Wednesday, October 29, 2008

सुसंस्कृत

साप अजून सुसंस्कृत आहेत.

कुठल्याशा इसमानं लोळवलं एकाला
म्हणून अखिल सर्पजातीच्या अस्तित्त्वाचे प्रश्न
त्यांना अद्याप पडलेले नाहीत.
नि तमाम सर्पजातीच्या रक्षणाचा मक्ता कुणीही न सांगता घेऊन
खलनिग्रहणाय पेटून उठण्यासाठी उद्युक्त करणारं
सूडदार विष अद्याप भिनलं नाही त्यांच्यात.
त्यामुळेच असावं
सर्व नाग, घोणस, फुरसे, मण्यार अजगरासारखे पडून आहेत.
कुठल्याशा कल्पनेतील भयाने बिथरून
सर्वत्र फुत्कार करीत फिरण्याची
आपल्या हालाहलाने चराचर जाळून टाकण्याची
प्रसंगी एखाद्यावर दंशप्रहार करण्याची
व हे सर्व करताना आपल्या अंगात भिनलेलं विष
दुसर्‍यांच्याही रोमारोमांत पेरत जाण्याची
त्यांना अद्याप गरज वाटत नाही.

नाही म्हणायला काही नाग आहेत
जे सांगत फिरताहेत सगळ्यांना की
उठा, बिळातून बाहेर या, आपल्या विळख्यात जखडून टाका
ह्या जगातले सगळे व्यवहार.
आताशा असेही सांगतात ते
की आम्हीच शेतीचे तारणहार,
"उंदिर, घुशींना मारणार कोण?
आमच्याशिवाय आहेच कोण?"
बाकी सगळे बाहेरचे
आम्ही इथल्या मातीचे
आम्हांला माराल तर याद राखा
विषाचा आमच्या मान राखा.

पण म्हणून बिळाबिळांतून बाहेर येण्याची
सर्पसृष्टीला अद्याप गरज वाटली नाही.
उद्या आपण रस्त्यावर आलो
तर हेच नागोबा
आपल्या आयत्या बिळात
करतील घरोबा
हे समजण्याएवढी बुद्धी त्यांनी अद्याप शाबूत ठेवली आहे
साप अजून सुसंस्कृत आहेत.

त्यांचं सुसंस्कृतपण फक्त तेवढ्यापुरतंच नाही.
ते बिळात वेटोळे करून बसल्यावरसुद्धा
भूमिगत राहून
हळू आवाजात त्या विखारी नागांबद्दल
सहानुभूती दाखवत नाहीत.
ते त्यांना जराही भीक घालत नाहीत.
ते दिवसा स्वस्थ बसून राहतात.
नि रातोरात उंदिरादी भक्ष्य गिळून
आपलं पोट भरतात
शेताचं रक्षण करतात
नि कर्मण्येवाधिकारस्तेच्या चालीने
उंदीर रवंथ करत
आपापल्या बिळांत सुखी राहतात.
कधी नाहीच मिळाला एखादा उंदीर
तरीही ते
पोटातली आग विष ओकून
वाढवत नाहीत
व ओकून वाया गेलेले विष
जहरी विचारांनी पुन्हा मिळवत नाहीत
ह्याचे श्रेय
त्यांच्या निसर्गतःच नसलेल्या कानांना नसून
निसर्गतःच असणार्‍या अंगभूत लवचिकपणाला आहे
म्हणूनच
साप अजून सुसंस्कृत आहेत.

एरवी समस्त मानवजातीला
नकुलांच्या समान तोलून
त्यांच्याविरुद्ध गरळ ओकणारे
नि पंचमीला स्वतःला ओवाळून घेणारे
हे स्वयंभू नाग
आणि ते आपल्यासारखंच वागून आपल्यापेक्षा सरस ठरू पाहतात
म्हणून त्यांचा मत्सर करणारे
व स्वतःचं गोत्र थेट शिवाच्या नागाशी सांगणारे
काही शिवराळ बोलीचे नाग
जर वगळले
तर समग्र सर्पसृष्टी
आपली विविधतेमधील एकता जपून आहे.
केवळ फणा काढता येतो
म्हणून नागांचे नेतृत्व
सर्पजातीला मान्य नाही.
फण्याच्या धाकाला न डरण्याइतका
निर्भीड बाणा ते अद्याप राखून आहेत.
त्यांचं नशीबही असं थोर की
सर्पराज्याची सत्ता अजगरांच्या हातात नाही.

सामान्य सर्प चार शेतं फिरलेल्या सापांचं नेतृत्व मान्य करतात.
स्वसंरक्षणासाठी लाभलेल्या उपजत शक्तींवर त्यांचा विश्वास आहे.
त्यांना विषाचं उसनं अवसान आणावं लागत नाही.
एखादा मण्यार शेतात आला म्हणून
घोणस त्याला हुसकावून लावत नाही.
आपल्या विषाचा मान ते स्वतःच राखून असतात
नि आपल्या दंशाचे परिणाम
आपल्या बांधवांना भोगावे लागू नयेत म्हणून ते सतर्क असतात.
जर कळलीच एखादी दुर्दैवी घटना,
आपल्या बांधवाच्या खुनाची
तर दिसणार्‍या प्रत्येक माणसात
त्या अपराध्याचा चेहरा पाहून
पृथ्वी निर्मनुष्य करण्याची
आततायी परशुरामी प्रतिज्ञाही ते करत नाहीत.
क्षात्र उचलून पृथ्वी निःक्षत्रिय करण्यातला फोलपणा कळलाय त्यांना.
ऐकतात कानावर येतं ते
नि असतात काही माणसं
सापाच्या जातीची
असं म्हणून अंतःकरणातील बंधुभावाला स्मरून
त्यांना मोठ्या मनाने माफ करतात.
फार कमी उरलेत विषारी त्यांच्यात.
त्यांच्या विषाची लस
विष उतरवते,
भिनवत नाही.
त्यांचा एकूणच प्रवास विष उतरविण्याकडे आहे,
कदाचित म्हणूनच,
साप अजून सुसंस्कृत आहेत!

13 comments:

  1. succinct and effective :) mastach!

    ReplyDelete
  2. starmajha blog spardheteel yashabaddal abhinandan! mast blog aahe...

    ReplyDelete
  3. @ मेघना भु., नंदन, केतन, राज, मेघना ओ., प्रितम, अभिजीत, स्नेहल, आजानुकर्ण,

    धन्यवाद!

    ReplyDelete
  4. सुन्दर लिहिले आहेस. पण एक सहज विचार आला; साप सुसंस्क्रूत आहेत, कि अगतिक आहेत? नागांना क्षमा करणे किंवा त्यांच्याबरोबर जाणे यापेक्षा त्यांना स्वतःचे पोट भरणे जास्त महत्वाचे आहे. स्वतःचे बीळ आणि अंडी सुरक्षित आहेत एवढाच विचार ते करतात. काही तर त्याकरिता स्वतःचे शेत सोडुन शहरातही जातात. पण त्यांचा नेता नाग आहे कि अजगर आहे यांच्याशी खरच त्यांना काहि देणंघेणं नसतं. धामण मण्यार सापास माफ़ करते, ते ती मोठ्या मनाची आहे म्हणुन नव्हे तर तिला ठाउक आहे कि तिच्याकडे विषच नाही.
    दंश करणे हा कधीच उपाय नसतो; पण एवढेच ध्यानात ठेवावे, की बर्याच वेळा नुसता फणा काढला तरी खुप असतो. इसापनीति सांगते त्याप्रमाणे आपण साप आहोत, हे को्णी विसरु नये. शेवटी बलवानाच्या क्षमेला किंमत असते. दुर्बलाच्या नाही.

    ReplyDelete
  5. निनाद,

    तुझा धामणीला विष नसण्याचा मुद्दा बरोबर आहे. मला घोणस अपेक्षित आहे तिथे. मागेच ते लक्षात आलेलं, पण मी बदल केला तो पोस्ट का नाही झाला कोण जाणे? बदल केलाय. तिथे घोणस अपेक्षित आहे.

    धन्यवाद.

    बाकी मुद्द्यांशी जवळपास असहमत.

    "सामान्य सर्प चार शेतं फिरलेल्या सापांचं नेतृत्व मान्य करतात.
    स्वसंरक्षणासाठी लाभलेल्या उपजत शक्तींवर त्यांचा विश्वास आहे.
    त्यांना विषाचं उसनं अवसान आणावं लागत नाही."

    ह्या ओळींत तुला उत्तरं सापडावीत. इथे मी साप कोणाचं नेतृत्व मान्य करतात ते स्पष्ट केलंय नि त्यात त्यांच्या नेतानिवडीच्या सजगतेबद्दलचा मुद्दा स्पष्ट आहे, त्यामुळे तुझा तो मुद्दा नेमका पटला नाही. ती सजगता नक्कीच त्यांच्या सुसंस्कृतपणाचा (नि इतरांच्या असंस्कृतपणाचा) भाग आहे. नि प्रश्न आपमतलबी, हेकेखोर, फूट पाडणार्‍या, लादलेल्या नेतृत्वाचा आहे. स्वसंरक्षणासाठी फणा काढण्याबद्दल मी काहीच म्हणत नाहीये. इसापनीतीची ती गोष्टही त्याच संदर्भात आहे, असं मला वाटतं.

    ReplyDelete