माझ्याआधी सगळे कवी
एकेक ऋतू जगून गेले
रंग त्यांचे, गंध त्यांचे
नाद त्यांचे, स्पर्श त्यांचे
एकेक करून सगळे जण
सर्व काही कोळून प्याले
हल्ली जेव्हा कधी कुठे
कुठलातरी ऋतू येतो
पास न केवळ शब्द त्यांचे
जाणीवेतील सर्वच त्यांचे
रंग त्यांचे, गंध त्यांचे
नाद त्यांचे, स्पर्श त्यांचे
ऋतू काय!...येत असतात
माघारीचा मान्सून म्हणा
वादळांचे सीझन म्हणा
चार म्हणा, तीन म्हणा
तीनशे साठ अंशांचे
हवे तेवढे भाग म्हणा
ऋतू पाऊसपाण्याचे, वाहून गेल्या पाड्यांचे
ऋतू श्रावणी उन्हांचे, भाजून फुटत्या लाह्यांचे
ऋतू गुलाबी हिवाचे, शून्याखालच्या पार्याचे
ऋतू उमलत्या कळ्यांचे, स्वार्थपरायण पानांचे
ऋतू चांदण्या रातींचे, चंद्रग्रासल्या भीतींचे
ऋतू कोवळे ओलेते, ठाक कोरड्या डोळ्यांचे
ऋतू रंगल्या चालींचे, यतिभंगल्या ओळींचे
ऋतू कविता होण्याचे, तडफड चरफड श्वासांचे
ऋतू पुस्तकी व्याख्यांचे, पुस्तककोर्या वासांचे
ऋतू इंद्रियांसाठीचे, खोल खूणांतील गाठींचे
ऋतू रोजच्या जगण्याचे, दिवसामागून रातींचे
ऋतू इतरचे येणारे, भीतर भीतर नेणारे
पाऊस पिऊन, वारं भरून
उन्हं पचवून, थंडी रिचवून
घुमत राहणं कमाल आहे;
डोळे लावून वाट पाहा
पदर खोचून स्वागत करा
दहाव्या दिवशी नावं ठेवा
नंतर म्हणा...’निघा आता’
पुढच्याची खिदमत करा,
वयासारखं वय वाढतं
नित्यक्रम टळत नाही
गोल गोल घुमत आपला
मूर्खपणा ढळत नाही;
कविता होण्याचे असतात ऋतू
ती मागण्याचेही असले पाहिजेत;
माझे कविता होण्याचे ऋतू जातात कुठे कळत नाही
नि तुझे कविता मागण्याचे ऋतू येतात कुठून कळत नाही;
ह्या सगळ्या अचरटपणाला एक नवा शब्द हवा जणू
तुझ्या ऋतूंची हरकत नसेल, तर आपण त्याला ‘ऋतणे’ म्हणू
माझं ऋतणं सध्यातरी पूर्वसूरींच्या ऋतण्यात आहे
माझ्या गहाण ऋतण्यात हल्ली माझी कविता रुतली आहे
माझे ऋतू कुठून आणू?
सोज्ज्वळ मोहक सुंदर गर्भार
मर्ढेकरी माघी सकाळी
शहरांत हल्ली होत नाहीत,
फ़रवरीच्या सर्दीमधल्या उन्हासारखं
नात्यांच्या कंगोर्यांचं गुलजारी कोरीवकाम
जमेल असं वाटत नाही,
जश्न-ए-बहाराच्या अस्तरात ख़िज़ा साजरं करणारं
समाज-भाषा-शब्दांचं अल्लद अख्तरी भान
नेमकं उतरणं कठीण आहे,
शाश्वत भय नि सोवळी दु:खं
संचिताच्या कोवळ्या ऋतूंहून अधिक ग्रेसफुली
झरतील असे वाटत नाही,
ग़ालबाएवढं दु:ख मला झालं तरी पुष्कळ आहे
अनभिज्ञाच्या दु:खऋतूंशी त्याचं तादात्म्य
साधणं तर दूर आहे,
गुलशनाचा कारोबार चालण्यासाठी तुझी गरज फ़ैज़ने पटवून दिल्यावर
सृष्टीचा गाडा वसंतावर तुझ्यासाठी अडलाय
हे मी वेगळं का सांगायला हवंय?
‘लावण्य जातसे ऊतू, वायाच चालला ऋतू’
असं म्हणून तू जीवाची दैना केलीस
तरी मी बोरकर कसा होऊ?
माझा असा एक ऋतू जरा कुठे उरला होता
‘एक मौसम रूह का है, जिसमें अब ज़िंदा हूँ मैं’ म्हणत
कोण कुठला अथर नफ़ीस तोसुद्धा जगून गेला
माझं ऋतणं गहाण आहे
त्यांचं ऋतणं महान आहे
ऋतुचक्राचा आस सध्या ढळेल असं वाटत नाही
परीघावरची फरफट माझी रुकेल असं वाटत नाही
5 and 6 kaDawe aavadale. mast aahe.
ReplyDeleteagadi.....
ReplyDeleteApratim kavita! sagaLich avadali.
ReplyDelete@ क्षिप्रा, मेघना, शर्मिला,
ReplyDeleteथँक्यू!
farach mast
ReplyDeleteखो दिलाय मित्रा! तुझा डाव्या हातचा मळ आहे...
ReplyDeleteनिमिष, नुस्ती सुंदर किंवा फार सुंदर म्हणणं म्हणजे पाप! It's a big leap as a poet. कवितेत भावना असतातच पण यावेळी त्यांना अनुभवाने येणारा सोशिकपणा, निवतेपणा आणि शहाणेपणा देखिल आलेला आहे. मध्यंतरी तुझ्या कवितांमधे काही फसवी वळणं येत होती, शब्दांचे विभ्रम म्हण किंवा संदर्भांचे गुंते म्हण, चमकदार कल्पना म्हण किंवा अलंकारात गुदमरण म्हण. यावेळी मात्र तुझी कविता चांगलीच सुटली आहे. जिओ प्यारे!!
ReplyDeleteअस्मि, संवेद,
ReplyDeleteआभार.
संवेद, इतक्या उपयुक्त समीक्षकी नि केवलप्रयोगी अव्ययेतर प्रतिसादासाठी अनेकानेक आभार!
केवलप्रयोगी अव्ययेतर mhanje kay?
ReplyDeleteSamved
संवेद, :D
ReplyDeleteवाह! अहाहा! अरेरे! अबब! श्या! छे! ओह! ओह ****! ह्या सगळ्या उद्गारवाचक अव्ययांना व्याकरणात केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात. त्यांहून इतर ते केवलप्रयोगी अव्ययेतर! :-)
too much.....I used to believe that I have good command over Marathi till 10th but then lost touch over years. I am glad you still manage it very well
ReplyDeleteGood one.. also v nice to see some activ responses on your blog...
ReplyDeleteSG
@Samved :-)
ReplyDelete@SG Thanks!