Friday, September 26, 2008

सामाजिक खोखो

संवादिनीने सुरू केलेला खोखो अनिकेतमार्फत इथवर आलाय. तो पुष्कळ वेळाने घेतोय त्याबद्दल प्रथम दिलगिरी.

खरं तर संवादिनीचं पोस्ट वाचलं तेव्हा सुरुवातीला ब्लॉगर्सपैकी कोणाला समाजाशी काही पडलंय हे वाचून बरं वाटलं. पण आपण आपलं उठून रक्तदान करून यावं नि समाजाचं ऋण वगैरे फेडलं बिडलं म्हणावं, हे काही झेपेना. त्यामुळे ते वाचल्यावर "तिडिक" ते "असो" असा विचारांचा एक प्रवास झाला. पण अनिकेतचं पोस्ट वाचून जरा जिवात जीव आला.

वास्तविक सामाजिक जाणीवेच्या भव्य कल्पना एवढ्या मर्यादित पातळीवर उतरून सीमित झाल्या, तेव्हा ह्या सामाजिकतेची, सामाजिक बांधिलकी वगैरेची, किंबहुना सामाजिक कामाच्या स्वरूपाची एक वर्गवारीच करावीशी वाटली.

पहिला गट त्या कामांचा जी अगदीच वैयक्तिक असतात, त्यातून गरजूंना मदत होते, पण आपल्या जीवाला नगण्य किंवा शून्य तोषिष लागून. ह्या कामासाठी दानत लागते. रक्त, डोळे, शरीर, पैसे, कपडे, अन्न, पुस्तकं वगैरे देणं हे आलं ह्यात. ह्या सगळ्या दातृत्वाचं श्रेष्ठत्व मानूनसुद्धा बहुतांशवेळा दिलेली गोष्ट आपल्याकडे एकतर अतिरिक्त असते किंवा ती भरून काढता येते (शरीर सोडून, तो वेगळाच भाग आहे पण). सुदैवाने अशा गोष्टी इतक्या प्रतिक्षिप्त क्रीयेसारख्या नकळत केल्या जातात, की त्या आठवून त्यांना सामाजिक काम म्हणायला माझी जीभ धजावेना. त्यामुळे त्यांची जंत्री येथे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण अशी दानत असणं हेसुद्धा दुर्मिळ झालेलं आजूबाजूला पाहताच लक्षात आलं नि मग म्हटलं की असेल एखाद्याला मिळत असं करून सामाजिक काम केल्याचं समाधान, तर मला काय त्याचं? चांगल्याच हेतूने तर करतात सगळे. तेव्हा असो!

ह्या गटात एक वैयक्तिक नैतिक कामे स्वरूपाचा उपगट घालूयात. ह्यात आपण कायदेशीर नि नैतिक वागून समाजाला अप्रत्यक्ष मदत करत असतो. वीज वाचवण्यापासून लाच न देण्यापर्यंत. ते नमूद करायला हरकत नाही. नुकतंच मी गाणी, चित्रपट बेकायदेशीर डाऊनलोड करणं किंवा इतरांकडून अशी फुकटची ती घेणं बंद करायचं ठरवलंय. सध्या जी आहेत त्यांचं काय? तर प्रांजळ कबुली की ती डिलिट करायचं धैर्य अजून नाही. तेही लवकरच येवो अशी इच्छा. तुम्ही कधी बंद करताय?

दुसरा गट म्हणजे संघटित स्वरूपाचं, साधारण समाजसेवी एनजीओ, सामाजिक संघटनांसारखं. (ज्या संघटना संघटित होऊन पहिल्या गटातली कामं फ्याशन म्हणून करतात त्यांचा काही संबंध नाही.) किंवा एखाद्या विशिष्ट समस्येवर, प्रश्नावर केलेलं काम (प्रश्नाविषयी जागृती करण्यासकट). किंवा एखाद्या दुर्लक्षित समाजघटकांसाठी केलेलं काम. काही वैचारिक बांधिलकी असणारं, charity च्या पलिकडलं, जरा स्वतःला तोषिष लावून.

नि इथे मला अगदी लाजेनं मेल्यासारखं वगैरे वाटू लागलं. वास्तविक अशी कामं पूर्ण वेळ करणारी मंडळी घरात असताना, आपण अगदी खानदानाला धब्बा वगैरे आहोत असं वाटू लागलं. नि हा खोखो आपल्यापर्यंत नाहीच आला तर बरं होईल, नाही तर त्यावर लिहायला लागलो तर अजून लाज वाटेल असा एक सोयीस्कर पळपुटा विचार मनात आला. पण अगदी दुसर्‍याच खेपेला तो आला नि मला बेसावध गाठलं, नि शिवाय अनिकेत नि अगदी विचारपूर्वक वगैरे दिला होता हे वाचून तर अधिकच त्रास.

मग ठरवलं फार झालं. जे इतके दिवस करता येण्यासारखं आहे असं नुसतं म्हणत होतो, त्याची माहिती गोळा केली. तर आमच्या विद्यापीठात पर्यायी स्प्रिंग ब्रेक नावाचा एक उपक्रम चालतो. ह्यात अमेरिकेच्या विविध भागांत वा अमेरिकेबाहेर अभ्यासगट, कृतिगट पाठवले जातात. प्रत्येक भेटीमागे विशिष्ट उद्देश असतोः पर्यावरणीय समस्या, शिक्षणामधील तफावत, जागतिकीकरणाचे दुष्परिणाम, आपद्कालीन मदतीमधील भेदभाव वगैरे. तर येत्या स्प्रिंग ब्रेक मध्ये अशा अभ्यास/कृतिगटात जायचं नक्की केलं. मी ह्या चार उद्दिष्टांसंदर्भात काम करायला जाणार्‍या गटांमध्ये सहभागी व्हायला उत्सुक आहे असे अर्जात पर्याय देणार आहे. म्हणजे मी ठरवलंय. रीतसर अर्ज, मुलाखती असा सोपस्कार आहे. त्यामुळे निवड व्हावी लागणारे. पाहूयात. निवड झाल्यावर खर्चाचं काय हाही प्रश्न आहे, पण निधी उभारण्यासाठीही काही उद्योग करतात म्हणे. नाहीतर पदरचे मोडीन. तसेही स्प्रिंग ब्रेक मध्ये लांबलचक सहलीवर उडवीनच पैसे...तर ते दुय्यम आहे. निवड झाली तर जाईनच, नि ते अनुभव इथे लिहिनंच. नाही झाली तरीही त्याच केंद्राच्या अजून एक दोन गोष्टी बघून ठेवल्यात त्याचा पाठपुरावा करीन. ही अर्थात पहिली पायरी, शिक्षण संपेपर्यंत बहुतेक सुट्ट्यांमध्येच, पुढंचं पुढे...

तिसरा गट हा व्यापक आहे. म्हणजे व्यापक सामाजिक-राजकीय स्वरूपाचा. राजकारण व समाजकारण हे काहीतरी भिन्न आहे असं मला जराही वाटत नाही. अशी समजूत असणारे दोन गट: समाजकारणाशी नातं तोडलेले राजकारणी नि राजकारण व समाजकारणाशी नातं तोडलेले शिकले सवरलेले लोक. मला हे असं अलिप्त जगणं अशक्य आहे. वास्तविक अराजकीय भूमिका घेऊन केलेलं समाजकारणसुद्धा मग बर्‍याचदा मर्यादित राहतं, असं आपलं माझं मत. पण ते सगळं करायची ही वेळ नाही. मागे हे सगळं सांगितल्यावर एका मित्राच्या आईने "आधी शिक्षण पूर्ण कर बाबा" असं सांगितलं होतं. मलाच त्यांची दया आली. मी पोट धरून हसून, "काकू, मी काय उद्या उठून राजकारणात शिरत नाहीये" असं सांगितलं होतं, तेव्हाही त्यांच्या चेहर्‍यावर मी काहीतरी भयंकर करणारे आयुष्यात असाच भाव होता. पण त्या सगळ्याला वेळ आहे, नि नेमकं कसं काय होईल कुणास ठाऊक. पण रक्तातच उतरलंय बहुतेक माझ्यात, अराजकीय होताच येत नाही, त्याला काय करणार...पण ते असो....ही ती वेळ नव्हे.

हे वर्गीकरण माझ्यापुरतंच...ते वर्गही अर्थातच mutually exclusive and exhaustive नाहीत. त्यामुळे नाही पटले तर सोडून द्या. गट १ हा अगदी विनम्रपणे माझ्यासाठी सवयीचा भाग आहे, त्यामुळे त्या कामांना मी कमी लेखून उगीच कुणाला दुखावलं वगैरे असेल तर जाहीर माफी. गट २ हा खरा गाभा आहे नि त्यासाठी हालचाल सुरू करायला कारण ठरल्याबद्दल ह्या खोखोचे आभार. गट ३...पाहूयात!

गट२ शी असलेली बांधिलकी ज्यांच्या लेखांतून वेळोवेळी व्यक्त झालेली आहे, त्या कसंकायक्षिप्रा ह्यांना माझा खो!

Friday, August 22, 2008

कविता

मेघनाकडून खो घेऊन...
------------------------------------------
१.

पाऊस अल्लद
स्वप्नातल्या हिनकळ्या सावलीसारखा.
दिवसाआधीच्या झांजरझापीतला.
झाडांच्या फांद्यांवर; थेंबथेंब पानांवर
अल्लद स्वप्नातला, पाऊस झोपेतला.

पाऊस पक्ष्यांच्या पंखांवर निसटता
हलका, हेलकावता, थेंबाथेंबीचा
पिवळ्या जर्द पहाटेच्या
अंगणात पाखडल्या चिमण्यांच्या
चिवचिव चोंचीतल्या गाण्यातला.

पाऊस चढतीचा
आषाढ गढतीचा
दुपारच्या निःशब्द तळ्याच्या पाण्यावर
संथ सरपटता
केतकी कबूतरी पंखांच्या दाटीत
गर्भार गढतीचा.-पाऊस चढतीचा

पाऊस उतरल्या सांजेच्या काळोखात
गडदगर्द गहिरा
डोंगर कठड्याशी झिंगून काजळी काळोख पिणारा
निमूट झोपलेल्या खोर्‍याखोर्‍यांवर
विक्राळ बरळता मदमस्त पाऊस.

पाऊस रात्रीचा
कभिन्ह-माध्यान्ही
धसमुसळा, काळा, वैर्‍यासारखा.
उध्वस्त डोळ्यांतल्या सांदीसांदीतून
खिंडार पाडणारा.
विजेच्या विळख्यांनी वेटाळत जाणारा...
-सर्पाहून गहिरा.

--- ना. धों. महानोर (पावसाळी कविता)
------------------------------------------

२.

तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे,
निद्रिस्त शांतकाय आता पडून आहे.
गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी
हा वेल मोगर्‍याचा पानीं मिटून आहे.
अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाबः आता रोखून श्वास आहे.
जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फूट गीत मंद हुरहूर बोलताहे.
वनवेळु वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी निःश्वास टाकताहे.
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे.
बोले अखेरचे तोः "आलो इथे रिकामा,
सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे."

---आरती प्रभू, (नक्षत्रांचे देणे)
------------------------------------------

माझा खो आनंद आणि जास्वंदी ह्यांना.

Wednesday, August 6, 2008

दिल में एक लहर सी...

नासीर काज़्मी यांची "दिल में एक लहर सी उठी है अभी" ही ग़ुलाम अलींच्या गायकीने अजरामर झालेली ग़ज़ल. तिच्या भाषांतराचा एक प्रयत्न.

मूळ ग़ज़लेचे देवनागरी transliteration (ह्याला मराठीत काय म्हणायचं? अक्षरांतर?)(संदर्भ):

दिल में एक लहर सी उठी है अभी
कोई ताज़ा हवा चली है अभी

शोर बरपा है ख़ाना-ए-दिल में
कोई दीवार सी गिरी है अभी

कुछ तो नाज़ुक मिज़ाज हैं हम भी
और यह चोट भी नई है अभी

भरी दुनिया में जी नहीं लगता
जाने किस चीज़ की कमी है अभी

तू शरीक़-ए-सुख़ाँ नहीं है तो क्या
हमसुखाँ तेरी ख़ामोशी है अभी

याद के बेनिशाँ जज़ीरों से
तेरी आवाज़ आ रही है अभी

शहर की बेचराग़ गलियों में
ज़िंदगी तुझको ढूँढती है अभी

सो गए लोग उस हवेली के
एक खिड़की मगर खुली है अभी

तुम तो यारों अभी से उठ बैठै
शहर में रात जागती है अभी

वक़्त अच्छा भी आएगा 'नासीर'
ग़म ना कर ज़िंदगी पडी है अभी

ग़ज़लेचं भाषांतर ग़ज़लेच्या स्वरूपातच करावं असं वाटलं. ते खालीलप्रमाणे. ‍भाषांतर कितपत जमलं हा भाग अलाहिदा. पण त्या प्रयत्नात शांता शेळके यांचं एक वाक्य संपूर्ण पटलं, जे काहीसं असं होतं - "भाषांतर हा एखाद्या साहित्यकृतीचा रसास्वाद घेण्याचा एक सर्वोत्कृष्ट मार्ग आहे"...शांताताई..अगदी खरं! भाषांतराचा प्रयत्न काहीसा असा...

आत्ताच लहर जराशी उठली अभ्यंतरी
ताजीच झुळुक हवेची आली कुठली तरी

गेहात उठे मनाच्या कसला कल्लोळसा
एखाद भिंत कुठेशी नुकती ढळल्यापरी

नाजूक, मृदुल म्हणा वा हळवा ढंगच खरा
ओलीच जखम तशी ही, नवीच तीही खरी

सुख भरून वाहे जरी, मन हे दुःखी तरी
आहे उणीव कशाची? उमगे ना हे परी

खुंटून जरी 'संवादी' नुरले शब्दच तुझे,
मौनही तुझे बोलते, साथ तीच सोयरी

स्मृतींची बेटे ज्यांची नव्हती खूणच कधी
तेथून तुझ्या स्वरांच्या झरती कानी सरी

शहरात उजळ दिव्यांच्या नुरल्या वाटा जरी
आयुष्य वणवण शोधे तुज त्या रस्त्यांवरी

निद्रिस्त समस्त वाडा, पहुडे तिमिरावरी
एकली सताड उघडी खिडकी वाड्यावरी

भलत्याच अशा अवेळी उठला तुम्ही कसे?
रात्रीस येतसे जाग शहरी ह्याच प्रहरी

आश्वस्त रहा "नासीर", काळ येईल भला
सोडून खंत बघ, जिणे उरे केवढेतरी

Monday, July 28, 2008

वायफळ सूर

वायफळ सूर (१)


वायफळ सूर (२)


वायफळ सूर (३)


काही निवांत क्षणांना हे जाणीव‍े-नेणीवेमधले वायफळ सूर कानांमध्ये रेंगाळतात. तसेच तेव्हाही रेंगाळत होते. घरपरतीच्या वाटेवरती. बँगा भरताना, पाऊस पाहताना, विमानात, धावपट्टीवर विमान उगीच रेंगाळत उभं असताना, विमानतळावर रिकामा बसलो असताना. सगळीकडेच. थेट शहरात पाय ठेवेपर्यंत नि त्यानंतर बरेच दिवस. अन्वयार्थांचे गुंते सोडवण्यात हशील नाही हे लवकरच उमगलं हे बरं झालं होतं. पुष्कळ दिवसांनी "काहीच काम नाही" अशी स्थिती आली की, अशा कामांच्या यादीहीन वेळेला वाटणारं "काहीतरी काम विसरतोय आपण नक्कीच" अशा अर्थाचं उसनं भय सुद्धा चेपलं होतं एव्हाना.

तेव्हाच लहानपणीच्या अलिबागच्या आठवणींत आधीची पिढी दंगली होती. सिनेगॉगपाशी घुटमळणारा वायफळ सूर आत्याच्या अलिबागच्या समुद्राजवळच्या ज्यू कुटुंबांच्या आठवणींशी जुळला. अलिबागचा नॉस्ट॓ल्जिया बालाजी मंदिरासमोर घोळवला जात असताना. तिथल्या प्रत्येक गल्लीच्या, वाड्याच्या, सरकारी इमारतीच्या नि त्या सगळ्यांतल्या साध्या सरळ माणसांच्या काही ना काही आठवणी ऐकून हसताना. त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नव्हतं. नॉस्टॆल्जिया उगाळण्याची ती पहिली का खेप होती त्यांची? पण वाटलं...नॉस्टॆल्जिया किती कालसापेक्ष असतो ना? म्हणजे आपण जगायला लागतो एखादी जागा तिथपासून आपल्या आठवणी सुरु...नॉस्टॆल्जिया हा एक memoryless random variable सारखा प्रकार आहे असा काहीसा साक्षात्कार तिथून घरी परत येता येता झाला.

परत आल्यावर स्टेशन गाठलं तेव्हा त्या चिरेबंदी बांधकामाशी स्पर्धा करणारे काँक्रिटचे स्तंभ दिसले. काही दिवसांनी जेव्हा तो स्टेशनपासून सुरु होणारा उड्डाणपूल नेमका कुठेतरी उतरेल तेव्हा त्याच्याखालचा रस्ता कितीतरी लोकांच्या नॉस्टॆल्जियाचा भाग असणं बंद होऊन जाईल. स्थितीशीलतेचे चोचले वाईटच पण शहर विकासाच्या कुठल्यातरी अचाट कल्पनांच्यापायी हे असे किती रस्ते नॉस्टॆल्जियाचा भाग असणं बंद होणार? हे रस्ते असेच नीरस होत जाणार? तशीच शहरंही त्या अमेरिकन शहरांसारखीच भकास होणार? मग ज्या रस्त्यांवरून मुळात कुणी चालणारच नाही, तिथे पाऊलखुणांचे काळाशी मेळ कसे काय जुळणार? असे काही अतिरेकी प्रश्न मनात आले.

अशा वेळी काय करावं? नॉस्टॆल्जिया हा एक memoryless random variable सारखा प्रकार आहे, ह्या साक्षात्काराचा बोध घेऊन सरळ एखादं शहर पहिल्यापासून परत जगायला लागावं का? आठवणींचं नवीन संचित निर्माण करण्यासाठी? स्तोत्रांत गुणगुणणारे वायफळ सूर खरंच वायफळच. "जे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे" असं स्मरणालाच म्हणायचं? ग्रेसांचे शब्द कधी कुठले संदर्भ घेऊन अर्थपूर्ण होतील हे शोधण्याइतकंच अनाकलनीय सारं. काळाच्या वशात् सगळे रस्ते स्मृतिपथम् जातील याचं भय नाही, ते होणारंच. पण त्या रस्त्यांनी जपलेली मूल्यं? तीसुद्धा? भय का जात नाही त्याच मार्गाने?

सारं उमलून आलेलं निवांतपण कसं वायफळ सूरांसारखं नकळत विरलं. म्हटलं नव्हतं? हा निमिषांचा निमिषांशी निमिषार्धासाठी खेळ!