Wednesday, April 2, 2008

आवरा...

'आवरणे' या धातूचे आज्ञार्थाचे द्वितीय पुरुषाचे अनेकवचन म्हणजे 'आवरा'. ते आदरार्थी अनेकवचन वगैरे पण. म्हणजे नाही का म्हणत..."चला उशीर होतोय. पटापट आवरा", किंवा, "आवरा तो पसारा". तर असे ह्याचे रूढार्थाने वाक्यात प्रयोग होतात. 'वरणे' असाही एक धातू आहे. बहुदा पंत लोक वापरत असत. "श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी" वगैरे. श्लेष अलंकाराच्या या standard उदाहरणाव्यतिरिक्त हा शब्द क्रियापद म्हणून मराठीच्या शिक्षणात चुकूनसुद्धा आला नाही. त्यालाच हा 'आ' उपसर्ग लागत असावा. पण त्यांचा अर्थार्थी काही संबंध नसावा. हल्लीच ह्या शब्दाची बोली शब्दकोषात बर्‍याच वर्षांनी पुन्हा एकदा नव्याने भर पडली आहे. नि त्या शब्दाच्या उच्चारातून होणारी प्रभावी अर्थनिर्मिती अगदी वाखाणण्यासारखी आहे. त्यामुळे इसवीसनानंतरच्या २००८व्या एक एप्रिलचे औचित्य साधून ह्यावर काही फसवं लिहावं, नि एक एप्रिलच्या अनुषंगाने ह्या विषयाचा सोदाहरण परामर्श घ्यावा अशी एक कल्पना कालच्या मंगलदिनी स्फुरली. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच. (एक आतला आवाज: आवरा...)

तर थोडंसं "आवरा" विषयी. साध्या अर्थाने हा शब्द साधारणपणे, "आव्रा" असा भसकन उच्चारतात नि मोकळे होतात. पण ह्या शब्दाची खरी मजा तो "आव'राऽऽ" किंवा "आ'राऽ" अशा काहीशा उच्चारांमध्ये आहे. म्हणजे थोडा वैतागवाणा 'आ', अगदी जोर देऊन भक्कम उच्चारलेला 'व', आणि जरा हेल काढून म्हटलेला 'रा'. साधारणपणे "पुरे आता", "बास", "अति झालं", "ही व्यक्ती सुटल्या, तीला कुणीतरी थांबवा", "निघा आता", असे अनेक प्रसंगानुरुप अर्थ असलेला हा शब्दप्रयोग पुण्यात उदयास आला आहे, असा एक मतप्रवाह आहे. पण हे अशक्य आहे, असेही काही अशक्य पुणेकर सांगतात. असो. पुणेकर नसल्यामुळे माझ्यावर या गोष्टीवरून चर्चेला तोंड फोडायची कोणतीही नैतिक जबाबदारी नाही. (पुन्हा एकदा एक आतला आवाज: आवरा...)

मी बहुदा निर्बुद्धच निपजलोय, असा एक सार्वत्रिक भ्रम समस्त विश्वाने करून घेतल्याचे काल सकाळपासून दिसून आले. म्हणजे आज इतक्या दिवसांनी सगळी शिरस्त्राणं, उबदार पोशाखांची ओझी न वाहता जाण्याजोगी हवा होती. तर म्हटलं दिवस मजेत जाईल. पण नाही, "एक एप्रिल बरं का आज"...असं अगदी जागोजागी ठसवत होते. सकाळी लोकसत्तेनं "अखेर मुख्यमंत्री बदलले" असा एक माफक प्रयोग करून पाहिला. म्हटलं "बऽर...". माझ्या आठवणीत काही वर्षांपूर्वी मुंबई टाइम्सने सगळ्यांत आधी हा हसावाफसवीचा खेळ केला होता. स्मार्ट मित्राच्या चंट पुरवणीचे बाष्कळ चाळे. (आता राज्यसभेची अधिकृत उमेदवारी मिळाल्यावर या स्मार्ट संपादकांनी ही असली चंट पुरवणी बंद करावी, तसेच वृत्तपत्राचे नावही मराठी पाहिजे म्हणून "महाराष्ट्र काल" (काल म्हणजे काळ, वेळवाला काळ, कालच्या बातम्या वगैरे काही संबंध नाही) असं नामांतर करावं, असा आग्रह सुरु केला आहे, असं ऐकतो. खरं का हो?) त्यानंतर सगळेच ते करताहेत. मध्यंतरी काही दृकश्राव्य माध्यमातील वृत्तवाहिन्यांनीही हा खेळ खेळून पाहिला म्हणतात. पण त्यांच्या एरवीच्या बातम्या नि त्या तसल्या फसव्या बातम्या ह्यांच्यात काहीच फरक न आढळल्यामुळे लोकांना आपण रोजच फसवले जात आहोत, असं वाटू लागलं व TRP कमी झाला. म्हणून तेवढा नाठाळपणा थांबला. पण तसा नाठाळपणा करणारी व थांबवणारी आमचीच वाहिनी पहिली असं मग त्यांनी मिरवून घेतलं. तर एक एप्रिलला फसवू पाहणार्‍या समस्त पत्रकारांनो, आ'राऽ!

