आमचाही अग्रलेख

Tuesday, November 10, 2009

राजपूर्व ४६ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्रराज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील कालचा दिवस सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवला पाहिजे. (आम्ही इ.स. २००६, मार्च ही राजकालगणनेची सुरुवात विकीपिडियाच्या आधारे मानली आहे. हे कुठेतरी कोणीतरी कृपया नोंदवून ठेवा. उगाच ४०० वर्षांनंतर तारखा-तिथींचे अनौरस गोंधळ नकोत.) उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी राज्यांच्या विधिमंडळांत होणारे देदीप्यमान सोहळे मुंबईतही होताना पाहून आम्ही धन्य जाहलो. तेथील आमदारांनाही लाजवेल असा मराठीजनांचा आविष्कार पाहून आमची छाती अभिमानाने भरून आली आहे. ‘अब दिल्ली दूर नहीं’ हा राष्ट्रभाषेत वाटणारा विश्वास लपवून आम्ही ‘घोडा मैदान जवळ आहे’ असा राज्यभाषेतील विश्वास याप्रसंगी जाहीर व्यक्त करत आहोत. ह्या विश्वासाचे पानिपत होऊ नये अशी श्रींनी इच्छा ठेवल्यास बरे होईल. "श्शी! एक जण हिंदीत बोलायला कबूल नाही. नुसतं तमिळ. त्याचं आम्हांला कळेना नि आमचं त्याला. नुसता सावळा गोंधळ. नि सगळ्यांना येत नाही, असं नाही हं. पण डामरटपणा बघा, मुद्दामून बोलत नाहीत." अशी वाक्यं मराठी व महाराष्ट्राबद्दल दिल्लीत बोलली जातील, तो सुदिन उजाडण्याची आम्ही चातकासारखी वाट पाहत आहोत. कालनंतर मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता इत्यादींच्या उज्ज्वल भवितव्याची आम्हांला खात्रीच पटली आहे. ह्याहून अधिक स्पष्ट शब्दांत आम्हांला आमचा आनंद व्यक्त करता येणार नाही. महाराष्ट्रातील तमाम संपादकांना तो इतक्या स्पष्ट शब्दांत का व्यक्त करता येऊ नये, ह्याचं आम्हांला आश्चर्य वाटतं. म्हणजे ते कुणासाठी मनसेला मारल्यासारखं करतात, हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे. आधी उगाच ताकाला जाऊन भांडं लपवायचं नि मग मनसेच्या आमदारांनी मराठी असून अडचणीचे प्रश्न विचारल्याबद्दल जाब विचारला की भोकाड पसरायचं, ह्याला काय अर्थ आहे?

