Wednesday, March 8, 2017

स्युडोज्वर

या, बसा. काय होतंय?

मला काही नाही, अामच्या यांना ना डॉक्टर …

यांना? मग ते कुठे अाहेत?

अहो काय सांगू, ते कुठले यायला, पण त्यांना ना डॉक्टर …

काय होतंय

काही कळत नाही हो, कायतरी विचित्रसंच करतात

नीट सविस्तर सांगा

सांगते ना -
रोज रात्री एकदम बीपी वाढतं हो यांचं
नि मग एकदम निर्वाणीच्या सुरात बोलत राहतात -
सोडणार नाही तुम्हांला
अामच्या सोसायटीची जागा अाहे ती, समजलात काय
सोसायटीभर कॅमेरे लावतो की नाही पाहा; चोर लेकाचे
छाटून टाकीन, एक दिवस छाटून टाकीन

अां? काय?

नाही म्हणजे तसा थोडा ना त्रास अाहे अामच्याकडे
बाजूच्या बिल्डींगचा
झाडं हो वेडीवाकडी
अामच्या कंपाऊंडच्या भिंती फोडून एकदम खिडक्यांशी येतात
पावसाळ्यात इतकी धास्ती
तसं अाम्हीच खर्च करून
रातोरात तोडल्यात अनेकदा फांद्या
पण त्रास होतोच ना हो

हं. अजून काही त्रास?

म्हणजे तशी मी बाई नसते फार अध्यात मध्यात
पण तरी सततच्या कुरबुरी असतातच ना हो
गरभा, गणपतीच्या वेळी दहानंतरही अावाज बंद करत नाहीत
सत्यनारायणाच्या पूजांसाठी नेमके मुलांच्या परीक्षांचे मुहूर्त काढतात
कचरेवाल्यांशी हुज्जती नि मग कचऱ्याचे ढीग
असं काय काय चालू असतंच
शिस्त नाही हो बाजूच्यांना, कसेही राहतात

अहो, सोसायटीचा त्रास नाही. तुमच्या यांचं विचारतोय.

सांगते ना
तर यांचा हा असा अवतार पाहून
अामच्या सोसायटीच्या लोकांनी बरं का
यांना गेल्या वर्षी सोसायटीचं सेक्रेटरीच केलं
तर मध्यंतरी यांनी काय करावं?
रातोरात कुठून बाई माणसं अाणली
काय केलं परमेश्वर जाणे
पण कुणाला काही कळायच्या अात
कंपाऊंडची भिंत थोडी पाडून
पलीकडे जाऊन ते मोठ्ठं झाड
मुळासकट पाडूनच टाकलं हो!
नि वर पहाटेपासून
दूधवाला म्हणू नका, पेपरवाला म्हणू नका,
ज्याला त्याला कौतुकाने सांगत होते त्याबद्दल
खालच्या परागने ऑफिसला जाताना म्हटलं,
ओ काका, त्या झाडावर एक पाय ठेवून उभे राहा की
विजयी मुद्रेत
तो फोटो व्हॉट्सॅपवरून अाख्ख्या सोसायटीभर झाला

मग तुम्ही काय केलंत?

काय की एकदम बरंच वाटलं,
कशी जिरली शेजारच्यांची असं झालं पटकन
पण तरी म्हणजे अाता बोलू नये,
पण असे छाती फुगवून पोट अात घेऊन
फोटो काढायचं वय अाहे का ह्यांचं?
पण मग नंतर एकाएकी
मला बाई धस्स काळजात
नुकतंच एका चिमणीनं घरटं केलं होतं त्या झाडावर
ग्यालरीच्या ग्रिलवर पाण्याची वाटीही होती अामच्या
गेलं हो
शेजारच्या बिल्डींगवरच्या तिसऱ्या मजल्यावरही
तशीच वाटी होती हो पाण्याची
त्यांची लेक वाकून वाकून पाहत होती
म्हणजे झाड पाडल्यावर कळलं मला
तश्शी काही सगळी बिऱ्हाडं वाईट नाहीत हं तिथली
दोन चार अाहेत जरा त्रासदायक
नि ते झाड ना खरं तर
तळमजल्यावर मूळ मालक राहतात त्यांचं
सोसायटीवाले त्यांचं सगळं चालवून घेतात म्हणून

हं, मग यानंतर शांत झाले का तुमचे मिस्टर जरा?