लोकसत्ता बंद करून जी‍मेल उघडलं. यंदा काय कर्तव्य पार पाडलंय त्यांनी एक एप्रिल निमित्त ते पाहाण्यासाठी. मागे एकदा एक एप्रिलला ह्या लोकांनी तुमचे सर्व इ‍मेल प्रिंट करून धाडण्याची मोफत सोय आम्ही केली आहे असं सांगितलं. तेव्हा उंचावलेल्या भुवयांनंतरसुद्धा मी दर एक एप्रिलला फसावं अशी ह्यांची समजूत असेल तर त्यांच्या निरागसपणाची कदर केली पाहिजे. यंदा म्हणे काय तर तुमच्या दहा इमेलची वेळ बदलून देऊ. (एक आतला आवाज: बऽर...). त्यानंतर म्हणे काही जण ही सुविधा म्हणताहेत खरे जीमेल वाले, पण अजून सापडत नाहिये इमेल compose करताना, अशी तक्रार करत होते. म्हणजे लोक फूल असतात तर. जीमेलवाले खूश झाले असतील. किती टक्के लोक फसले म्हणजे ही marketing/ advertising/ creative/ किंवा ज्या कुठल्या प्रकारात मोडत असेल त्या प्रकारची कल्पना यशस्वी झाली असं व्यवस्थापन तज्ज्ञ (म्हणजे थोडक्यात जो कुणी उठतो तो) मानतात? (एक कुतूहल.) तर झाली असेल यशस्वी वा नसेल. पण हे लोक एवढ्यावर थांबत नाहीत. ह्यावर एक आख्खं webpage खाणारी माहिती देतात. त्यात एक सूत्र मांडलेलं की दहाच इमेल का, कुठलासा एक paradox शोधून काढलेला नि त्याची wikipedia ची link. आजकाल हे एक बरं झालंय, उठसूठ wikipedia च्या links द्यायच्या. तीन कारणं असावीत. एक - एकदा wikipedia ची link दिली की तुम्ही सुटलात. वर संदर्भ दिल्याची मिजास. दोन - लोक wikipedia ची link उघडून तिकडे गेले की त्यात गुंतून पुन्हा परतत नसावेत. म्हणजे तुम्ही परत सुटलात. तीन - तरीही काही परत आलेच तर त्यांना ज्ञान वाटल्याचं श्रेय मोफत. पण मुळात कशावरून ही wikipedia ची लिंक जे काही बरळते ते तुम्हीच लिहिलं नसेल. तिथे काय कुणीपण कायपण लिहू शकतं. (पुन्हा एकदा एक आतला आवाज : आ'राऽ...) तर अशी एक wikipedia ची लिंक, अजून बरीच अगम्य माहिती नि आम्ही कित्ती कित्ती हुशार असा आव असलेला मजकूर. म्हणजे ह्या लोकांना सवयच आहे ती. फसवतानासुद्धा शिस्तीत, पद्धतशीरपणे व आपल्या चातुर्याचं प्रदर्शन करून फसवतात. अशा काही साम्राज्यवादी शक्तींच्या वसाहती अमेरिकेच्या पश्चिमकिनारी नांदतात. लोकांना आपल्या अधीन करणे, सतत आपल्या चातुर्याने एकमेकांवर कुरघोड्या करणे, काळ मागे लागल्यासारखे धावत सुटणे व पर्यायाने इतरांना तुम्ही काळाच्या किती मागे आहात असा न्यूनगंड देणे असा ह्या सर्व साम्राज्यवादी शक्तींचा चारकलमी कार्यक्रम आहे. तर एक एप्रिलला फसवण्याचा परवाना असल्यामुळे अधिकृतपणे व एरवी अनधिकृतपणे हसवाफसवीचे खेळ खेळणार्‍या सर्व पश्चिमेच्या शक्तींनो, आ'राऽ!
(पुन्हा एकदा एक आतला आवाज: जरा जपून...नाही ब्लाँगपण त्यांचाच आहे.
दुसरा आवाज: असू देत. मग ही ब्लाँगच्या आत्महत्येआधीची चिठ्ठी आहे असं समजा.
पहिला आवाज: बऽर.)

हे सर्व करून एक तास वर्गात बसून आलो. सुदैवाने प्रोफेसरने आवरा म्हणायची वेळ काल आणली नाही. एरवी तो ती वारंवार आणतो. परत lab मध्ये आलो तर दारावर प्रोफेसरच्या नावाने एक चिठ्ठी डकवलेली. "आज lab बंद आहे". निम्मी चिंकी मंडळी आपण ह्या गावचेच नाही अशा नेहमीच्या तंद्रीत होती. उरलेली स्वतःवर उगीच हसत होती. (नेमकं कारण कळू शकलं नाही त्यामुळे हेच असावं). नि माझं त्या अज्ञात संदेशवाहकाला एकच सांगणं होतं, "अरे सद्गृहस्था, जर तुला हा खेळ खेळायचाच होता तर चोरून रात्री भिंतींवर पोस्टर्स लावतात तसं तू ते काल रात्रीच करायला हवं होतंस. किमान सकाळी lab मध्ये आपण शेवटी येणार नाही याची तरी काळजी घ्यायला हवी होतीस. conference साठी परगावी गेलेल्या प्रोफेसरचं नाव तरी खाली टाकायला नको होतंस. नि मुख्य म्हणजे हे सगळं करणं तुला भागच होतं का? तेव्हा भाऊ, आ'राऽ!"

(पुन्हा एकदा एक आतला आवाज: आता तुम्ही आवरा...) तर एक एप्रिलच्या निमित्ताने दैनंदिन आयुष्यात नाहक नाट्यमयता आणू इच्छिणार्‍या या केविलवाण्या प्रयत्नांच्या व त्यांच्या कर्त्यांच्या उदाहरणांवरून (आ. आ.: आवरा...) (व्याकरणातला कर्ता नव्हे हं)(आ. आ.: रा...) लोकांना आवरतं घेता येत नाही हे आपल्यासारख्या सुज्ञ वाचकास कळले असेलच. ह्या विषयाची तोंडओळख म्हणूनच या लेखाकडे पाहिलं जावं, ह्या विषयावरील समग्र माहितीचे संकलन व त्यानुरूप विवेचन (आ.आ.: आ'रा...) हे ह्या लेखाच्या सीमित व्याप्तीत बसणं शक्य नाही...(आ.आ.: आ'राऽ...). ह्या शब्दाचा वारंवार वापर करण्याच्या संधी वारंवार प्राप्त होत असतातच. तर त्या त्या वेळी ह्या शब्दाचा खाजगी अथवा जाहीर वापर करून आपण त्याच्या भाषिक व व्यावहारिक सौंदर्याची व सामर्थ्याची अनुभूती जरूर घ्यावी. (आ.आ.: आ'राऽऽऽ...). तेव्हा मा. सोनियाताईंचा आदर्श समोर ठेवून आतल्या आवाजाच्या विनंतीस मान देऊन...इत्यलम्!

Monday, March 24, 2008

I think, therefore...

कधी समुद्राच्या लाटांकडे बघत किनार्‍यावर बसावं आणि विचारून पहावं की या लाटा नेमकं काय करताहेत?...

