खूप वर्षांपूर्वी स्वप्न पाहिलं होतं. तेच उराशी बाळगून पुढे चालत होतो तेव्हापासून. कधी त्याच्या जवळ होतो कधी दूर. पण मी ते पाहत होतो. सदैव. कधी त्याला थेट भिडायचा विचार तर कधी आडवाटेने गवसणी घालण्याचा प्रयत्न. कधी ते नजरेतून निसटताना दिसलं की निराशा. कधी अचानक त्याचा भास झाला की पुन्हा आशा. मग त्या वाटेचीच ओढ. त्याच्या जितकं जवळ जावं तितकं ते दूर...मृगजळासारखं! पण ते दिसेल तोपर्यंत धावायचं. कधी कोणाची सोबत व्हायची. पण त्यांच्यात अथक पळायची जिद्द नसावी. ते दिसत नाही असं सांगून थांबायचे. त्यांना कुणी सांगितलं नव्हतं का की जर तुम्ही वाळवंटात गेलात आणि तुम्हाला मृगजळ दिसलं नाही तर त्या वाळवंटाला दोष देऊ नका, तर मान्य करा की तुम्ही आंधळे आहात. का ते फक्त मलाच दिसत होतं? पण माझ्यासाठी तर ते वास्तव होतं. का माझी कुवत नव्हती ते मृगजळ आहे हे समजून घेण्याची? एवढं खरं होतं की मी वाळवंटात फिरत होतो आणि मला ते स्वप्नं वास्तवात उतरवायचं होतं.
अनेकदा मनात स्वतःबद्दल शंका येत असत. अजूनही येतात. कधी त्या मनाला नि बुद्धीला अशा काही ग्रासून टाकत की एकदम जग अंधःकारमय वाटे. रोजच्या वाटांवरही पाय अडखळे. सवयीच्या गोष्टी नव्या वाटत आणि मग स्वतःबद्दलच्या शंका दाट होत. तसं मी ते स्वप्न दिवसाउजेडीही पहात असे. पण अशावेळी ते रात्रीसही दिसत नसे. भय अंधाराचं नव्हतं. ते स्वप्न दिसेनासं झालं याचं होतं. मग सावरून तो नाद सोडून वेगळ्या वाटा धुंडाळित असे. खूप दूर जायचा प्रयत्न करत असे. पण ते स्वप्न पुन्हा ओझरतं दिसे नि मी पुन्हा नव्या उमेदिने त्याच्यापाठी पळत असे.
अलीकडे असाच पळत होतो. बेभान. एकच ध्यास. तिथवर पोहोचायचा. कंबर कसून मेहनत घेत होतो त्यासाठी. एक संधी सोडत नव्हतो पुढे जायची. प्रथमच मला वाटतं होतं की हीच ती वाट जी आपण इतके दिवस शोधत होतो. वाट सोपी नव्हती पण ती चालणं अशक्यही नव्हतं. अनेकांची मदतही होत होती. अगदी अनपेक्षित. एकामागोमाग एक गोष्टी घडत होत्या. त्यातल्या सर्वच अनपेक्षित नव्हत्या. त्यासाठी फार पूर्वीपासूनची तयारी होती. पण वाटलं नव्हतं इतक्या अकस्मातपणे त्या इतक्या वर्षांपासून चोखाळलेल्या वाटा वाट वाकडी करून या वाटेला येऊन मिळत होत्या आणि माझा धीर वाढवत होत्या. प्रत्येक पाऊल जपून टाकत होतो. टप्प्याटप्प्यावर मार्ग निरखतहोतो. आता कोणतीही कसूर चालणार नव्हती. एक तप झालं होतं स्वप्नामागे धावता धावता. मी संपूर्ण शक्ती पणाला लावून निघालो होतो. शेवटचा टप्पा होता नि मी नजर खिळवून समोर बघत होतो. खंबीरपणे नि आत्मविश्वासाने.
अचानक वाट खुंटली. काय होतयं हे कळण्या आधीच सगळं संपलं होतं. ज्यांनी आधार दिला होता त्यांनी उत्तरादाखल वेगळ्या वाटा दाखवायला सुरुवात केली. मला काहीच सुचेना. ज्या आभाळाला मी गवसणी घालायला निघालो होतो तेच आज असं कोसळलं होतं. मी स्तब्ध उभा होतो. दिग्मूढ. मला लक्षात येत होतं की मी इतर वाटांचा नकाशाच विसरून पुढे आलो आहे. मला माहित नव्हतं काय करायचं. सभोवती काळोख नव्हता. मलाच दिसत नव्हतं. पहिल्यांदाच ते स्वप्न कायमचं निसटलयं असं वाटतं होतं. दिशांचे संदर्भ लागत नव्हते. आकाशात ढग होते. तेवढेच काय ते दिसत होते. पण तेही अर्थहीन. विस्कळीत आणि जटील. भोवताली फक्त वारा गर्जत होता. तो आज असा खवळला होता. पुन्हा वर पाहिलं तर निराळं आकाश. वार्याने विस्कटलेलं. नकळत ग्रेसच्या दोन ओळी आठवल्या...
संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्यावरती लाटांचा आज पहारा...
अनंत ध्येयासक्तीच्या किनार्यावर मी उभा होतो. किनारा माझाच. तिथवर येणारा मार्गही माझाच. मीच शोधलेला मुक्काम. पण मी स्वप्नात पाहिलेला किनारा असा नव्हता. तो अजून दूर आत असावा. उगाच मनाची समजूत. न पटणारी. पुन्हा मी स्तब्ध. निःशब्द. समोर फक्त माझा मार्ग सीमित करणार्या अनंत लाटा. त्या माझा किनारा राखत होत्या की रोखत होत्या? ती आसमंतात घुमणारी गाज नि बधीर मी. त्या लाटा माझ्यावर आदळत होत्या. मला उद्ध्वस्त करण्यासाठी की मला स्वप्नातून जागं करण्यासाठी?
... काय बोलू? काही अर्थपूर्ण ठरेल असं नाही सुचत...
ReplyDeleteआपल्याखेरीज कुणाला काही नाही दिसलं तरी, सगळा जीव गोळा करून धावताना हाती काहीच येण्या-न येण्याची धास्ती वाटली तरी... आणि सरतेशेवटी अशी माती हातात आली तरीही... स्वप्न पाहायचीच. मजा या सगळ्यातच असते, ना?
agadi khara...tyamulech ha prashna mi mazyasathi "swapnatun jaga karun navin swapna pahanyasathi" asha uttarane sodawalay sadhya tari :)...
ReplyDelete