हा महापूर विशेष अाहे
कारण तो सरत नाही
महापूर काय वर्णावा?
गंगेइतकाच विध्वंसक
चंद्रभागेइतकाच वाळवंटी
अाणि बाकी सगळे
नेहमीचेच
चिखल माती ओली पाती
मनुष्यहानी वित्तहानी
वाहून गेलेली नशीबं करंटी
वाहून अालेली अर्धी करवंटी
पण हा महापूर विशेष अाहे
कारण अभिषेकाच्या दुधासारखाच
हाही कधी संपत नाही
कधीतरी पडला पाऊस
धुवांधार
तेव्हापासून अालाय म्हणतात
हा पूर भरत शिवार
दुष्काळही अाले,
नाही असं नाही
तेव्हाही हा होताच म्हणतात
कशामुळे असेल बुवा?
असेही कुणालातरी वाटले म्हणतात
"रडत होत्या बायका फार,
कण्हती पोरं बेसुमार,
गळले होते लोक पार.
कधी अवकाळ कधी दुष्काळ
अस्मानीचा पडला भार
राजा थोर, चोख कारभार"
बखरी सांगतात एकसुरात
बाकी तिथ्यांत गफलती फार
"पुराणकथा, दुसरे काय?
डेटा द्या, बखरींना अाधार काय?”
कुणी मख्ख बोलत होता
टीव्हीवर अाख्खी दुपार
जुने जाऊद्यात, हल्लीचं काय?
“सांगणं कठीणे, डेटाच नाय"
म्हणजे सध्या पूर नाही?
"तशी परिस्थिती दिसत नाही"
हा असा अचाट लोंढा
अद्वातद्वा पसरत चाललाय
अक्राळविक्राळ अाकार घेत
कदमताल करत करत
शिस्तीत कसा घेतोय अात
सूप उखळ नांगर भात
शाई पेन कागद हात
पूरसदृश तरी म्हणा
अाणेवारी करू म्हणा
“ते सगळं डिजिटल केलंय
डेटा हवा, डेट्याशिवाय होतंय काय?”
दहा दिशांनी पडतो वेढा
बांध फोडून वाढतो रेटा
लहान चीर भगदाड होते
होत्याचे नव्हते होते
मुसळधार संततधार
पाऊस असतो पडत फार
पाणी नुसतं वाढत जातं
उधाणतं, उनाडतं
नवी पातळी कायम करतं
हेच ते न्यू नॉर्मल.
हा महापूर विशेष अाहे
पण नॉर्मलसदृश नॉर्मल अाहे
लव्हाळ्यांची किंमत काय?
अाहेही अन नाहीही
नाही हे वास्तव अाहे
अाहे हेही वास्तव अाहे
कुणास ठाऊक लव्हाळ्यांना
अापली किंमत माहित्ये काय?
लव्हाळ्यागत जगत राहणं
हा मोठ्ठा प्रॉब्लेम अाहे
अणुरेणिया तोकडं असणं
नि अाकाशाएवढं असणं
अावाका माहीत हवा
असामान्यत्व गृहीत हवं
हा भलताच पेच अाहे
पण इथेच खरी मेख अाहे
गरज स्पष्ट दिसते अाहे
हा महापूर विशेष अाहे
उफाळून येतात तेव्हा
नव्हाळीतले ध्यास काही
एकाएकी उमळून पडतात
अंगांगातले गंड काही
कुठे उरावं कुठे जिरावं
कुठे सरावं कुठे मुरावं
कुठे हरावं कुठे रहावं
कुठे जगावं कुठे मरावं
दबा धरून बसलो अाहे
तिथ्थेच थोडा पसरलो अाहे
बहुधा थोडा रुजलो अाहे
तिथेच थोडा उगवलो अाहे
शांत शांत वाटत अाहे
नवा धीर दाटत अाहे
अापला परीघ कोरतो अाहे
अापली जागा अाखतो अाहे
लव्हाळ्यांचे प्रश्न कधी
पडले नसते एरवी कधी
हा महापूर विशेष अाहे
तो सरायला तयार नाही
मी हरायला कबूल नाही
असल्या कविता जितक्या लवकर कालबाह्य होतील तितक्या बर्या. हुह.
ReplyDelete