रायटर्स ब्लॉक
Saturday, March 13, 2010
वाहता वाहता एकदा ती धडामदिशी कोसळली
वाहणं-बिहीणं सोडून एक वाईट खोड चिकटली
पाहून तिला पडताना चार जण म्हणाले
पारणं फिटली डोळ्यांची, श्रम सारे निमाले
झिरपत झिरपत जायचं दूर, उरात साठवून उधाणपूर
झोकून देण्या कड्यावरून, दरीकपारी घुमवत सूर
हे सोडून, तिने तेव्हा उंची मोजण्याचा घातला घाट
घुटमळली ती, लोकांनीच मग काठावरती बांधला घाट
लिहिता लिहिता त्याने चक्क समीक्षेचा घाट घातला
त्याच्यामधला कवी मग पॉलिट ब्युरोत दाखल झाला
हिमालय मोजता मोजता सह्याद्री खुजा झाला
'रायटर्स ब्लॉक' म्हणत त्याने कवी थोडा जगवत ठेवला
6 comments:
नाही आवडली. :(
शेवटी माझ्या खो खोची वाट न पाहात लिहीलसं म्हणायचं :) तर आता त्या खोखॊची गरजच काय? नवीन सुरु करु!! आपल्याकडे विषय आहेच :ड (दुर्मिळ मराठी मुक्त हास्य)
कविता अपूर्ण राहीली असं वाटतय. पहील्या आणि दुसऱ्या कडव्यांमधला सांधा निखळलाय असं का वाटतय?
@ प्रशांत,
अर्रर्र... :( नेमकी का नाही आवडली ब्वा? (कारण असलंच पाहिजे असं काही नाही, तरी पण.)
@ संवेद,
दुर्मिळ मराठी मुक्त हास्य.... खिखिखि! :)
सांधा - हो? मला वाटलं, न वाहता साचलेल्या नदीचं रूपक पुरेसं स्पष्ट होतं, अजून सोपं नाही केलं म्हणून. फश्या बहुतेक :(
अपूर्णता - जरा (जरा काय अतीच) trivialize केलाय मुद्दा म्हणून वाटतंय का? पण ना हे पूर्ण नसलं तरी, हे आहे, एवढंच म्हणायचं होतं मला. ह्या नसण्यालाच ते समग्रता का काय म्हणतात काय? नि "such" म्हणजे काय कळेपर्यंत मी थोडं राखून ठेवलंय :P
@ a Sane man,
का नाही आवडली ते नेमकं सांगणं अवघड आहे.
दोन मुद्दे स्पष्ट जाणवतात ते म्हणजे
१. संवेद म्हणतो तसं "सांधा निखळल्यासारखं वाटतंय".
एकाच वृत्तातल्या दोन स्वतंत्र कवितांची कडवी एकाखाली एक लिहिल्यासारखं वाटतंय. किंबहुना दोन्ही कडव्यांना वाढवून दोन स्वतंत्र कविता होऊ शकतील.
२. छंदबद्धतेतून येणारी नैसर्गिक तालबद्धता, नादमयता, मुक्तछंदात नसल्यामुळे मुक्तछंदात खूप काळजी घ्यावी लागते. पहिल्या कडव्यात "झिरपत झिरपत जायचं दूर,...." ही ओळ मस्त आहे. एकंदरीत पहिल्या कडव्यात हे बऱ्यापैकी जमलंय. पण,
दुसऱ्या कडव्यात लोच्या झालाय. आणि तो पहिल्या कडव्यातल्या सौंदर्याला बाधा आणतोय. नेमका काय प्रॉब्लेम आहे ते नाही समजत नाहीये. पण कुठेतरी काहीतरी कमी पडतंय. तुझ्याच शब्दांत सांगायचं तर ते "ध्रुवासारखं सहज उमटत नाहीये" आणि "लोणच्या सारखं मुरलेलंही नाहीये".
मी जरा जास्तच टीका करतोय असं वाटेल कदाचित, पण somehow मला नाही आवडली ही कविता. :(
@संवेद,
:D चा :ड केलायंस खरा. पण "दुर्मिळ मराठी हास्य" असल्यामुळे "ड" ऐवजी "ह" असायला हवा होता. नाही का? ;)
फतवा काढा रे कोणीतरी..... :ह
@ प्रशांत,
जरा उशीरानेच उत्तरतोय ---
दोन्ही कडव्यांना वाढविण्याची सूचना पूर्णत: अमान्य. ती कडवी एकाच संपूर्ण कवितेची भाग आहेत. शिवाय ती आपापल्या जागी अर्थवाही आहेत.
मला दुसर्या कडव्याला ओघ नाही, हेदेखील तितकसं मान्य नाही. मुळात मला मुक्तछंदाला हे छंदोबद्धतेला लागू होणारे निकष लावणंच मान्य नाही.
मला अजूनही त्या दोन्ही कडव्यात काय तुम्हांला अर्धवट वाटतंय कळत नाही. शिवाय मी म्ह्टलं तसं, पहिल्या कडव्याचं रुपक पुरेसं स्पष्ट व्हायला हवं दुसरं वाचल्यावर.
Post a Comment