Monday, July 28, 2008

वायफळ सूर

वायफळ सूर (१)


वायफळ सूर (२)


वायफळ सूर (३)


काही निवांत क्षणांना हे जाणीव‍े-नेणीवेमधले वायफळ सूर कानांमध्ये रेंगाळतात. तसेच तेव्हाही रेंगाळत होते. घरपरतीच्या वाटेवरती. बँगा भरताना, पाऊस पाहताना, विमानात, धावपट्टीवर विमान उगीच रेंगाळत उभं असताना, विमानतळावर रिकामा बसलो असताना. सगळीकडेच. थेट शहरात पाय ठेवेपर्यंत नि त्यानंतर बरेच दिवस. अन्वयार्थांचे गुंते सोडवण्यात हशील नाही हे लवकरच उमगलं हे बरं झालं होतं. पुष्कळ दिवसांनी "काहीच काम नाही" अशी स्थिती आली की, अशा कामांच्या यादीहीन वेळेला वाटणारं "काहीतरी काम विसरतोय आपण नक्कीच" अशा अर्थाचं उसनं भय सुद्धा चेपलं होतं एव्हाना.

तेव्हाच लहानपणीच्या अलिबागच्या आठवणींत आधीची पिढी दंगली होती. सिनेगॉगपाशी घुटमळणारा वायफळ सूर आत्याच्या अलिबागच्या समुद्राजवळच्या ज्यू कुटुंबांच्या आठवणींशी जुळला. अलिबागचा नॉस्ट॓ल्जिया बालाजी मंदिरासमोर घोळवला जात असताना. तिथल्या प्रत्येक गल्लीच्या, वाड्याच्या, सरकारी इमारतीच्या नि त्या सगळ्यांतल्या साध्या सरळ माणसांच्या काही ना काही आठवणी ऐकून हसताना. त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नव्हतं. नॉस्टॆल्जिया उगाळण्याची ती पहिली का खेप होती त्यांची? पण वाटलं...नॉस्टॆल्जिया किती कालसापेक्ष असतो ना? म्हणजे आपण जगायला लागतो एखादी जागा तिथपासून आपल्या आठवणी सुरु...नॉस्टॆल्जिया हा एक memoryless random variable सारखा प्रकार आहे असा काहीसा साक्षात्कार तिथून घरी परत येता येता झाला.

परत आल्यावर स्टेशन गाठलं तेव्हा त्या चिरेबंदी बांधकामाशी स्पर्धा करणारे काँक्रिटचे स्तंभ दिसले. काही दिवसांनी जेव्हा तो स्टेशनपासून सुरु होणारा उड्डाणपूल नेमका कुठेतरी उतरेल तेव्हा त्याच्याखालचा रस्ता कितीतरी लोकांच्या नॉस्टॆल्जियाचा भाग असणं बंद होऊन जाईल. स्थितीशीलतेचे चोचले वाईटच पण शहर विकासाच्या कुठल्यातरी अचाट कल्पनांच्यापायी हे असे किती रस्ते नॉस्टॆल्जियाचा भाग असणं बंद होणार? हे रस्ते असेच नीरस होत जाणार? तशीच शहरंही त्या अमेरिकन शहरांसारखीच भकास होणार? मग ज्या रस्त्यांवरून मुळात कुणी चालणारच नाही, तिथे पाऊलखुणांचे काळाशी मेळ कसे काय जुळणार? असे काही अतिरेकी प्रश्न मनात आले.

अशा वेळी काय करावं? नॉस्टॆल्जिया हा एक memoryless random variable सारखा प्रकार आहे, ह्या साक्षात्काराचा बोध घेऊन सरळ एखादं शहर पहिल्यापासून परत जगायला लागावं का? आठवणींचं नवीन संचित निर्माण करण्यासाठी? स्तोत्रांत गुणगुणणारे वायफळ सूर खरंच वायफळच. "जे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे" असं स्मरणालाच म्हणायचं? ग्रेसांचे शब्द कधी कुठले संदर्भ घेऊन अर्थपूर्ण होतील हे शोधण्याइतकंच अनाकलनीय सारं. काळाच्या वशात् सगळे रस्ते स्मृतिपथम् जातील याचं भय नाही, ते होणारंच. पण त्या रस्त्यांनी जपलेली मूल्यं? तीसुद्धा? भय का जात नाही त्याच मार्गाने?

सारं उमलून आलेलं निवांतपण कसं वायफळ सूरांसारखं नकळत विरलं. म्हटलं नव्हतं? हा निमिषांचा निमिषांशी निमिषार्धासाठी खेळ!

Saturday, July 12, 2008

वायफळ सूर

वायफळ सूर (१)

वायफळ सूर (२)

हा चौक आणि त्याच्यापुढचं जैन मंदिर यांच्यामधोमध एक जुनाट वाडा होता. तो कित्येक दिवस तसाच भर रस्त्यात उभा होता. म्हणजे खरं तर तो आपल्याच जागी होता. त्याला हळूहळू रस्त्यावर आणलं होतं. ह्या जैन मंदिराच्या बरोबर समोर आणिक एक मंदिर आहे. कधीच गेलो नाही मी तिथे. का कुणास ठाऊक? जैन मंदिराचीसुद्धा खरं तर फार आठवण राहिली नसती. पण काही शिल्पकार अशी काही जादू करतात की आपल्या एखाद्या शिल्पाची आठवण कुणी वर्षानुवर्षे काढतंय ह्याची त्यांना कल्पनाही नसेल. त्यांच्या बोटांमधली जादू बघून जग खूश होताना त्यांची पोटं भरली होती की नाही कोण जाणे? ताजमहाल बांधणार्‍या हातांची आठवण न येता ताजमहाल पाहता येतो का? मला तरी नाही. तसेच ते हत्ती पाहताना. देवळाच्या दाराशी दोन बाजूला दोन देखणे निळे हत्ती. कधीही ह्या रस्त्यावरून जाताना सवयीने मान वळायची हत्ती पाहायला. जैन मंदिर नि द्वारपालासारखे सोंड वर करून उभे असणारे हत्ती असं एक विचित्र पण पक्कं समीकरण डोक्यात बसलंय माझ्या लहानपणापासून. मागे मंदिराचा जिर्णोद्धार झाला नि एक भव्य पांढरी इमारत उभी राहिली आजूबाजूला. सुदैवाने ते हत्ती तसेच राहिले, फक्त एका पांढर्‍या हत्तीची भर.

खरं तर तसंच पुढे जायचं कोपर्‍यावरच्या कचराकुंडीपर्यंत. पण मंदिराच्या पुढे जरासं आतल्या गल्लीतून जायचं. एका आतल्या रस्त्यावरच्या कचराकुंडीच्या, नि त्रिकोणी बागेच्या बाजूने. आता आपलं जन्मस्थळ ही काही राष्ट्राने जतन करून ठेवण्याची वास्तू नसली, तरी कौतुक असतंच ना निदान आपल्याला तरी. तीच ती जागा. त्याच्या चार पावलं पुढे घर. नि त्याच्या अजून चार पावलं पुढे मशीद. कानात भरलेली ती बांग. शब्द कधीच कळले नाहीत आजवर. स्तोत्रांचे अर्थ कोणाला कळतात म्हणा. पण ते जे सूर लागतात ना. ऐकत रहावं. आर्त ह्याशिवाय दुसरा शब्दच सुचत नाही मला. पुढे "स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे" ही ओळ ऐकल्यावर मला सर्वांत प्रथम ते सूर आठवले होते. ते दिवसभर घुमणारे आर्त सूर, जाईची नाजूक वेल, जाळीचं कोरीवकाम, सर्व गोष्टींत भरलेली पांढरी हिरवी रंगसंगती नि ह्या सगळ्यामुळे आपसुक येणारा असीम शांतपणा. हेच सगळं इथूनच गझलेध्ये उतरलं असेल का?

कुठे सुरांच्या आठवणी तर कुठे साजांच्या. मी कधीच ऐकलं नाही ते वायोलिन पण म्हणे कोपर्‍यावरच्या एका ज्यू कुटंबात कुणी रोज वाजवायचं. कसलं वाटत असेल ना रोज ऐकताना? आतली गल्ली मूळ रस्त्याला मिळते तिथेच. हल्ली त्याला सिनेगॉग चौक म्हणतात. त्याच गल्लीच्या खालच्या कोपर्‍याला. हल्ली त्याचाही जिर्णोद्धार होतोय. त्याच्यावरची दगडाची पाटी तशीच होती पण, नि ती चांदणी. शाळेत सगळ्यात पहिले शिकतो ना आपण चांदणी काढायला, एकात एक दोन त्रिकोण, एक वर बघणारा नि एक खाली बघणारा, तशी, सहा कोनांची, मूलभूत. वय वाढलं की हात न उचलता पाच टोकांची चांदणी शिकतो आपण, चंद्राबरोबर काढतात तशी. धर्मांचंही काहीसं असंच झालंय का? कोण कुठले कधी आले नि ह्या मातीचे कधी झाले, सारंच विचित्र. सर्वसमावेशकता, धर्मनिरपेक्षता हे शब्द काय संविधानाने ह्या भूमीला दिले? आधी आडात असावंच लागतं. मोठेपणा त्या चवदार पाण्याची चव कळण्यात असतो. कुणी तो पाणवठा इतरांसाठी खुला करतो, तर काहींना आपल्या रसशून्य गर्दभवृत्तीचाच आत्यंतिक अभिमान. सिनेगॉगच्या बाजूने वाहणारा नाला नि पुढे नाल्यापलीकडल्या वस्ती. त्या द्रष्ट्याच्या नावाच्या रस्त्याला धरून अजून उभ्या आहेत.

(क्रमश:)

Saturday, July 5, 2008

वायफळ सूर

वायफळ सूर (१)

तळ्याच्या कोपर्‍यावर उजव्या हाताला जरा आतल्या बाजूला एक गणपतीचं देऊळ. बाजाराच्या गजबजाटात लपलेलं. या गणपतीला रोज वेगवेगळी आरास. कधी जास्वंद, कधी दुर्वा, कधी नारळ नि असं बरंच काही. रोज वेगळी. नि रोज सुरेख. प्रसाद पण छान मिळायचा. मला त्याचीच मजा. गणपतीच्या मूर्तीबद्दल लिहायला ती एवढी निरखून पाहिलीय कोणी? खरं तर मूर्तींमध्ये काय डावं उजवं करायचं? तसंही गणपतीला येणार्‍या बोळिंजकरांच्या गणपतीच्या मूर्तींच्या अतीव नाजूक डोळ्यांपुढे बाकी सगळ्या मूर्ती साध्याच!

रस्त्याच्या जेवढ्या अंतरावर हे देऊळ, साधारण तेवढ्याच अंतरावर डाव्या बाजूला त्या भव्य, प्रशस्त चर्चचं प्रवेशद्वार. संध्याकाळी आजीकडून घरी जाताना तिथे जायचा हट्ट. चर्चची काँन्व्हेंट शाळा नुकतीच सुटलेली नि मुलं घरी गेल्यावर शाळांना येणार्‍या भयाण सुन्नपणामध्ये ऐकू येणारी ती चर्चची पोक्त घंटा. कधी सहा वेळा वाजायची, कधी सात वेळा. ती वाजायची थांबेपर्यंत हलायचं नाही तिथून. आत गेल्यावर कुठल्याही चर्चमध्ये असते तशी उंच, स्तब्ध शांतता. तिथे जाऊन दोन मिनिटं बसायचं. तिथे तसं कुणाचंच कुणाकडे लक्ष नसायचं. कधीतरी फक्त कोणा आजीबाईंचं चेहर्‍याची ओळख सांगणारं स्मित हास्य. एरवीसुद्धा सणाचं वातावरण असावं असा प्रसन्न चर्च नाताळात, ईस्टरला विशेष सजायचा. मग मी आईबरोबर सार्वजनिक सजावटी बघायला जातानाच्या कुतूहलपूर्ण उत्साहात ती सजावट बघायला तिकडे. त्या सजावटीमधला थेट समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित वृक्षांशी नातं सांगणारा हिरवा रंग, त्याच रंगाच्या झाडांवरचे ते लालबुंद गोळे नि तो आकाशातला तारा. शांत आणि आश्वासक.

चर्च, मंदिरं, मशिदी ह्यांना, तुम्ही जा वा न जा, टाळून जाताच येत नाही नि त्याही कधी टाळत नाहीत. पण जरासंच पुढे गेल्यावर विलक्षण अलिप्तपणे उभी असलेली ती अग्यारी नि मी एकमेकांना नेहमी टाळतच आलो आहोत. आजवर मी कुठलीही अग्यारी आतून पाहिलेली नाही, सिनेमात पण नाही. कशी असेल आतून कुणास ठाऊक? ह्यांच्या स्मशानासारखीच अग्यारी पण एक वैचित्र्यपूर्ण गोष्ट वाटत आली आहे मला. हे लोक मेलेली माणसं कोरड्या विहिरींत टाकतात नि मग गिधाडं येऊन ती खातात ही गोष्ट विज्ञानात गिधाडं अन्नसाखळीत आणि इतर नैसर्गिक चक्रांमध्ये येईपर्यंत माझ्या कधी पचनीच पडली नव्हती. तसाच त्या पांढरट‍, फिकट पिवळट वास्तूचा विचित्र पण न बोचणारा अलिप्तपणा. तिच्यासमोरचा तो निर्जीव रस्ता मी "वरचा माँब्रिन दादा इथे येतो नि आम्ही पूर्वी ह्याच कोपर्‍यावर राहायचो" ह्या दोनच गोष्टींवर कापला आहे. बाकी बघण्यासारखं नि सांगण्यासारखं काहीच नाही.

ह्या रस्त्याला पूर्वी फक्त वर्षातून एकदा नवरात्रीच्या नऊ रात्री नि दहा दिवस जान यायची, पुढच्याच चौकात बसणार्‍या देवीमुळे. त्या चौकात एक हौद होता असं मला काहीसं आठवतंय. अगदीच उथळ. बहुदा घोडे पाणी पित असावेत त्यात. कारण तिथेच टांग्यांचं टर्मिनस होतं. तिथून स्टेशन, स्टेशनहून परत. झापडं लावली नसती तरी नाकासमोर सरळच जावं लागलं असतं. तिथेच नवरात्रात देवी बसते. गेली कित्येक वर्षे ती तशीच नि तितकीच प्रसन्न मूर्ती मी बघत आलोय. दरवर्षी तश्शीच, वाघासकट! धार्मिकतेच्या नावाखालची वैशिष्ट्यपूर्ण राजकारणी अशी पैशांची उधळण मी सर्वात प्रथम तिथेच पाहिली. आता ह्यांच्या देवीसारखी जत्रा त्यांच्या गणपतीला भरते, नि त्यांची हंडी नऊ थरांवर फुटली की ह्यांची दहा थरांवर फुटते. लाखांनी काळ्याचे पांढरे होतात. जीवाशी खेळ करणार्‍या धैर्यशील चिमुकल्यांचा पराक्रम उभा महाराष्ट्र घरबसल्या थेट पाहतो. त्यांच्या जीवावर आपली कीर्ती दिगंत करणार्‍यांचा तमाशा डोळ्यांत तेल घालून पाहणार्‍या मुर्दाड माणसांनी रस्ता अजून एक दिवस जिवंत होतो एवढंच.

(क्रमशः)

Friday, July 4, 2008

वायफळ सूर

रेल्वेची चार स्टेशनं दिसतात तसंच एक स्टेशन. भारतातली पहिली आगगाडी कधीतरी येऊन थांबल्याच्या पुसलेल्या खूणा जपणारे काही दगड असतील कदाचित पूलांचे भार सोसत उभे आडोशाला नि तो दाराशी असलेला भला मोठा वृक्ष नि त्याचा पार. तो अजून तसाच उभा आहे. कधीपासून कुणास ठाऊक? एनर्जी स्टाँल हे लोकांचं भेटायचं ठिकाण होतं तेव्हाही नि नसलेला एनर्जी स्टाँल हे भेटायचं ठिकाण झालं तेव्हाही. एक नंबरचा इंडिकेटर ही भेटण्याची जागा होती तेव्हाही नि ती जुन्या एक नंबरवरचा इंडिकेटर अशी झाली तेव्हाही. तो होताच. तसाच. माझ्या नाँस्टँल्जियात. तिथूनच बाहेर पडायचं स्टेशनकडे पाठ फिरवून नाकासमोर सरळ चालत. रस्ता वळेल तसं वळायचं.

तशा फूटपाथवरच्या फुटलेल्या सगळ्याच लाद्या सवयीच्या. अंधारातही चालता आलं असतं इतक्या. म्हणजे कुठल्या लाद्या अर्ध्या फुटल्या आहेत, कुठल्या लाद्या बाजूच्या वडापावच्या गाडीच्या गळक्या पिंपात भिजलेल्या असतात, कुठल्या ठिकाणचा फूटपाथ चढता उतरताना पाय किमान दीड फूट उचलावा लागतो, पावसाळ्यात पाणी साचल्यावर कुठल्या चार लाद्यांवरून कमीत कमी लांब उड्या मारून चालता येतं, फूटपाथच्या कुठल्या भागावरून चाललं म्हणजे रस्त्यावरून जाणार्‍या गाडीने उडविलेलं पाणी अंगावर उडत नाही, कुठलं गटारावरचं झाकण कधीकधी उघडं असतं ह्याचे नकाशे वाचायला पायांना डोळे थोडीच लागतात? तसंच सवयीने चालत राहिलं की थोड्या अंतरावर पहिल्यांदा नजर वळायची उजवीकडच्या बागेकडे. आजोबा कधी कधी घेऊन यायचे तिथे. स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत दगडावर कोरलेलं अण्णांचं नाव दाखवायला. हल्ली उघडी असते का ती बाग?

त्याला लागूनच असलेलं शंकराचं मंदिर. तसे आजूबाजूला पुष्कळ देव होते. पण मुख्य शंकर. एका छोट्याशा दारातून पायर्‍या उतरून खाली गेलं की प्रशस्त गाभार्‍यामधली शंकराची भली मोठी पिंड नि त्याच्यावर अभिषेक करणारा कलश. त्याच्याबाहेरचा तो पांढराशुभ्र भला मोठा नंदी. हा नंदी पिंडीच्या दिशेने अणुभर की अशाच काहीतरी सूक्ष्म अंतराने म्हणे सरकतो नि तो जेव्हा पिंडीशी पोहोचेल तेव्हा जलप्रलय होणार. आपण मोठे होऊ तोवर तो निदान एक‍ दोन वीत अंतर तरी सरकेल असं मला तेव्हा फार वाटायचं. नंतर नंदीची चाल कधी मोजली नाही पण जलप्रलयसदृश परिस्थिती २६ जुलैला पाहिली. देवळासमोरचा भलामोठा तलाव भरून वाहणं हे पावसाच्या कहराचं परिमाणसुद्धा थिटं पडलं तेव्हा. रस्त्याच्या डाव्याबाजूला असणारं हे तळं पूर्वी म्हणे देवळाला लागून होतं. मग रस्ता बांधला मधे. असेलही. तो रस्ता माझ्या आधीच्या पिढ्यांच्या नाँस्टँल्जियाचा भाग नसेल कदाचित.

हे तळं मागे एकदा गाळ काढायला म्हणून संपूर्ण उपसलं होतं. बिल्डींगची पाण्याची टाकी रिकामी करावी ना तसं रिकामं केलं होतं. पाणी कुठे गेलं कोणास ठाऊक, गाळ मात्र शहरभर पसरला होता. तेव्हा त्या तळ्याच्या मधोमध असलेल्या एका सुरेख कमळात असणार‍्या शंकराच्या पिंडीपर्यंत चालत जाता येत होतं. एका संध्याकाळी तळ्यात तसं चालून आलेलंही मला आठवतंय. पुढे गाळ निघाला, तळं भरलं, सुशोभिकरणाच्या भन्नाट कल्पनांमध्ये ते सुंदर कमळ तुटलं नि एक मोठ्ठं बटबटीत देऊळ तळ्यात उभं राहिलं. त्यानंतर त्या तळ्यात बोटीतून फिरतानाही ती मधलं बटबटीत वास्तू डोळयात खुपायची. लहानपणी जवळपास दर महिन्याला त्या बोटींमध्ये बसलो असेन. फक्त बोटीत बसता येत होतं तेव्हा. हातात धडाधड फोटो घ्यायला डिजिटल कँमेरे नव्हते नि ती बोट राइड व्हीडियो शूट करायला ते कँमेरे मूव्ही मोड मध्ये टाकून सज्ज राहायची अनावश्यक धडपडही नव्हती. हात मोकळेच असायचे. माझे पाण्यात घालायला नि आईचे मला धरायला.

(क्रमशः)