...
एक्झिट २८.
शेवटी एकदाची गाडी हो नाही हो नाही करत वाहनांच्या गर्दीत.
निळ्या फोर्डचे आभार आत येऊ दिल्याबद्दल. संध्याकाळच्या पाच वाजता घर सोडलं तेव्हाच वाटलं होतं की, ट्र॓फिक आज जीव खाणार. पण इलाज नाही.
किती वेळ लागेल पोहोचायला आज?
सगळं सुरळित असताना साडेचार तास लागतात. आज पाच?
आत शिरल्यापासून ब्रेकवरचा पाय जसाच्या तसा...
मग थोडा हिय्या करून नि शेजारच्या लेनमधल्या एकदोन गाड्यांना बेसावध गाठून मी सर्वांत डावीकडल्या लेनमध्ये.
एक्झिट २९.
आज बहुतेक सहा तास?....सहा?
बारा पर्यंततरी पोहोचायला हवं. गाडी दोन फूट पुढे.
हवा काय सहिये आज. दिवसभर मळभ नि जोरदार वारा.
थंडी सुरू होणार आता. नि मग बर्फ..
मरो...
आज हवा छान आहे. आत्ताच थोडा पाऊस झालाय. एक पातळसं ज॓केट पुरतंय.
मागची गाडी फारच लगट करतेय. गाडी तर अम्रू दिसतेय, अरेच्चा नि आतला माणूसही. भाऊ, नका फिरत जाऊ फार देसी लोकांबरोबर. कुठून लावून घेतलात हा वाण?
एक्झिट ३०.
अजून इथेच! कठीण आहे. परत जावं का? उद्या सकाळी निघू लवकर.
नको.
दिवस वाया जाईल. आत्ताच जाऊ. काय होईल ते होईल.
पण किती वेळ लागेल! नि फार रात्र होईल डोंगरदर्यांचे रस्ते येईपर्यंत. मग तिथे जंगलात एकटंच भुतासारखं जात रहायचं?
पहिल्यांदा तर जातोय रात्रीचा, कुणी पाहिलंय एकटेच असणारोत हे? आज जाऊन बघू मग पुढच्या वेळेस आपोआपच ठरवता येईल असल्या अडनिड्या वेळेला निघायचं का ते...
बरं...जाऊया पुढे...
अजून वेळ आहे पण मागे जायला...पण असो...
देखूँ जिधर भी इन राहों में
रंग पिघलतें हैं निगाहों में
ठंड़ी हवा है, ठंड़ी छाँव है...
दूर वह जाने किसका गाँव है...
बादल ये कैसा छाया
दिल यह कहाँ ले आया
सपना यह क्या दिखलाया है मुझको..
हर सपना सच लगे, जब प्रेम अगन जले
जो राह तू चले अपने मन की
हर पल की सीप से मोती ही तू चुने
जो तू सदा सुने अपने की...
यूँही चला चल राही....कितनी हसीन यह दुनिया है.....
एक्सिट ३१.
"पाऊस अल्लद
स्वप्नातल्या हिनकळ्या सावलीसारखा"...
एक थेंब, दोन थेंब....काचभर थेंब...
वायपर एकदा इकडून तिकडे...थेंब दूर. पाण्याचा एकसंध हलकासा थर...काच स्वच्छ....वायपर बंद.
एक थेंब, दोन थेंब....काचभर थेंब...
वायपर एकदा इकडून तिकडे...थेंब दूर. पाण्याचा एकसंध हलकासा थर...काच स्वच्छ....वायपर बंद.
चालूच राहू देत की वायपर.
नको. एवढाही नाही पडताहे पाऊस. हे बरंय...
तसं दुसरं काय आहे करण्यासारखं?
खेळत रहा...
...
भरली काच...वायपर...नको इतक्यात....अजून भरू देत...पण समोरचं काही दिसतंय तरी का?
समोरच्या करोलाचे मागचे लाल दिवे दिसताहेत. ह्याहून अधिक काहीही दिसणं गरजेचं नाहीये. नि त्या करोलातही कोणी बघण्यासारखं बसलं नाहीये!....
पानं कसली हिरवीगार आहेत झाडांची....निथळतोय हिरवा रंग....चकाचक....
आत्ताच न्हाऊन ओले केस घेऊन निवांत उभी आहेत...."सोज्वळ मोहकतेने..." टाईप....
फार दिवस नाही उरले...एखादं पान लालसर व्हायला लागलंयसुद्धा...पण झाडाला त्याचं काहीच नाही...क्षमाशीलता कशी भरल्या रंध्रारंध्रांत...