समुद्रात बंदिस्त राहून कंटाळल्यामुळे किनार्‍यावर येताच जरा वाट सोडून धावत असाव्यात. समुद्राच्या भरती ओहोटीशी एकरूप होऊन किनार्‍यावर त्या जाणीवा उमटवत असाव्यात. गंगोत्रीत पाझरलेल्या थेंबापासून दक्षिण गंगोत्रीत वितळलेल्या हिमाच्या थेंबापर्यंतचं आपलं सारं अनुभवाचं गाठोडं किनार्‍यावर सोडत असाव्यात. कधी मधेच आलेल्या खडकावर फुटून उत्स्फुर्तपणे व आर्ततेने किनार्‍यावर झरत असाव्यात. कधी गर्त्याच्या खोलीचा किनार्‍याला नेमका अंदाज देत असाव्यात. कधी त्यांच्यातील लयीचं संगीत करत असाव्यात तर कधी त्या लयीवर स्वार होत गुणगुणत पाण्याचे थेंब किनारा गाठत असावेत. किंवा कदाचित कुठल्याशा पृथ्वीवरही नसणार्‍या चंद्रसूर्यांच्या तालावर नाचत असाव्यात. प्रत्येक वेळी या प्रश्नाचं उत्तर वेगळं असेल. पण हे सगळं सामावून घेणारं एक उत्तर सध्या असं वाटतंय की, ह्या लाटा समुद्राची सगळी ऊर्मी किनार्‍यावर उधळून देत आहेत, चंद्रसूर्य केवळ निमित्तमात्र.


लिखाणाची ही ऊर्मी नेमकी कशात आहे हे सांगणं कठीण आहे. अनेक गोष्टींची ती एकत्रित परिणती आहे. कधी गाज नसलेला पाऊस ती जागवतो तर कधी भयाण शिशिर. कधी स्वतःची मनःस्थिती एखादी लहर निर्माण करते, किंवा बर्‍याचदा तीची अव्यक्तता तशी लहर निर्माण करते. कधी एखादी नितांत सुंदर अभिव्यक्ती दाद द्यायला भाग पाडते. कधी कुठल्या क्रौर्याने आलेल्या विषण्णतेवर एखादी लाट फुटत असते. आसपासची राजकीय, सामाजिक परिस्थिती तर नेहमीच लाटा प्रवृत्त करत असते. बर्‍याचदा यातली एखादी गोष्ट निमित्तमात्र ठरते नि उठणारी लाट जाणीवेत असणारे सर्व विचार पार्श्वभूमीला ठेवते. कधी एक खेळकर ऊर्मी असते, चालीशी, शब्दांशी खेळण्याची. वरवर खेळ, पण बर्‍याचदा विचारपूर्वक अभिव्यक्ती. निदान उथळ पाण्याचा खळखळाट न करण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न.


मला वाटतं जर एका शब्दात उत्तर द्यायचं असेल की काय आहे म्हणून लिहिणं आहे, तर "विचार" असं मी म्हणेन. अगदी रेने देकार्तेच्या "I think, therefore I am" च्या धर्तीवर "I think, therefore I write" असंही म्हणेन. ते मूळ आहे. मग त्यानुरुप माध्यम. चीड व्यक्त करायला उपहास, थेट मनातलं असेल तर कविता हे सगळं नंतरचं. सर्वांच्या मूळाशी अव्याहत चाललेला विचार. निदान काही जाणवलेलं व्यक्त करण्यापेक्षा त्याचं विश्लेषण करून ते व्यक्त करण्याचा, काही नवीन करण्याचा प्रांजळ प्रयत्न. किनार्‍यावर उमटलेल्या प्रत्येक लाटेसह विचार प्रगल्भ व्हावेत व लेखन समृद्ध व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे.

हा विचार डोक्यात आणवल्याबद्दल मेघनाचे नि ही लाट निर्माण करायला निमित्त ठरल्याबद्दल राजचे मनापासून आभार.

माझा खो केतनला.

Friday, March 21, 2008

जगता जगता

मेघनाच्या जगता जगता या लेखावर एक प्रतिक्रिया...


जोडलेल्या नाळेवर कुढत काढले दिवस होते, गर्भामध्ये जगता जगता
तोडलेल्या नाळेवर कुढत काढले दिवस होते, विश्वामध्ये जगता जगता


काही नाळ तुटूनही जन्मभर फिरत राहतात, त्या काजळी कोपर्‍यांकरता
पृथ्वीही त्याचसाठी अव्याहत जाळते इंधन, गाभ्यामध्ये, जगता जगता


दवामधून विखुरणारे रंग कधी पाहत असेल, फुलपाखरू हलकेच उडता
सापडतही असेल कधी सुरवंटाचा रंग त्याचा रंगांमध्ये, जगता जगता


शिखरावर पाझरलेला थेंब व्यर्थ शोधत असेल, संथ नदीही वळता वळता
कोसळताना अवचित तो तुषार होऊन दिसत असेल सार्‍यांमध्ये, जगता जगता