बिच्चार्‍या शिवसेनेचं कसं होणार, असे लांब चेहरे आम्हांलाही करता येतील. दहशत, राडे अशा प्रकारांना आमची ना नाही, पण ते आम्ही करू, तुम्ही काय म्हणून? असा सूर आम्हांलाही लावता आला असता. पण आम्हांला काही शिवसेनेने राज्यसभेवर पाठविलेलं नाही. म्हणून सर्व प्रकारच्या दहशतीचं आम्ही खुल्या दिलाने स्वागत करतो. एक दहशतवादी द्विपक्षीय व्यवस्था येथे निर्माण व्हावी ह्या व्यापक दृष्टिकोणातून पाहता भारतीय राजकारण योग्य दिशेने जात असल्याचेच ते द्योतक आहे. अबू आझमी हेसुद्धा कसे दोषी आहेत, हे सगळं त्यांनीही कसं मुद्दामूनच केलं, असा उफराटा प्रचार आम्हांलाही करता आला असता. पण राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक फाडू पाहणार्‍या ह्या व्यक्तीचे नि आमचे संघर्षाचे मार्ग एकच आहेत. त्या साधनांशी आम्हांला अशी प्रतारणा करता येणार नाही. त्यांनी केलं तेही योग्यच होतं. मनसेला दिलेल्या संधीबद्दल त्यांचं नि त्याचं सोनं केल्याबद्दल मनसेचं पुन्हा एकदा जाहीर अभिनंदन. आम्ही एका तटस्थ भूमिकेतून नरो वा कुंजरो वा अशीही भूमिका घेऊ शकलो असतो. पण पुन्हा तेच. हत्तीलाही एकाधिकारशाहीचं वावडं नसल्यामुळे उगा त्यांना कशाला मध्ये आणा? रीतसर लोकशाहीच्या र्‍हासाबद्दल आम्हांलाही गळे काढता आले असते. पण आम्हांला हे ‘मनसि एकद्‍ वचसि अन्यद्‍’ असलं जमत नाही. आम्हांला मन से मनसेचं प्रेम आहे व ते आम्ही सरळ मान्य करतो. मनसेचं सभासदत्व घेण्याचाही आमचा मानस आहे. "तुमच्या मानसला मनसे जॉइन करायचंय का?" असं जर त्यांनी आम्हांला विचारलं नसतं, तर आम्ही एवाना ते घेतलंही असतं. पण तरीही आमचा अजूनही मानस आहे. लोकांचा विश्वास बसत नाही. कित्तीही समजावलं तरी. "अरे, वाट्टेल ते करायचं. नाही पटलं, तर धरा नि हाणा. पुढे तर सगळ्या मावळ्यांना बंदूक बाळगायचीही परवानगी मिळते की नाही बघ. काहीच विचार करायचा नाही. नो टेन्शन, मज्जानी लाइफ़. अमेरिकन ड्रीम साकारतंय भौ, आहात कुठे?" असं सांगितल्यावर काहींना ते कूल वाटू लागलंय नि आम्हांला लय गार.

ह्या दिलखुश प्रसंगानंतर आजचा लेख लिहिताना आम्ही भावनेच्या भरात जरा भरकटण्याची शक्यता आहे. अग्रलेख आहे हा, साधंसुधं लिखाण नव्हे, हे भान राखलं पाहिजे आम्हांला. त्यामुळे लोकशाही, स्वातंत्र्य इ. रोजच्या गोष्टी राहू देत; राजकीय भूतभविष्याचा विविधायामी वेध घेतला पाहिजे. अबू आझमी ह्यांना वाचविणार्‍या मीनाक्षीताईंना पाहून राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक सादर करणारे तत्कालीन विधी व न्याय मंत्री आणि त्यांच्याभोवती कडं करून त्यांच्या हातातल्या विधेयकाला अबू आझमींपासून वाचविणार्‍या कॉंग्रेसच्या महिला खासदार आम्हांला आठवल्या. भविष्यात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक येईल तेव्हा ते फाडायला अबू आझमी तेथे कदाचित नसतील, पण जे असतील त्यांना देवाने एवाना सद्‍बुद्धी दिली असेल, असे आम्ही गृहीत धरतो. महिला आरक्षण विधेयक आता तरी विनासायास लोकसभेत मांडता येईल. एकट्या मीनक्षीताईंना पाहून अजून काही महिला आमदार असत्या, तर झाला प्रकार टाळता आला असता काय? असा एक विचार सत्ताधारी बाकांच्या मनात शिरेल व निदान असा विचार करून तरी महिला आरक्षण विधेयक संमत होईल, असे आम्हांस तेव्हा वाटले. (आम्ही तसे पुरोगामी आहोत. प्रश्नच नाही.) पण त्यांनाही धक्काबुक्की करून मनसेने तो युक्तिवाद खोटा ठरविल्यामुळे आम्ही खजील झालो आहोत. पण धुडगूस घालण्यामध्येही मनसेने जपलेली लिंगभाव समानता पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. अशीच जाणीव समाजात रुजण्याची नितांत गरज आहे. मग महिला आरक्षण विधेयकाची जरूरच भासणार नाही. शिवाय विरोधी बाकांवरच जर एवढी जाणीव असेल, तर महिलांवरील अत्याचार हा सरकारला कोंडीत पकडणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होणारच नाही. आबांचं केवढं काम कमी होईल अशाने. आता त्यांना मनसेच्या वाढीमध्ये रीतसर लक्ष घालण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. ह्या प्रसंगानंतर शिवसेनेने हाय खाल्ली नि एकनाथ खडसे हे अनभिषिक्त विरोधी पक्षनेते झाले असे म्हणतात. ह्याची परतफेड म्हणून भाजपा मनसेचे कसे आभार मानतो, हे पाहणे रंजक ठरेल. (मराठी वृत्तवाहिन्या पाहत चला. अशी वाक्यं सहज फेकता येऊ लागतात.) इ.स. २०६० अर्थात राजे ५४ मध्ये महाराष्ट्र राज्याची शताब्दी साजरी होईल, तेव्हा आजच्या दिवसाला तेव्हाचा महाराष्ट्र नवनिर्मित महाराष्ट्राची गुढी उभारली गेली, तो दिवस, ह्या शब्दांत गौरवेल, ह्याची आम्हांस खात्री वाटते.