पाऊस कसा अलगद विसावलाय पानांत...दवालाही हेवा वाटेल...
देखो इन्हें ये हैं ओस की बूँदें
पत्तों की गोद में आसमाँ से कूदे
अंगड़ाई ले फिर करवट बदलकर
नाज़ूक से मोती हँस दे फिसलकर...
एक्झिट ३२.
मोरमॉन का काहीसं चर्च...हे लोक टेंपल म्हणतात बहुदा...कोण जातं त्यात हे कोडंच आहे...पण काहीतरी गोपनीय नि एकदम सो हायक्लास प्रकार आहे म्हणतात...ही जमात फार पैसेवाली आहे...ते तर त्या सोनेरी कळसांवरूनच दिसतंय म्हणा...रात्री काय सही दिसतं पण ते.....आत्ताही पावसाळी हवेत कशी स्पेशल वॉशची सफ़ेदी की चमकार डोळ्यात भरतेय...ह्यांच्यासाठी स्पेशल पाऊस पडतो? का आपला चारचौघांसाठी पडतो तोच, श्रीमंती प्रदूषणात विरघळलेला?
गाडी त्याला जाऊन धडकेल सरळ असं वाटतानाच आपण नेहमीसारखे त्या वळणावर....स्पीड लिमिट ५०....कुणासाठी? इथे ५ वर गाडी चालत नाहीये....असो...
बाय द वे....रस्त्याला कसलं बँकिंग आहे....ह्या सर्वांत डावीकडच्या लेनमधून डावीकडे वळताना...बाकीच्या लेनमधली वाहनं घरंगळून अंगावर पडतील असं वाटतंय....ते उल्हासनगरच्या जवळ रेल्वेगाड्या तिरक्या होतात ना वळताना...तितकं जाणवतंय....तरीच असल्या वळणावरही स्पीड लिमिट बरंच आहे...वळणावर असं निवांत थांबलं की कळतं ना एकेक...ते किती अवघड आहे नि ते आधीच कोणीतरी कसं सोपं करून ठेवलंय ते....वळणांवर थांबता आलं पाहिजे...नुसतं वेग कमी करून त्यांना टाळून जाण्यात अर्थ नाही!
अर्रर्र....निळी अ॓क्युरा मध्ये...इतकंही नकोय रमून जायला रस्त्यात...पण ठिक आहे तसाही त्या सोनेरी करोलाचा कंटाळाच आला होता...ही निळाई हवामानाला साजेशी आहे.
एक्सिट ३३.
शहराला कसा वाहनांचा वेढा पडलाय...शहराला विळखा घालून बसलेला हा रस्ता...नि त्यात अजगराच्या शरीरात उंदीर हळूहळू पुढे सरकावा, तितक्याच संथपणे सरकत असलेली वाहनं. रस्ता गिळून तृप्त. म्हणजे रोज ह्या वेळेला वरून स्नँपशॉट घेतला तर शहराला खरोखरीच वाहनांचा वेढा पडलाय असं दिसेल नाही?...पण रस्त्याने गिळलेली वाहनं नि वाहनांनी गिळलेली माणसं...शहरात काय होतंय ह्याबद्दल सोयरसुतक नसलेली. किंवा कदाचित असलेली पण आपली क्रयशक्ती हरवून बसलेली...
शहराला वेढा देऊन बसला असेल कुणी एक, आता ही नोकरी किती दिवस टिकतेय असा घरी जाताना विचार करत...कुणी आजच कदाचित पिंक स्लीप घेऊन घरी चालला असेल. उद्या कुठला रस्ता? असा विचार करत. शहराच्या आत त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी ७० कोटींच्या बळीचा बकरा कोण? ह्यावर काथ्याकूट करत असतील. अरे आज तर पीएम पण आत असतील, सकाळीच न्यूयॉर्कहून इथे येणारेत असं बरखा दत्त म्हणत होती खरी तिच्या च॓नेलवर...कुणाला तरी "उरका आता, निवडणुकीच्या प्रचाराला जायचंय," असं झालं असेल...कुणी तरी म्हणत असेल, "हे काय आणलंय १२३ कराराचं मध्येच....इथे घरचं झालंय थोडं!"..