कुठचे हो? उलट जास्तच चेकाळले
ही तर सुरुवात अाहे, पाहिलं ना काय करू शकतो अाम्ही?
असलं जोरजोरात बाजूच्या सोसायटीतल्या लोकांना सांगतात हो
अाणि अामच्या बिल्डींगमधले लोक
जळलं मेलं लक्षण
इथे मी यांचं वय नि वाढतं बीपी पाहून शांत करतेय यांना
तर उलट यांना अजून हरभऱ्याच्या झाडावर -
काका, एकदम जबरी
होऊनच जाऊद्यात अाता.
अाता अाहेत भांडणं, नाही असं नाही
पण अाता कित्ती केलं तरी
शेवटी अाजूबाजूलाच राहायचंय ना सगळ्यांना
विनाकारण संबंध इतके विकोपाला गेलेत अहो
गेला बाजार हळदीकुंकवांना तरी येणंजाणं होतं
यंदा तिकडची एक्कही बाई अाली नाही
कसं हो थांबवायचं हे?

हं? तुमचे मिस्टर करतात काय?

रिटायर झाले दोन वर्षांपूर्वी
माझी अाहे अजून सर्वीस दीड वर्षं
मुलगाही लागलाय अाता नोकरीला
तर दिवसभर एकटेच असतात घरी
सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन येतात
मग रोजचा पेपर, टीव्ही
पूर्वी खूप वाचत असत, हल्ली कंटाळा येतो म्हणतात
हल्ली ते फेसबुकपण शिकलेत
संध्याकाळी कधी बाजारात, कधी टेकाडे भाऊजींकडे जाऊन येतात
मग रात्रीच्या मालिका
जेवताना एक-दोन तास ते बातम्यांच्या चर्चांचे चॅनल चालू असतात
नि मग माझी अावराअावर सुरू झाली नाही की यांचं सुरू होतं
रोजचं झालंय हो

हे असं त्यांचं रोज रात्री जेवणानंतर, बातम्यांच्या चर्चा पाहून झाल्यावर होतं?

होS

एकटेच पाहतात की तुम्ही सगळे?

म्हणजे जेवताना चालू असतं
पण मी अापली जेवणं झाली की उठते
हे बाप-लेक पाहत बसतात
कुस्तीची मॅच पाहत असल्यासारखे

मग तुम्ही काय करता?

मला नै बाई ते होत
काय तो अाक्रस्ताळेपणा
नि जिवाच्या अाकांतानं दुसऱ्यावर तुटून पडायचं
नि सकाळ झाली की जणू संपलेच प्रश्न त्या चर्चेतून कायमचे
असे वागतात हो
मला माझी कामं असतात
खरकटी ताटं, काढून ठेवायचं अन्न
उद्याची भाजी, उद्याची कणीक
दुधाची पिशवी, कचऱ्याचा डबा

शनिवारी, रविवारी रात्रीपण पाहतात बातम्यांच्या चर्चा?

चक

मग त्याही दिवशी होतो त्रास बीपीचा?

अं, नाही हो, हे माझ्या अाधी लक्षातच नाही अालं.

हं. तुमचा मुलगाही पाहत असतो म्हणालात. त्याची कशी असते मनस्थिती?

तशी ठीक असते, म्हणजे तसं दोघांचं पटतं बऱ्याच मुद्द्यांवर
पण ना -
हे रातोरात-झाड-पाडणं-भांडणं-हरभऱ्याचं झाड झालं त्यानंतर एकदोन दिवसांपासून …

काय झालं?

म्हणजे कुठे बोलू नका -
मला ना संशय अाहे की
अामचा वरुण अाणि शेजारच्या सोसायटीतल्या वर्षाचं काहीतरी अाहे
वरच्या घाऱ्या काकू म्हणे की ते
रोज एकत्र जाता येतात,
कोपऱ्यावरून मग अापापले घरी येतात
त्यांचं तसं काही बोलण्यात बोलणं नसतं, पण
त्या दिवशी वर्षा नि तिची मैत्रीण बोलत होत्या गेटपाशी
तर वरुण अाल्यावर ती धुसफुसत अात गेली
पाहिलं मी खिडकीतून
काय की तशी ती काही अापल्यातली नाहीय

अापल्यातली?