चुकून कोकिळ स्वर चुकला, फांदीवर नुसताच बसला, आंब्यावरती गाता गाता
सूर आत जुळला होता, कधी कानांवर पडलेला, अंड्यामध्ये जगता जगता

Wednesday, February 20, 2008

कोई कलमा मुहब्बत का दोहराते फरिश्ते हैं

प्रति
आशुतोष गोवारीकर


चित्रपटासाठी भारताच्या तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भांचा canvas निवडण्याची तुमची ही तिसरी खेप आणि त्या canvas वर चित्रपटाची गोष्ट पार्श्वभूमीच्या आणि गोष्टीच्या बारकाव्यांसह समर्थपणे उभी करण्याचीही. त्यासाठी तुम्हांला तिसरा सलाम !

दिवसेंदिवस अधिकाधिक असहिष्णु होणार्‍या ह्या समाजमनाला परमतसहिष्णुतेविषयी इतकी कळकळ असणारा एक राजा ह्या देशावर राज्य करून गेला, ही गोष्ट सांगायचं ठरवलंत त्याबद्दलही सलाम. त्या राजाने ही सहिष्णुता एक राजा म्हणून, एक मुलगा म्हणून, एक नेता म्हणून, एक पती म्हणून, एक प्रियकर म्हणून, एक भाऊ म्हणून नि मुख्यत्वे एक माणूस म्हणून कशी जपली, हे दर्शविणार्‍या तरल अभिव्यक्तीलाही सलाम. ही गोष्ट जितकी अकबराची तितकीच जोधाची (अगदी "जैसे दो सूर हो मध्धम, ना कोई ज्यादा ना कोई कम राग में" इतकी). रयतेच्या हितासाठी प्रजाभिमुख राजाने केलेला व्यवहार, हे भयंकर प्राक्तन स्वाभिमानाने स्वीकारून एका बलाढ्य राजाला नि पर्यायाने राज्यसत्तेला प्रजाभिमुख करणार्‍या राजपूत युवराज्ञीची कथाही तितक्याच सशक्तपणे उभी केल्याबद्दलही सलाम.

तशा तिन्ही प्रेमकथाच. तिन्ही वेगळ्या. तिन्हींचे भिन्न संदर्भ. पहिल्या दोन्हींत खरं तर प्रेमकथा हा दुय्यम भाग होता, पण तुम्ही तोही अगदी हळुवार टिपला होतात. इथे प्रेमकथा केंद्रस्थानी होती. पण ही प्रेमकथा दोन राज्यसत्तांच्या राजकारणाची परिणती होती. साहजिकच तदनुषंगाने येणारे संदर्भ आणि व्यक्तिमत्त्वाचे पैलू हे प्रेमकथेइतकेच महत्त्वाचे असणार. ज्या व्यक्तींचे वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्य अभिन्न आहे, त्यांची प्रेमकथासुद्धा त्या संदर्भांशिवाय अर्थहीन ठरते. पण बर्‍याचदा फक्त प्रेमकथेला महत्त्व देण्याचा मोह दिसतो. आपण त्या मोहाला बळी न पडता जोधा व अकबर यांची स्वतंत्र व्यक्तिमत्त्वंही उभी केलीत, त्याबद्दलही सलाम.


सुरुवातीपासून अखेरपर्यंत जोधा व अकबर यांच्यावरचा focus जराही विचलित होऊ दिला नाहीत, हे आवडलं मला. जोधा‍ - अकबराच्या कथेत बिरबलाच्या चातुर्यकथांचा मसाला भरला नाहीत, त्याबद्दल आभार. किती नानाविध माध्यमांतून तुम्ही नि तुमच्या सहकार्‍यांनी काही ना काही व्यक्त केलंय. म्हणजे माझं त्या सर्वच माध्यमांबद्दलचं ज्ञान अगाध असलं तरी माझ्या सामान्य बुद्धीला जे जे रुचलं ते ते पाहून तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं असं वाटलं. जोधाला परत घेऊन जाण्यासाठी आलेल्या अकबराच्या स्वागताच्या दृश्यात भगवा रंग नुसता भरलाय आसमंतात. याआधी भगवा रंग एवढा आल्हाददायक कुठे पाहिला होता हे आठवावंच लागेल. जलालचं अकबरीकरण होतानाच्या गाण्यात तर रंग नि नृत्याची नजाकत भरली आहे. पण जेव्हा "ख्वाजा मेरे ख्वाजा" म्हणताना हिंदुस्तानचा बादशाह तन मन अर्पून त्यात एकरूप झाला ना तेव्हा त्या नृत्याच्या सादगीतून केवढी मोठी अभिव्यक्ती केलीत तुम्ही. तेव्हाच इतिहासाचे, नि घटनांच्या तपशीलांबद्दलचे फिजूल प्रश्न संपूर्ण निरर्थक झाले. अकबराचं एवढं सुरेख interpretation विरळाच ! त्या गाण्यासारखंच संपूर्ण चित्रपटात राजेशाही डामडौलात जपलेल्या त्या काळाच्या उपजत साधेपणासाठी सलाम.