त्या सगळ्यांना जाऊन सांगायचं...आत्ता एक बातमी आलीय, राजधानीला वेढा पडलाय...रनगाड्यांसारखी धुडं आहेत, ती अमेरिकन बनावटीचीच आहेत...पण जपानी, कोरियन बनावटीची सामग्री भरल्या नुसती. कारण कळत नाहीये. गोंधळ आहे काहीतरी. आपण तर इतक्यात कुठे मोठा हल्ला नाही केलाय, नाही? व्हाईट हाऊस ने सैन्यही आऊटसोर्स केलंय का हल्ली? व्हाईट हाऊस मध्ये पीएम साहेबांच्या ताफ्यातला कुणी गुल्टी अधिकारी चिंतेत पडेल, हे १२३ करार ठिकेय हो. पण आता माझ्या भाच्याकडे कसा जाऊ व्हर्जिनियात? ह्या पुढल्या इलिप्समध्ये एखादं हेलिकॉप्टर उतरवता येईल का हो? त्या मॉन्युमेंटवर न आपटता?
हिहि...
वेड लागलंय का?
अजून तीन मिनिटांत एक्झिट ३४ नाही आलं तर लागेल.
एक्झिट ३४.
इथं का जायचंय सगळ्यांना!...हुश्श...उगीच वाट अडवून बसलेत मागच्यांची...
५, १०, १५, २५, ४०, ५५, ६५...स्पीडलिमिट अधिक दहा...पुरे!
विस्कटलेला ट्र॓फिक...
शहाणपण शाबूत...
उंदीर वेगात पुढे...
बहुदा साडे पाचच तास...
अर्थहीन विचारांच्या वेढयातून सुटका...
एक्झिट ३७.
ब्रेक...
धत्....क्षणभंगुर...हेसुद्धा?
(क्रमशः)
Lilit lekh... faar chhan lihila aahes... ajun vachayla avadel... vaat baghate aahe...
ReplyDeletesundar lekha.
ReplyDeleteameriket nasalyane exit prakaraNa nit kalale nahi
puDhil bhagachya pratikshet
Intresting! Ekhadya ekpatri natka sarkha jhala ahe he. Dusrya praveshyachya pratikshet :)
ReplyDeleteहा हा ...!! सही रे ... ! मागच्या वर्षी वेगसला गेलो होतो ड्राईव करत - थॅंक्स गिवींगच्या वीकेंडला. परत येताना घाण ट्रॅफीकमधे अडकलो. अक्षरशः असेच एक्झिट मोजत येत होतो!! आधी एकदम थंड डोक्याने सगळे बघत - जसे काही ट्रॅफीकमुळे काहीच फरक पडत नाहीए. मग जरा चीडचीड करत - काय आज सगळ्यानाच काय या रस्त्यावर यायचय? कसे मेंढरासारखे चाललोय आपण!? असे कहीतरी त्रागायुक्त प्रश्न विचारत! आणि मग नंतर सगळ्याचीच परीसीमा ... पुर्ण भरकटलेले विचार ... काही करू शकत नाही हे तर माहीत असते ... मग ऊगाच कशावरपण हसत ... कशाची पण चेश्टा करत ... कशाचीपण आठवण काढत ...!!
ReplyDeleteहा हा ... सही मजा आलेली!! सगळ्याची आठवण करून दिलास ... पुढचेही लिहून टाक ... वाट बघतोय ...
क्रमशः? हे कधीपासून सुरू झालं आहे तुझं? त्रिवार निषेध.
ReplyDeleteलिही चल लवकर पुढे. तोवर माझी प्रतिक्रियापण क्रमशः.
Nimish you blog is good. Congratulations for getting first prize.
ReplyDeleteI had also participated in the competetion. I secured consolation prize.
visit my blog
http://madhavithakurdesai.blogspot.com
email: madhavi63@gmail.com
निमिष, आत्ताच ’स्टार माझा’च्या ब्लॉगस्पर्धेचा निकाल समजला. प्रथम क्रमांकाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन!
ReplyDeleteनिमिष,
ReplyDeleteहार्दिक अभिनंदन. पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!
hEY coNGRATS!
ReplyDelete@ माधवी, नंदन, राज, संवेद,
ReplyDeleteअनेक आभार. :)
@ माधवी, नंदन,
तुमचंही अभिनंदन! :)
अभिनंदन!
ReplyDeletecongratulations on this blog ... wonderful description of I-495.... deserved to be on the top.... keep it up !!!!
ReplyDeleteCongrats. :)
ReplyDeleteगाडी पुढे गेली का नाही? किती वेळ ईथेच!?
ReplyDeleteवा... लेख तर आवडलाच पण त्यातली तुमची "एक्झिट" ची कल्पनाही भन्नाट आहे...
ReplyDeleteबाय द वे तुम्ही माझ्या पोस्टला टाकलेल्या कॉमेंटमध्ये विचारलंय की मी गोरेगांव - माणगांवचा का... मी गोरेगांवपासून तीन किमी वर असणा-या वडगांव कोंड या गावातला :)
तुम्हीही त्याच भागातले आहात का?