हा चौक आणि त्याच्यापुढचं जैन मंदिर यांच्यामधोमध एक जुनाट वाडा होता. तो कित्येक दिवस तसाच भर रस्त्यात उभा होता. म्हणजे खरं तर तो आपल्याच जागी होता. त्याला हळूहळू रस्त्यावर आणलं होतं. ह्या जैन मंदिराच्या बरोबर समोर आणिक एक मंदिर आहे. कधीच गेलो नाही मी तिथे. का कुणास ठाऊक? जैन मंदिराचीसुद्धा खरं तर फार आठवण राहिली नसती. पण काही शिल्पकार अशी काही जादू करतात की आपल्या एखाद्या शिल्पाची आठवण कुणी वर्षानुवर्षे काढतंय ह्याची त्यांना कल्पनाही नसेल. त्यांच्या बोटांमधली जादू बघून जग खूश होताना त्यांची पोटं भरली होती की नाही कोण जाणे? ताजमहाल बांधणार्या हातांची आठवण न येता ताजमहाल पाहता येतो का? मला तरी नाही. तसेच ते हत्ती पाहताना. देवळाच्या दाराशी दोन बाजूला दोन देखणे निळे हत्ती. कधीही ह्या रस्त्यावरून जाताना सवयीने मान वळायची हत्ती पाहायला. जैन मंदिर नि द्वारपालासारखे सोंड वर करून उभे असणारे हत्ती असं एक विचित्र पण पक्कं समीकरण डोक्यात बसलंय माझ्या लहानपणापासून. मागे मंदिराचा जिर्णोद्धार झाला नि एक भव्य पांढरी इमारत उभी राहिली आजूबाजूला. सुदैवाने ते हत्ती तसेच राहिले, फक्त एका पांढर्या हत्तीची भर.
खरं तर तसंच पुढे जायचं कोपर्यावरच्या कचराकुंडीपर्यंत. पण मंदिराच्या पुढे जरासं आतल्या गल्लीतून जायचं. एका आतल्या रस्त्यावरच्या कचराकुंडीच्या, नि त्रिकोणी बागेच्या बाजूने. आता आपलं जन्मस्थळ ही काही राष्ट्राने जतन करून ठेवण्याची वास्तू नसली, तरी कौतुक असतंच ना निदान आपल्याला तरी. तीच ती जागा. त्याच्या चार पावलं पुढे घर. नि त्याच्या अजून चार पावलं पुढे मशीद. कानात भरलेली ती बांग. शब्द कधीच कळले नाहीत आजवर. स्तोत्रांचे अर्थ कोणाला कळतात म्हणा. पण ते जे सूर लागतात ना. ऐकत रहावं. आर्त ह्याशिवाय दुसरा शब्दच सुचत नाही मला. पुढे "स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे" ही ओळ ऐकल्यावर मला सर्वांत प्रथम ते सूर आठवले होते. ते दिवसभर घुमणारे आर्त सूर, जाईची नाजूक वेल, जाळीचं कोरीवकाम, सर्व गोष्टींत भरलेली पांढरी हिरवी रंगसंगती नि ह्या सगळ्यामुळे आपसुक येणारा असीम शांतपणा. हेच सगळं इथूनच गझलेध्ये उतरलं असेल का?
कुठे सुरांच्या आठवणी तर कुठे साजांच्या. मी कधीच ऐकलं नाही ते वायोलिन पण म्हणे कोपर्यावरच्या एका ज्यू कुटंबात कुणी रोज वाजवायचं. कसलं वाटत असेल ना रोज ऐकताना? आतली गल्ली मूळ रस्त्याला मिळते तिथेच. हल्ली त्याला सिनेगॉग चौक म्हणतात. त्याच गल्लीच्या खालच्या कोपर्याला. हल्ली त्याचाही जिर्णोद्धार होतोय. त्याच्यावरची दगडाची पाटी तशीच होती पण, नि ती चांदणी. शाळेत सगळ्यात पहिले शिकतो ना आपण चांदणी काढायला, एकात एक दोन त्रिकोण, एक वर बघणारा नि एक खाली बघणारा, तशी, सहा कोनांची, मूलभूत. वय वाढलं की हात न उचलता पाच टोकांची चांदणी शिकतो आपण, चंद्राबरोबर काढतात तशी. धर्मांचंही काहीसं असंच झालंय का? कोण कुठले कधी आले नि ह्या मातीचे कधी झाले, सारंच विचित्र. सर्वसमावेशकता, धर्मनिरपेक्षता हे शब्द काय संविधानाने ह्या भूमीला दिले? आधी आडात असावंच लागतं. मोठेपणा त्या चवदार पाण्याची चव कळण्यात असतो. कुणी तो पाणवठा इतरांसाठी खुला करतो, तर काहींना आपल्या रसशून्य गर्दभवृत्तीचाच आत्यंतिक अभिमान. सिनेगॉगच्या बाजूने वाहणारा नाला नि पुढे नाल्यापलीकडल्या वस्ती. त्या द्रष्ट्याच्या नावाच्या रस्त्याला धरून अजून उभ्या आहेत.
(क्रमश:)