तळ्याच्या कोपर्यावर उजव्या हाताला जरा आतल्या बाजूला एक गणपतीचं देऊळ. बाजाराच्या गजबजाटात लपलेलं. या गणपतीला रोज वेगवेगळी आरास. कधी जास्वंद, कधी दुर्वा, कधी नारळ नि असं बरंच काही. रोज वेगळी. नि रोज सुरेख. प्रसाद पण छान मिळायचा. मला त्याचीच मजा. गणपतीच्या मूर्तीबद्दल लिहायला ती एवढी निरखून पाहिलीय कोणी? खरं तर मूर्तींमध्ये काय डावं उजवं करायचं? तसंही गणपतीला येणार्या बोळिंजकरांच्या गणपतीच्या मूर्तींच्या अतीव नाजूक डोळ्यांपुढे बाकी सगळ्या मूर्ती साध्याच!
रस्त्याच्या जेवढ्या अंतरावर हे देऊळ, साधारण तेवढ्याच अंतरावर डाव्या बाजूला त्या भव्य, प्रशस्त चर्चचं प्रवेशद्वार. संध्याकाळी आजीकडून घरी जाताना तिथे जायचा हट्ट. चर्चची काँन्व्हेंट शाळा नुकतीच सुटलेली नि मुलं घरी गेल्यावर शाळांना येणार्या भयाण सुन्नपणामध्ये ऐकू येणारी ती चर्चची पोक्त घंटा. कधी सहा वेळा वाजायची, कधी सात वेळा. ती वाजायची थांबेपर्यंत हलायचं नाही तिथून. आत गेल्यावर कुठल्याही चर्चमध्ये असते तशी उंच, स्तब्ध शांतता. तिथे जाऊन दोन मिनिटं बसायचं. तिथे तसं कुणाचंच कुणाकडे लक्ष नसायचं. कधीतरी फक्त कोणा आजीबाईंचं चेहर्याची ओळख सांगणारं स्मित हास्य. एरवीसुद्धा सणाचं वातावरण असावं असा प्रसन्न चर्च नाताळात, ईस्टरला विशेष सजायचा. मग मी आईबरोबर सार्वजनिक सजावटी बघायला जातानाच्या कुतूहलपूर्ण उत्साहात ती सजावट बघायला तिकडे. त्या सजावटीमधला थेट समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित वृक्षांशी नातं सांगणारा हिरवा रंग, त्याच रंगाच्या झाडांवरचे ते लालबुंद गोळे नि तो आकाशातला तारा. शांत आणि आश्वासक.
चर्च, मंदिरं, मशिदी ह्यांना, तुम्ही जा वा न जा, टाळून जाताच येत नाही नि त्याही कधी टाळत नाहीत. पण जरासंच पुढे गेल्यावर विलक्षण अलिप्तपणे उभी असलेली ती अग्यारी नि मी एकमेकांना नेहमी टाळतच आलो आहोत. आजवर मी कुठलीही अग्यारी आतून पाहिलेली नाही, सिनेमात पण नाही. कशी असेल आतून कुणास ठाऊक? ह्यांच्या स्मशानासारखीच अग्यारी पण एक वैचित्र्यपूर्ण गोष्ट वाटत आली आहे मला. हे लोक मेलेली माणसं कोरड्या विहिरींत टाकतात नि मग गिधाडं येऊन ती खातात ही गोष्ट विज्ञानात गिधाडं अन्नसाखळीत आणि इतर नैसर्गिक चक्रांमध्ये येईपर्यंत माझ्या कधी पचनीच पडली नव्हती. तसाच त्या पांढरट, फिकट पिवळट वास्तूचा विचित्र पण न बोचणारा अलिप्तपणा. तिच्यासमोरचा तो निर्जीव रस्ता मी "वरचा माँब्रिन दादा इथे येतो नि आम्ही पूर्वी ह्याच कोपर्यावर राहायचो" ह्या दोनच गोष्टींवर कापला आहे. बाकी बघण्यासारखं नि सांगण्यासारखं काहीच नाही.
ह्या रस्त्याला पूर्वी फक्त वर्षातून एकदा नवरात्रीच्या नऊ रात्री नि दहा दिवस जान यायची, पुढच्याच चौकात बसणार्या देवीमुळे. त्या चौकात एक हौद होता असं मला काहीसं आठवतंय. अगदीच उथळ. बहुदा घोडे पाणी पित असावेत त्यात. कारण तिथेच टांग्यांचं टर्मिनस होतं. तिथून स्टेशन, स्टेशनहून परत. झापडं लावली नसती तरी नाकासमोर सरळच जावं लागलं असतं. तिथेच नवरात्रात देवी बसते. गेली कित्येक वर्षे ती तशीच नि तितकीच प्रसन्न मूर्ती मी बघत आलोय. दरवर्षी तश्शीच, वाघासकट! धार्मिकतेच्या नावाखालची वैशिष्ट्यपूर्ण राजकारणी अशी पैशांची उधळण मी सर्वात प्रथम तिथेच पाहिली. आता ह्यांच्या देवीसारखी जत्रा त्यांच्या गणपतीला भरते, नि त्यांची हंडी नऊ थरांवर फुटली की ह्यांची दहा थरांवर फुटते. लाखांनी काळ्याचे पांढरे होतात. जीवाशी खेळ करणार्या धैर्यशील चिमुकल्यांचा पराक्रम उभा महाराष्ट्र घरबसल्या थेट पाहतो. त्यांच्या जीवावर आपली कीर्ती दिगंत करणार्यांचा तमाशा डोळ्यांत तेल घालून पाहणार्या मुर्दाड माणसांनी रस्ता अजून एक दिवस जिवंत होतो एवढंच.
(क्रमशः)
खूप छान लागला आहे सूर. वाचता वाचता एक मूड तयार होतो आहे. संथ-शांत-चिंतनशील. निवांतपणे पण निकडीनं लिही.
ReplyDeleteLihi na pudhe....
ReplyDelete@ Meghana,
ReplyDeleteThnx, nakki
@Snehal,
Lihitoy tar...dheer dhar!