अं? नाही म्हणजे अामच्यातली नाहीय ती
नाही म्हणजे तसं नाही
पण मला जरा टेंशन येतं हो हे कळल्यापासून
की खरंच असेल का,
किती सिरीयस असेल
पण तसं अाम्ही अामच्या मुलाला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय

हं. ते ठीके हो. वरुण नि तुमच्या मिस्टरांचं काय?

हं तर त्याच दिवशी रात्री एकदम वरुण यांना चिडून म्हणाला -
अाधी तो टीव्ही बंद करा
ह्या असल्या चर्चा पाहता ना त्याने बीपी वाढतंय
जरा लोकांशी माणसासारखं वागा
अद्दल घडवताहेत शेजारच्यांना
अाणि अातल्या खोलीत निघून गेला
अात जाऊन काय करत असतो कॉंप्युटरवर देव जाणे
पण अामच्या यांना असा संशय की
तो अात जाऊन कॉंप्युटरवर
बरं का
कॉंप्युटरवर एन डी टी वी पाहतो

हो?

हं. मग त्याने यांचं पित्त खवळतं.
काय झालं असेल हो डॉक्टर?

हे साधारण कधीपासून होतंय असं?

तरी झाले सहा-सात महिने
ते सर्जिकल सर्जिकल झालं नै का सैनिकांचं काहीतरी
त्या रात्री डोळ्याला डोळा लागला नाही यांचा
त्याच्या नंतरच झालंय हे सुरू

हं. कुठल्याही वादात सतत टिपेच्या अावाजात बोलतात का?

हो

शेजारच्या बिल्डींगमधल्या कुणाशीही वाद उकरून काढतात का?

होय

शेजारच्या बिल्डींगचा पाण्याचा पाईपच तोडला तर, टेलिफोनची केबलच कापली तर -
असल्या गोष्टीही बोलत राहतात का?

अगदी, अगदी.

जाता येता इतकी वर्षं राहतोय अाम्ही इथे अशा छापाचं काही बोलतात का?

होय हो. शेजारच्या बिल्डींगमधल्या एकांना परवा म्हणाले -
अरे, एकाच वेळी ना बांधल्या बिल्डींगी अापल्या? काय ही तुमची अवस्था!
नि कहर म्हणजे मध्यंतरी खालच्या देशमुख काकांना म्हणाले -
अरे गेली पस्तीस वर्षं राहतोय अाम्ही इथे,
काय केलंत तुम्ही सेक्रेटरी असताना
पाहा इथे दोन महिन्यांत दणका दाखवलाय की नाही
नि बिल्डींगमधले बाकीचे लोक अाहेतच यांचा शब्द खाली न पडू द्यायला
यांचं पाहून तेही तसेच बोलतात.
अाता तो इतका वयस्क माणूस
त्यांनी हेलपाटे घालून बिल्डींगचं ओसीचं काम करून घेतलं
अाज अामच्या भागात अामच्या सोसायटीचं तेवढं ओसीचं काम झालंय
गरज ए का त्यांना असं उगा घालूनपाडून बोलायची?

हं. सतत अाक्रमक पवित्रा केवळ बाहेरच्यांशी की घरातही एकदम फर्मानं सोडतात?

अहो काय सांगू? परवा एकदम म्हणाले -
अाजपासून घरातून तांदूळ बाद.
अाहे तो फेकून देणार मी अाजच्या अाज.
मला काही कळेचना.
हल्लीच भरले होते अहो,
नाही यंदा जरा उशीरच झाला भरायला
ते चाळून, बोरीक पावडर, धान्यरक्षक लावून भरताना
माझी पाठ मोडली, यांची काडीची मदत नाही
नि बरं कुणाला द्यायचा तर सरळ घरातून बाद म्हणून फेकून दिला?
तरी मी एक डबाभर तांदूळ
गुपचूप देशमुख काकांना देऊन अाले
त्यांच्याच्यानं होत नाही हो अाता, त्यांची एक फेरी कमी दुकानात
वर अापण काही म्हटलं की यांचं एकच टुमणं
वजनं पाहा एकेकाची. भात हवाय.
नाही झाली पन्नास दिवसांत वजनं कमी तर पाहा.
काही मरत नाही कुणी भाताशिवाय.

मग झाली का वजनं कमी?

ती कुठली हो व्हायला
माझं मेलीचं काम दुप्पट वाढलंय पोळ्या लाटताना
नि तो चक्कीवाला भैय्या फार मारतो हो पीठ
अापण नसलो तिथे की भलत्याच धान्यावर अापला गहू टाकतो
तिथ्थे ताटकळत थांबून राहावं लागतं दळण होईपर्यंत
त्याही खेपा मेल्या वाढल्यात यांच्या असल्या तुघलकी वागण्यानं
काय कळत नाही, हे असं कशानं झालं असेल हो?

हं. तसं काही काळजीचं नाही, पण त्यांना स्युडोज्वर झाला अाहे.

स्युडोज्वर?

हं. लोकांना अापल्यामुळे ताप होतोय हे कळत नाही या अाजारात
उलट अापणच कसे तारणहार म्हणून माणूस सतत तापलेला
इतका अात्यंतिक उन्माद होतो बीपी वाढून की
कोणीतरी शत्रू शोधून सतत वाद उकरून काढावा असं वाटत राहतं
मग त्यात शेजारची सोसायटी ते घरातले तांदूळ सगळे अाले

अगं बाई, मग काय करायचं अाता यावर?

काही नाही. सगळ्यात अाधी म्हणजे दुर्लक्ष करायचं.

अं?

हं. बिलकुल भाव द्यायचा नाही.
त्यांच्या प्रत्येक गोष्टीला अापण अरेला कारे करायला जायचंच नाही.
अापण अापलं रुटिन सुरू ठेवायचं.

हं? अाणि?

सकाळी सकाळी टीव्ही लावायचा नाही.
पेक्षा लवकर उठून संतवाणी ऐका

हं. मनाच्या श्लोकांची सीडी अाहे घरी.

नको. शक्यतो तुकारामच ठेवा.
बदल म्हणून ज्ञानेश्वर, जनाबाई, चोखामेळा चालतील.

बरं. अजून?

ते खूप अाक्रमक, रक्त खवळावं असं काही बोलले की
तुम्ही अापण त्या गावचेच नाही असं समजून
केर काढा, भांडी लावा, पोळ्या करा
रोजची कामं करा.
त्यांना कचरेवाल्याशी बोलायला सांगा
त्याच्यासोबत जाऊन कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते ते पाहून यायला सांगा.

अं? काय?

अाणि मग अाख्ख्या सोसायटीत किती कचरा गोळा होतो,
कोणत्या स्वरूपाचा,
तो कसा वेगवेगळा करायचा,
कचरेवाल्याच्या कामाचं मोल काय, त्याला किती पैसे द्यायचे
या सगळ्याचा एक सविस्तर अहवाल तयार करायला सांगा
नि सोसायटीचं या विषयावर प्रबोधन करायला सांगा.
त्यांना गॅसचे भाव विचारा
गॅसची सबसिडी परत केलेली परत मिळते काय
ते विचारून त्याचा पाठपुरावा करायला सांगा.
नगरसेवकाला शोधायला सांगा.
तो सापडला तर त्याच्या मागे लागून समोरचा रस्ता दुरुस्त करून घ्या
काम झालं खरंच सुरू
तर तुमच्या मिस्टरांना रोज त्या कामावर देखरेख ठेवायला सांगा
रोजचे कामगार, कामाचे तास नोंदवून ठेवा
मग महापालिकेकडून हिशेब मागून त्यांच्या नोंदींशी पडताळायला सांगा
सोसायटीच्या पाणी, वीजवापराचं ऑडिट करायला सांगा

काय हे नवीनच ए सगळं, पण हे जमेल यांना?

शिकतील हो.
नाही तर निदान प्रश्न विचारायला नि इतरांचं ऐकायला शिकतील
तुम्हांला रोज जिथे जिथे म्हणून अडखळायला होतं ना
त्या त्या गोष्टीत त्यांना गुंतवत चला
अाणि हो, मुलाला सांगा, बाबा रे तू तुझ्या मैत्र्या धरून ठेव नीट

काय एकेक भलतंच ए तुमचं डॉक्टर. अाणिक काय?

संध्याकाळी तुम्ही यायच्या अाधी
भाजी निवडायला नि कुकर लावायला सांगा
बातम्या पाहून टीव्ही बंद करा
बातम्यांच्या चर्चा अापसांत करा
तुम्हीही बोला, नाय तर फक्त तेच बोलत राहतील
रात्री जेवणं झाली की
मुलाला तुमची खरकटी-अन्न-दूध-कचरा-कणीक-भाज्या यांतली कामं करायला सांगा

अं? अाणि मी काय करू?

तुम्ही नि तुमचे मिस्टर
जुनी गाणी लावून गप्पा मारा
स्युडोज्वर झालाय त्यांना -
ये छूने से नहीं फैलता
उन्हें बस प्यार की ज़रूरत है

Friday, March 23, 2012

देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई?

देऊळ (अखेर) पाहिला. लघुकथा/रूपककथा हा संक्षिप्त लिखाणाला काव्याकडे नेणारा प्रकार लिखाणात प्रभावी असला, तरी अनेकदा त्या गोष्टींवरचे चित्रपट साफ फसतात. असे चित्रपट व्यावसायिक वगैरे असणं तर दूरच. देऊळ याला अपवाद आहे. वळू वगैरे चित्रपटांनी रुजवलेला सादरीकरणाचा पोत देऊळ बिनदिक्कत उचलतो आणि अधिक प्रगल्भ करतो. देऊळ आपली बारीकसारीक गोष्टी टिपणारी दृश्ये, दैनंदिन वास्तवाचं समर्थ चित्रण आणि सामन्यांच्या आयुष्यातही गोष्टी घडू शकतात या धाग्यातून रस्किन बॉंडचीही आठवण करून देतो. तो ’रिकामं देऊळ’पासून ’शिलाखंड’पर्यंतच्या कुसुमाग्रजांच्या अनेक समिधांचीही झलक दाखवतो. या दोहोंच्या मिश्रणातून तयार झालेली एक पूर्ण भाग न जाणारी गोष्टही सांगतो. पण तो अमूर्त नाही. तो वास्तवाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळेच तो अधूनमधून ’ढोलताशे’सारख्या नाटकाचीही आठवण करून देतो. पण त्याने नायक आणि सूत्रधार यांची चोख वाटणी केली आहे. त्यामुळेच सूत्रधार त्याची विवेकनिष्ठा नायकावर लादत नाही. परिणामी, देऊळ कुठेही प्रचारकी आणि तर्ककर्कश होत नाही. मुळात ती काही अवकाशांच्या संतुलनाची एक कथा आहे. ती आहे ते दाखवते. सूत्रधाराशिवाय कोणीही त्या गोष्टीत काहीच भाष्य करत नाही, पण तरीही तिची वास्तवाशी असलेली घट्ट वीण काही न बोलताही बरंच काही सांगून जाते. देऊळची गाणी विंदांचीही आठवण करून देतात तेही त्यातल्या विवेकनिष्ठ रोखठोकपणामुळेच. आपल्या गोष्ट सांगण्याच्या हातोटीमुळे देऊळची नाळ कळत नकळत कुठेतरी ’मालगुडी डेज’शीसुद्धा जोडलेली वाटते. सुरुवात आणि शेवटाचं पार्श्वसंगीतही हे नातं काहीसं अधोरेखित करतं. आणि तरीही देऊळ या सगळ्यांपेक्षा वेगळा आणि सरस ठरतो. 

