निमिषा,

Wednesday, April 21, 2010

जोडलेली माणसं तोडण्याच्या संध्याकाळी
हे तोडावं की तुटू द्यावं ह्या यक्षप्रश्नात
मी आरक्त बुडलो असताना
रात्रीचा पडदा ओढण्याची तुला कोण घाई झाली होती.
पडद्याची उघडझाप करून त्या सापळ्यात
जयद्रथाला पकडण्यासारखी चमत्कारिक क्षमता तुझ्यात नव्हती,
तर निदान थोडा धीर धरून वाट पाहायची होतीस -
ह्या निष्प्राण तळ्याकाठी माझ्यात धर्म सर्जतोय का ह्याची.

दुसरा युधिष्ठिर निर्माण होऊ न देण्याचा
द्रोणाचार्यमक्ता तू घेतला होतास काय?

तुझ्या क्रौर्याची कल्पना
तू त्यांचं बॅड लाइटचं अपील उचलून धरलं होतंस
तेव्हाच खरं तर मला आली होती.
नि वॉर्निंग बेलच्या आधीच असा
पेपर हातातून हिसकावून घेताना तर
तू आता कहर केला आहेस.

काळा बाळा, तुला कळतंय का
की सामना अनिर्णित ठेवण्याचा पर्याय
मला उपलब्धच नव्हता ते?
हे अस्ताचे शंखनाद विजयोन्मादाचे आहेत;
ते काही गिरण्यांचे सकाळसंध्याकाळचे भोंगे नव्हेत.
आपलं सर्वसाक्षित्व, अखंडत्व, प्रवाहित्व उमजून
किमान तू तरी
आजचं मरण उद्यावर ढकलणारी
खेळाचे नियम इत्यादीची
ही बाष्कळ चाकोरी
निर्भय होऊन झुगारून द्यायला हवी होतीस.
का तुलाही आता आवडू लागलंय
हे ऑफिस टाइम युद्ध?

दिवसभर
रणावर
हव्या तशा नियमांचे
हवे तसे अर्थ लावून
कधी रोखून, कधी जोखून
कधी आखून, कधी माखून
कधी राखून, कधी चाखून
चक्रव्यूहाशिवायही
नि:शस्त्राला आत घेऊन
मुरारबाजीचं धड होऊन
एकामेकी तुटून पडू
तुटायचंय तर जोडताय कुठे
दिवस येतात सुटे सुटे
पाचा दिवसांचा पाचुंदा
जल्लोषाने बांधूया
जल्लोषाला चिता बर्‍या
रेडीमेड शेकोट्या
शेकोटीला हल्ली तो म्हातारा येत नाही
बाणांच्या खाटेवर निजूनसुद्धा चचत नाही
आम्हांला त्याचे काय? त्याच्या जखमा कोण स्मरेल?
मरायचा तेव्हा मरेल, त्याला हवं तेव्हा मरेल
म्हातार्‍याला जखमा फार,
गोतावळ्याच्या चिंता फार
एकटं एकटं जगूनसुद्धा सगळंच म्हणतो सुटत नाही
बाकीच्यांनी तोडलं तरी सगळंच म्हणतो तुटत नाही

त्याचे हे प्रश्न सोडवत मी इथे निकराने उभा आहे
तो काय गंमत म्हणून?
ते आता माझेही झालेत हे तुला कळू नये
म्हणजे कमाल झाली.
त्या बेफिकीर, सोप्या सोप्या,
गोग्गोड, सुट्या सुट्या
जगाशी सामील झालेल्या तुला
काही गहन प्रश्न आता झेपतील असं मला वाटत नाही.
त्यामुळे तुझ्यावर ते सोपवण्याचं व्यासधैर्य मला होत नाही,
किमान म्हणून तरी
जरा धीर धरला असतास
तर निमिषा, तुला असा कुठे जायला उशीर होत होता?

5 comments:

Meghana Bhuskute said...

** कळ्ळी नाही. पण शब्दांना एक लय आहे असं वाटलं, जी तुझ्या याआधीच्या मुक्तछंदातल्या कवितेला फार करून असल्याचं आठवत नाही.

Samved said...

मला वाटतं मला ही कळाली आत्ता! तू बरेच संदर्भ आणलेस. त्यातले काळाबाळा आणि शेकोटेचा म्हातारा व्यवस्थित बसलेत पण बॅड लाईटवालं कडवं(!) आऊट ऑफ सिंक वाटलं (जर तू लिहीलीस तशी कविता मला कळाली असेल तर!!!)

पण माझ्या दृष्टीनं तू हा स्व-संवाद सुरु केलास ही फार मोठी गोष्ट आहे.

a Sane man said...

ह्या कवितेविषयी थोडं लिहिणं आवश्यक वाटतंय. मला लिहून झाल्यावर आवडलेली कविता "कळ्ळी नाही"ची सार्वत्रिक ओरड ऐकून अगदीच कोसळून पडली. म्हणून हा उपसंहार ---

मैत्री व नात्यांच्या टिकाऊपणाविषयी प्रश्न उपस्थित होऊ लागले की हे असंच रेटत राहायचं, सांभाळत राहायचं की कसं, हे न कळणं काही नवीन नाही. मग जर तसं रेटत नसेल राहायचं, तर ते जोडलं गेलेलं मूळापासून तोडायचं की कालानुरूप आपल्या आपण तुटायची वाट बघत राहायची, हाही प्रश्न पडतो. उत्तरं कधीच सोपी नसतात नि एक प्रथा आहे, काळावर सोपवून स्वस्थ बसण्याची. हे काळावर सोपवणं प्रकरण कालानुरूप अर्थ लावता येणार्‍या महाभारताने "मैं समय हूँ"मधून उदात्त केलं. आजूबाजूला पाहताना कळतं की भलेमोठे गोतावळे असले, तरीही आपण कुठल्याच गोतावळ्याचा अविभाज्य भाग नाही. लोक मुद्दामून हे करतात असंही काही नाही, पण हे होतं. पण ह्याचा त्रासही फक्त आपल्यालाच होतो, कारण लोकांना बेफिकीर, सुट्या सुट्या, सोप्या सोप्या, गोड गोड बाजारात जगण्यासाठी इतक्या उत्तम तर्‍हेने प्रशिक्षित व नियंत्रित करण्यात आलंय, की त्यांना ह्या असल्या प्रश्नांची काहीच पडली नाही. ह्या कॉर्पोरेट गोतावळ्याचं नि काळाचंही काहीतरी मेतकूट असावं. मला त्यामुळेच काळावर सोपवायचं नाही.

काळ जाम रडी खातोय, असं पहिली काही कडवी निकराने म्हणताहेत, नि त्याच्या हवाली करायचं नसताना तो मात्र मला यक्षप्रश्नांना उत्तरणारा युधिष्ठीर होण्यासाठी वेळ द्यायला कबूल नाही. असलं काहीतरी त्रांगडं झालंय. (संवेद, हे सिंक व्हावं). प्रश्न अनिर्णित राहणं हे त्यामुळे काळावरच सोपवणं असल्याने उत्तर मिळेस्तोवर जय नाही. सकाळसंध्याकाळचे भोंगे गेले तरी ९ ते ५ च्या कॉर्पोरेट कचेर्‍यांत काय बदललं? ब्ल्यू कॉलरची जागा व्हाईट कॉलर शोषित मजूरांनी घेतली, एवढंच. पण त्यांना तसं वाटत नाही. त्यांच्या उद्दामपणाला तोड नाही. माझी हार सेलिब्रेट करतानाचा त्यांचा डंका ऐकून काळाला उगाच अजून गिरण्यांचे निरागस भोंगेच स्मरताहेत, की तोही त्या थिल्लर सोहळ्यांत सामील आहे?

’कॉर्पोरेट कल्चर’ अशा गोंडस नावाखाली जे काही नि काहीही चालतं त्यात नि महाभारताच्या युद्धात रोज उठून आपापल्या सोयीने काहीही अर्थ लावून झालेली नाट्यं ह्यांत काय फरक? वीकेंड टू वीकेंडचे जल्लोषसुद्धा कुणाच्या तरी शोषणावरच होतात, असं चित्र सर्वदूर आहे. ह्या सगळ्यात भीष्माच्या व्यथांसाठी टाइम कुणाला आहे?

तेव्हा हे गुंते काळावर सोपवायला मी कबूल नाही. ते मला सोडवायचे आहेत. निदान त्यासाठी तरी सतत पळवणार्‍या ह्या अर्थहीन घिसाटघाईत मीही त्यातलाच एक न होता, अधीर न होता जरा ठहरावं एवढी इच्छा नि अपेक्षा. शेवटचा श्लेष ह्याने सुटावा.

हे काही उत्तरपत्रिकेमधलं संदर्भासहीत स्पष्टीकरण नाही, परंतु कविता आपापली भेटवून घ्यायला हे पुरेसं ठरावं असं वाटतंय.

kshipra said...

he vaachalyaavar kavita bhetali. thanx.

तेव्हा हे गुंते काळावर सोपवायला मी कबूल नाही. ते मला सोडवायचे आहेत. निदान त्यासाठी तरी सतत पळवणार्‍या ह्या अर्थहीन घिसाटघाईत मीही त्यातलाच एक न होता, अधीर न होता जरा ठहरावं एवढी इच्छा नि अपेक्षा. ha vichar aavadala.

Meghana Bhuskute said...

तेव्हा हे गुंते काळावर सोपवायला मी कबूल नाही. ते मला सोडवायचे आहेत. निदान त्यासाठी तरी सतत पळवणार्‍या ह्या अर्थहीन घिसाटघाईत मीही त्यातलाच एक न होता, अधीर न होता जरा ठहरावं एवढी इच्छा नि अपेक्षा.
हे अप्रतिम. पण कविता मात्र तितकीशी पोचली नाही. अनेक शैलींचं मिश्रण असल्यासारखं वाटलं.

Post a Comment

  © Blogger templates Newspaper II by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP