Wednesday, July 11, 2007

एका रविवारची कहाणी

एका रविवारची कहाणी

पु.ल.नी एका रविवारच्या सकाळची कहाणी रंगवली होती. आमची रविवारची सकाळ ११ वाजता सुरू होऊन १२ वाजता संपते. त्यात विशेष काहीच घडत नाही. १२ वाजता सुरू होणारी दुपार रेंगाळत रेंगाळत साधारण ४ वाजेपर्यंत लोळत असते. त्यात घरी फोनवर बोलणे, आंघोळ, जेवण इत्यादि ओघाने येणारी कामे आणि प्रामुख्याने chatting चा पहिला अध्याय पूर्ण होतो. रविवारच्या रात्री सोमवारच्या चिंतेने ग्रासलेली भारतातील मंडळी या काळात online असतात. गावभरच्या गप्पा मारून "चला मी जातो आता...उद्या कामावर जायचं आहे...तुम्ही करा रविवार एन्जाँय" असा सल्ला देऊन एकेकजण निघून जातो. झोपायचं सोडून उगाच टंगळमंगळ करत बसलेल्या एखाद्या निशाचराला "brb" असं सांगून मी लँपटाँप बंद करतो.चार वाजले; बरचं काही करायचंय असं मनात म्हणतो नि थंड बसून राहतो.

अजून संध्याकाळ चढायची बाकी असते. रविवार चालू असतो. म्हणजे खरं तर काहीच चालू नसतं पण रविवार चालू असतो. जसजसा desktop चा कोपरा 4:50 PM वगैरे दाखवू लागतो तसा पहिला विचार डोक्यात येतो...संपला रविवार...काहीच केलं नाही आज. नुसता बसून होतो. Timepass भरपूर झाला पण त्यातून काही विरंगुळा वगैरे अजिबात झाला नाही. नुसता वेळ वाया गेला. असो. जाऊ देत. एक दिवस काही न करता बसून राहिलं तर काही बिघडत नाही. अजून आहे वेळ....त्यात थोडी कामं होतील. मग एखादा फोन. अमेरिकेतल्याच कोणातरी मित्रमैत्रिणीचा फोन. पुन्हा शिळोप्याच्या गप्पा. "पक रहा है यार..." हे एकच पालुपद दोन्ही बाजूंनी...हे फोन फार काळ चालतात. नि मग जेव्हा काहीच बोलण्यारारखं उरत नाही नि "और क्या चल रहा है?" हा प्रश्न जिभेवर येणंही बंद होतं तेव्हा फोन थांबतो. शनिवार रविवार फोन फुकट असण्याचा दुष्परिणाम आहे हा.वास्तविक दुष्परिणाम कसला? त्या वेळात तसंही काही रचनात्मक कार्य वगैर हातून घडणार नव्हतंच. पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून निर्माण झालेल्या साधनांचा फाजील चैनीसाठी यथेच्छ वापर करून मग त्यावर टिका करणे हा माझा एक आवडता छंद आहे.

तर फोन ठेवताना त्याच्यावरचं घड्याळ कृत्रिमपणे 6:00 PM असं काहीतरी दाखवू लागतं. मनात जरा गलबलतं...सहा वाजले. पुढचा विचार..संपला weekend. भारतात तो रविवारी रात्रीपर्यंत संपत नसे. इथे शुक्रवारीच तो घाईघाईत सुरू होतो नि रविवारी घाईघाईत संपू लागतो. दिवस संपला, रविवार संपला इथवर ठीक असतं पण weekend संपला हे जरा जड जातं पचायला. कारणही तशीच आहेत. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत assignments, projects, laundry, रूम आवरणं, blog लिहिणं, काहीतरी वाचणं (अभ्यासाचं नि अभ्यासेतर), काहीतरी ऐकणं, कुणाला तरी फोन करणं, कुठेतरी जाणं, पुढच्या आठवड्याची तयारी करणं, आधीच्या weekend ची थकलेली कामं पूर्ण करणं, नवीन काहीतरी करणं असं सगळं येणार्‍या weekend साठी साठवून ठेवलेलं असतं. हे सगळं राहीलं करायचं. weekend फुकट गेला ह्या भावनेने आलेले नैराश्य. त्यामुळे उगाच स्वतःचाच तिरस्कार. मग वैताग. मग निरुत्साह. मग रिकामटेकडेपणा. नंतर weekend सारखा मोकळा वेळ पुन्हा मिळणार नाही उद्यापासून ही खंत. सोमवारची चिंता. म्हणजे weekend भर काहीच केलं नाही याचं दुःख आणि weekend सारखं काहीच न करता बसायला मोकळा वेळ आता मिळणार नाही याचंही दुःख. हळूहळू रात्र होते नि सगळे मनसुबे पुढच्या weekend वर ढकलून मी सोमवारच्या रहाटगाडग्याच्या चिंतेत झोपून जातो.

सोमवार ते गुरुवार संध्याकाळ होतच नाही. शुक्रवार‍ शनिवारी होते संध्याकाळ. रम्य वगैरे. विरत्या उन्हात संध्या, हिरवाईत न्हाली होती...शांत निळाईत तान्ह्या, तळ्यात उतरली होती....असं सुचतं काहीबाही...पण रविवारची संध्याकाळ यासारखा निरर्थक, निरुत्साही नि रटाळ काळ आयुष्यात दुसरा नसेल. आता इतके रविवार येऊन गेले पण हे मत काही बदलत नाही. काहीतरी करून हा वेळ घालवावा असा नेहमी विचार येतो. पण रविवार येईपर्यंत विचार करायला उसंत मिळत नाही आणि तो आला की हाही विचार पुढच्या रविवारवर ढकलून chatting चा शेवटला अध्याय पूर्ण करणे एवढंच काय ते त्या रविवारच्या संध्याकाळी होतं!

4 comments:

  1. Chhan lihilayas. Kahi anubhav universal asatat ani sthal-kal nirpeksh..tyatalach ek anubhav vatala.

    ReplyDelete
  2. @ Meghana,

    Laptop was dead :(...restored it now..have posted one new one and one old one...

    @ Anahat naad,

    Thanks. Relate zala ha anubhav he vachun chhan vaTala...

    ReplyDelete