रहमान, जावेद अख्तर हे तर "प्रतिभा गहाण टाकल्यास जग विकत घेता येईल" या categoryत मोडत असल्यामुळे ती बाजू उत्तमच असण्याची स्वाभाविक अपेक्षा होती. पण ह्या दोघांनी चित्रपटागणिक कलेला अधिक उंचीवर नेण्याची प्रथा इथेही अखंडित ठेवली आहे. लगानमध्ये त्यांनी "मितव्या"ला हाक मारली होती, स्वदेसमध्ये "देख त्यजकर पाप रावण, राम तेरे मन में है" अशी विचारघन वाक्यं सहज फेकली होती. नेहमीच चळवळींची गाणी वाटलीत ती मला. इथे तर म्हणजे थेट भजनापासून सुफी कलामांपर्यंत नि तरल प्रेमगीतांपासून भाटांनी राजाच्या स्तुतीसाठी लिहावं, अशा गीतापर्यंत प्रतिभा नुसती ओसंडून वाहतेय. ज्या प्रतिभेला तुमच्या बहुतांश समकालीनांच्या अगदीच सरधोपट कथांमध्ये वाव मिळणे कठीण आहे, तिची योग्य कदर केल्याबद्दल सलाम. रहमान तर बहुदा पहिल्यांदा वाक्यातले शेवटचे दोन शब्द आणि शब्दातील शेवटची दोन अक्षरं संगीतात दडपून न टाकता (बर्‍याच अंशी) गायला असेल.

माझ्याबरोबरच्या साधारण वीस पंचवीस लोकांना हा चित्रपट रटाळ वाटला, त्यामुळे हा काही सार्वत्रिक लोकप्रिय नाही. नसू देत. सोळाव्या शतकातल्या दोन राज्यसत्तेंमधल्या राजकारणातून जन्मलेली हळवी प्रेमकथा, त्यातून जन्मलेले एक परिपक्व नातं, त्यातून झालेली सांस्कृतिक देवाणघेवाण व त्याचा संबंधित राज्यसत्तांवर नि व्यक्तिमत्त्वांवर झालेला व्यापक परिणाम, हे सगळं एकविसाव्या शतकासारखं चित्तथरारक, वेगवान वगैरे वगैरे असावं अशी अवाजवी नि अर्थहीन अपेक्षा करणार्‍यांचा त्यात दोष आहे, तुमचा नाही. सर्व शांतताप्रिय, धर्मनिरपेक्ष भक्तीपंथांत (मग सुफी असो, वारकरी असो वा इतर) असणारा निखळ साधेपणा ज्यांना भावला नाही, ते ख्वाजा मेरे ख्वाजा ह्या गाण्याला हसले असतील. तो त्यांचा प्रश्न आहे, तुमचा नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही जोधा अकबर यशस्वी साकारला आहे आणि एक अजून छान चित्रपट पहायला मिळाल्याचं समाधान दिलं आहे.

जेव्हा बरेचसे इतर लोक अत्यंत थिल्लर चित्रपट खोर्‍याने काढत आहेत, तेव्हा तुम्ही ही तिसरी सशक्त कलाकृती निर्माण केली आहे. एकंदरीत सर्वत्रच द्वेष, असहिष्णुता यांचेच उदात्तीकरण दिसत असताना आपण आपल्या या तिन्ही चित्रपटांमधून नेहमीच प्रेमाला महत्त्व दिलं आहे, देशप्रेमासकट. मला वाटतं, हा आपल्या वृत्तीचा परिणाम असला पाहिजे. जोधा अकबर हे एक त्याच सर्जनाचं भव्य मूर्त रूप आहे. असे अनेक प्रेमाचे कलमे गाणार्‍या तुमच्यातल्या फरिश्त्याला सलाम !