आमचा एक चिंतनशील मित्र तमाम मराठी वृत्तपत्रांनी ह्या घृणास्पद कृत्याबद्दल एवढे मवाळ अग्रलेख का लिहिले, म्हणून सचिंत दिसला. आम्हांला तर काहीच निंदनीय दिसत नव्हतं. आम्ही आता मराठीच्या फूटपट्टीवर त्याची उंची मोजून पाहणार आहोत. दादरहून पट्टी मागविली आहे. उद्याच्या राड्यांतून लोकल बचावल्या तर उद्याच ती आम्हांस मिळेल म्हणतात. "तुमची मुले इंग्रजी माध्यमांत शिकतात, हे कसे?" असे आचरट प्रश्न पत्रकार का विचारत होते, हेही त्याला उमगेना. ह्या बाबतीत आम्ही त्याच्याशी सहमत होतो, पण का ते आम्हांलाच कळत नव्हतं. म्हणून आम्ही खुलासा मागितला. तेव्हा त्याने पुढील अवतरण दिले. त्यातील विरामचिह्णांचा गुंता तुम्हींच निस्तरा. तो म्हणाला, "ज्याप्रमाणे धर्मनिरपेक्षता व धार्मिक/आस्तिक असणे/नसणे ह्या स्वतंत्र गोष्टी आहेत; स्वत: अधार्मिक असणारे बॅरिस्टर जिना किंवा स्वत:ला नास्तिक म्हणवून घेणारे सावरकर जसं धर्माचं भांडवल करू शकतात; स्वत: अत्यंत धार्मिक असणारे गांधी ज्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष असू शकतात; लोकशाहीची गळचेपी करणारे मुशर्रफ जसे पुरोगामी विचारांचे असू शकतात; त्याचप्रमाणे मराठीतून शिकणे/न शिकणे व मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून सहिष्णू असणे/नसणे ह्याही दोन भिन्न गोष्टी आहेत - मराठी अस्मितेचे भाकड मुद्दे उठवून मराठी शिक्षणाबद्दल ब्र न काढणारी मनसे ढोंगी आहेच; एकूणात मनसेचे वागणे विसंवादी असले, तरी मुद्दा त्यांच्या असहिष्णुतेचा असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या माध्यमाचा नाही; त्यांच्या मुलांनी कुठल्या माध्यमात शिकायचं हे विचारणारे तुम्ही कोण?" आम्हांला शेवटचा खडा सवाल तेवढा लक्षात राहिला. "म्हंजे आमची मुलं इंग्लिश मिडिअममध्ये गेली, तरी चालतील ना?" एवढंच आम्ही क्लिअर करून घेतलं. "मनसेच्या आमदारांच्या मुख्यमंत्र्यांसह सर्वांना एकेरीतून संबोधण्याचा उगम तिथे आहे तर", असं काहीसं तो जाताना पुटपुटत होता.

Read more...

अन्वय

Monday, October 26, 2009

तळ्यावरी हिरव्या तेव्हा
लाटांचे सावट आले
मन हिरवे हिरवे सारे
अन सैरावैरा झाले

कमळावर थेंब निसटला
विस्कटली पिंपळनक्षी
माशाचा श्वास अडकला
ग्रहणाशी चकला पक्षी

वास्तव संयोग सगळे
नियती होऊन हसले
सैरावैरा होण्याचा
मन अन्वय शोधत बसले

धाग्याची टोके जुळली
मध्याशी तुटला धागा
'जैसे थे' सगळ्या गोष्टी
माझा विस्कटला त्रागा

होती ती टोके दूर
की मीच ठेवली दूर?
माझा का हुकला ताल
जुळताना त्यांचा सूर?

