटें हम, ना हुआ के जी उठे हम

--- फ़ैज़ अहमद फ़ैज़

मराठी भाषांतराचा प्रयत्न [३] ---

गांजणार्‍या व्यथांवर उतारा, ती मनाच्या मुक्तीची झांजर
लावण्यात दयाहस्त येशू नि तुझी याद मरिअमचे अंतर

जीव ओवाळल्या पायवाटा कधी येऊन तूही पहा तर
विद्ध हृदयातल्या सर्व वाटा, आसावल्या रात्रींचा जागर

ज्या वसंता लळा लावला तू, तो नजरपारखासा तुला बघ
तो बहरला मळा, जेथ झरली वेणीवरल्या दवाची ती सर

दाद सादेस पाहा मिळाली, दिवस असेही येती फिरून कि
तोच तो कैदकोना इथेही, सुतकी तोच फुललेला मोहर

चालताना तुझ्या पायवाटे विचित्रसे हे येतात प्रलय कि
नाही गेलो पुरते लयाला वा झालो सचेतन त्यानंतर

[१] खालील दुव्याद्वारे आपण अन्य संकेतस्थळावर पुनर्निर्देशित केले जाल. त्या संकेतस्थळावरील संभाव्य प्रताधिकारभंगाचे उत्तरदायित्व ह्या सूचनेद्वारे नाकारण्यात येत आहे.
[२] ह्या मूळ कलाकृतीचे प्रताधिकार मूळ प्रताधिकारधारकांकडे, लागू होत असल्यास, सुरक्षित आहेत.
[३] मूळ साहित्यकृतीचे अक्षरांतर, अक्षरांतरित पुनर्मुद्रण, किंवा भाषांतराने कोणत्याही प्रताधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे त्या प्रताधिकारधारकांनी निदर्शनास आणून दिल्यास सदर मजकूर ह्या संकेतस्थळावरून वगळण्यात येईल.

Monday, May 24, 2010

आठवतात अजून

आठवतात अजून
कंटाळलेल्या पोरासारखे
दोन्ही हातांच्या मुठी
दोन्ही गालांत खुपसून
त्या खोबणीत ठेवलेल्या हनुवटीवर
ओठ मुडपून
शून्यात रोखलेले
स्वप्नाळलेले निर्वेध अनभिज्ञ डोळे
आठवतात अजून

आठवतात अजून
एका हाताची मूठ डोक्यावर मागे ठेवून
मूठ वळलेला दुसरा हात फक्त कोपरात वाकवून
नि त्याचा खांदा जरासा ताणून
बिनदिक्कत दिलेले मनमुराद आळोखेपिळोखे
आठवतात अजून

आठवतात अजून
जगाच्या अनोळखी, अर्थहीन प्रश्नांना
उत्तर देण्याच्या फंदातही न पडता
"काय ते?" असले प्रश्नार्थक झालेले डोळे
नि "अंS" असं काहीसं म्हणणारे निष्कपट आवाज
आठवतात अजून

आठवतात अजून
त्या कंटाळ्यातही
अचानक मनचं दिसलं काही
की जराही अडकून न पडता
त्या गोतवळ्यातून
स्वत:ला लगोलग सोडवून
तिकडे धावणारे स्वच्छंदी पाय
आठवतात अजून

आठवतात अजून
त्या मनस्वी निरागस विश्वाला
जगाशी सांधणारे
नि त्या विश्वांमधील
स्वत:च्या मर्जीवर चाललेली आतबाहेर
बेलगाम होऊ देणारे
निर्व्याज आश्वासक हात
आठवतात अजून

आठवतात अजून
एकसंध आरशात निरखून पाहताना
माझ्या विखुरलेल्या प्रतिबिंबांचं कोलाज जुळतं तेव्हा
नि कधी तुझ्या ते बिंबात दिसल्यावर
तुझा अनसूयेने हेवा वाटतो तेव्हा
आठवतात अजून.

Wednesday, April 21, 2010

निमिषा,

जोडलेली माणसं तोडण्याच्या संध्याकाळी
हे तोडावं की तुटू द्यावं ह्या यक्षप्रश्नात
मी आरक्त बुडलो असताना
रात्रीचा पडदा ओढण्याची तुला कोण घाई झाली होती.
पडद्याची उघडझाप करून त्या सापळ्यात
जयद्रथाला पकडण्यासारखी चमत्कारिक क्षमता तुझ्यात नव्हती,
तर निदान थोडा धीर धरून वाट पाहायची होतीस -
ह्या निष्प्राण तळ्याकाठी माझ्यात धर्म सर्जतोय का ह्याची.

दुसरा युधिष्ठिर निर्माण होऊ न देण्याचा
द्रोणाचार्यमक्ता तू घेतला होतास काय?

तुझ्या क्रौर्याची कल्पना
तू त्यांचं बॅड लाइटचं अपील उचलून धरलं होतंस
तेव्हाच खरं तर मला आली होती.
नि वॉर्निंग बेलच्या आधीच असा
पेपर हातातून हिसकावून घेताना तर
तू आता कहर केला आहेस.

काळा बाळा, तुला कळतंय का
की सामना अनिर्णित ठेवण्याचा पर्याय
मला उपलब्धच नव्हता ते?
हे अस्ताचे शंखनाद विजयोन्मादाचे आहेत;
ते काही गिरण्यांचे सकाळसंध्याकाळचे भोंगे नव्हेत.
आपलं सर्वसाक्षित्व, अखंडत्व, प्रवाहित्व उमजून
किमान तू तरी
आजचं मरण उद्यावर ढकलणारी
खेळाचे नियम इत्यादीची
ही बाष्कळ चाकोरी
निर्भय होऊन झुगारून द्यायला हवी होतीस.
का तुलाही आता आवडू लागलंय
हे ऑफिस टाइम युद्ध?

दिवसभर
रणावर
हव्या तशा नियमांचे
हवे तसे अर्थ लावून
कधी रोखून, कधी जोखून
कधी आखून, कधी माखून
कधी राखून, कधी चाखून
चक्रव्यूहाशिवायही
नि:शस्त्राला आत घेऊन
मुरारबाजीचं धड होऊन
एकामेकी तुटून पडू
तुटायचंय तर जोडताय कुठे
दिवस येतात सुटे सुटे
पाचा दिवसांचा पाचुंदा
जल्लोषाने बांधूया
जल्लोषाला चिता बर्‍या
रेडीमेड शेकोट्या
शेकोटीला हल्ली तो म्हातारा येत नाही
बाणांच्या खाटेवर निजूनसुद्धा चचत नाही
आम्हांला त्याचे काय? त्याच्या जखमा कोण स्मरेल?
मरायचा तेव्हा मरेल, त्याला हवं तेव्हा मरेल
म्हातार्‍याला जखमा फार,
गोतावळ्याच्या चिंता फार
एकटं एकटं जगूनसुद्धा सगळंच म्हणतो सुटत नाही
बाकीच्यांनी तोडलं तरी सगळंच म्हणतो तुटत नाही

त्याचे हे प्रश्न सोडवत मी इथे निकराने उभा आहे
तो काय गंमत म्हणून?
ते आता माझेही झालेत हे तुला कळू नये
म्हणजे कमाल झाली.
त्या बेफिकीर, सोप्या सोप्या,
गोग्गोड, सुट्या सुट्या
जगाशी सामील झालेल्या तुला
काही गहन प्रश्न आता झेपतील असं मला वाटत नाही.
त्यामुळे तुझ्यावर ते सोपवण्याचं व्यासधैर्य मला होत नाही,
किमान म्हणून तरी
जरा धीर धरला असतास
तर निमिषा, तुला असा कुठे जायला उशीर होत होता?