सोप्यासोप्याच्या सुलट्या उलट्या किंवा असंच काहीतरी...
Saturday, October 23, 2010
दरवाजा संध्येचा थोडा किलकिल किलकिल झालेला
स्वर त्याच्या सांध्यांचा हलका किणकिण मिणमिण आलेला
भाळाशी ओघळ घामाचा निथळत निथळत आलेला
भुवयांशी येता अडलेला झिरपत झिरपत मुरलेला
बुबुळांना स्वर तो वातीचा कातर कातर दिसलेला
वाराही जातायेताना हळवा हळवा तुटलेला
रात्रीच्या काखी मौनाचा दरवळ दरवळ सुटलेला
तो रोज सकाळी नेमाने लवकर बिवकर उठणारा
सवयीने चूळा दिवसाच्या खळखळ खळखळ भरणारा
देहावर उरल्या रात्रीच्या खाणाखूणा पुसणारा
रात्रीही त्याच्या वर्जिनशा उष्ट्या बिष्ट्या नसणार्या
स्वप्नांच्या निष्ठा रातींच्या कह्यात बिह्यात असणार्या
दिवसा ना डोळा केव्हाही इकडे तिकडे चळणारा
शारीरी स्वास्थ्यासाठी तो सैरावैरा पळणारा
मौनाशी श्वासाश्वासांचा चाळा ताळा केलेला
उकलेचा उकलेशी गुंता उलटा सुलटा केलेला
स्वप्नांनी येताजाताना हल्ला कल्ला केलेला
रस्त्याशी रस्ता पायांचा अडला नडला भ्यालेला
पाण्याशी ओढा पाण्याचा पाणी पाणी झालेला
डोक्याचा गाभा डोळ्यांनी हलका हलका केलेला
जगण्याने रडण्याला अपुला हसता हसता केलेला
तो कसली पर्वा नसणारा लाइफ वाइफ जगणारा
कोणाच्या चिंतांची त्याला चिंता बिंता नसणारा
जगण्याच्या धुंदी मेंदूच्या जागोजागी असणारा
नि तरीही त्याला मद्याचा प्याला प्याला चढलेला
पोटाने ओकार्या करता ओक्साबोक्शी रडलेला
तो ओका ओका कोनाडा भडभड भडभड भरलेला
डोक्याचा ताबा सुटताना डोळा डोळा सुटलेला
3 comments:
hihihi...gammatshir aahe
although I could not understand the poem....it sounds nice...the 'shaili' u have used is very good.
कवितेत खूप अर्थ आहे,शब्दांचा उलट सुलट वापर करून व्यक्तिचित्र उभारण्याचा सुंदर प्रयत्न आहे!
Post a Comment