अन्वयाचे बाप चकवे
मी सुयोधनाचा अंश
मी सलज्ज साहत असतो
मोकळ्या जटांचे दंश

आंधळ्यास कुठले चकवे?
दृष्टीला डोळस शाप
नि कोमेजण्याचा आहे
उमजल्या फुलांना श्राप

काठांची उत्कट उर्मी
लाटांचे संचित मस्ती
साचल्या तळ्यावर तेव्हा
श्वासांची जिवंत वस्ती

लाटांचे उगम तळाशी
तळेच उन्मळून पडते
नि खोल गढूळ होताना
वाहण्याचे स्वप्न बघते

Read more...

एक‍‍‍टाकी

Sunday, October 25, 2009

मायबोलीच्या ’हितगुज दिवाळी अंक २००९’ मध्ये माझ्या दोन कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. खरं तर त्या एकाच कवितेचे भाग आहेत. त्या दोन स्वतंत्र कविता म्हणून का प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, माहित नाही. संपादकांना तसं उचित वाटलं असावं किंवा काहीतरी तांत्रिक गोंधळ झाला असावा, असं मी गृहीत धरतो. याहून अधिक वाद घालण्याची आवश्यकता नाही. असो. कविता अशी...

एक‍‍‍टाकी

एकटाकी भरण्याबद्दल...

लिहायचं म्हटलं, की असंच होतं
उतरायला हवं, ते उतरत नाही
उतरवू म्हटलं, तर जमत नाही
मनात आणायचंच नाही,
असं कधी ठरवता येतं?
नि येऊन न उतरलेलं
न साचता ठेवता येतं?
मग काय? फक्त वाट
भरेस्तोवर काठोकाठ
मोठ्ठ्या मनाचा मोठ्ठा तोटा
तेवढा वेळ अजून तिष्ठा
एवढा वेळ काय करा?
स्वतःशी झुंजत रहा...
पहा, पहा, भरलं! भरलं!
एक थेंब नि झरलंच झरलं...
थेंब कुठला नि झरतंय कसलं
द्रव कुठलं, पात्रच झरलं!
उतरणार काय नि उतरवणार कोण?
झरणार कोण नि भिजणार कोण?
अशावेळी होतं कसं?
जसं असतं, तसं तसं
रितं रितं
सुटं सुटं

xxx


एका टाकाबद्दल...

कुठलेही कागद आणा
नि धरा काहीही खाली
अन पहा कशी झरझरते
ही माझी स्पेशल झरणी

गुळगुळीत, जाडा, कोरा
ते नकोत किमती नखरे
भरला कागद आणा, ज्या
कंगोरे अनंत कोरे

कोर्‍याला रंग न कुठला
सोवळी शुभ्रता टाळा
रंगेल आतवर शाई
असताच रंग पाण्याचा

मौनाचा कातळ काळा
रगडून मिळवली शाई
ती रंग उषःकाळाचे
मग स्वतः पेरते रात्री

शाईच्या कुठल्या दौती?
ती सरस्वतीची करणी
अडखळते संतत झरते
ही माझी स्पेशल झरणी

प्रथम प्रसिद्धीः हितगुज दिवाळी अंक २००९, दुवाः http://vishesh.maayboli.com/node/679

Read more...

रेषेवरची अक्षरे २००९

Friday, October 16, 2009

नमस्कार,

‘रेषेवरची अक्षरे’ हे ब्लॉगवरील निवडक लेखांचं संकलन आम्ही मागच्या दिवाळीत प्रथम प्रकाशित केलं होतं. यंदा आम्ही ‘रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक प्रकाशित करत आहोत. हे संकलन येथे उपलब्ध आहे.

http://reshakshare.blogspot.com/

कसं वाटलं ते जरूर कळवा!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

:)

Read more...

  © Blogger templates Newspaper II by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP