Friday, July 4, 2008

वायफळ सूर

रेल्वेची चार स्टेशनं दिसतात तसंच एक स्टेशन. भारतातली पहिली आगगाडी कधीतरी येऊन थांबल्याच्या पुसलेल्या खूणा जपणारे काही दगड असतील कदाचित पूलांचे भार सोसत उभे आडोशाला नि तो दाराशी असलेला भला मोठा वृक्ष नि त्याचा पार. तो अजून तसाच उभा आहे. कधीपासून कुणास ठाऊक? एनर्जी स्टाँल हे लोकांचं भेटायचं ठिकाण होतं तेव्हाही नि नसलेला एनर्जी स्टाँल हे भेटायचं ठिकाण झालं तेव्हाही. एक नंबरचा इंडिकेटर ही भेटण्याची जागा होती तेव्हाही नि ती जुन्या एक नंबरवरचा इंडिकेटर अशी झाली तेव्हाही. तो होताच. तसाच. माझ्या नाँस्टँल्जियात. तिथूनच बाहेर पडायचं स्टेशनकडे पाठ फिरवून नाकासमोर सरळ चालत. रस्ता वळेल तसं वळायचं.

तशा फूटपाथवरच्या फुटलेल्या सगळ्याच लाद्या सवयीच्या. अंधारातही चालता आलं असतं इतक्या. म्हणजे कुठल्या लाद्या अर्ध्या फुटल्या आहेत, कुठल्या लाद्या बाजूच्या वडापावच्या गाडीच्या गळक्या पिंपात भिजलेल्या असतात, कुठल्या ठिकाणचा फूटपाथ चढता उतरताना पाय किमान दीड फूट उचलावा लागतो, पावसाळ्यात पाणी साचल्यावर कुठल्या चार लाद्यांवरून कमीत कमी लांब उड्या मारून चालता येतं, फूटपाथच्या कुठल्या भागावरून चाललं म्हणजे रस्त्यावरून जाणार्‍या गाडीने उडविलेलं पाणी अंगावर उडत नाही, कुठलं गटारावरचं झाकण कधीकधी उघडं असतं ह्याचे नकाशे वाचायला पायांना डोळे थोडीच लागतात? तसंच सवयीने चालत राहिलं की थोड्या अंतरावर पहिल्यांदा नजर वळायची उजवीकडच्या बागेकडे. आजोबा कधी कधी घेऊन यायचे तिथे. स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत दगडावर कोरलेलं अण्णांचं नाव दाखवायला. हल्ली उघडी असते का ती बाग?

त्याला लागूनच असलेलं शंकराचं मंदिर. तसे आजूबाजूला पुष्कळ देव होते. पण मुख्य शंकर. एका छोट्याशा दारातून पायर्‍या उतरून खाली गेलं की प्रशस्त गाभार्‍यामधली शंकराची भली मोठी पिंड नि त्याच्यावर अभिषेक करणारा कलश. त्याच्याबाहेरचा तो पांढराशुभ्र भला मोठा नंदी. हा नंदी पिंडीच्या दिशेने अणुभर की अशाच काहीतरी सूक्ष्म अंतराने म्हणे सरकतो नि तो जेव्हा पिंडीशी पोहोचेल तेव्हा जलप्रलय होणार. आपण मोठे होऊ तोवर तो निदान एक‍ दोन वीत अंतर तरी सरकेल असं मला तेव्हा फार वाटायचं. नंतर नंदीची चाल कधी मोजली नाही पण जलप्रलयसदृश परिस्थिती २६ जुलैला पाहिली. देवळासमोरचा भलामोठा तलाव भरून वाहणं हे पावसाच्या कहराचं परिमाणसुद्धा थिटं पडलं तेव्हा. रस्त्याच्या डाव्याबाजूला असणारं हे तळं पूर्वी म्हणे देवळाला लागून होतं. मग रस्ता बांधला मधे. असेलही. तो रस्ता माझ्या आधीच्या पिढ्यांच्या नाँस्टँल्जियाचा भाग नसेल कदाचित.

हे तळं मागे एकदा गाळ काढायला म्हणून संपूर्ण उपसलं होतं. बिल्डींगची पाण्याची टाकी रिकामी करावी ना तसं रिकामं केलं होतं. पाणी कुठे गेलं कोणास ठाऊक, गाळ मात्र शहरभर पसरला होता. तेव्हा त्या तळ्याच्या मधोमध असलेल्या एका सुरेख कमळात असणार‍्या शंकराच्या पिंडीपर्यंत चालत जाता येत होतं. एका संध्याकाळी तळ्यात तसं चालून आलेलंही मला आठवतंय. पुढे गाळ निघाला, तळं भरलं, सुशोभिकरणाच्या भन्नाट कल्पनांमध्ये ते सुंदर कमळ तुटलं नि एक मोठ्ठं बटबटीत देऊळ तळ्यात उभं राहिलं. त्यानंतर त्या तळ्यात बोटीतून फिरतानाही ती मधलं बटबटीत वास्तू डोळयात खुपायची. लहानपणी जवळपास दर महिन्याला त्या बोटींमध्ये बसलो असेन. फक्त बोटीत बसता येत होतं तेव्हा. हातात धडाधड फोटो घ्यायला डिजिटल कँमेरे नव्हते नि ती बोट राइड व्हीडियो शूट करायला ते कँमेरे मूव्ही मोड मध्ये टाकून सज्ज राहायची अनावश्यक धडपडही नव्हती. हात मोकळेच असायचे. माझे पाण्यात घालायला नि आईचे मला धरायला.

(क्रमशः)

5 comments:

  1. kalach mi athwan kadhli hoti kopineshwarachi ani tya talyatla malakat gulabi kamalachi....
    ani mag nana ajobach athwat rahile barach kal... firayla gheun janare goshti sangnare...ka konas thauk...

    ani tu pan hech lihilas...agdi mi je bolat hote kal tech...

    ReplyDelete
  2. परत घरी गेल्यासारखं वाटतं आहे. काण्ट वेट.

    ReplyDelete
  3. मी लहान असताना सुट्टीत ठाण्यातच पडीक असायचे... आणि आता कॉलेजची ३ वर्ष तिथे काढल्यानंतर ह्या सगळ्यांशी एक नातं निर्माण झालयं... पटकन पुढे लिही ना...
    पुढे वाचायची खुप खुप खूप उत्सुकता लागुन राहिल्ये (सॉरी चुकीचं व्याकरण आहे का ह्या वाक्यात?)

    ReplyDelete
  4. सुंदर पोस्ट. आठवणी बरेचदा त्रासदायक ठरतात. यावेळी भारतात आलो तेव्हा जुन्या ठिकाणी गेल्यावर फार त्रास झाला. तिरिमिरीत काहीतरी लिहून काढल नोस्टाल्जीयावर, पण अजून टाकावस वाटत नाहिये.

    ReplyDelete
  5. @ Meghana, Snehal
    :)

    @ Jaswandi,

    :)...lihilay...kay chukalay vyakaraN...ni tasahi bha.po. :)

    @ Raj,

    Tak na are, vachayla aawadel, arthaat tula vaTel tevhach! :)

    ReplyDelete