ही गोष्ट आहे, त्यामुळे ती इथे सविस्तर सांगण्यात अर्थ नाही. तो उद्देशही नाही. चित्रपट सुरू होतो तो एका पुरातत्व खात्याचं उत्खनन चालू असल्याच्या दृश्याने. वास्तविक "हे काय (खोदकाम) चालू आहे?"छाप सपक संवाद नायकाच्या तोंडी इथे पुरू शकला असताही. पण इथे कोरीवकामात सपकपणाला स्थान नाही. त्या नायकाच्या विश्वात चाललेला व्यवहार इथपासून लख्खपणे दिसू लागतो. आपल्या आणि चित्रपटाच्या पहिल्याच संवादात हा चित्रपटाचा (होऊ घातलेला) नायक ज्या कमालीच्या अलिप्तपणे, निरागसपणे, साशंकतेने आणि स्वाभाविकपणे विचारतो, "काय एशीझ्येड हाये का?" तिथेच हा चित्रपट आपला खुंटा बळकट करतो. आपल्या आजूबाजूला चालू असलेल्या "विकास प्रकल्पां"विषयी ग्रामीण जनता अनभिज्ञ असते, या प्रकल्पांविषयीची साशंकता "बाहेरच्यांची"च अधिक असते अशा सार्वत्रिक, अकारण शहरी मानसिकतेला हा चित्रपट तिथेच हरताळ फासतो. मग तो मागे वळून पाहत नाही. वास्तविक त्या कथेत शहरी-ग्रामीण असं आहेही आणि नाहीही. ती कथा एका गावात घडते. म्हणून पटकथा त्या गावाचं वास्तव कुठलीही तडजोड न करता समर्थपणे उभं करते, आणि कथेतली पात्रं आपापले संवाद त्यानुरूप त्या बोलीभाषेत बोलतात. ’चला एक ग्रामीण (महाराष्ट्र दाखवणारा/पार्श्वभूमीला असणारा) चित्रपट काढू’ (चएग्राचिका) या मानसिकतेतून काढलेला हा चित्रपटच नव्हे. साहजिकच ’चएग्राचिका’ मराठी चित्रपटांना अनेकदा (विनाकारण) ग्रासून टाकणारा ’प्रमाण ग्रामीण बोलीभाषे’चा प्रश्न या चित्रपटाला अजिबात पडत नाही. या चित्रपटाचा सूत्रधार त्याची भाषा बोलतो. ती बोली वेगळी असली, तरीही या दोन बोलींच्या व्यवहारात बोलीभाषांच्या शुद्धाशुद्धतेचा आणि पर्यायाने ठरवल्या जाणार्‍या प्रतवारीचा वास येत नाही. 

धार्मिकतेच्या आध्यात्मिक मुलाम्याचं, व्यवसायीकरणाचं, आणि बटबटीतपणाचं प्रत्ययकारी चित्रण तर या चित्रपटात आहेच. पण कोरीवकाम करत बारकावे टिपण्याचा छंद असल्यासारखा देऊळ ते टिपत जातो. गाडीच्या नंबर प्लेटवरील "भाऊ"पासून दत्ताच्या स्टिकरपर्यंत, ’दत्त दत्त, दत्ताची गाय, गायीचं दूध...’ म्हणणार्‍या गाण्यांपासून कांदाफोडी आणि सागरगोटे खेळण्यापर्यंत हे बारकावे बेमालूमपणे येत जातात. भाऊंच्या ताटाखालचं मांजर म्हणून वावरणार्‍या सरपंचबाई आपला भाव वधारल्यावर ऐटीत टिवी पाहताना पार्श्वभूमीला ’होम मिनिस्टर’चं शीर्षकगीत चालू असण्याची कल्पकता विलक्षण आहे. तिथेही महिला सक्षमीकरणाचं वास्तव दाखवत हा चित्रपट निमूट पुढे जातो. ‘संडास ज्याच्या दारी तोच खरा पुढारी’ अशी घोषणा मिरवणारा भाऊंच्या घरचा संडास आणि सरपंचबाईंचा कागदावर बसलेला मुलगा हागणदारीमुक्त महाराष्ट्राची कथा व्यवस्थित विशद करतात. तापाने फणफणलेल्या केश्याला बघायला आलेल्या बाया आपली देहबोली, वावर, खोलीत बसण्याची जागा यातून सत्तेची सामाजिक उतरंड, पंचायती व्यवथेमधील महिला आरक्षणाने त्या पारंपरिक उतरंडीला दिलेला छेद अलगद चिमटीत धरून आपल्यापुढे ठेवतात. "बाई! पारोश्यानं झेंडावंदन! काय व्हनार या देशाचं?" अशासारखे संवाद एरवी चिमटीतून निसटणारे संकेतांचे आणि प्रतीकांचे संदर्भ सराईतपणे पकडतात. केशा आणि पिंकीमधले शारीर-अशारीर स्पर्शास्पर्श नाना कंगोरे टिपत जातात. साध्या दैनंदिन घटना, जीवन आणि राहणीमान दरडोई मोबाईल फोन आणि दूरचित्रवाणी संच यांचं दरडोई पाणी, वीज, शौचालयं यांच्याशी असलेलं व्यस्त प्रमाण कुठल्याही आर्थिक अहवालांच्या हवाल्याविना आहे तसं समोर ठेवतात. असं बरंच काही.

कथेच्या नायकावर कथा पुढे नेण्याचं ओझं नाही. सूत्रधारावर कथा घडवण्याचं ओझं नाही. कथेच्या नायकाला तात्कालिक जगण्याची मुभा आहे. किंबहुना त्याला काळाच्या एका बिंदूपलिकडचा अवकाशच नाही. सूत्रधाराला भूतभविष्याचा आसमंत आहे. परंतु त्यातूनच आकळलेली आपला काळाचा आवाका मर्यादित असल्याची जाणीव आहे. सूत्रधाराकडे भविष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे, पण अचूक भविष्य सांगण्याची अमानवी शक्ती नाही. त्याच्याकडे विवेकनिष्ठा आहे, पण त्यासाठी जिवाचं रान करण्याची वृत्ती नाही. त्याच्या त्रिशंकू अवस्थेचं त्याला भान आहे. सूत्रधार संपूर्ण मानवी आहे; तो जितका विचारशील आहे, तितका सर्जनशील नाही. नायकही संपूर्ण मानवी आहे; पण तो जितका सर्जनशील आहे, तितका विचारशील नाही. या संतुलनावर पूर्ण गोष्ट उभी आहे. एका विशिष्ट क्षणी सूत्रधाराची आपल्या मर्यादेची जाणीव तीव्र होते. तो प्राचीन उत्खननाच्या जागीही हिंडून पाहतो. आणि अखेर काहीशा हताशपणे गोष्टीला शक्यतांच्या यादृच्छ मार्गांवर सोडून तो कथेपासून नामानिराळा होतो. पुढे एका दिग्मूढ क्षणी नायकही त्याच उत्खननाच्या जागी पोहोचतो. इथे नायकाची सर्जनशीलता सामान्याकडून असामान्याकडे झेपावते. हा आणि केवळ हाच या गोष्टीचा निर्णायक क्षण आहे. परंतु तोपर्यंत पोचण्यासाठी घेतलेल्या मेहनतीत आणि कलाकुसरीत त्या क्षणाची तीव्रता आणि उत्कटतेचं यश आहे. भास-आभास, वास्तव-अवास्तव, मानवी-अमानवी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, दैव-सर्जन, पुरोगामी-सनातनी, श्रद्धा-अंधश्रद्धा, माणुसकी-सत्ता या आणि अशा अनेक सीमांवर नकळत उभं करून या क्षणी नायकही कथेपासून नामानिराळा होतो. केवळ अर्थ आणि शक्यता यांचा बहुमितीय आसमंत उरतो. ’देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई?" ही तर केवळ एक शक्यता. चित्रपट एक चित्रपट राहत नाही; फक्त एक गोष्ट उरते. देऊळ तिथेच इतर अनेक चित्रपटांपेक्षा वेगळा आणि सरस ठरतो.

Tuesday, October 25, 2011

रेषेवरची अक्षरे २०११

मंडळी,

सलग चौथ्या वर्षी ’रेषेवरची अक्षरे’च्या अंकासह तुमच्या भेटीला येताना आनंद तर वाटतो आहेच, खेरीज थोडा अभिमान आणि जबाबदारीही.

इथे ’रेषेवरची अक्षरे २०११’चा अंक ब्लॉगवर आणि पीडीएफमध्येही उपलब्ध आहे.

दर वर्षीपेक्षा तिपटीनं ब्लॉग वाचूनही संकलित साहित्याचा भाग मात्र संख्येनं आणि दर्जानंही आहे तिथेच आहे, याची खंत आहेच. पण ब्लॉगरांकडून नवं काही लिहून घेण्याचा प्रयोग यंदा यशस्वी झाला आणि ’लैंगिकता आणि मी’ यासारख्या अनवट विषयावरचं साहित्य अंकात सामील करता आलं, त्याचा आनंदही आहे. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत.

अंक वाचा, आपल्या सुहृदांना पाठवा, तुमच्या प्रतिक्रिया, तक्रारी, सूचना, सुधारणा कळवा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत.

तुम्हा सगळ्यांना, तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरपूर सकस साहित्याची जावो...


ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
रेषेवरची अक्षरे
२०११